चंदेरी दुनियेतल्या स्टंटवूमन…

रेश्माही मला हिरकणीच वाटते त्या हिरकणीने जसा गड उतरायची जोखम पत्करली होती तशीच याही आधुनिक हिरकणीने पत्करली. अशी जोखीम पत्करण्याचे दोघींचेही कारण एकच- माझ्या मायेची माणसं…………

छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगड. ४४०० फूट उंच असणारा रायगड म्हणजे सह्याद्रीचा मान बिंदू. या रायगडाचे दरवाजे एकदा बंद झाले की हवा आणि पाण्या शिवाय कुणी ना आत येऊ शकत होते ना बाहेर जाऊ शकत होते. याला एकमेव अपवाद ठरली होती गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाकुसरे गावची हिरकणी. या बहाद्दर हिरकणीची गोष्ट तुम्हा आम्हा सर्वांनाच माहित आहे आपल्या तान्ह्या लेकरासाठी ही माऊली अख्खा रायगड उतरली होती हिरकणी बुरूज आजही तिला ताठ मानेने सलाम करत उभा आहे. माऊली, आई, माय, मदर, अम्मी जेवढी म्हणून आईची रूपे आहेत ती जगभरात एक सारखीच. फरक असेल तो फक्त् भाषा, वस्त्र, प्रदेश आणि रंगरूपाचा. आपलं मुल आणि आपल्या कुटूंबासाठी ती जगातील प्रत्येक धोका पत्करायला तयार असते. त्यावेळी तिला स्वतःच्या जीवाची पर्वा करायला क्षणभरही उसंत नसते. चित्रपट इंडस्ट्रीतही काही स्त्रीया अशा आहेत ज्यानां आधुनिक काळातील हिरकणी म्हणायला काहीच हरकत नाही.

ManacheTalksशोले या चित्रपटात क्लायमॅक्स पूर्वीचा एक प्रसंग असा आहे. हेमा मालिनी अर्थात बसंतीला गब्बरचे डाकू वेढा घालतात. बसंतीच्या लक्षात येते की आता आपण पकडले जाणार. मग ती अत्यंत चपळाईने आपल्या टांग्याकडे धाव घेते आणि म्हणते – चल धन्नो भाग आज बसंतीकी इज्जत का सवाल है आणि तुफान वेगाने टांगा पळवू लागते. मागे घोड्यावर डाकूही पाठलाग करू लागतात. मध्ये मग टांग्याचे एक चाक निखळून पडते आणि मग एकाच चाकावर बसंती टांगा पळवत रहाते. चित्रपटातील अत्यंत उत्कंठा वाढवणारा हा प्रसंग या चित्रपटाचे छायाचित्रकार द्वारका द्विवेचा यांनी अप्रतिमपणे चित्रीत केला आहे. खरं तर या चित्रपटाच्या यशस्वी होण्यात या जेष्ठ छायाचित्रकाराचा आणि सर्वच स्टंटमन/वुमेनचा खूप मोठा सहभाग आहे

reshmaजेव्हा भारतीय चित्रपटात हाणामाऱ्या व धाडसी प्रसंग चित्रीत करण्याचा काळ सुरू झाला तसतसे या व्यवसायात इतर अनेकानां रोजी रोटी मिळू लागली पूर्वी एक काळ असा होता की नटनट्या जोखीमीची दृष्ये स्वतःच करीत असत कारण काहीच पर्याय नव्हता. मग हळूहळू हे लक्षात यायला लागले की अशा नटनट्यांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे? जर त्यांच्या जीवावर बेतले तर चित्रपट कसा पूर्ण करायचा? ही समस्या सोडवली ती चित्रपटसृष्टीतील स्टंटमॅन आणि स्टंट वुमननी. स्व:तच्या जीवाची जोखीम पत्करून मग यात अनेक पुरूष व स्त्रिया येऊ लागल्या. अर्थात बहुतांश वेळा ही जोखीम पत्करण्याचे खरे कारण आर्थिक समस्येत गुंतलेले असते. मुंबईत जेव्हा जेव्हा मी १५-२० मजले उंच इमारतीवर बांबूच्या पालकावर उभे राहून काम करणारे मजूर बघायचो तेव्हा तेव्हा ते सर्वच मला एखाद्या स्टंटमॅन सारखेच वाटायचे….. असो…..तर आपण या चित्रपटसृष्टीला कितीही मायावी म्हटले तरी तिने अनेकांची पोटं इमाने इतबारे भरण्याचे काम प्रमाणिकपणे केले आहे हे विसरता कामा नये. १९६८ मध्ये अवघ्या १४ वर्षांच्या एका मुलीने हा धोका पत्करायचे नक्की केले कारण त्यावेळी तिच्या कुटूंबाची आर्थिक् अवस्था खूपच नाजूक झाली होती. तिचा हा निर्णय अत्यंत अवघडच होता कारण एक तर ती मुलगी होती आणि त्यात परंपांरीक मुस्लिम परीवारातील होती. रेश्मा हे त्या मुलीचे नाव. जी पूढे या चित्रपटसृष्टीतील नामांकित स्टंट वुमन म्हणून गौरविली गेली.

Reshma ManacheTalksवर जो मी शोले या चित्रपटाचा एक प्रसंग सांगितला आहे त्या प्रसंगाची खरी नायिका ही रेश्मा होती. हेमामालिनीची डुप्लीकेट म्हणून तिने यातील हा प्रसंग साकारला होता. यातील टांगा चालविण्याचे सर्वच प्रसंग रेश्माने केले आहेत. त्यावेळी चित्रपटसृष्टीत रेश्मा ही एकमेव घोडा चालवू शकणारी स्टंट वुमन होती. रेश्माला या कामाचे रोज १७५ रूपये मिळत असत. जवळपास तीन दशके काम केल्यानंतर तिचे सर्वत्र नाव झाले. मग एक दिवस “फेमिना” नावाच्या मासिकाची एक वार्ताहर तिची मुलाखत घ्यायला म्हणून गेली. हार्बर लाईनवरील रे रोड या भागातील दारूवाला चाळीत रेश्मा रहात असे. तिथे तिने एका फळविक्रेत्याला तिचा पत्ता विचारला. पण त्याला सांगता येईना. जवळ उभे असलेल्या निवासी लोकांनाही माहित नव्हता. मग अचानक ती वार्ताहर म्हणाली- शोले पिक्चर की हिरोईन कहाँ रहती है?’ मग मात्र सगळ्यांनीच ती राहते त्या इमारतीकडे बोट केले. गब्बरला जशी या चित्रपटाने ओळख मिळाली तशीच रेश्मालाही याच चित्रपटाने ओळख मिळाली.

Reshma StuntWomanयावरून मला एक किस्सा आठवला. कुठल्यातरी सिने मासिकात वाचला होता. शोले मुंबईतल्या मिनर्वा चित्रपटगृहात लागला तेव्हाची गोष्ट. प्रदर्शीत झाल्या नंतर पहिली तीन वर्षे या चित्रपटाची डेली शोच्या तिकीटाची खिडकी बंदच होती फक्त अडव्हान्स बुकिंगची खिडकी चालू असायची. ब्लॅक तिकीटाचा धंदा जोरात होता त्या काळात. मला दोन वर्षानंतर या चित्रपटाचे तिकीट मिळाले होते. त्याकाळात ज्यांनी ज्यांनी ब्लॅकनी तिकीटे विकली ते मालामाल झाले. माझ्या तेथील एका मित्राच्या परीचयाच्या एका म्हातारीने ब्लॅकच्या बळावर झोपडपट्टीत एक रूम विकत घेतली. तिच्या घरात तिने शोलेतील सर्व कलांवताची छायाचित्रे फ्रेम करून देवाच्या शेजारी ठेवली होती. ती नेहमी म्हणाची- “येच मेरे भगवान..मेरी रोटीका बंदोबस्त येच करते है.’’ कोणत्याही प्रसिद्ध कलाकृतीचे जे कोणी साक्षीदार असतात त्यांच्यावरही प्रकाशझोताचे काही कवडसे पडत असतात. रेश्माने चित्रपटसृष्टीतल्या जवळपास सर्वच अभिनेत्रींनसाठी बॉडी डबलचे काम केले. चित्रपटात पडद्यामागेही अनेकजण चित्रपट चांगला व्हावा म्हणून रात्रं दिवस झटत असतात. त्याचे चेहरे मात्र आम्ही बघू शकत नाही. स्टंटमन/वुमूनचे दूर्देव हे की ते पडद्यावर तर दिसतात पण स्वत:ची ओळख लपवून. चित्रपट पाहताना आम्ही सर्व श्रेय समोर दिसणाऱ्या अभिनेते/अभिनेत्रीला देऊन मोकळे होतो. प्रत्यक्षात मात्र हे काम दुसरेच कुणीतरी करत असतात. रेश्माला बरे आणि वाईट दोन्हीही अनुभव मिळाले. एका मुलाखतीत ती म्हणते- कसमे वादे या अमिताभ राखी अभिनीत चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ४० फूट उंच डोंगरावरून मी खाली कोसळली आणि पायाला चांगलाच मार लागला. मला हॉस्पिटलमध्ये अडमिट व्हावे लागले. त्यावेळी “मीरा” चित्रपटाचे शुंटीग करत असलेली हेमा मालिनी वेळ काढून आवर्जुन मला भेटली पण जिच्या साठी मी काम करत होते ती राखी मात्र मला भेटायला आली नाही.”

रेश्माने मीना कुमारी, सायरा बानू, रेखा, डिम्पल, श्रीदेवी, राखी, हेमा मालिनी, मिनाक्षी शेषाद्री सारख्या सर्वच् प्रसिद्ध अभिनेत्रींनसाठी अनेकदा बॉडी डबलचे काम केले. मीना कुमारीसाठी फक्त एकदाच रेश्माने हा स्टंट ‘मेरे अपने’ साठी केला होता. धाडशी स्टंटचे सर्वच प्रसंग रेश्मा निडरपणे साकार करत गेली. तेव्हाही आणि आजही स्टंटमॅन – वुमन यांना सुरक्षा म्हणावी तशी मिळत नाही. त्यामुळे शुटींग दरम्यान जखमी होणे हे नित्याचे. “कर्ज” या चित्रपटात दुर्गा खोटे या अभिनेत्रीला ट्रक उडवतो असा एक प्रसंग चित्रीत करायचा होता. चित्रीकरणाच्या वेळी रेश्मा रस्त्यात उभी असते आणि ट्रक जवळ येताच बाजूली उडी मारणार असते. मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्यावेळी ट्रक ड्रायव्हरने खरेच रेश्माला उडवले. डोक्याला जबरदस्त मार लागला. रक्त च रक्त झाले चित्रीकरण मात्र चालूच होते. दिग्दर्शकाने कट असे म्हटल्यावर मग युनिटचे लोक धावत आले. काहीनी त्या ट्रक ड्रायव्हरला झोडपून काढले. मग अनेक दिवस पुन्हा हॉस्पिटल मध्ये रहावे लागले.

Stunt Womanकाचेच्या खिडकीला धडक देऊन उडी मारणे, आगीचे प्रसंग, घोडा वेगाने पळवणे, उंच इमारती वरून खाली झोकून देणे, नदीत उडी मारणे, डोंगरा वरून घरगंळत येणे, एका इमारती हून दुसऱ्या इमारतीवर उडी मारणे असे अनेक जीवघेणे प्रसंग स्टंटमन- स्टंटवुमनला करावे लागतात. यात जीवाची जोखीम कायम असतेच. आजू बाजुला मृत्यू दबा धरून बसलेला असतोच. नेहमीच त्याला हुलकावणी देता येईल याची शाश्वती नसते. चित्रपटसृष्टीतले असे अनेक स्टंटमन काम करताना मृत्यू पावले आहेत. गेल्याच वर्षी अनिल वर्मा आणि राघव उदय या दोन स्टंटमॅन तरूणांनी एका कन्न्ड चित्रपटातील स्टंट करण्यासाठी हेलिकॉप्टर मधून धरणात ३० फूटावरून उडी घेतली. पण त्यानां पोहता येत नव्हते त्यामुळे ते पाण्यात दिसेनासे झाले. प्रसिद्ध कन्नड अभिनेता दुनिया विजय यांनीही त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली पण ते सापडले नाही. कुटूंबाची जबाबदारी ही अधिक महत्वाची असल्यामुळे स्टंटमन आणि वुमन आपले प्राण पणाला लावतात. त्यात जर दुसरे कोणते काम येत नसेल तर हाच पर्याय शिल्लक उरतो.

राखी और हतकडी या चित्रपटात रेश्माने मोटार सायकलवर जवळपास ५० मीटर तुफान वेगाने रेसींग केली होती. एका गुजराती चित्रपटासाठी तीला एका खडकाळ, काटे दगड असलेल्या डोंगरावरून घरगंळत यायचे होते. सीन ओके झाल्यावर ती अनेक जखमा घेऊनच घरी परतली होती. पण मिळालेले पैसे या जखमेच्या वेदना पेक्षा अधिक सुखावह होते कारण घरातल्या सर्वांचीच भूक त्या पैशाने भागणार होती. १९७० ते ८० च्या दशकात रेश्मा चित्रपटसृष्टीतील मोस्ट वॉन्टेड स्टंट वुमन होती. ज्या शोलेतील प्रसंग तिने केला होता त्यावेळी खरोखरच टांगा हवेत फेकला गेला होता आणि त्याच्या स्टीलच्या रॉडने रेश्माला चांगलेच जखमी केले होते. बरी झाल्या नंतर रेश्माने पुन्हा आपले उर्वरीत काम पूर्ण केले. तिच्याकडे असलेले जुने फोटो अल्बम बघतानां ती आजही भावविभोर होते. त्यातल्या प्रत्येक छायाचित्रा सोबत तिच्या अनेक आठवणीही अल्बममध्ये डकविल्या गेल्या आहेत. ती म्हणते धर्मेंद्र, प्राण सारखे अभिनेते स्टंट कलावंताना अत्यंत आस्थेने वागवत असत. अनेकदा तर त्यांनी अनेक स्टंटमनच्या हॉस्पिटलची बीलं स्वत: भरली आहेत. हेलेन नेहमी तिने सोबत आणलेला पंच तारंकित डबा माझ्यासाठी ठेवायची आणि माझा डबा ती खायची. मौशमी चटर्जीने घरी नेऊन खाऊ घतलेल्या “दोई माच” ची चव आजही तिच्या जिभेवर रेंगाळते. हेमा मलिनीच्या घरी जेव्हा ती गेली होती तेव्हा हेमा सकट तिच्या मुलींनी केलेले आदरातिथ्य ती आजही विसरली नाही.

आजही चित्रपटात अनेक स्टंटवुमन जोखीम पत्करून कामे करत आहेत. रेश्मा ही प्रातिनिधीक म्हणून तिच्यावर लिहावेसे वाटले. सन २००० पर्यंत रेश्मा स्टंट वुमन म्हणून कामे करत राहिली. मग हळूहळू ती एक्स्ट्रा म्हणून काम करत राहिली. २०१३ मध्ये तिने अक्षय कुमारच्या “पिस्तोल” या चित्रपटात काम केले. अक्षयकुमार पूर्वी स्वत: एक स्टंटमॅन असल्यामुळे त्याला स्टंटमॅनच्या वेदना चांगल्या माहित आहेत. स्टंट करणाऱ्या कलावंताचा विमा उतरवला जावा म्हणून त्यांनी खूप पूढाकार घेतला व त्यानां यशही मिळाले. २०१३ ला मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत रेश्मा म्हणते- आम्हाला तोंड लपविण्यासाठी २००० रूपये तर तोंड दाखविण्यासाठी १००० रूपये मिळतात” बॉडी डबल म्हणजे तोंड लपवून करायचे काम आणि एक्स्ट्रा कलावंत म्हणजे तोंड दाखवून करायचे काम. रेश्माने तोंड लपवून करायचे काम निवडले कारण त्यात जोखीम अधिक असली तरी पैसे जास्त मिळणार होते. कुटूंबातल्या आठ सदस्यांचे पोट तिने निवडलेल्या या कामामुळेच भरत होते. रेश्मा पठाण आज ६२ वर्षांची आहे. ती स्टंटची कामे आता नाही करत. तिचे मुलगेही या व्यवसायात नाहीत. ते सर्व कार्पोरेट कंपन्यात काम करतात. सुरूवातीला मी हिरकणी बद्दल लिहले आहे. रेश्माही मला हिरकणीच वाटते. त्या हिरकणीने जसा गड उतरायची जोखम पत्करली होती तशीच याही आधुनिक हिरकणीने पत्करली. अशी जोखीम पत्करण्याचे दोघींचेही कारण एकच- माझ्या मायेची माणसं…………

वाचण्यासारखे आणखी काही…..

शोले….शोकांतिकेची गाथा..(भाग २)
पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका
दूहेरी हेरगिरीचा बळी : माता हरी


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय