अंडे हे अत्यंत पौष्टिक असणारे सुपर फूड आहे. परंतु काही शाकाहारी लोक अंडे खाणे पसंत करत नाहीत.
त्यामुळे ते अंड्याच्या पोषणापासून वंचित राहतात. ह्याचा विचार करून मुंबईतील एक स्टार्ट अप कंपनी ‘इवो फूड्स’ ह्यांनी असे अंडे बनवले आहे जे संपूर्णपणे शाकाहारी असून त्याचा स्वाद तर खऱ्या अंड्यासारखा आहेच शिवाय त्यापासून प्रोटीन देखील खऱ्या अंड्याइतके मिळते.
आपल्याला कधी असे वाटले देखील नसते की एखाद्या वस्तूची चव अगदी अंड्यासारखी लागेल. अंडे नसुनही त्यापासून बनवलेला पदार्थ अगदी अंड्यासारखा लागेल.
परंतु हे शक्य करून दाखवले आहे मुंबईतील दोन तरुणांनी. कार्तिक दीक्षित आणि श्रद्धा भन्साळी अशी त्यांची नावे आहेत.
त्या दोघांनी मिळून २०१९ मध्ये एक स्टार्ट अप सुरु केले ज्याचे नाव आहे ‘इवो फूड्स’. त्याअंतर्गत त्या दोघांनी मिळून झाडांपासून मिळणाऱ्या प्रोटीन पासून एक असा प्रोटोटाइप तयार केला ह्याचा स्वाद अगदी अंड्यासारखा आहे.
त्यापासून बनवलेल्या ऑम्लेट आणि सँडविचची चव अगदी खऱ्या अंड्यासारखी आहे.
एका गेमिंग एजन्सी साठी काम करणारे श्री. अनंत शर्मा (नाव बदलले आहे) हे संपूर्ण शाकाहारी आहेत. त्यांना हे शाकाहारी अंड्यापासून बनवलेले ऑम्लेट दिले असता, ते अतिशय खुश झाले कारण आता शाकाहारी असूनही अंड्यापासून मिळणारे प्रोटीन त्यांना मिळू शकेल.
‘इवो फूड्स’ च्या कार्तिक दीक्षित आणि श्रद्धा भन्साळी ह्यांनी सांगितले की २०१९ पासून सुरुवात करून साधारण वर्षभरात प्रयोग करून त्यांनी हा प्रोटोटाइप तयार केला.
फेटलेल्या अंड्यासारखे दिसणारे हे मिश्रण चव आणि पोषणाच्या बाबतीत अगदी खऱ्या अंड्यासारखे आहे.
ह्यापासून ऑम्लेट, अंडा रोल आणि इतरही अंड्याचे पदार्थ करता येतात. तसेच ह्याची किंमतही खऱ्या अंड्याइतकीच ठेवण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे हे सर्वांना परवडेल अशा किमतीत मिळणे शक्य झाले आहे.
भारतात अनेक लोक शाकाहारी आहेत आणि त्यातील काही लोक तर वीगन आहेत. वीगन म्हणजे असे लोक जे प्राण्यापासून मिळणारे कोणतेच पदार्थ खात नाहीत.
असे लोक मांस, मटण, अंडी किंवा दूध, दही ह्यातील काहीच खात नाहीत. ते फक्त झाडांपासून मिळणारे पदार्थ खातात.
कार्तिक ह्यांना ह्यामुळेच प्रेरणा मिळाली. वीगन लोकांना देखील अंडी आणि तत्सम पदार्थांचे पोषण मिळावे ह्या हेतूने त्यांनी हे प्रयोग करायला सुरुवात केली.
त्यांना चिकन / मटण ह्यावर प्रयोग करायचे होते परंतु भारतात अजून असे लॅब मध्ये तयार होणारे मास ह्यासाठीची टेक्नॉलजी तितकीशी उपलब्ध नाही.
म्हणून मग त्यांनी अंड्याची निवड केली. एक तर अंडे हे लोकप्रिय खाणे आहे, पौष्टिकही आहे आणि झाडांपासून अंडे तयार होऊ शकेल अशी सर्व टेक्नॉलजी भारतात उपलब्ध देखील आहे.
हा प्रयोग सफल झाल्यावर हयातून स्वतःचा स्टार्ट अप व्यवसाय सुरु करताना कार्तिक ह्यांची भेट श्रद्धा ह्यांच्याशी झाली. समविचारी असणाऱ्या ह्या दोघांनी मिळून मग ऑगस्ट २०१९ मध्ये ह्या व्यवसायाची सुरुवात केली.
सध्या हे दोघे ‘इवो फूड्स’ तर्फे अंड्याचे आणखी निरनिराळे पदार्थ कसे तयार करता येतील ह्यावर काम करत आहेत. इवो फूड्स मध्ये सध्या ६ जणांची टीम काम करत आहे.
त्यात कार्तिक आणि श्रद्धाशिवाय ४ खाद्य शास्त्रज्ञ काम करतात. सध्या जरी ते फक्त अंड्यांवर काम करत असले तरी भविष्यात हा व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
तसेच त्यांचे पदार्थ रेस्टॉरंटमध्ये मिळावे म्हणून ते प्रयत्न करत आहेत. आणि भविष्यात ग्राहकांना हा पदार्थ ३०० मिलि आणि ६०० मिलि च्या बाटल्यांमध्ये दुकानात देखील मिळेल असा प्रयत्न ते करत आहेत.
तर अशी ही शाकाहारी अंड्याची कहाणी. शाकाहारी लोकांसाठी उपयुक्त असणारे अंडे घेऊन आलेल्या कार्तिक आणि श्रद्धा ला आपण खूप शुभेच्छा देऊया.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.