कौल

त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी मी ओसरीवर खांबाला टेकून बसले होते. आप्पा देवगडला मराठयांकडे गेले होते, ते शेवटच्या गाडीने येणार असं आई म्हणत होती.

घरात आई-आजीची रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. मी निरांजन पेटवून तुळशीपुढे आणून ठेवले आणि ओसरीवर खांबाला टेकून बसले.

समोरची पांदण ग्रामपंचायतीच्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात उदासवणी वाटत होती. दिवेलागणीचा काळोख घरावर घेरून आल्यासारखं उगाचच मला वाटलं आणि मी उठून आत जाऊन पाणी पिऊन आले. पुन्हा खांबाला टेकून बसले. का कुणास ठाऊक पण उगाचच बेचैन वाटत होतं.

‘अजून आले नाहीत काय गो हे? आढ्याकडे जाऊन बघ जरा जाग लागतेय का’ माझघराच्या दारातून आई मला उद्देशून म्हणाली खरी पण माझं तिकडे लक्षच नव्हतं. माझं खरंतर कुठेच लक्ष नव्हतं.

खरंतर हल्ली माझं कशातच लक्ष नाही. हे कधीचंच आजीने हेरलं होतं. आणि म्हणूनच तिने आणि आईने गेल्या काही महिन्यांपासून आप्पांकडे ‘हिला एकदा उजवून टाक’ असं टुमणं लावलं होतं.

म्हणून तर आज आप्पा देवगडला गेले होते. आणि म्हणूनच मी अधिक बेचैन झाले होते. मी पुन्हा एकदा आत जाऊन पाणी पिऊन बाहेर येणार एवढ्यात ‘आई..’ आप्पांची हाक आली.

मी आतच थांबले. आजी बाहेर आली. आप्पा बाहेर ओसरीवरच्या आरामखुर्चीत टेकले आणि मानेवरचा पंचा काढून घाम पुसू लागले.

पाण्याचा तांब्या समोर ठेऊन माजघराच्या चौकटीला टेकून उभं रहात ‘भेटले काय मराठे?’ असं विचारत आजीने विषय काढला.

तशी, ‘हो भेटले. गोगटयांकडे सुद्धा जाऊन आलो. सगळं बघून आलो. उत्तम आहे. आज सकाळी मुलाचा चुलता आला होता मराठयांच्या दुकानात. मुलाचं टाचण दिलंय. मी हिचं टाचण ठेऊन आलोय मराठेंकडे. पत्राने कळवतो म्हणालाय’

अप्पांनी एका दमात आधी पाण्याचा तांब्या संपवला होता आणि मग बातमी सांगून टाकली होती.

आप्पा उठून न्हाणीकडे गेले. गरम पाण्याची बादली भरून घेऊन आई मागल्यादारी उभी होती. मी माझघरातून वळून कोठीच्या खोलीच्या खिडकी पाशी आले. मागे न्हाणीघर.

पाण्यात विसण घालता घालता आईने विचारले, ‘कसंय स्थळ?’

‘बरंय’ आप्पा धोतराच्या निऱ्या काढत होते.

‘झेपेल का आपल्याला?’ आईने बादली मोरीत ठेवली.

‘झेपेल’ आप्पांनी सदरा काढून खुंटीवर टांगला.

‘पुढे कसं काय?’ पदराला हात पुसत आईने विचारले.

‘माणसं बरी आहेत नव्या विचारांची वाटली. पत्र येईल मग ठरवू’ असं म्हणून अप्पानी मोरीत जाऊन एक एक तांब्या अंगावर घ्यायला सुरुवात केली.

कोठीच्या खोलीतल्या भिंतीला टेकून सरकत सरकत मी खाली बसले. तळव्यांना घाम फुटला. ओठ कोरडे पडले. घसा सुकला.

काहीवेळ तसाच गेला.

रामरक्षा म्हणत आप्पा माझघरात येऊन लिखाणाच्या टेबल पाशी बसले होते.

‘वीणा गो वीणा, कुठे गो आहेस?’ आजीच्या हाकेने मी भानावर येत धडपडून बाहेर आले.

‘काय गो कोठीचे खोलीत काय करत होतीस? चल पानं घे. आप्पा दमून आलाय त्याला भूक लागली असणार’, असं म्हणून आजी स्वयंपाकघरात वळली.

जेवणं झाली.

आवरा-आवर झाली.

मी अंथरुणावर पडले पण काही केल्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. आप्पा आपलं लग्न ठरवून आले. म्हणजे तुझी-माझी भेट आता परत काही होणे नाही. हे मला कळून चुकले. पण कळते ते वळत नाही नं…

तुझे नाव तर मी त्याच दिवशी टाकले ज्या दिवशी तू निघून गेला होतास. पण तू येशील अशी आशा होती मनात.

पुढल्या आठवड्यात देवगडातून पत्र आले. आणि आश्चर्य म्हणजे आंतरदेशीय पत्रात एक फोटो सुद्धा होता. आम्हा सगळ्यांसाठी हे नवीनच होतं.

‘फोटो काय मेला पाठवायचा तो ! ही कसली नकोती फ्याडं’ म्हणत आजीने नाक मुरडून झाले होते.

अजूनही फोटो आणि पत्र अप्पांच्या हातात होते. आप्पानी आईला हाक मारून फोटो तिच्या हातात दिला आणि आपण पत्रावरून नजर फिरवू लागले.

मला कशातच रस नव्हता खरा पण, एकूण घरातल्या वातावरणाचा प्रभाव माझ्यावर पडून कसलीशी चुटपुट लागल्या सारखे मला झाले होते. मी लक्ष देऊन आप्पांचा चेहरा निरखू लागले.

‘बरं. तर असं आहे होय.’ असं म्हणून आप्पांनी पत्रातील मजकूर आईला आणि आजीला थोडक्यात सांगितला तो असा की, मुलगा वकिलीच्या शेवटच्या वर्षाला होता. मुंबईत राहून शिकत होता. विचारसरणी आधुनिक होती. म्हणूनच त्याच्या सुचने नुसार फोटो पाठवला होता.

नोंदणी पद्धतीने देणे-घेणे न करता विवाह करावा अशी त्याची इच्छा होती. पण त्याच्या आजोबांच्या अग्रहाखातर घरगुती विवाहसोहळ्याला त्याने मान्यता दिली होती. मुलीला प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. तिच्या पसंतीला, मताला महत्त्व आहे वगैरे वगैरे.’

आप्पा पत्रातला मजकूर वाचत होते. त्यातल्या पुढच्या ओळी काही माझ्या कानावर पडल्याच नाहीत. दोन वर्षा पूर्वीचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि तुझ्या आठवणीने मला रडू फुटलं.

आई-आप्पांसमोर अगदीच कानकोंडं झालं आणि मी परसदारी आले. तिथे बहरलेला चाफा डोलत होता त्याला पाहिलं आणि मी बागेच्या दिशेने धावत सुटले.

डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. शेवटी बागेच्या दुसऱ्या टोकाला आले आणि काळ्या आंब्याच्या खाली बसून खूप रडले.

त्या सुट्टीत ताईकडे गेले होते तेव्हा तू भेटलासच नसतास तर?

तू निघून गेल्यावर मी घरी आले आणि हा दिवस पाहण्यासाठी जिवंत राहिले त्या ऐवजी विहिरीत उडी मारली असती तर? मेले असते तर? पण मी जिवंत राहिले तुझ्या आशेवर. तू परत येशील, कधीतरी भेटशील म्हणून.

पण, आता त्याचाही काही उपयोग नव्हता आणि हे लग्न मोडणंही माझ्या हातात नव्हतं. मग, आता काय करावं? मरावं का आपण? बागेतल्या विहिरीत उडी मारावी का? तेव्हा नाही केलं ते आता करावं का? तू मला सोडून निघून गेलास; तसं मीही.. हे जगच सोडावं का?

असे विचार आले आणि मी खरंच धावले विहिरीकडे. कठड्यापर्यंत पोचले आणि तेवढ्यात वाटलं त्या मुलाला माझं मत जाणून घ्यायचंय तर मग त्याला काहीच कळू न देता मी असं मरून चालणार नाही.

आप्पा काय तोंड दाखवतील. हा विचार आला आणि मी माघारी फिरले.

त्या मुलाला भेटायला हवं. भेटून त्याला नकार द्यायचा. म्हणजे ही वेळ तरी टळेल. असा विचार मनात पक्का करत मी घरात पोचले. आप्पा कुठेतरी बाहेर गेले होते.

आजी बहुदा रामाच्या देवळात. आई सुद्धा कुठे दिसली नाही. घरात कोणीच नाही म्हटल्यावर मी ओसरीवर आले आणि कोनाड्यातला दिवाळी अंक काढून चाळू लागले.

नकाराचा निर्णय पक्का झाल्यामुळे मी बरीच शांत झाले होते. इतक्यात मला पत्राची आठवण झाली आणि फोटोची. मी चटकन आत जाऊन आप्पांच्या टेबलच्या खणातले ते पत्र बाहेर काढले. त्या पत्रातच फोटोही होता.

मी तो फोटो बाहेर काढला. पत्र माझ्याहातून गळून पडले. मी फोटोकडे पहातच राहिले. हाताची घडी घालून उभा राहिलेला. रोखून बघणारी करारी नजर असलेल्या. एका रुबाबदार तरुणाचा तो फोटो होता.

बारीक चौकड्यांचा इन केलेला हाफ शर्ट आणि करड्या रंगाची पॅन्ट. उभा गोलट चेहरा आणि मागे वळलेले केस. ओठांच्यावर मिशीची बारीकशी रेष.

कितीतरीवेळ तो फोटो मी पहात होते.

मला नक्की काय होते आहे काहीच कळेना. माझघराचा दरवाजा ढकलून आजी आत आली आणि मी भानावर येऊन धडपडत तो फोटो आणि पत्र पुन्हा खणात ठेवले आणि बाहेर पळाले. नशीब आजीचे माझ्याकडे लक्ष नव्हते.

बाहेर येऊन मी अंगणाच्या पेळेवर बसले आणि उगाचच कडेचे गवत तोडू लागले. माझ्या आत काहीतरी उचंबळून येत होते. पुन्हा एकदा तो फोटो पहावा असेही वाटले. तुझीही आठवण आली.

मग तुझा चेहरा आठवला. तुझे घारे डोळे आठवले. बागेतला तुझा स्पर्श आठवला. तितक्यात ‘मुलीला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे. मुलीच्या पसंतीला महत्त्व आहे’ हे पत्रातले वाक्य आठवले. तडकाफडकी न सांगता निघून गेलेला तू आठवलास.

माझ्या मनात द्वंद्व सुरू झाले. न बोलता निघून जाऊन तुझे मला नाकारणे आणि न भेटता न बोलताही ‘मुलीच्या मताला महत्त्व आहे’ हे पत्रातले वाक्य याची नकळत मनात तुलना होऊ लागली आणि मी पुन्हा अस्वस्थ झाले.

पंधरा-वीस दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस सकाळी, ‘या रविवारी गोगट्यांची मंडळी बघायला येणार आहेत’ असे आप्पानी जाहीर केले. घरात लगबग.

तो रविवार उजाडला. सकाळी अकराच्या सुमारास मंडळी आली.

आईने साडी नेसायला लावून डोक्यात अबोलीचा गजरा माळायला दिला होता.

मागचे पंधरा वीस दिवस मी कसे काढले होते हे माझे मलाच ठाऊक. डोक्यात विचारांचा भुंगा अविरत भुणभुणत होता.

मी ताटात चहाचे कप घेऊन माजघरात आले. समोर ताट धरून वर पाहिले तर फोटोतला चेहरा जसाच्या तसा. मी चटकन वळून आत गेले.

प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मात्र आता उर धपापु लागले होते. अजून एक गोष्ट गेल्या पंधरा दिवसात घडली होती ती म्हणजे प्रत्यक्ष भेटायची संधी मिळतेय तर भेटून बोलल्या शिवाय आणि मुख्य म्हणजे विचार केल्याशिवाय नकार द्यायचा नाही. या मतापर्यंत मी पोचले होते.

एक मन म्हणत होते की, तू परत येशील तुझी वाट पहावी. तर दुसरे, तू न सांगता निघून गेलास आणि यांनी निदान मत तरी जाणून घ्यायची इच्छा दाखवली त्याचा आदर ठेवला पाहिजे. असे बजावत होते.

‘अगो ह्यांना जरा सुपारीची बाग तर दाखव’, अशी आईची हाक आली आणि मी लटपटत्या पायांनी बाहेर आले.

आम्ही दोघे बागेत पोचलो.

‘मी सुभाष, सुभाष रामचंद्र गोगटे. लॉची शेवटची परीक्षा देतोय’

त्या आवाजात एक मार्दव होता.

मी त्यांच्याकडे पाहिले.

नजरेला नजर मिळाली.

ती नजर स्वच्छ होती. त्या गहिऱ्या डोळ्यांचा थांग लागणं कठीण होतं.

