बाजवांचा फुसका ‘बाजा’? (पाकिस्तानचे दुटप्पी धोरण)

‘चोराच्या उलट्या बोंबा’ या उक्तीप्रमाणे पाकिस्तानच्याच्या उलट्या बोंबा हे वाक्य आता जगाला चांगलेच परिचित झाले आहे. एका हाताने शांततेची कबुतरे आकाशात उडवून आम्हाला मैत्री हवी आहे, असा कांगावा करायचा, आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन भारतावर वार करायचा. हे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण सर्व जगाला ज्ञात झाले आहेत. याचे परिणामही आता पाकला भोगावे लागत आहेत. भारत आणि अन्य देशात त्यांनी पेरलेल्या दहशतवादाचा आज पाकिस्तानमध्येच कल्पवृक्ष बनला आहे.

यूएन सारख्या जागतिक संघटनेने आतंकवादाच्या मुद्यावर पाकला अनेकदा फटकारले. मात्र तरीही भारताविषयी गरळ ओकायची पाकची सवय काही जाताना दिसत नाही. ‘सीमेवर जे रक्त सांडले आहे आणि सांडत आहे त्याचा पुरेपूर बदला पाकिस्तान घेईल’, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केली आहे. डिफेन्स डे च्या कार्यक्रमात बोलत असताना बाजवा यांनी भारताला धमकी देण्याच्या सुरात आपला फुसका ‘बाजा’ वाजविला. तेवढय़ावरच त्यांची वळवळ थांबली नाही तर कश्मिरी जनता भारता विरुद्ध लढा देत असल्याचा जावईशोध लावून आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे ‘तारे’ही त्यांनी तोडले. पाकच्या अशा दर्पोक्त्या आणि धमक्या नवीन नाहीत. पाकिस्तानमधील हर दुसरा राजकारणी आणि लष्करशहा भारताविषयी अशा प्रकाराचं विष कायम ओकत असतो. बाजवा यांनीही तोच कित्ता गिरवून पाकचे शेपूट अद्यापही वाकडेच असल्याचे आपल्या वक्तव्यातून सिद्ध केले आहे.

भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी राष्ट्र….. पाकिस्तानचा जन्म हा भारताबरोबरचाच. पण जन्मापासूनच त्यांच्या भाळी रक्तपात आणि अस्थिरता लिहली असल्याने त्याची अधोगती झाली. याउलट भारतात राजकीय आणि सामाजिक शांतता असल्याने भारताने प्रगती साधली. पाकिस्तान सुरवातीपासूनच भारताविषयी शत्रुत्वाची भावना बाळगून आहे. आजपर्यंत भारताने कधीच आगळीक केली नाही परंतु पाकने भारत द्वेषा तून दोन तीन वेळा युद्ध पुकारली आहेत. आपण भारताशी सरळ युद्धात विजय मिळवू शकत नाही हे लक्षात आल्या नंतर पाकने दहशतवादा चा सहारा घेतला. धार्मिक कट्टरता वाद जोपासत दहशत वादाला खतपाणी घालणे, सीमेवर शस्त्र संधीचे उल्लंघन करून आगळीक करण्याचे उद्योग सुरु केले.. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतंकवाद्यांना रसद पुरविणे, त्यांचे रक्षण करणे असे काम पाक सुरवातीपासून करत आला आहे.

सध्या काश्मीरमध्ये जी अस्थिरता पसरली आहे, ते या पाक पुरस्कृत दहशतवादामुळेच. परंतु भारताने मात्र सुरवातीपासून मोठ्या भावाची भूमिका वठवीत पाक सोबत मधुर संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात सरकार कोणते हि येवो पाकिस्तान सोबत पराराष्ट्र धोरण ठरविताना चर्चेला आणि संवाद साधण्याला विशेष महत्व देण्यात आल्याचे दिसून येइल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनीही पाकी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला बोलावून हा कित्ता कायम ठेवला. पण पाकिस्तानच्या वाकड्या धोरणाने चर्चेच्या आणि शांततेच्या सर्व मार्गावर पाणी फेरण्याचे काम सातत्याने केले आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानकडूनच नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्या जाते, हे सांगण्यासाठी कुण्या जोतिष्याची गरज आता राहिलेली नाही. काश्मीरमधील असंतोषालाही पाकपुरस्कृत दहशतवादच कारणीभूत आहे. मुळात भारत द्वेष पाकच्या नसानसात भिनलेला आहे. भारताविषयी विष ओकल्याशिवाय तिथे कुणी सत्तेवरच येऊ शकत नाही. त्यामुळे, सगळे धंदे करूनही पाकचे लष्करप्रमुख बदला घेण्याची भाषा करत असतील तर त्यात फारसे नवल नाही. पण, बदलत्या परिस्थितीनुसार भारताने पाक विषयी वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्याला एकवेळ मित्र बदलता येतो. पण, शेजारी बदलता येत नाही. शेजारी बदलता येत नसल्याने त्याच्यासोबत राहणे अपरिहार्य आहे. पण, पाकिस्तानसारख्या शेजार्‍यासोबत नेमके कसे राहिले पाहिजे याचा नव्याने विचार करून भविष्यात येऊ घातलेल्या संकटाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी भारताने आतापासूनच योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे.

कुठल्याही प्रश्नाच उत्तर शांततेच्या मार्गाने सोडवायची आपली पद्धत आहे. कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं या म्हणीप्रमाणे भारताने कधीच आगळीक केली नाही. परंतु पाणी आता डोक्यावरून जायला लागले आहे. त्यामुळे किमान दगड तरी भिरकावला गेला पाहिजे. सरकार म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेला सर्वच निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतात.. प्रत्येक निर्णयांच्या दूरगामी परिणामांचा विचार सरकारला करावा लागत असतो…… अंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि जागतिक नियमांचेही संकेत सरकारला पाळावे लागतात. त्यामुळे भावनेच्या भरात एखादा आरेरावीचा निर्णय सरकारला घेता येणार नाही, हे मान्य. परंतु पाकचे लष्करप्रमुख ‘बाजवा’ बदला घेण्याची धमकी देत असतील तर भारतही पाकचा ‘बाजा’ वाजविण्यास सज्ज आहे….. चिंचोळी पट्टी इतका भूप्रदेश असलेल्या पाकने बदला घेण्याच्या गप्पा मारू नये. असे पाकिस्तानला ठासून सांगितल्या गेले पाहिजे. अर्थात, ५६ इंच छातीवाले ही हिम्मत कधी दाखवतील याची जनतेला प्रतीक्षा आहे.

वाचनकट्टा...
वाचनकट्टा… नानाविध पुस्तकांचा…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।