तुम्ही लोकांना ‘आवडता’ का? लोकांनी तुमचा ‘आदर’ करावा म्हणून आणि लोकांना तुम्ही ‘आवडण्यासाठी’ तुम्ही काय कराल??
लोकांना तुम्ही आवडता हे जर तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला किती बरं वाटेल ना? साहजिकच आहे? सगळ्यांनाच बरं वाटेल.
लोकांना आपण आवडतो, आणि लोक आपला आदर करतात असं समजल्यावर अंगावर मूठभर मांस चढतं.
विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी सगळ्यांना आवडता आणि लोक तुमचा आदर करतात असं जर असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात.
कारण लोकांनी मान द्यावा असं प्रत्येक बॉसलाच वाटत असतं, पण त्याची वागणूक तशी नसेल तर?? कधीच मिळणार नाही मान.
तुमची वागणूक ठरवते की तुम्हाला मान दिला जाईल का नाही.
तुम्ही लोकांचे आवडते होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग निवडायला लागतात. आणि ते मार्ग तुम्हाला कळले तर तुम्ही लोकांना आवडायला लागाल, लोक तुम्हाला मान देतील.
अगदी डोक्यावर पण घेतील. मी ह्या लेखातून भरपूर काही असे मार्ग तुमच्यापुढे ठेवणार आहोत की ज्याने तुम्हाला मान मिळेल, आणि तुम्ही लोकांना आवडायला लागाल… पण तसं केलं तर…..
मग बघा तर लोकांच्या आवडीचे होण्यासाठीचे कोणते मार्ग आहेत ते.
१:- तुमचं काम तुम्ही करत रहा आणि ते जास्त चांगलं कसं करायचं ह्याच्याकडे लक्ष द्या
तुम्हाला मान मिळावा, आदर मिळावा ह्या साठी एक साधा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही जे काही काम करत असाल ते करत रहा.
ते जास्तीत जास्त चांगलं कसं कराल ते बघा. कोणी आपल्याला मान द्यावा किंवा आपला आदर करावा ह्या गोष्टीकडे बिलकुल लक्षच देऊ नका.
तुमचा वेळ तुम्ही करत असलेल्याच कामात घालवा. ते अगदी मनापासून करा, इतकं की त्या कामातून तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही त्या कामातले मास्टर समजले जाल, इतकं त्या कामात लक्ष द्या.
त्यातून जे काही तुमच्या पदरात पडेल ते जबरदस्त असेल. तुमच्या कामाचं फलित खूप मोठं असेल की कुणी त्याच्याकडे दुर्लक्षच करू शकणार नाही.
करिअर एक्सपर्ट्स च्या म्हणण्या नुसार,
जेंव्हा एखाद्या व्यक्तीला मान मिळवायचा असेल त्या व्यक्तीने आपल्या सहकाऱ्यांना हे दाखवून दिलं पाहिजे की ह्या कामातल्या कितीही अवघड प्रश्नाचं बिनचूक उत्तर माझ्याजवळ आहे, म्हणजेच माझं ह्या कामातलं ज्ञान अगदी परिपूर्ण आहे.
ज्यावेळी तुमच्याकडे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान आहे हे लोकांना जाणवतं ना, तेंव्हा लोकांना तुम्ही आवडायला लागता, आणि आपोआप ते स्वतः होऊन तुम्हाला मान द्यायला लागतात.
ह्याच्यासाठी आपल्या कामात आधी मास्टर व्हा, मान आपोआप मिळायला लागेल.
२:- कोणत्याही बाबतीत उशीर करू नका.
तुम्ही कधीही तुमच्या कामाची सुरुवात ठरलेल्या वेळीच करा. वेळ पाळायलाच पाहिजे असा निश्चय करा.
कामाची सुरुवात असो, किंवा एखादी मिटिंग, कोणतंही काम पूर्ण करून द्यायचं असेल, किंवा कोणाला भेटायचं असेल तर ठरलेली वेळ पाळा.
एक मिनिटं सुद्धा कधीही उशीर होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमची प्रतिष्ठा आपोआप वाढायला लागेल.
३:- त्या त्या प्रसंगाला शोभतील असे चांगले कपडे परिधान करा..