मला तुझे डोळे आठवले. भुरळ घालणारे. ते जादुई होते… शांत होते…

मी टक लावून त्यांच्याकडे पहात होते. आणि मनातल्या मनात अस्पष्ट होत चाललेल्या तुला आठवत होते. तुझ्यातला उत्साह, खट्याळपणा, चंचलता ह्या सगळ्याच्या उलट समोरचं व्यक्तीमत्व

प्रभावी, शांत, हालचाली देखील संयमित, स्थिर नजर आणि हो हे काही उसनं आणलेलं सोंग नव्हतं तसं असतं तर ते पाहताक्षणी जाणवलं असतं.

मी काहीच बोलले नाही.

‘तुम्ही काहीच बोलत नाहीत.’

‘हं’ मी एवढंच उत्तरले.

‘असं एकट्याने परक्या मुलाला भेटणं म्हणजे थोडं अवघडून टाकणारं आहे. मी समजू शकतो पण, खरंच सांगतो, लग्नाआधी किमान दोन शब्द प्रत्यक्ष बोलून जिच्याशी माझं लग्न होणार आहे तिला किमान जाणून घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे तिला काय वाटतं ते समजून घ्यायची माझी प्रामाणिक इच्छा होती इतकंच.’

ते एका दमात बोलले आणि माझ्याकडे पाहू लागले.

मी, ‘हं’.

‘तुम्हाला हे चुकीचं तर वाटलं नाही ना? म्हणजे या पेक्षा वेगळा पर्याय मला सुचेना. माझं असं वागणं आगाऊपणाचं वाटलं तर तसं स्पष्ट बोला. मला राग नाही येणार. तुम्हाला नसेल माझ्याशी लग्न करायचं तर तसही सांगा.’

‘अं, हो,’ मी भानावर आले.

‘नाही, म्हणजे अगदी आत्ताच सांगा असा आग्रह नाही माझा. नंतर कळवलं तरी चालेल.’

‘हो’ मला काय बोलावं सुचेना.

आणि आठवलं, आपण एकमेकांना असं विचारलंच नव्हतं, नाही का?

पण, आपण ‘एकमेकांची साथ सोडणार नाही’ असंही एकमेकांना सांगितलं नव्हतं.

म्हणजे ते सगळं त्या क्षणांपुरतं होतं? निव्वळ अपघात किंवा सहज स्वाभाविक आकर्षण होतं?

आज पहिल्यांदा भेटलेल्या या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने माझ्या एकूणच तुझ्या बद्दलच्या कल्पनांसमोर प्रश्न उभे राहत होते.

तुझ्या भेटीतून मला एक तसा पुरुष भेटला होता. आता या भेटीत मला एक असा पुरुष भेटत होता. आणि तुला खरं सांगू एका बेसावध क्षणी माझ्या मनाचा तोल झुकला. त्या संयमित विचारी व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडू लागली होती.

मी काहीच बोलत नाही हे पाहून तेही गप्प झाले होते.

एव्हाना आम्ही घरामागच्या विहिरीला वळसा घालून परसदारी पोचलो.

आता मात्र मला बोलायचे होते, पण काही सुचेना.

आणि माझ्याही नकळत चटकन मी त्यांना विचारले, ‘तुम्हाला सोनचाफा आवडतो?’

त्यांनी चमकून वळून माझ्याकडे पाहिले आणि.. ते … ‘हो’ म्हणाले.

तुलाही चाफा आवडायचा.

माझे डोळे भरले.

ते पुढे होऊन समोरच्या दाराने आत गेले. आणि मी मागल्या दाराच्या दिशेने निघाले तेवढ्यात आईची हाक आली. ‘वीणा, यांचा चहा झालाय. येता येता ती चाफी फुललीयेत बघ. तेवढी दोन काढून आण. पाहुणे निघायचं म्हणतायत. वहिनींना कुंकू लावून फुल देते.’

मी पदराने डोळे टिपून चाफ्याची फुलं खुडली आणि एक कळी सुद्धा.

तशीच आत आले.

पाहुणे उठतच होते.

आईने ह्यांच्या आईना कुंकू लावले. फुल दिले. आणि मला खुणेनेच त्यांना नमस्कार कर असे सांगितले.

ह्यांच्या आईच्या आणि वडिलांच्या पाया पडून माघारी वळताना मी माझ्या मुठीत धरून ठेवलेली ती चाफ्याची कळी मुठीतून सुटून यांच्या पायाशी पडली. त्यांनी ती नेमकी उचलून घेतली मग..

माझ्याकडे पाहिलं आणि अगदी कोणाला कळणारही नाही अशा तऱ्हेचं हसू त्यांच्या ओठावर उमटलं.

मी लाजून आत पळाले.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय