नवशिक्या लोकांना सहज साध्य होतील अशी ५ योगासने जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
योगासने हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे. योगासनांचे उत्तम आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत हे आता संपूर्ण जगाने मान्य केले आहे. नियमित योगासने करण्यामुळे शरीर आणि मन या दोन्हीचे आरोग्य जपले जाते.
परंतु योगासने सुरू करताना नेमकी कशी सुरुवात करावी? कोणती आसने करावीत? योग शिकवणाऱ्या शिक्षकांशिवाय योगासने करता येणारच नाहीत का? असे अनेक प्रश्न योगासने करायला सुरुवात करताना नवोदित लोकांच्या मनात असतात.
आज आपण ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
घरच्याघरी शिका ही सोपी आसने
योगासने करण्यासाठी एखाद्या तज्ञ योगशिक्षक अथवा योगगुरुचे मार्गदर्शन मिळाले तर ते अगदी फायदेशीर ठरेल यात शंकाच नाही. परंतु जर योगासने शिकण्यासाठी सहजपणे एखादा क्लास लावणे किंवा योगशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणे शक्य नसेल तरीदेखील आपण घरच्या घरी सहजसोपी असणारी काही योगासने करून योगाभ्यासाला सुरुवात करू शकतो.
घरच्या घरी योगाभ्यास सुरू करण्यासाठी खालील आसने फायदेशीर आहेत. ही आसने करायला सोपी तर आहेतच शिवाय ह्यांचे आरोग्याला विशेष फायदे मिळतात.
१. ताडासन
योगासनांपैकी हे एक अगदी सोपे आणि सहज करता येण्यासारखे आसन आहे. नवशिक्या लोकांना योगासने करण्यास सुरुवात करताना, सहसा हे असं शिकवले जाते. सगळी योगासने निसर्गाशी जोडली गेलेली आहेत. ताड ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ पर्वत असा आहे आणि त्या शब्दावरून आलेले हे आसन आपल्याला पर्वताप्रमाणे निश्चल आणि ताठ उभे रहायला शिकवते.
कृती
१. सर्वप्रथम पायात थोडेसे अंतर ठेवून पाठीचा कणा ताठ ठेवून उभे रहावे.
२. त्यानंतर खांदे ताठ ठेवून दोन्ही हात खांद्यांच्या रेषेतून वर न्यावेत.
३. हात वर नेऊन दोन्ही कानांना समांतर राहतील असे डोक्याच्या वर न्यावेत. आणि पुढे नमस्कार स्थिती मध्ये न्यावेत
४. अगदी ताठ आणि निश्चल उभे राहण्याचा प्रयत्न करावा. जणू काही एखादा पर्वतच.
५. काही वेळाने हळूहळू चवडे खाली आणून मग हात खाली आणवेत.
६. हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळणे आवश्यक आहे.
२. वृक्षासन
हे देखील निसर्गातील वृक्षांशी निगडीत असणारे आसन आहे. हे आसन सुद्धा शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी उपयुक्त आहे. या आसनामुळे शरीरातील स्नायूंना आवश्यक असा हलका ताण बसतो आणि ते बळकट होतात.
कृती
१. सर्वप्रथम दोन्ही पायात किंचित अंतर ठेवून मॅटवर उभे रहावे.
२. उजवा पाय जमिनीवर स्थिर ठेवून डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या मांडीला टेकवावा.
३. डाव्या पायाचे पाऊल उजव्या मांडीवर रोवून शरीराचा तोल एका पायावर सांभाळून उभे रहावे.
४. त्यानंतर हळूहळू श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर नेऊन दोन्ही पंजे एकमेकांना जुळवून नमस्काराच्या स्थितीत आणावे.
५. पाठीचा कणा ताठ ठेवून शरीराचा तोल सांभाळून उभे रहावे.
६. काही वेळाने हळूहळू आसन सोडावे.
७. हे आसन पाठदुखी आणि पाय दुखण्यावर उपयुक्त आहे.
३. उत्कटासन
बळकट आणि निरोगी शरीरयष्टीसाठी हे आसन उपयोगी आहे. या आसनामध्ये शरीराची स्थिती खुर्चीवर बसल्यासारखी होत असल्यामुळे इंग्रजीत ह्या आसनाला चेअर पोज असे सुद्धा म्हणतात.
कृती
१. हे आसन सुरू करताना आधी ताडासन करावे.
२. त्यानंतर ताडासनात असतानाच दोन्ही पाय गुढग्यात वाकवून शक्य तितके खाली व्हावे.
३. शरीराची स्थिती खुर्चीवर बसल्यासारखी होईल.
४. त्या स्थितीत काही काळ रहावे. संथ गतीने श्वास घेत रहावे.
५. नंतर हळूहळू आसन सोडावे.
४. भुजंगासन
ह्या आसनाच्या नावात सुचवल्याप्रमाणे हे आसन केले असता शरीराची स्थिती एखादा भुजंग म्हणजे नागाप्रमाणे होते. या आसनामुळे पोट आणि कमरेवरील चरबी कमी होण्यास तसेच पाठदुखी कमी होण्यास मदत होते. इंग्रजीत ह्या आसनाला कोब्रा पोज असे म्हणतात.
कृती
१. हे आसन करताना सर्वप्रथम मॅटवर पालथे झोपावे.
२. पाय एकमेकांना जुळवलेल्या स्थितीत असावेत. पावले जास्तीतजास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करावा.
३. हाताचे दोन्ही पंजे छातीजवळ शरीराला समांतर ठेवून जमिनीवर पालथे ठेवावेत.
४. हाताचे तळवे जमिनीवर रोवून शरीराचा पोटापासून वरचा भाग वर उचलावा.
५. डोके मागे नेत जास्तीत जास्त मागे वाकवावे.
६. शरीराची स्थिती फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते.
७. ह्या स्थितीत काही काळ रहावे आणि नंतर हळूहळू आसन सोडावे.
८. सुरुवातीला ह्या आसनात जमेल तितके डोके मागे न्यावे. हळूहळू सवयीने हे आसन जास्त नीट जमू शकते.
५. सुखासन
नव्याने योग शिकणाऱ्या लोकांसाठी हे महत्वाचे आसन आहे. खरे तर आपण हे आसन एरवी पण बरेचदा नकळत करत असतो परंतु योग करताना प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन ते केले तर त्याचे जास्त फायदे होतात. हे आसन मेडिटेशन करताना केले जाते.
ह्या आसनात बसल्यामुळे शरीराबरोबरच मनाला देखील ऊर्जा मिळते.
कृती
१. मॅटवर मांडी घालून बसावे.
२. हात गुढग्यावर ठेवावे. बोटे सैल सोडावी किंवा त्यांची प्रणव मुद्रा करावी.
३. पाठीचा कणा ताठ ठेवावा.
४. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे.
५. दीर्घ श्वसन करावे.
तर ही आहेत अशी ५ आसने जी नवोदितांना अगदी सहजपणे करता येतील. ही आसने घरच्याघरी अगदी सहज करणे शक्य असून त्यामुळे योगाभ्यासाला सुरुवात होऊ शकते.
अर्थात ही आसने करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या तब्येतीची काळजी घेऊन झेपतील इतक्याच तीव्रतेने ही आसने करावीत.
तुम्ही देखील योगाभ्यासाची सुरुवात ह्या सोप्या आसनांपासून करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंट करून सांगा. ही आसने उत्तम पद्धतीने करता येऊ लागली की पुढचा योगाभ्यास एखाद्या तज्ञ योगशिक्षकाच्या मदतीने सहज करता येऊ शकेल.
चला तर मग एका आरोग्यपूर्ण जीवनशैलीला सुरुवात करूया. स्वस्थ आणि आनंदी राहुया.
आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला मात्र विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Please send me the yoga video