आधुनिक शिक्षण, मिळालेले ज्ञान आणि आत्मसात केलेल्या बुद्धीच्या जोरावर आजचा माणूस प्रगत आणि संवेदनशील झाला असल्याचे समजले जात असले तरी, या पृथ्वीतलावर असणाऱ्या इतरांप्रमाणे माणूस हा सुद्धा एक प्राणीच असल्याने त्याच्यातील उपजत प्राणी गुणधर्म अद्यापही नष्ट झाले नसल्याचे सभोवताली घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे. माणूस हा तसा समाजशील. पण, प्राण्यांच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. या प्रवृत्तीला पोषक एखादा प्रसंग समोर आला की माणसातील सुशिक्षितपणा आणि सामाजिकता अलगदपणे गळून पडते. व त्याची मूळ रानटी वृत्ती ज्वालामुखीसारखी उफाळून येते.आणि बेफाम झालेला माणसाचा हा झुंड मग हिंसेचा कडेलोट करतो. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे अशाच हिंस्त्र ‘कळपप्रवृत्तीचे’ प्रत्यंतर आले. सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या पाच जणांची बेफाम झालेल्या झुंडीने दगडाने ठेचून हत्या केली. हे पाच जण म्हणजे मुले पळवणारी टोळी आहे, अशी अफवा सोशल मीडियावरून उठली, आणि माणसांच्या समूहाचा कळप झाला.
कळपाच्या किंव्हा झुंडीच्या वृत्तीला ना विवेक असतो ना विचार. त्यांना ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात. त्यामुळे या झुंडीकडून हिंसा केली जाते. राईनपाड्यातही रविवारी तेच घडले. सारासार विवेकाला सोडचिठ्ठी दिलेल्या झुंडीने पोट भरण्यासाठी भटकणाऱ्या पाच जीवांचा क्रूरपणे अंत केला. एखादा जमाव नाहक फालतू बाबींचे अवडंबर करून एखाद्याचा विनाकारण बळी घेत असेल तर त्याला माणसांचा जमाव म्हणावे, की प्राण्यांचा कळप? मुलं पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमाव बेकाबू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कुठल्याही हिंसेचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. एका माणसाने दुसऱ्या हाडामासाच्या माणसाला मारण्यासाठी कधीच कुठलेही कारण योग्य ठरविल्या जाऊ शकणार नाही. त्यामुळे राईनपाड्यातील घटना ही आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. एकेकाळी प्रगल्भ असलेल्या, जगाला विचार देणाऱ्या आपल्या समाजाचं असं अध:पतन का व्हावं यावर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
गत काही वर्षांपासून देशात झुंडशाहीचे जोरदार वारे वाहत असून, ही प्रवृत्ती हकनाक निरपराध लोकांचे बळी घेताना दिसून येत आहे. मानवी उत्क्रांतीच्या काळात वनपशूंचे हल्ले रोखण्यासाठी मानव शारीरिक हिंसेचा उपयोग करायचा. ते नैसर्गिकही होते. परंतु आजच्या काळात मानवाने बुद्धी आणि भावनांचा वापर करून एका सुसंस्कृत आणि सभ्य समाजाची निर्मिती केली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी हिंसक कृती मानवी समाजाला शोभणारी नाही. प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे.
जमावबळी, हत्या, आत्महत्या, अत्याचार अशा घटनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून त्यातील क्रौर्य कमालीचे वाढले आहे. महत्वाचे म्हणजे अगदी छोट्या-मोठ्या कारणावरून अशा प्रकारच्या नृशंस घटना घडणे सभ्य मानव समाजासाठी घातक म्हणाव्या लागतील. राईनपाडा येथील घटना म्हणजे माणुसकीची हत्याचं. मुलं पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच जणांचा खून केला जातो. बेफाम झालेल्या जमावाला आवरण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. साधी पोलिसांना वर्दी देण्याची तसदीही कुणी घेत नसेल तर याला कुठली मानवता म्हणावी? वास्तविक धुळे जिल्ह्यातील घटना घडण्याच्या महिनाभर आधी औरंगाबाद जिल्ह्यातही असाच प्रकार घडला होता. मुल पळवून नेण्याच्या संशयावरून दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व अफवा असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आहवानही माध्यमातून, समाजमाध्यमांतून करण्यात आलं. मात्र तरीही पुन्हा त्याच संशयावरून राईनपाड्यात पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली.
ज्या सोशल मीडियावरून ही अफवा (Social Media Rumour) व्हायरल झाली, त्याच सोशल नेटवर्किंग साईटवर ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’, हे पोलिसांचे आहवानही फिरत होते. मात्र ते वाचून कुणाचीही तर्कबुद्धी जागृत झाली नाही. पाच हाडामासाच्या माणसांना ठेचून काढताना अगोदर खातरजमा करावी, असा विचार कुणाच्याही मनाला शिवला नाही. रस्त्यावर सांडणारे रक्त पाहून कुणाचीतरी माणुसकी जिवंत व्हायला हवी होती, कुणाचे तरी हृदय कळवळायाला हवे होते.परंतु असे काहीच झाले नाही. मारणाऱ्यांनी आणि बघणारयांनीही या क्रूर घटनेचा एकप्रकारे आसुरी आनंदच घेतला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे, हे सभ्य मानव समाजाचं लक्षण आहे का? असा सवाल कुणी उपस्थित करत असेल, तर तो सहाजिक म्हटला पाहिजे.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या एखाद्या अफवेवरून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणा वरील एक प्रश्नचिन्ह आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल नेटवर्किंग साईटच्या आविष्काराने अवघे जग मुठीत आले आहे. या मीडियाचे अनेक फायदेही दृष्टिक्षेपात येत आहेत. मात्र हा मीडिया कसा हाताळावा, काय करावे, आणि मुख्य म्हणजे काय टाळावं, हे अजूनही आपल्याला समजलेलं दिसत नाही. त्यामुळेच सुशिक्षितांकडून अशिक्षितसारखं वर्तन केल्या जात आहे. सोशल मीडियाच्या दुधारी तलवारी वरून चालताना आपल्याला संयमाने आणि जागृकतेने वाटचाल करावी लागणार आहे. सोबतच घटना रोखण्याची जबाबदारी जशी समाजाची, तशीच सरकारची देखील आहे. त्यामुळे संवेदनशील विषयात सरकारी यंत्रणेकडून गांभीर्याने पाऊले उचलली जायला हवीत.
अफवेवरून औरंगाबाद जिल्ह्यात दोन बळी गेल्यानंतर शासन-प्रशासन खडबडून जागे व्हायला हवे होते. दोषींवर कडक कारवाई करण्यासोबत भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी धोरणी पाऊले उचलण्याची गरज होती. मात्र चौकशी आणि मदतीच्या घोषणा झाल्या, सोशल मीडियावरील निर्बंध कडक करण्याच्या चर्चा झडल्या आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणत प्रशासन नेहमीप्रमाणे सुस्तावले. मुळात, फक्त पीडितांना मदत जाहीर करणे आणि चौकशा करणे हीच सरकारची जबाबदारी नाही तर अशा घटनांमध्ये सरकारचे अस्तित्व दिसायला हवे. परंतु दुर्दैवाने सरकारी यंत्रणा अशा वेळीच कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. रायनपाडा नावाच्या गावामध्ये रविवारी जे काही अमानवीय कृत्य घडलं त्याकडे केवळ ‘घटना’ म्हणून बघता येणार नाही, तर त्यामागे वाढत चाललेली वृत्ती लक्षात घ्यावी लागेल. आज माणूस अधिकाधिक हिंसक आणि क्रूर होत चालला आहे. जणू काही माणसामधील सहनशीलताच संपुष्टात आल्याचं हे चित्र भयावह आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. अपराधीक कृत्य करणारा जमाव जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच बघ्याची भूमिका घेणाराही दोषी असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. अन्यथा विकृतीने बेफाम झालेली झुंडशाही एकदिवस मानवी समाजाला मानवी मूल्यांच्या तळाशी घेऊन जाईल, यात शंका नाही.
वाचण्यासारखे आणखी काही….
चला ‘ सोशल ‘ बनुया ..!
भ्रमाचा भोपळा फुटला!!
राज्यातील महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरीचा प्रयोग….
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.