‘द साऊथ सी बबल’…एका जागतिक महाघोटाळ्याची कथा

सर आयझॅक न्युटन हेही स्वतःला या कंपनीत गुंतवणूक करण्यापासून रोखू शकले नाहीत. उपलब्ध माहितीप्रमाणे त्यांनी या कंपनीत ३०,००० पौंड गुंतवले व प्रचंड नुकसान (आजचे तब्बल २५/३० कोटी रुपये!!!) सोसल्याने उद्वेगाने ‘I can calculate the motion of heavenly bodies, but not the madness of people” असे उद्गार काढले.

पुर्वी झालेले आणि संभाव्य घोटाळे हा सर्वसामान्यांना बाजारापासून दूर ठेवणारा एक मोठा घटक!!. हे गैरप्रकार नक्कीच निषेधार्ह आहे, पण अशा घोटाळ्यांतून किंवा अपघातांतूनच प्रचलित व्यवस्थांना सुधारणांचे बाळकडू मिळते, त्या सुदृढ़ बनतात हे नाकारता येणार नाही.

असे भ्रष्टाचार हल्लीच होतात, आपल्याकडेच होतात असे बिलकुलच नाही. वाचकांचा असा गैरसमज असेलच तर तो दूर करणारी ही एक ऐतिहासिक महाघोटाळ्याची सुरस कथा….

‘घोटाळा’ हा शब्द आपल्याला अलिकडे भलताच परिचयाचा झाला आहे, उपर जेंव्हा तो शेअरबाजारासारख्या (कु)प्रसिद्ध बाबीशी जोडला जातो तेंव्हा ‘घोटाळस्य कथाः रम्याः’ हे ओघानेच आले.

पुण्याचा इतिहास म्हटले की पानशेतचा प्रलय आठवतोच, तसे शेअर घोटाळा म्हणताक्षणी वाचकांना लगेचच हर्षद मेहता वा केतन पारेख असे महानुभाव आठवले असतील.

पण नाही, ही कथा आपल्या भारतीय नायकांची नाही. किंबहुना असे घोटाळे फक्त आपल्याकडेच होतात असे नाही तर या बाबतीत जागतिक परंपराही तितक्याच ‘भव्य-दिव्य’ आहेत असे मला सुचवायचे आहे.

चला, ऐका ही शेअरबाजारांच्या इतिहासातील एक जागतिक महाघोटाळ्याची, ‘द साऊथ सी बबल’ची कहाणी..

अठराव्या शतकाच्या सुरवातीस ब्रिटीश साम्राज्य जगभर पसरले होते, मात्र त्याच वेळी आक्रमक वसाहत विस्ताराच्या धोरणाने इंग्लंड सरकारवर स्पेन बरोबरील युद्धामुळे प्रचंड कर्ज झाले.

ते कसे फेडावयाचे ह्याची चिंता पार्लमेंटला होती. १७११ साली स्थापन झालेल्या ‘The South See’ कंपनीने सरकारला एक क्रांतिकारी प्रस्ताव दिला.

’सरकारचे कर्ज फेडण्यासाठी कंपनी सरकारला अल्प दराने कर्ज देईल, मात्र त्या बदल्यात सरकारने ‘द साऊथ सी’ कंपनीला स्पेन व दक्षिणेकडील वसाहतींबरोबर व्यापाराची मक्तेदारी बहाल करावी’ असा तो प्रस्ताव होता. लगोलग बॅंक ऑफ इंग्लंड्नेही या प्रस्तावासारखाच प्रस्ताव संसदेस दिला.

(८० च्या दशकात, भारतातील एका कुख्यात स्मगलरने, आपल्या सरकारला, ‘तुम मुझे स्मगलिंग की परमिशन दो…मै तुम्हारा पुरा कर्जा उतारुंगा’ असा बाणेदार प्रस्ताव दिला होता म्हणे- माहिती अर्थातच ऐकीव.)

या दोन्ही प्रस्तावांवर ब्रिटिश पार्लमेंट्मध्ये गरमागरम चर्चा सुरु झाली. तेव्हाच्या सर्वोत्तम संसदपटुंपैकी एक श्री. रॉबर्ट वॉल्पोल या एकमेव गृहस्थांनी ‘द साऊथ सी’ कंपनीच्या प्रस्तावास कडाडून विरोध केला..

पण त्यांची विद्वत्ता, वक्तृत्वाचा पराभव झाला, आणि ०२ फेब्रु.१७१७ रोजी बहुमताने ‘द साऊथ सी अ‍ॅक्ट’ मंजूर झाला.

सुखवस्तू आणि असलेला पैसा गुंतविण्याच्या आकर्षक पर्यायाच्या शोधातील जनतेच्या पाठ्बळामुळे आधीच तेजीत असलेल्या शेअर बाजारात या बातमीचे पडसाद दिसू लागले होते.

कंपनीच्या संचालकांनी बाजारात जाणीवपूर्वक बातम्या पेरावयास सुरवात केली. सरकारकडून मिळालेल्या व्यापार हक्कांचा वापर करुन ‘द साऊथ सी’ कंपनीला वसाहतींतील दुर्गम प्रदेशांतील सोने, चांदी व अतिमह्त्वाची खनीजे अतिशय स्वस्त दरांत मिळणार..

आणि कंपनीचा नफा शेकडो पट वाढणार, अशा आवया उठू लागल्या…महिन्या दोन महिन्यातच या कंपनीच्या हक्कबहालीचे बील हाउस ऑफ कॉमन्स मध्ये १७२ वि. ५५ अशा बहुमताने पास होईस्तोवर या शेअरचा भाव १०० पौंडावरुन ३३० पौंडावर स्थिरावला.

पुढे, हाउस ऑफ लॉर्ड्स मधे या बीलाचे प्रथम वाचन ०४ एप्रिलला, द्वितीय वाचन दुसर्‍याच दिवशी, ०५ एप्रिलला झाले. ०६ एप्रिल रोजी हे बील ‘कमिट’ झाले आणि ०७ एप्रिलला ते संमतही झाले.

त्याच दिवशी बीलास राजघराण्याची मंजूरी घेण्यात येऊन त्याचे रुपांतर कायद्यांत करण्यांत आले. इतक्या महत्वाच्या विधेयकाचे अशा घाईने कायद्यात रुपांतर होण्याची ब्रिटिश इतिहासातील ही एक अपवादात्मक घटना मानली जाते.

गंमत म्हणजे आजच्या भाषेतील प्रसिद्ध ‘Buy on rummers, Sellon the News’’ ह्या सुप्रसिद्ध वचनाचा तेंव्हाही प्रत्यय आला. गेले २/३ महिने सतत उसळ्या घेऊन एव्हाना ४०० पौंडावर पोहोचलेला ह्या कंपनीचा भाव सदरहू कायदा मंजूर होताक्षणीच कोसळला, आणि ०७ एप्रिलला तो ३१० आणि पुढच्याच दिवशी २८० पौंडावर बंद झाला….

पण एव्हाना या कंपनीच्या ‘हितचिंतकां’ मधे बरेच वजनदार लोक सामिल झाले होते. ज्यांची पोटे अजून भरावयाची होती. (असे म्हणतात की ब्रिटीश संसदेच्या दोन्ही सभागृहांतील मिळून अर्ध्यापेक्षा अधिक सदस्यांकडे या कंपनीचे शेअर्स होते.)

सहाजिकच कंपनीच्या बाबतीत अतिशयोक्तीपूर्ण बातम्यांचे पेव फुटले. स्पेनच्या राजाने कंपनीबरोबर व्यापारात रस दाखविला आहे, राजाला थोडासा मोबदला देऊन त्या बदल्यात ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ सारख्या अतिमहत्वाच्या ठिकांणावर आपल्या कंपनीची मक्तेदारी असेल…

अशा वावड्या ‘आतल्या गोटातल्या’ व्यक्तींच्या हवाल्याने उठू लागल्या… शेअरचा भाव पुन्हा वाढू लागला.

कंपनीच्या हुशार प्रवर्तकांनी १२ एप्रिलला, हुबेहुब हल्लीच्या बुक बिल्डींग इश्श्युसारखीच, शेअर्सची प्रति शेअर ३०० पौंड दराने सार्वजनिक रित्या विक्री करावयाचे जाहीर केले.

ह्या योजनेला जनतेचा अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. कंपनीने या पैशांतून खनिजे आणि कापड व्यवसाय या मूळ धंद्या व्यतिरिक्त, जहाजे विकत घेऊन नविन व्यापारी मोहिमा काढणे, गुलामांची खरेदी-विक्री सारख्या तत्कालीन कमालीच्या फायदेशीर व्यवसायांत हात पाय पसरणे वगैरे दावे केले.

बाजारांत शेअरचे भाव वाढतच राहिले. १७१९ सालापर्यंत कंपनीने सरकारला दिलेले कर्ज ०५ कोटी पौंडापर्यंत पोहोचले. गेल्या दोन/तीन वर्षातील दैदिप्यमान कामगिरी, जाहिरातबाजी आणि बाजारातील तेजीचा उन्माद याचा फायदा घेऊन कंपनीने अनेकदा निरनिराळ्या प्रकल्पांसाठी चढ्या दराने इश्श्युज काढून बाजारांतून पैसा उभारला.

South See Bubble
सर आयझॅक न्युटन यांच्या सांपत्तिक स्थितीवर South See Bubble चा परिणाम

एव्हाना शेअर्समध्ये पैसे गुंतवून झटपट श्रीमंत होण्याच्या वेडाने परिसीमा गाठली होती.

एकीकडे धनाढ्य, सावकार, उमरावांत या कंपनी्त गुंतवणुकीची अहममिका लागली असतानाच दुसरीकडे अगदी सामान्य, गरीब सुद्धा कर्जे घेऊन ह्या कंपनीचे शेअर्स घेण्यास आतूर झाले होते.

आकडेवारीनुसार २/३ पेक्षा अधिक पेन्शनर्सनी आपले निवृतीवेतन या इश्श्युमध्ये गुंतवले होते, यावरुन या प्रकरणाची तीव्रता ध्यानात येईल. शेअर खरेदीची ही सुंदोपसुंदी इतकी मोठी होती की कंपनीची कार्यालये अपुरी पडली.

जमलेल्या जनतेत धक्काबुकी, मारामारीचे प्रसंग घडले. शेवटी रस्त्यावर बाकडी मांडून कंपनीने इश्श्युद्वारे लोकांना शेअर्स दिले. सर आयझॅक न्युटन हेही स्वतःला या कंपनीत गुंतवणूक करण्यापासून रोखू शकले नाहीत.

उपलब्ध माहितीप्रमाणे त्यांनी या कंपनीत ३०,००० पौंड गुंतवले व प्रचंड नुकसान (आजचे तब्बल २५/३० कोटी रुपये!!!) सोसल्याने उद्वेगाने ‘I can calculate the motion of heavenly bodies, but not the madness of people” असे उद्गार काढले.

दरम्यान ०३ मे १७२० रोजी शेअरने ८९० पौंडाचा भाव नोंदवला. येथे प्रथमच गुंतवणुकदारांना ‘बुडबुडा’ फुटण्याची भीती वाटली व भावांत मोठी घसरण झाली.

मात्र तरीही काही हितसंबंधीयांनी पुन्हा तुफान खरेदी करुन तेजीचा देखावा करण्यांत यश मिळवले आणि ऑगस्ट मध्ये भाव १००० पौंडांपलिकडे पोहोचवला.

शेवटी A pin lies in wait for every bubble…ही उक्ती खरी ठरलीच, भाव वेगाने घसरु लागले. पूर्ण ऑगस्ट्मधे घसरण चालू राहिली. ०२ सप्टेंबर १९२० रोजी ७०० पौंड, ०८ सप्टेंबर – ६४०, ०९ सप्टेंबर – ५४० अशी तीव्र उतरण दाखवित अंतिमतः शेअरचा भाव १३५ पौंडांवर स्थिरावला.

एक अंक संपला, पण आजही अगदी अल्पावधीत भावांत ५०/१०० पटींपेक्षाही अधिक वाढ दाखवून नंतर जमीनदोस्त होणा-या हिमाचल फ्युच्युरास्टिक, पेन्टामिडिया सारख्या कंपन्या हेच सांगतात की साठा उत्तराची कहाणी अजून सुफळ संपुर्ण व्हायची आहे.

हा महाघोटाळा आणि आपल्या बाजारांतील घोटाळे यांत अनेक साम्य स्थळे आहेत.
  • अति महत्वाकांक्षी प्रवर्तक आणि त्यांच्या राक्षसी लालसेला साथ देणारी बडी धेंडे ह्या भ्रष्ट युतीतूनच अशी प्रकरणे जन्म घेतात. सामान्य गुंतवणुकदार अशा फसव्या लोकांच्या जाळ्यात ओढला जातो, (आपले BSE सर्वाधिक काळ बंद पाडणारा MS Shoes घोटाळा)
  • आपण गुंतवणूक करीत असलेल्या कंपनीची मूलभूत माहितीही नीटशी घेण्याचे कष्ट आपण घेत नाही. येथेही ‘द साऊथ सी’ कंपनी ही एक अतिसामान्य व्यवस्थापन असलेली कंपनी होती जिची अनेक जहाजे चुकीच्या पत्त्यावर जाऊन अडकल्याचा इतिहास होता. भारतातही अशाच कंपन्याच्या नादी लागून अनेकांनी हात पोळून घेतले आहेत.
  • मला काय त्याचे? मला गाठायचा आहे फक्त एक (माझ्यापेक्षा) मुर्ख…आणि मी सुटलो !! ही ‘Greater fool theory’ तेंव्हाही होती..आजही आहेच आहे.
  • याशिवाय कोणत्याही तेजी आणि नंतरच्या कडेलोटात हमखास आढळणारा आशावाद (Optimism), सहभाग (Participation), उन्माद(Euphoria), गळचेपी (Capitulation) आणि घबराट (Panic) ही सर्व मूळ लक्षणे या गोष्टींत ठळकपणे दिसतात.

असे म्हणतात की ‘History doesn’t repeat itself, but it does rhyme’, आपण अशा धड्यांतून काही बोध घेतला आहे का?? निर्णय मी आपणावर सोडतो. धन्यवाद.!!

(संदर्भः ‘Extraordinary Popular Delusions and the Madness of Crowds’- by Charles Mackay, ‘अर्थात’- श्री. अच्युत गोडबोले आणि आंतरजालावरील अनेक दुवे)

सौजन्य: अर्थसाक्षर

लेखक- प्रसाद भागवत

(श्री. प्रसाद भागवत हे गेली २२ वर्षे शेअर बाजारात कार्यरत असून मराठी वाचकांना शेअर मार्केटची माहिती व्हावी म्हणून विपूल लेखन करत आले आहेत.)

वाचण्यासारखे आणखी काही…..

शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज
तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!
पैशाचा उड्डाणपूल बांधूया

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय