स्वतःचे अद्भुत जग फिरून त्याचा मनमुराद आनंद घेण्याची आठवण करून देणारा हा लेख खास तुमच्यासाठी.
स्वतःची काळजी घ्यायची!! हा काही विशेष चर्चेचा विषय आहे का बरं… असं काही वाटत असेल तर थांबा आणि हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा
सोशल मीडियावरचे, आई-बाबांवरचे मिम्स किती चपखल असतात नाही? म्हणजे घरातील दोन मजबूत खांब जे घरासाठी, कुटुंबासाठी, आप्तेष्टांसाठी आणि मित्रमंडळींसाठी आयुष्यभर खस्ता काढतात आणि आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा त्यांना निवांतपणा असा मिळतच नाही.
घरातील कोणतीही कर्ती सवरती व्यक्ती अशीच असते. मग ते वडील असो, आई असो, आज्जी आजोबा असो, मोठे काका-काकू किंवा मोठी बहीण भाऊ..
त्यांना कुटुंबासाठी कष्ट घेताना स्वतःचा असा वेळच मिळत नाही. हल्लीच्या युगात सुद्धा स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे खूप मोठी बाब असते.
तरुण पिढी शनिवार रविवारची सुट्टी स्वतःसाठी ठेवतात.. पार्ट्या, पब मध्ये दिवस घालवतात, तिथूनही थकून घरी येतात आणि पुन्हा नवीन आठवड्याला तोंड देतात.
पण खरंच का आपण स्वतःला वेळ देतो? स्वतःला वेळ देणे म्हणजे पार्ट्या झोडणे, कपडे, घड्याळ, परफ्युमची शॉपिंग करणे इतकेच असते का?
हे मान्य आहे की, दोस्तमंडळींसोबत पार्टी करणे, गप्पा टप्पा, छान छान पदार्थ खाणे किंवा पोटभर शॉपिंग करण्यातून आनंद मिळतोच. पण तरीही ह्याला, आपण स्वतःला दिलेला क्वालिटी टाईम नाही म्हणता येणार.
कारण इथे आपण इथे तर आपण स्वतःच्या भावभावनांवर मुखवटे घालून दुसऱ्यांच्या जगात वावरत असतो. मग स्वतःला वेळ दिला, स्वतःची काळजी घेतली असे कसे म्हणता येईल?
जशी आपण आपल्या भवतालच्या सगळ्यांची काळजी करतो, ज्यांची शक्य आहे त्यांची काळजी घेतो तशी स्वतःची काळजी नको का घ्यायला?
अर्थातच घ्यायला हवी… भले आई, वडील, बहीण-भाऊ किंवा बायको-नवरा एकमेकांची काळजी घेत असली तरी आपल्याला स्वतःचा असा वेळ काढून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
स्वतःची काळजी म्हणजे नक्की काय?
आजारी पडल्यावर आम्ही डॉक्टर कडे जातो, औषधे वेळेवर घेतो, वेळच्या वेळी जेवतो. म्हणजे आम्ही स्वतःची काळजी घेतो. असेच ना?
हो, ही अशी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. नुसते डॉक्टरकडे जाणेच नाही तर आजारीच पडू नये म्हणून सकस आहार घेणे, व्यायाम करणे, मेडिटेशन करणे, भावना व्यक्त करणे हे सगळे शारीरिक स्वास्थ्यासाठी करावेच लागेल.
पण याहूनही अधिक जास्ती स्वतःची काळजी घ्यावी. शारीरिक काळजी बरोबर मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्यायलाच हवी.
तुम्ही म्हणाल आम्ही फिरायला जातो, नातेवाईक मित्रमंडळींना भेटतो, सिनेमे पहातो, स्वतः पैसा कमावतो आणि स्वतःवर उडवतो सुद्धा आणि ह्यातून खूप आनंद मिळवतो. म्हणजे झालीच की स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी.
पण फक्त एवढेच करणे म्हणजे सगळे जमले असे नाही.. स्वतःसाठी करण्यासारख्या अजून भरपूर गोष्टी आहेत ज्यातून आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो.
स्वतःची काळजी घेणे म्हणजे भौतिक आनंदातून सुद्धा सुट्टी घेणे. आत्मिक आनंदाकडे वळणे.
ऑफिसमसधून सुट्टी घेतली असेल तर ती सुट्टी स्वतःवर खर्च करा. मग घरात बसून किंवा लोळून काही वेळ एखादा टीव्ही शो बघण्यासाठी का असेना..!! स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःच्या कलागुणांना वाव देताना वेळ आणि पैशांचे बंधन नसणे. जे तुम्हाला आवडतंय ते करायला कोणाचेही बंधन नसणे. चला सुरुवात करूया सेल्फ केअरची:
१. आपल्याला आवडतंय ते करा
आपण कित्येकदा असे निर्णय घेतो जे इतरांच्या मनाप्रमाणे असतात. स्वतःच्या मनाला आपण कायम दुय्यम भाव देतो. पण जेव्हा स्वतःची काळजी घ्यायचं ठरवाल तेव्हा तुम्हाला जे हवय तेच करा. त्या वेळेला इतरांना काय वाटेल त्याचा विचार तुम्ही करू नका. त्यांना जे वाटायचे ते वाटो..
तुम्हाला लोकरीचा स्वेटर विणायचा आहे ना मग तो विणा.. तुम्हाला कोणी रिटायर्ड म्हणो किंवा आज्जीबाई म्हणो. तुम्ही तुमची आवड बिनधोक जोपासा.
मित्रांबरोबर पार्टीला न जाता, एकट्याने घरात बसून पुस्तके वाचायची अशी इच्छा असेल तर तसेच करा. भले कोणीही म्हणू दे की, “किती कंटाळवाणे आहेत तुझे छंद” तुम्ही त्यांची काळजी सोडा..
भिंत रंगवा, वस्तू रंगवा, रांगोळ्या काढा, सिनेमे बघा, जुन्या गाण्यांवर बिनधास्त नाचा अगदी सकाळ पर्यंत. कोणी काही म्हटले तरी स्वतःच्या मनाला काय भावतेय त्याकडे काही वेळ लक्ष केंद्रित करा.
उद्या पासून पुन्हा कामाला जुंपायचेच असते. मग आजचा दिवस माझा.. स्वतःला पुढच्या काही दिवसांसाठी आवडीच्या गोष्टी करून रिचार्ज करा. मात्र हे वारंवार करता आले पाहिजे.
नाहीतर ४ वर्षातून एखादा दिवस असा घालवणार तेही चोरून मग ह्याला काहीच अर्थ नाही. आपला वेळ आपल्यासाठी राखूनच ठेवा. आणि दुसऱ्यालाही त्याचा वेळ त्याच्या साठी काढू द्या..
२. आपल्या भावतालचे जग मनापासून अनुभवा
भवतालच्या जगात इतक्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या निरखून बघूनच तुम्हाला खूप विस्मय होईल.. आपण कित्येक गोष्टींचा अनुभवच घेतला नाहीये अजून ह्याची तुम्हाला जाणीव होईल.
कधीतरी रोजच्या सवयीचे पदार्थ सोडून वेगळाच कोण्या दुसऱ्या प्रांताचा पदार्थ करून पहा.
नेमही रोमँटिक सिनेमे पाहत असाल तर आज एखादा ऍक्शन किंवा अनिमेशनचा सिनेमा पहा.
अचानक प्लॅन बनवा आणि जवळच्या नदीकाठी किंवा किल्ल्यावर सूर्यास्त पाहण्यास जाऊन बसा.
समुद्रकिनारा जवळ असेल तर तिथे जाऊन सूर्योदय पहा. रात्री अंगणात किंवा गच्चीवर जाऊन मस्त चांदणे, तारे किंवा काजवे पहा. जवळपासच्या टेकडीवर किंवा वनात जाऊन वाऱ्याच्या झुळुकेचा आवाज ऐका तिथल्या पक्षांची गाणी ऐका.
हे सगळे अद्भुत आहे.. निसर्गच एक अगम्य गूढ आहे.. त्यात रमणारा माणूस सगळे जग नक्कीच विसरून जातो. स्वतःशी वेगळे नाते निर्माण करतो. एकांतात स्वतःला समजून घेतो..
३. विखारी लोकांपासून आणि विचारांपासून दूर राहा
स्वतःला वेळ द्यायचा म्हणजे त्या सोशल मीडियावर तासंतास घालवू नका. सगळे आभासी जग आहे ते. तिथे जितके मुखवटे आहेत तितके एखाद्या सर्कशीतही नसतील.
राजकारण, धार्मिक तेढ, जातीपातीचे विष देखील त्यावर पसरलेले आहे. जो तो त्या सोशल मीडियावर सुंदर नाती निर्माण करण्यापेक्षा एकमेकांवर चिखलफेकच जास्ती करतो.. अशा जहरी विषयांपासून आणि लोकांपासून काही काळ दूर राहा.
आपल्या नात्यातील, मित्रमंडळातील काही माणसे सुद्धा तितकीच विखारी असतात. त्यांना आपले भले बघवत नाही, आपले वाईट चिंतण्यात ते धन्यता मानतात अशा लोकांपासून सुद्धा ‘मी टाईम’ मध्ये फारकत घ्या.
कितीही जवळची व्यक्ती असुद्यात पण जर त्याच्या वागण्याने किंवा त्याच्याशी बोलण्याने तुम्हाला दुःख, वैताग, त्रास अनुभवास येत असेल तर beware.
जागरूक राहा आणि अशांना चार हात दूर ठेवा. त्याने तुमचे मानसिक खच्चीकरण होत राहील, तुम्ही कायम उदासीन होत राहाल. म्हणून विखारी लोकांपासून सावधान..!!
४. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःला प्रथम दर्जा देणे
जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढायचे ठरवतो त्यावेळी तुमच्या प्रयोरिटीज थोड्या बदला. कबुल आहे, आपल्याला आपले कुटुंब आणि आपली नोकरी ह्या दोन्हीलाच कायम महत्व द्यावे लागते. पण ‘मी टाईम’ मध्ये ‘मी फर्स्ट’ हे लक्षात ठेवा.
कारण तुम्ही स्वतःला आनंदी करण्याचा प्रयत्न करणार आहात. स्वतःला यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहात.. तुमचे मन आनंदी राहिले तरच तुमच्या भवताली वातावरण, माणसे मजेने राहतील.
तुमची लाडकी माणसं तुम्हाला आनंदी पाहून समाधानी होतील. तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत तरच तुम्ही दुसऱ्याची काळजी घ्यायला शिकाल.
त्यामुळे स्वतःला काय हवे नको तेही पहा. स्वतःच्या सगळ्या गरजा पूर्ण करा. ह्यात अपराधीपणाची भावना वाटण्याची गरजच नाही..
तुम्ही दुसऱ्याचे ओरबाडून स्वतःसाठी काहीही करत नाही. सगळ्यांना काय लागेल ते करता मग स्वतःला सुद्धा खुश ठेवणे हे स्वतःचे कर्तव्यच असते.
कोणी तुम्हाला कामापूरते वापरत असेल तर अशांपासून सुद्धा स्वतःला जपा. अशांना जाणवून द्या की तुम्ही त्यांना अजिबात बधणार नाही. तुमचे स्वतःचे आयुष्य तुमच्या टर्म्स वर मनमोकळेपणाने जगा.
मंडळी थोडक्यात काय तर स्वतःला सर्व पाशातून मुक्त करणे म्हणजेच सेल्फ केअर.
स्वतःला कशाने आनंद मिळतो ते करणे म्हणजेच स्वतःच्या मनाची योग्य काळजी घेणे. इतरांबरोबर स्वतःचे मन जपणे म्हणजेच स्वतःची काळजी घेणे.
आपली स्वप्नपूर्ती करायची म्हणजेच स्वतःला समजून घ्यायचे. खरे बोलणे, मनावर दडपण न ठेवणे, मनावरचे ओझे कमी करणे म्हणजेच स्वतःची योग्य काळजी घेणे. सेल्फ केअर म्हणजे आपले आयुष्य छान बॅलन्स करणे.
जो स्वतःवर प्रेम करू शकतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो हे समजून घ्या. म्हणून स्वतःवर प्रेम करणे, स्वतःची काळजी घेणे हे सगळ्यांनीच केले पाहिजे.. आज पर्यंत असे वागणे जमले नसेल तर आजपासूनच सुरू करा. स्वतःला वेळ द्या, आनंद घ्या आणि स्वतःला परिपूर्ण करा..!!
Image Credit: artofliving.org
तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.
आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. हे सांगण्याचे कारण असे कि बरेच वाचक आमच्यावर चिडतात.
कि एवढी चांगली माहिती आहे, आम्ही का इतरांना द्यायची नाही? तर नक्की द्या!! पण कॉपी-पेस्ट करून नाही, तर दिलेल्या पर्यायातून शेअर करूनच…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mast Lihil Aahe Khup 👍