कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते. अशीच तुमचीही बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी असेल. तुमच्याही काही कल्पना अश्याच तुम्ही सत्यात उतरवल्या असतील. तर हा लेख खास तुमच्यासाठी.
मिल सके आसानीसे उसकी ख्वाहीश किसे है|
जिद तो उसकी है जो मूकद्दर मे लिख्खाही नही||
दक्षिण स्वीडनच्या एका छोट्या गावातल्या मुलाची हि अविश्वसनीय कहाणी…..
एका गरीब शेतकऱ्याच्या घरात २६ मार्च १९२६ साली इंग्वारचा जन्म झाला. गरिबी इतकी की, शेतीबरोबर जंगलातून लाकूड कापून आणून ते विकून जो पैसा जमेल त्यातून घर चालवण्याशिवाय गत्यांतर नव्हतं.
घरातला प्रत्येक जण काहीना काही काम करून घरखर्चात हातभार लावत होता. हे बघून इंग्वारला पण लहानपणापासूनच छोटी छोटी कामं करत राहण्याची सवय होती.
जेव्हा शाळेत जायला लागला तेव्हा इंग्वारला डीसलेक्सिया असल्याचं लक्षात आलं. घरच्या गरिबीमुळे मुलाच्या आजारावर लक्ष देणं हे इंग्वारच्या वडिलांच्या गावीही नव्हतं. इंग्वारला शिकवलेला अभ्यास समजून घेणं काही केल्या जमत नव्हतं. सकाळी उठून नीट दिनक्रम सुरू करणे वगैरे गोष्टी तर त्याच्या समजेच्या पलीकडच्या होत्या.
इंग्वारचे वडील त्याला नेहमी त्याच्या वाईट सवयी, आळशीपणा, अभ्यासात दुर्लक्ष या कारणांसाठी घालून पाडून बोलत. तो आयुष्यात काहीही करू शकणार नाही असाच त्यांचा समज होता. यामागे नक्कीच त्यांचा हेतू काही वाईट नव्हता.
मात्र हळूहळू इंग्वारला या गोष्टी खुपू लागल्या. त्याला त्याच्या वडिलांना दाखवून द्यायचं होतं की मी सुद्धा काहीतरी करू शकतो.
रोजचं बोलणं ऐकून इरेला पेटलेल्या इंग्वारने एक दिवशी ठरवलं की आता उद्या सकाळी लवकर उठायचंच आणि सकाळी ५ वाजेचा गजर लावून त्याने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली.
अभ्यासात मागे असलेल्या इंग्वारने स्वतःच्या मनाशी पक्क ठरवलं की इतर वर्गमित्र करतात त्यापेक्षा जास्त अभ्यास केला तर मी का अभ्यासात कोणाच्या मागे राहील!!
६ वर्षांचा इंग्वार फावल्या वेळात वडिलांबरोबर जंगलात सुद्धा जाऊ लागला. अभ्यासात मागे असणाऱ्या इंग्वारची कल्पनाशक्ती मात्र अफाट होती.
जंगलातुन येताना वेगवेगळ्या आकारांची छोटी छोटी लाकडं तो आणू लागला. आणि त्यापासून छोट्या छोट्या वस्तू बनवणं त्याने सुरू केलं.
आणि त्या वस्तू शाळेत मुलांना विकून आपला पॉकेटमनी स्वतः मिळवायला त्याने सुरुवात केली. आणि या कामात त्याला मजासुद्धा येऊ लागली.
लहान वयातच तो पैसे कमावण्याचे आणखी मार्ग काय असू शकतील असे विचार करू लागला. वडिलांनी बनवलेल्या लाकडी सायकलवर आपल्या जवळपासच्या लोकांना माचीस विकायला जाणं हाही त्याचा आवडीचा उद्योग बनला.
दहा वर्षांचा होईपर्यंत वडिलांनी त्याला सायकल घेऊन दिली. आणि मग सायकलवर जाऊन तो माचीस विकू लागला. मग त्याला कळलं की स्टॉकहोम हुन माचीस होलसेल मध्ये मिळतात. तर माचीस तिथून आणल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवता येईल.
मग स्टोकहोमला असलेल्या एका नातेवाईकाच्या मदतीने त्याने होलसेल मध्ये माचीस आणून त्या विकल्या. मग हळूहळू त्याने इतर डेकोरेशन च्या वस्तू, बॉलपेन हेही विकायला सुरुवात केली.
त्या काळात बॉलपेन नवीनच होते. आता खप चांगलाच वाढला होता म्हणून होलसेलची खरेदी वाढवण्यासाठी त्याने बँकेतून ६३ डॉलरचे लोन घेतले.
हे त्याच्या आयुष्यातलं पाहिलं आणि शेवटचं लोन होतं. त्याचा लुटुपुटीचा व्यवसाय मोठा व्हायची हि एक सुरुवात होती.