तुम्ही ज्या ज्या प्रसंगासाठी तुमच्या सहकाऱ्यांच्या समोर जाणार आहात त्या प्रसंगांना शोभतील असे चांगले चांगले कपडे परिधान करा.
विचित्र किंवा रंगीबेरंगी कपडे घालणं चुकीचं ठरेल. जे कपडे वापराल ते स्वच्छ आणि नीट नेटके असू द्या त्यामुळे तुमचं वेगळेपण उठून दिसेल.
तुमच्या कंपनीचा ड्रेसकोड असेल तर तेच कपडे घाला, पण घामाने भिजलेले कपडे, घामट चेहेरा घेऊन इतरांच्या समोर जाऊ नका. लोक तुम्हाला गाबाळा म्हणतील, असे कपडे घालू नका.
आणि सगळे ड्रेसकोड मध्ये असतील तर तुम्ही सूट घालून जाऊ नका.
४:- तुमच्या सहकाऱ्यांना सुद्धा आदराची वागणूक द्या.
तुम्ही सगळ्यांचा आदर करा, प्रत्येकाला मान द्या.
मान देताना तुमची पत लक्षात ठेऊन मान द्या. म्हणजे इतरांना मान देताना स्वतःचा स्वाभिमान पण लक्षात असू द्या.
तुम्ही जर बॉस असाल तर तुम्ही घमेंडखोर बॉस आहात असंही वाटू देऊ नका. आणि इतरांना मान देताना तुमचाही मान ठेऊन घ्या.
तुमची छाप ही एक अतिशय गुणी आणि उत्तम माणूस अशी पडेल ह्याची काळजी घ्या.
५:- तुमच्या पसंतीस पडलेल्या तुमच्याच कंपनीतल्या लोकांशी मैत्री करा आणि दुसऱ्या कंपनीतल्या उत्तम लोकांशी सुद्धा मैत्री करा.
काम करताना तुमचे सहकारी, तुमच्या बरोबरीचे लोक ह्यांच्या कामाच्या पद्धती जाणून घ्या.
तुम्हाला कंपनीला पुढे नेण्यासाठी ज्या लोकांची मदत होईल असे लोक हेरून त्यांच्याशी मैत्री करा, मैत्री वाढवा.
त्यांच्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. काही असेही लोक जे तुम्हाला मदत करतील असे मित्र शोधा, भले ते दुसऱ्या कंपनीत काम करत असतील.
मैत्री करा, मदत करा आणि मदत मिळवा. तुम्हाला नवीन कल्पना, योजना कळू शकतील.
६:- तुम्ही एखाद्या सहकाऱ्याची मदत घ्या.
तुमचा वेळ वाचवण्यासाठी, किंवा दुसऱ्या कामाला वेळ देण्यासाठी तुम्ही तुमच्या सहकाऱ्याची मदत घ्या.
मदत घेणे कमीपणा नसून वेळ वाचवण्या साठी तुम्ही ती घेताय, ह्यात तुमच्या सहकाऱ्याला मान दिला जाईल आणि त्याच्याकडून तुम्हालाही काही माहिती मिळू शकेल, जी माहिती तुमच्याकडे नसेल.
७:- तुमच्याकडे जेंव्हा वेळ शिल्लक असेल त्यावेळी, तुम्हाला कोणी बॉस असेल किंवा तुमचा सहकारी असल्यास त्याच्या कामाचा भार हलका करा.
कधी अशी वेळ पण येईल की तुमचा प्रोजेक्ट किंवा तुमचं काम तुम्ही वेळेच्या आधीच पूर्ण केलं तर त्यावेळी तुमच्याकडे थोडा
मोकळा वेळ असेल.
तुम्हाला जर एखादा बॉस असेल तर सरळ त्याला जाऊन भेटा. आणि सांगा की माझ्याकडे आत्ता वेळ आहे, तुमचं जर एखादं काम शिल्लक असेल तर मला द्या, मी ते करीन. तेवढाच तुमचा वेळ वाचेल.
जर बॉस नसेल तर सहकाऱ्याला विचारा, असं त्यांचं काम तुम्ही करून त्यांचा वेळ वाचवला तर तो त्यांच्या कायम लक्षात राहील आणि त्यांच्याकडून तुम्हाला मानाचं स्थान मिळेल.
बघा करून, लोकांना तुम्ही आवडायला लागाल. नोकरी, व्यवसाय कुठेही ह्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.
८:- ऐका, लक्ष देऊन ऐका.
असं कधीही होऊ देऊ नका की ज्यामुळे तुमच्या बद्दल तुमच्या सहकाऱ्यांचा आदर कमी होईल.
तुमचे सहकारी जेंव्हा तुमच्याकडे एखादा प्रश्न घेऊन येतात किंवा काही प्रश्नावरचे उपाय घेऊन येतात त्यावेळी ते तुमच्याशी बोलत असताना त्यांच्या कडे तुमचं दुर्लक्ष होईल किंवा ते बोलताना तुम्ही दुसरंच काही काम करत राहिलात तर त्यांचा गैरसमज होईल, आणि तुम्ही त्यांना काहीच किंमत देत नाही असं त्यांना वाटेल.
त्याचा परिणाम तुमच्या बद्दलच्या त्यांच्या आदर भावनेत होईल. असं होऊ नये म्हणून तुम्ही ते बोलत असताना त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्या.
त्या बोलण्यावर चर्चाही करा, शंका विचारा, म्हणजे तुम्ही त्यांचं म्हणणं नीट ऐकून घेतलं असा अर्थ निघेल.
आणि त्यांना सुद्धा तुम्ही तुमचा वेळ दिला म्हणून बरं वाटेल. आदर कायम राहील.
९:- लोकांच्या ख्याली खुशाली ची चौकशी करा..
व्यवसाय किंवा नोकरी करताना किंवा अगदी घरच्या एखाद्या कार्यक्रमात जे जे लोक तुम्हाला भेटतील, हसऱ्या चेहेऱ्याने, हात मिळवून, किंवा नमस्कार करून त्यांची ख्याली खुशाली विचारा, तब्येतीची चौकशी करा.
ह्या मुळे तुम्ही त्यांना मान देऊन विचारपूस केली असा अर्थ निघतो. ही विचारपूस तुमच्या आदराच्या धाग्यांना आणखी मजबूत करते.
१०- तुमची स्मरण शक्ती चांगली ठेवा, आणि ज्यांना तुम्ही आवडता अशा लोकांच्या वाढदिवसाची यादी तुमच्याकडे ठेवा.
त्यांना सगळ्यात आधी शुभेच्छा पाठवा. जवळच्या लोकांना गिफ्ट द्या. त्यांच्या मुलांची नावं लक्षात ठेवा, त्यांच्या मुलांच्या यशाचे संदेश पाठवायला विसरू नका.
सुट्टीत कोणती प्रेक्षणीय स्थळे बघणार ते विचारा, आल्यावर ट्रिप कशी झाली? काय विशेष आवडलं ह्याची चर्चा सुद्धा करा. त्यांच्या घरगुती कार्यक्रमात हजर रहा.
तुमच्या घरातल्या कार्यक्रमांना त्यांना बोलवा. तुमचे नातेसंबंध कमी होणार नाहीत ह्याची काळजी घ्या.
११:- ज्या लोकांना तुम्ही आवडता, त्या लोकांना सतत तुमच्यावर विश्वास राहील अशाच पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार करा.
हे व्यवहार करताना तुमच्याकडून एखादी सुद्धा चूक होऊ देऊ नका.
एक चूक सुद्धा तुमच्याबद्दल गैर समज निर्माण करू शकते. तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यातली नम्रता अजिबात ढळू देऊ नका.
त्यामुळे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. लोक तुमच्या पासून तुटणार नाहीत.
१२:- तुम्ही सतत तुमच्या सहकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत चला.
तुम्हाला तुमच्या कामात अगदी परफेक्ट व्हायचं असेल तर तुमच्या बरोबरच्या लोकांकडून नेहमी तुम्ही करत असलेल्या कामाचा आढावा घेत चला.
लोकांच्या सूचना, उपाय, ह्यांचा जरूर विचार करा.
तुमच्या बॉस बरोबर सुद्धा सतत मिटिंग घेऊन बोलत रहा. ह्या सगळ्या कामांमुळे तुम्हाला तुमची पुढची वाटचाल अगदी सुकर होत जाईल आणि तुमच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली दिसेल.
तुमचा परफॉर्मन्स वाढत जाईल. आणि हाच तुमच्या लोकप्रियतेचा आधार ठरेल.
जसा लोकांच्या कडून कामाचा आढावा घ्याल तसाच लोकांना सुद्धा काही माहिती पुरवा. काही चांगले उपाय किंवा कल्पना सुचवा.
त्यामुळे लोकांना तुमच्याकडून मदत होईल. आणि एकूण चांगलेच परिणाम तुमच्या कामात दिसायला लागतील.
काही लोकांना सवय असते की आपलं काम झालं की स्वस्थ बसायचं, दुसऱ्याने काही विचारलं तर ते काम माझं नाही. असं म्हणून टाळायचं.
तसं तुम्ही कधीच करू नका. तुम्हाला कोणी कामात त्रासलेला दिसला किंवा टेन्शनमध्ये दिसला तर त्याला जरूर मदत करा.
तो तुम्हाला जास्तच मान द्यायला लागेल. करून बघा लगेच फरक दिसायला लागेल.
१३:- लोकांचे दृष्टिकोन समजून घेऊन त्यांना मान द्या.
नवीन काम हाती घेता तेंव्हा सगळ्या बाजूने विचार व्हावा लागतो. आपण आपला दृष्टिकोन लोकांसमोर ठेवावा, आणि त्यांचा सुद्धा कळून घ्यावा. चांगला वाटला तर त्याचा स्वीकार करून अमलात आणा.
लोकांच्या समोर गुळमुळीत राहू नका. एखादा प्रोजेक्ट हातात घेतला असेल तर तो लोकांना एकत्र बोलवून अगदी ठाम पणे समजून सांगा.
हा प्रोजेक्ट, असं काम झालं पाहिजे, त्यातून हे परिणाम मिळाले पाहिजेत आणि इतक्या दिवसात पूर्ण करायचा आहे असं सहकाऱ्यांना स्पष्ट करून सांगा.
असं करणं मात्र टाळा…
हा प्रोजेक्ट आपण करायचा का? केला तर किती दिवसात पूर्ण करू शकतो, मला आशा वाटते की तो इतक्या दिवसात पूर्ण होईल, जर आपण तसं काम केलं तर. असं कधीच गुळमुळीत बोलू नका. ठाम बोला. आधीच त्याचा पक्का प्लॅन तयार करा, वेळेच्या आधीच पूर्ण करा.
१४:- तुमच्याकडून गॉसिपिंग होऊ देऊ नका.
लोकांच्या कामाच्या पद्धतीवरून एकमेकांत गैरसमज पसरू देऊ नका.
कोणाला पाठीमागून नावं ठेऊ नका, कोणाला दुसऱ्याच्या चुका काढून त्यावर चर्चा करू देऊ नका.
कामाच्या ठिकाणचं वातावरण गढूळ होऊ देऊ नका. आपल्या कामाच्या ठिकाणी लूज टॉक्स करूही नका आणि इतरांनाहि करण्यापासून थांबवा.
ठरलेला प्रोजेक्ट, ठरलेला वेळ, ठरलेलं काम असेल तर उगाच मिटिंग मध्ये वेळ जाऊ देऊ नका. दुसऱ्याचा वेळ अजिबात वाया जाईल असं काही करू नका.
वेळेला महत्व द्या. आपला वेळ फालतू कामात वाया जाणार नाही हे बघा. वेळेची बचत करा.
१५:- “मला माहित नाही” असं वाक्य कधीही तुमच्या तोंडातून येऊ देऊ नका.
लोक तुम्हाला काही प्रश्नावरचे उपाय विचारायला येतील तेंव्हा ते मला माहित नाही असं चकूनही म्हणू नका.
जबाबदार व्यक्ती नेहमी स्वतःकडे भरपूर माहिती गोळा करून ठेवतात. एखादं काम कोण परफेक्ट करेल ह्याची सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे.
अशी माहिती तुमच्याकडे आधीपासूनच असायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्ही लीडर म्हणून ओळखले जाता.
१६:-तुमच्या सहकाऱ्यांकडून जर म्हणावे तसे चांगले सहकार्य मिळत नसेल तर, त्यांच्याकडे स्वतः जाऊन त्यांच्याशी बोला.
त्यांच्यावर न रागावता त्यांना चांगल्या सहकाऱ्यांची व्याख्या समजावून द्या. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला त्यांच्याकडून सहकार्य मिळायला लागेल.
काही नवीन लोक जर तुम्हाला योग्य सहकार्य करत नाहीत असं दिसून आलं तर कंपनी पॉलिटिक्स मुळे त्यांच्या करिअरला कसा धोका निर्माण होतो हे हसत खेळत समजावून द्या.
लगेच फरक पडेल आणि तुम्हाला योग्य ते सहकार्य आपोआप मिळायला लागेल आणि तुमचा मान सुद्धा ठेवला जाईल.
१७:- तुमच्या कंपनीच्या प्रगती साठी तुम्ही औद्योगिक सेमिनारला जा.
तिथून कंपनीच्या विकासाच्या कल्पना आणि बाकी मिळालेले ज्ञान आपल्या सहकाऱ्यांना द्या.
त्यांना तसे बदल करायला प्रवृत्त करा. वेळ पडल्यास असे लोक तुमच्या कंपनीत बोलवून त्यांच्याकडून सहकाऱ्यांना ट्रेनिंग द्या.
सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडेल आणि कंपनीचा विकास आपोआप साधला जाईल.
१८:-कोणताही नवीन माणूस तुमच्या कंपनीत आला, तर त्याला तुमची ओळख करून द्या आणि त्याचीही ओळख करून घ्या.
त्याला कोणत्याही बाबतीत काहीही अडचण आली तर तुमच्याशी बोलायला सांगा. भले तो तुमच्या डिपार्टमेंट मध्ये नसेल. ह्यामुळे काय होईल की त्याच्या नजरेत तुम्ही एक जबाबदार लीडर ठराल. आणि पहिल्या दिवसापासूनच तो तुमचा आदर करायला लागेल.
१९:- तुमच्या जवळच्या सहकाऱ्याशी बोला, त्यांना ते उत्तम काम करून कंपनीचा फायदा कसा करून देऊ शकतील ह्या गोष्टींची कल्पना द्या.
त्यांना सतत त्याबद्दल माहिती पुरवत जा.
मोठ्या मोठ्या इ-मेल पाठवण्या पेक्षा स्वतःच एक दिवस त्यांच्या समोर जाऊन बसा. सगळी माहिती द्या.
त्यासाठी अगदी सकाळची वेळ निवडा. त्याच्या कामात विशेष प्रगती दिसायला लागेल.
कंपनीसाठी ते फायद्याचं ठरेल आणि तुमची ही कामगिरी वरच्या दर्जाची होईल.
२०:- तुम्ही हे सगळं करता करता, मीटिंगमध्ये चांगलं बोलायला शिका.
हे बोलायला शिकलात तर तुमचा मान चांगलाच वाढेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये चांगलं बोलायला लागाल. त्यांना तुमच्या प्रोजेक्ट चं प्रेझेंटेशन करा.
तुम्ही आत्मविश्वासानं कंपनीच्या सेमिनार मध्ये लोकांना मार्गदर्शन करा.
ह्याचा परिणाम, तुम्ही एक चांगले लीडर म्हणून ओळखले जाल.
आणि कंपनीचे जबाबदार व्यक्ती म्हणून तुमचा मान सन्मान राखला जाईल. तुमच्याकडे भरपूर ज्ञान येत राहील आणि तुम्ही उत्तम वक्ते म्हणून नावाजले जाल.
तुम्ही जेवढी तुमची प्रगती कराल तसे तसे लोकांच्या अधिक जवळ याल. लोकांच्या आवडीचे वक्ते व्हाल. तुम्हाला ऐकण्यासाठी लोक धडपडतील.
अशा अनेक प्रकारांनी तुम्ही लोकांच्या आवडीचे होऊ शकता. प्रयत्न करा, तुमच्यात ह्या सगळ्या गोष्टी आणण्याचा.
आणि बना लोकांच्या मर्जीतले. यशस्वी लीडर बनण्यासाठी आमच्या ही भरभरून शुभेच्छा बरं का!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.