बायकांची सहनशक्ती मुळातच जास्त असते आणि त्यात आपल्या भारतीय स्त्रियांना दुखणी अंगावर काढण्याची सवयच असते.
कधी घरच्या परिस्थितीमुळे, कोणी काळजी करणारं नसतं म्हणून तिच्या तब्येतीची हेळसांड होते तर कधी आपल्या जास्तीच्या सहनशक्तीमुळे त्यात कामाच्या वाढलेल्या व्यापामुळे तिचंच आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं.
आज बघू, उद्या बघू असं करेपर्यंत वेळ हातातून निघून जाते.
काही जणी तर किरकोळ आहे असा स्वतःचा समज करून आपली दुखणी इतरांपासून लवपतात आणि मग सहनशक्तीच्या बाहेर गेलं की जवळच्या कोणालातरी सांगतात मग डॉक्टर, तपासण्या आणि उपचार हे सगळं करेपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.
आपल्याकडे एक म्हण आहे, ‘तहान लागली की विहीर खणू नये.’ आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा किती खरं आहे हे.
दुर्लक्ष करून दुखणं वाढल्यावर डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी काही तपासण्या नियमितपणे, अगदी काही त्रास नसताना केल्या तर?
जर कुठे लहान-मोठं काही दुखणं खुपणं असेलच तर त्याचं अगदी वेळेत निदान होईल.
मग किरकोळ औषधांनी उपचार करता येतील, कधी कधी तर औषधं देखील लागणार नाहीत, व्यायाम, आहारात थोडेसे बदल यानेही फरक पडू शकतो.
मैत्रिणींनो, एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की निरोगी राहण्यासाठी व्यायाम, योग्य आहार, आहेत त्या दुखण्यांवर इलाज, पथ्य याचबरोबर आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे हेल्थ चेक अप.
बहुतेक वेळा काही दुखलं/खुपलं, काही त्रास असेल तरच आपण डॉक्टरांकडे जातो पण तसं न करता आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी नियमितपणे कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत हेच या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
१. PAP Smear Test
सर्व्हायकल कॅन्सरचं निदान करण्यासाठी ही टेस्ट असते. Human Papilloma Virus मुळे हा कॅन्सर होतो. वयाच्या पस्तीस ते पन्नास या वर्षात सहसा हा कॅन्सर होण्याची शक्यता असते पण वीस वर्षांच्या पुढच्या मुलींनी अगदी वर्षातून एकदा नाही तरी तीन वर्षातून एकदा तरी ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
ज्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी याबाबदल आपल्या डॉक्टरशी बोलून या ही तपासणी किती वर्षातून एकदा करायची हे ठरवलं पाहिजे.
२. ब्रेस्ट कॅन्सरसाठी तपासण्या
ब्रेस्ट कॅन्सरसाठीची जी सेल्फ एक्सामिनेशन टेस्ट असते (म्हणजे घरच्याघरी आरशासमोर उभं राहून दोन्ही ब्रेस्टचं निरीक्षण करून कुठे गाठी नाहीत ना, कुठे फुगीर नाही ना, इतर काही बदल नाहीत ना) हे प्रत्येक वयात आलेल्या मुलीनी महिन्यातून एकदा तरी करायला पाहिजे.
हे सेल्फ एक्सामिनेशन नक्की कसं करायचं? काय काय बघायचं?
बदल झालेले कसे ओळखायचे याबद्दल मोकळेपणाने आपल्या स्त्रीरोग तज्ञांशी बोलायला हवं.
साधारण चाळीशी नंतर दर वर्षी मॅमोग्राम नावाची तपासणी प्रत्येक बाईने करायची असते.
यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं वेळेतच निदान होतं. ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल त्यांना कदाचित त्यांचे डॉक्टर ही तपासणी वर्षातून दोनदा किंवा अधिक वेळा सुद्धा करायला सांगू शकतात.
अशा फॅमिली हिस्ट्री असलेल्या बायकांना, ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो त्यांना काहीवेळेला जेनेटिक टेस्ट सुद्धा करायला सांगतात.
BRCA १ आणि BRCA २ या दोन जनुकांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो.
एखाद्या बाईमध्ये ही जनुकं आहेत का ते या जेनेटिक टेस्टमध्ये कळतं.
त्यानुसार मग अशा बायकांना योग्य ती काळजी घ्यायचा सल्ला डॉक्टर देतात.
३. कोलेस्टेरॉल टेस्ट
वयाच्या साधारण तिशीनंतर सगळ्याच बायकांनी वर्षातून एकदा कोलेस्टेरॉलची टेस्ट केली पाहिजे.
आजकाल आपल्या आहारात खूप बदल झाला आहे, प्रोसेस्ड फूड, जंक फूड याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे अर्थातच कमी वयातच कोलेस्टेरॉलचा त्रास सुरु होऊ शकतो.
वयाच्या चाळीशी नंतर मात्र याबद्दल जास्त सतर्क राहण्याची गरज असते कारण हृदयविकारांचा धोका वयाबरोबर वाढत जातो.
ज्यांना हृदयविकारांची फॅमिली हिस्ट्री आहे अशांनी वर्षातून दोनदा तरी ही टेस्ट करावी आणि त्यानुसार आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४. ब्लड प्रेशर
खाण्याच्या बदलेल्या सवयीमुळे ब्लड प्रेशर, म्हणजेच हायपर टेन्शनचा त्रास मागे लागू शकतो.
पण त्याचबरोबर सतत काळजी आणि चिंता करून सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं.
बहुतेक बायकांना सारखी कसलीतरी काळजी करण्याची सवय असतेच आणि त्यामुळे ब्लडप्रेशरचा धोका जास्त असतो.
म्हणूनच वर्षातून दोनदा ते तीनदा डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर तपासून घेणं गरजेचं असतं.
५. डोळ्यांची तपासणी
ज्यांना आधीपासूनच डोळ्यांचा नंबर आहे त्यांनी तसाही वर्षातून एकदा डॉक्टरांना भेटून, काही त्रास असेल तर त्याबद्दल बोलून, नंबर वाढला आहे का हे तपासून घेणं अपेक्षित असतं.
चाळीशी नंतर डोळे कमकुवत होत जातात, त्यामुळे त्यानंतर तर डोळ्यांच्या तपासण्यांना जास्तच गंभीरपणे घ्यायची गरज असते.
ज्यांना जास्त वाचनाचं किंवा कॉम्पुटरचं काम असतं अशांची विशेष काळजी घ्यावी.
काहींना कॅटरॅक्ट, ग्लावकोमा याची फॅमिली हिस्ट्री असते, अशांनी सहा महिन्यातून एकदा डोळे तपासून घ्यावेत.
ज्यांना डायबेटीसचा त्रास असतो त्यांनी सुद्धा वर्षातून दोनदा डोळे तपासून घेतले पाहिजेत.
६. दातांची तपासणी
रोज घरी दात घासताना कोणता दात किडला आहे का हे तर बघावंच, पण वर्षातून एकदा दातांच्या डॉक्टरांना दात दाखवून, क्लिनिंग करून घेणं कधीही चांगलं.
कदाचित आपल्याला लक्षात न आलेली एखादी दातांची समस्या डॉक्टरांच्या लक्षात येऊ शकते आणि पुढचं दुखणं टळू शकतं.
दातांची दुखणी फार वेळखाऊ आणि खर्चिक सुद्धा असतात त्यामुळे दुखणं सुरू झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा नियमितपणे क्लिनिंग करून घेणं हे कधीही हिताचंच, नाहीका?
७. शुगर
वाढता स्ट्रेस, जेवणाच्या अनियमित वेळा, आहारात जंक फूडचा समावेश यामुळे डायबेटीसचा धोका अगदी तिशी किंवा पस्तीशीतच सुरु होऊ शकतो.
वर्षातून एकदा शुगर तपासून घेतली तर डायबेटीसचं निदान वेळेतच होऊ शकतं आणि आहारात बदल करून, व्यायाम करून तो आटोक्यात आणता येतो.
हीच तपासणी जर डायबेटीसची लक्षण दिसायला लागल्यावर केली तर आयुष्यभरासाठी गोळी मागे लागण्याची शक्यता असते.
ज्यांना डायबेटीसची फॅमिली हिस्ट्री असते, ज्यांचं वजन जास्त असतं (खासकरून पोटाचा घेर) अशांनी या टेस्टबद्दल जास्त सतर्क राहण्याची गरज असते.
८. गुदद्वाराच्या कॅन्सरची तपासणी
साधारण पन्नाशी नंतर दर वर्षी ही तपासणी बायकांनी करावी.
सगळ्यांनाच नाही पण ज्या बायकांना या कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री असते अशांना काहीवेळा डॉक्टर काही वर्षातून एकदा कोलोनोस्कोपी करायचा सुद्धा सल्ला देऊ शकतात.
९. त्वचा
ही खरंतर घरच्याघरी करायची तपासणी आहे.
त्वचेवरचे बदल आपण घरच्या घरी बघत असतोच. जर त्वचेवर खूप प्रमाणात नवीन तीळ येत असतील, जुन्या तीळाचा रंग बदलत असेल किंवा त्यात इतर काही बदल जसं की तो फुगीर होऊन त्यावर केस येणं हे बदल जाणवले तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायची गरज असते.
याचबरोबर कधी कधी काही बायकांच्या चेहऱ्यावर खूप प्रमाणात केसांची अचानक वाढ होऊ लागते.
त्यावर उपाय म्हणजे कोणत्यातरी कॉस्मेटिक प्रॉडक्टच्या मागे लागणं नव्हे तर ताबडतोब स्त्रीरोग तज्ञाकडे जाणं.
कारण हे PCOSचं महत्वाचं लक्षण आहे आणि याचा वेळेतच उपचार नाही झाला तर त्याचे भयंकर गुंतागुंतीचे त्रास होऊ शकतात.
मैत्रिणींनो, या लेखाचा हेतू म्हणजे वेगवेगळ्या रोगांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्रासाची माहिती देणं हा नसून तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जागृत करणं हा आहे.
स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे तुम्हाला पटवून देण्यासाठी हा लेख आहे.
कारण आपण फिट असू तरचं आपल्या परिवाराला फिट ठेऊ शकू.
हा लेख वाचून तुम्हाला काही महत्वाच्या हेल्थ चेकअपबद्दल माहिती मिळाली असेलच, यातल्या काही तुम्ही आधीपासूनच करत असाल तर काही हा लेख वाचल्यावर करायला घ्याल, हो ना?
हा लेख वाचणाऱ्या मित्रांनो, या तपासण्याबद्दल तुम्हीही सतर्क होऊन तुमच्या आई, बहीण, बायको, वाहिनी या सगळ्यांना याचं महत्व पटवून देणार ना?
हा लेखाचा हेतू, डॉक्टरांचा व्यवसाय वाढवण्याचा नसून, आरोग्याबद्दल जागृती वाढवण्याचा आहे. म्हणजे आजार आवाक्यात असे पर्यंतच त्यावर उपचार होऊ शकतील.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उपलब्ध करून दिलेल्या पर्यायातून लेख शेअर जरूर करावा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.