सामान भरण्यासाठी त्याने घराजवळच झोपडीसारखी छोटी जागा केली. याबरोबरच त्याचं शिक्षणही चालू होतं.
सतरा वर्षांचा झाला तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी वडिलांनी त्याला काही पैसे दिले. पण आता शिक्षणापेक्षा इंग्वारला धंद्यांतच रस होता. वडिलांकडून मिळालेले आणि स्वतः जमवले पैसे आणि लहानापासून मिळवलेला अनुभव एवढं आता त्याच्याकडे भांडवल होतं.
आता त्याने मेल ऑर्डर बिजनेस करायचा विचार केला. त्या वेळी हा विचारच इनोव्हेटिव्ह होता. त्याने काही रोजच्या उपयोगातल्या आणि डेकोरेशनच्या लाकडी वस्तू बनवणाऱ्या दुकानदारांच्या भेटी घेतल्या.
आणि त्यांच्याकडच्या सामानाचा कॅटलॉग बनवला. यात सुरुवातीला फोटोफ्रेम, पर्स, बॉलपेन यासारख्या कित्येक छोट्या छोट्या वस्तूंचा समावेश त्याने केला.
त्या काळात आजच्या ऑनलाईन शॉपिंग सारखाच हा बिजनेस होता. यामध्ये लांबलांब पर्यंत हा कॅटलॉग पाठवून ऑर्डर घेतल्या जायच्या. त्या ऑर्डर पोस्टानेच पाठवून तसेच डाक द्वारे पैसे घेणं असं इंगवारच्या या नव्या धंद्याचं स्वरूप होतं.
चार पाच वर्षात इंगवारच्या या कॅटलॉग मध्ये मोठे फर्निचर सुद्धा शामिल झाले. आणि हळूहळू छोटे छोटे जिन्नस त्यातून तो वगळू लागला.
लोकल सुतारांकडून फर्निचर बनवून घेणे इंगवारला सोयीचे जात होते. त्याला ब्रँड चे रूप देऊन हे समान आता मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये ग्राहकांकडे पोहोचवले जाऊ लागले.
अवाजवी किमती न ठेवता छोट्या मार्जिनवर दर्जेदार काम हे इंग्वारच्या यशाचं गमक होतं. आता कित्येक फॅक्टऱ्या फक्त इंग्वारसाठीच माल बनवू लागल्या.
इंग्वारची ही मोनोपॉली सहन न होऊन ‘स्वीडिश फेडरेशन ऑफ वूड अँड फर्निचर’ ने इंग्वारचा बॉयकोट केला. आणि त्याच्यासाठी माल बनवणाऱ्यांवर बहिष्कार टाकला त्यामुळे इंग्वारसाठी कोणीही काम करेनासं झालं.
पण हार मानेल तो इंग्वार कसा? आता त्याने त्याहूनही स्वस्त काम करणारा पोलिश सप्लायर शोधला. आणि हळूहळू इतरही देशातून सप्लायर मिळवायला सुरुवात केली. आणि इंग्वारच्या कामाचा झपाटा वाढला. १९५३ मध्ये त्याने आपलं पाहिलं शोरूम चालू केलं.
फोल्डिंगचं फर्निचर बनवायची सुरुवात इंग्वारने. ही कल्पनाच त्या काळात लोकांनी उचलून धरली कारण मोठी वस्तू खरेदी करून फोल्ड करून डिक्कीत टाकून सरळ घरी घेऊन जायची हे लोकांना आवडू लागलं.
स्वीडन शिवाय नॉर्वे, डेन्मार्क, पोलंड करत करत पूर्ण युरोपमध्ये इंग्वारने आपले शोरूम्स चालू केले.
आज या माचीस विकणाऱ्या छोट्या मुलाच्या कम्पनीत दीड लाखा पेक्षा जास्त एम्प्लॉयीज काम करतात, ४७ देशात ३७० पेक्षा सुद्धा जास्त स्टोअर्स आहेत.
इंग्वारच्या या कम्पनीचं नाव आहे IKEA. हे नाव त्याने आपलं आणि आपल्या गावाच्या नावाचं आद्याक्षर घेऊन बनवलं होतं. कारण एकदा त्याच्या लहानपणापासून काम करण्याच्या सवयीने त्याच्या शिक्षिकेने म्हंटल होतं की ‘हा मुलगा कधीतरी आपलं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करेल’
मित्रांनो इंगवारची गोष्ट ऐकून पटलं असेल ना!!
की कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते.
अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते.
अशीच तुमचीही बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी असेल. तुमच्याही काही कल्पना अश्याच तुम्ही सत्यात उतरवल्या असतील. या तुमच्या बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी आम्हाला लिहून पाठवा. कारण प्रत्येकजण हा आपल्या आयुष्याचा हिरो असतोच…. बरोबर ना!!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.