चांगल्या आठवणींना उजाळा देऊन मानसिक आरोग्य उत्तम कसं राखता येईल

या लेखात वाचा आपल्याच आयुष्यातल्या आनंद देणाऱ्या आठवणींना उजाळा देऊन आपलं मानसिक आरोग्य कसं उत्तम बनवायचं आणि निराशे पासून स्वतःला कसं वाचवायचं?

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारचे मानसिक ताण अगदी पाचवीला पुजल्या सारखे आपल्याच बरोबर धावायला लागतात.

ताण तणाव आला की आपल्या कामातला उत्साह गेला. त्यामुळे निराशा आपला पाठलाग करायला लागते, ह्या सगळ्यांशी सामना करता करता आपण मनाने पार खचून जातो.

तरी पण आपण आपलं आयुष्य तसंच पुढं रेटत राहतो. काहींना अपयशाची भीती वाटायला लागते. तर काहींना आयुष्यच नकोसं वाटायला लागतं. पण इतकं काय आभाळ कोसळतंय आपल्यावर?????

मित्रांनो, इतकं कधीच खचून जायचं नाही. खचून जाणं म्हणजे तुमचा मानसिक आजार आहे हे आधी समजून घ्या. बरेचदा तुम्ही ज्यामुळे खचून जात ती एक काल्पनिक भीती असते. आणि बरेचदा काल्पनिक नसली तरी प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच!!

याबद्दलच्या एका लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे. जिज्ञासूंनी तो लेख आवर्जून वाचा.

आता ह्या मनाच्या आजारावर सुद्धा संशोधन झालंय आणि चांगलं रामबाण औषध सुद्धा सापडलंय. हे औषध आपल्यापैकी प्रत्येकाला तयार करता येईल आणि आपल्या मनाला अगदी सशक्त, निरोगी, सुदृढ बनवता येईल.

निराशा नावाचा व्हायरस आपल्या जवळपास सुद्धा फिरकणार नाही, कारण औषधच तसं आहे.

मानस शास्त्राच्या काही संशोधकांनी एक प्रयोग केला, काही लोकांना एकत्र बोलावून एका हॉल मध्ये बसवलं, आणि समोर स्क्रीनवर त्यांना काही “नकारात्मक” आणि “सकारात्मक” शब्द दाखवले आणि त्या सगळ्या लोकांना सांगितलं की ह्या शब्दांशी जुळणाऱ्या तुमच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक घटना आठवून त्या तुमच्या मनात पुन्हा तश्याच्या तश्या रंगवा.

ह्या मानस शास्त्रीय संशोधनात संशोधकांना मिळालेले रिपोर्ट्स त्यांनी तपासून लोकांच्यासमोर ठेवले.

आश्चर्यकारक गोष्ट जी समोर आली ती अशी होती, पॉझिटिव्ह घटना रंगवलेल्या लोकांच्यात कॉर्टिसोल लेव्हल (मेंदूमध्ये तणाव निर्माण करणारा स्त्राव) निगेटिव्ह आठवणी रंगवलेल्या लोकांपेक्षा कमी होती आणि उदासीनतेची लक्षणं सुद्धा खूप कमी झाल्याचं स्पष्ट झालं.

हाच प्रयोग पुन्हा त्या संशोधकांनी १२ महिन्यांनंतर केला त्या वेळी सुद्धा त्याचे रिझल्ट्स अगदी सेम मिळाले.

ह्याच संशोधनातून सिद्ध झालंय की आपल्या आयुष्यात घडलेल्या काही सकारात्मक आठवणींना आपण जर पुन्हा उजाळा दिला तर आपल्यात आनंद भावना मोठ्या प्रमाणावर तयार व्हायला मदत होते, आणि उदासीनता किंवा नैराश्य दूर निघून जातं.

हे संशोधन झाल्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की जे लोक मुळातच अजिबात उदासीन, किंवा निराश वृत्तीचे नसतात, त्यांच्या जीवनात ‘पझिटिव्ह घटना’ जास्तच असतात.

त्यामुळे त्यांनी जर जुन्या सकारात्मक आठवणींना उजाळा दिला तर त्यांना त्याचा जास्त फायदा होतो.

मग मित्रांनो ह्या गोष्टीची गरज कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना जास्त आहे ते तुमच्या लक्षात आलं का?

ज्या व्यक्तींना सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल, सतत नकारात्मक गोष्टींमुळे उदासीन झालेल्या व्यक्तींना ह्याची जास्त गरज आहे.

आपला मेंदू हा नेहमी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या दिमतीला हजर असतो.

त्याला चांगलं कार्यरत ठेवा, पॉझिटिव्ह गोष्टींचा खुराक द्या, की सकारत्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल.

यासाठी नक्की काय करायचं? तर सतत आपल्या जीवनात घडलेल्या, सकारात्मक, म्हणजे मनाला आनंद देणाऱ्या आठवणी डोळ्यासमोर आणायच्या आणि तो आनंद परत घ्यायचा, तुमची निगेटिव्हीटी कमी कमी होत जाईल.

आयुष्यात एक सुद्धा आनंद देणारी घटना घडलीच नाही असा एकही माणूस सापडणार नाही. अहो… अपंग, आंधळे लोक सुद्धा जीवनात काही आनंदाच्या क्षणांची मजा घेतात, तर धडधाकट लोकांना आनंदाचे प्रसंग अनुभवायला कष्ट पडतात का????? हजारो क्षण आनंद देऊन जातात.

शिक्षण, प्रगती, नोकरी, व्यवसाय, यश, सण, समारंभ, पार्टी, पिकनिक, गेट टुगेदर, खेळ, अध्यात्म, अशा शेकडो प्रसंगातून आनंद देणाऱ्या घटना घडत असतात.

एवढ्या सगळ्या आनंदी घटना घडत असताना आपल्यात उदासीनता येऊच नये खरं तर, पण काही प्रसंग असेही येतात ते जीवनच उदासीन करतात.

पण हे विसरू नका की… प्रत्येक आजारावर औषध हे असतंच. फक्त ते वेळेत घ्यायची जबाबदारी आपली.

आता ही सकारात्मक आठवणींना उजाळा द्यायची ताकद तुम्हाला कोणत्या कारणासाठी उपयोगी पडेल ते बघा.

१) ह्या सकारात्मक आठवणी म्हणजे सकारात्मक भावनांचा धो धो वाहणारा स्रोत असतात. त्यातून तुम्हाला ताबडतोब आनंद मिळवता येतो. त्यातून एखादी जबरदस्त प्रेरणा मिळते, किंवा त्या आठवणींनी तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होते.

२) ह्या सकारात्मक आठवणी तुम्ही आनंदी राहण्यासाठी, आणि तुमच्या आयुष्यात आनंदी घटना घडवून आणण्यासाठी तुम्ही सक्षम आहात याची तुम्हाला आठवण करून देतात.

३) ह्या सकारात्मक आठवणींचा वापर तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या घटना कशा घडवून आणायच्या हे शिकण्यासाठी करू शकता.

४) ह्या सकारात्मक आठवणी तुम्हाला तुमच्या मनाचं संतुलन राखण्यासाठी मदत करतात. म्हणजे तुम्ही निगेटिव्हीटी च्या गर्तेत फसत चालला असाल तर ह्या आठवणींमुळे तुमच्यात सकारात्मक विचार करण्याची ताकद येते आणि तुम्ही त्या गर्तेतून वर निघू सुद्धा शकता.

निराशा, उदासीनता लांब गेल्यावर तुमच्या मनाचं आरोग्य कसं सुधारत जातं.

नकारात्मक विचार, नकारात्मक भावना ह्या आपल्या प्रगतीला मारक ठरतात हे आयुष्यभर लक्षात ठेवा.

तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला सकारात्मक विचारातून, सकारात्मक भावनांतून तुमच्या मनाला निरोगी ठेवायचंय.

हे सुद्धा आयुष्यभर डोक्यात ठेवा. मग हे कसं काय जमणार????

मित्रांनो, सगळ्यात सोपी हीच गोष्ट आहे. पण यासाठी तुमचा थोडा वेळ खर्च करायला लागणार आहे.

मला हे माहिती आहे की तुमच्याकडे “वेळ” अजिबात नसणार. पण मित्रांनो स्वतःच्या भल्यासाठी कोण वेळ देणार नाही???? हे पण मला माहिती आहे…

आयुष्यभर आनंदात राहायचं असेल तर ??

तर फक्त एक गोष्ट करायची, वेळ काढून. तुम्हाला तुमचं बालपण जेव्हापासून आठवतंय तेंव्हापासून….. ज्या काही सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत गेल्यात त्या आठवा.

तुमचं बारसं तर नाही आठवणार, पण जरा कळायला लागल्यावर जे आनंदाचे प्रसंग आठवतात ते आठवा परत.

त्यात काय काय गमती जमती घडल्या त्या डोळ्यासमोर आणा. तुमच्या बहीण भावांच्या बरोबर काय काय खट्याळ पणा केलात तो आठवा.

वयाप्रमाणे मोठे होत असतानाचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर आणा. आणि ते शक्यतो क्रमाने एका पाठोपाठ एका नोट पॅड मध्ये लिहा. मध्ये एखादं पान कोरं ठेवा, पुढं जे जे आठवेल ते सगळे फक्त आनंद, आणि पॉझिटिव्ह प्रसंग लहून ठेवत रहा.

शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, घरातले, मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, नवख्या लोकांबरोबर, प्रेमाच्या प्रसंगांचे, यशाच्या प्रसंगांचे, असे सगळे प्रसंग लिहा. आणि ते आठवून त्या त्या प्रसंगांची मजा पुन्हा घ्या.

ती मजा घेत असताना आणखी काही आठवणी डोळ्यासमोर येतील त्या त्या कोऱ्या सोडलेल्या पानावर त्या क्रमाने लिहा.

अगदी छोटे छोटे, किंवा अगदी किरकोळ प्रसंग सुद्धा लिहा.

मजेशीर, गमतीशीर, हसवणारे, उत्साह वाढवणारे, मॅच जिंकलेले, कशात पहिला नंबर मिळालेले, काही नवीन शिकून यश मिळवलेले, अगदी तुमच्या पाळीव कुत्र्याबरोबरचे, किंवा फॅमिली बरोबरचे सगळे सकारात्मक प्रसंग, घटना, विनोदी गोष्टींची नोंद करा. बालिश वाटणारी गोष्ट आहे, पण एकदा करू बघा.

ते ते प्रसंग आठवा, त्यातली मजा अनुभवा.

ही तुमची लिस्ट प्रत्येकवेळी काही न काही आठवल्या मुळे वाढतच जाईल.

ही लिस्ट अगदी आज सकाळी तुम्ही सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात गेला असाल तर त्या आजच्या प्रसंगा पर्यंत आणा.

ही लिस्ट सतत तुमच्या समोर येईल अशी ठेवा. निगेटिव्ह विचार चुकून जरी तुमच्या मनात आला तरी त्या लिस्ट मधला एखादा प्रसंग आठवा.

निगेटिव्हीटी औषधाला पण शिल्लक राहणार नाही. तुम्ही आयुष्याची मजा घेत रहाल, लिस्ट वाढत राहील, तसे तुम्ही त्या आठवणींच्या समुद्रात पोहत रहाल.

मधे मधे लिस्ट पहायची आणि आठवणींना उजाळा द्यायचा. तुम्ही मनाने अगदी श्रीमंत झाल्याचा अनुभव घ्याल. या एका एक्झरसाईझने तुमचं मनाचं आरोग्य अगदी ठणठणीत होणार आहे बघा.

असेच सगळे प्रसंग तुमच्या शाळा कॉलेज मधल्या मित्रांबरोबर पण घडले असतील, त्या मित्रांना भेटून परत तुम्ही त्या आठवणी जागवा, त्या लिहून ठेवा. आणि सतत त्याची मजा घ्या. तुमच्याच ह्या औषधाचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल.

असा हा फायदा तुमच्याच आयुष्यातल्या सकारात्मक आठवणींना उजाळा देऊन होणार असेल तर ???? सुरू करा की मग आज पासूनच.

फायद्याचं कलम आहे. वेळ घालवूच नका. आठवा, साठवा, आणि आनंद घ्या.

आणि हो ‘हॅप्पी थॉट्स डायरी‘ मध्ये लिहिणारच पण काही भन्नाट आठवणी कमेंट्स मध्ये लिहून आम्हाला सांगायला पण विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “चांगल्या आठवणींना उजाळा देऊन मानसिक आरोग्य उत्तम कसं राखता येईल”

  1. I want more information about this matter because I am suffering from this problem

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय