मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही…

संदर्भ :

  • Everything You Always Wanted to Know About Sex* (*But Were Afraid to Ask) (1969, लेखक David Reuben.(हे पुस्तक आमच्या कंपनीच्या लायब्ररीत मिळाले होते,अन्यथा ते बाजारात उपलब्ध नाही – सध्यातरी )
  • Against our will- Men Women and Rape – लेखिका: सुझान ब्राऊन मिल्लर
    शिवाय इतर अनेक यु ट्यूब वरील Documentaries, articles , मराठी लेख,फेस बुक वरील बातम्या, पोस्ट आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया- थोडक्यात इंटरनेट वर उपलब्ध माहितीचा उपयोग केलेला आहे. आणि This week tonight ह्या HBO वरील मालिकेचा एक भाग (हि अमेरिकेत दाखवली जाते पण यु ट्यूब वर उपलब्ध आहे. 👇
Sex Education and Parents

(मुळात मुलांचे लैंगिक शिक्षण कसे करावे?, त्याना हे शिक्षण कसे द्यावे? हे सांगण्याकरता हा लेख लिहिलेला नाही. ह्या एरवी अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी सर्वसामान्य पालकांचा आणि सरकारचाही दृष्टीकोन काय आहे आणि तो कसा असायला हवा?, का असायला हवा? हे सांगायचा हा प्रयत्न आहे. खरे पाहू जाता लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण ह्यात थोडा फरक आहे पण मुळात जेथे लैंगिक शिक्षण ह्या विषयी जबाबदारीने काही लिहिणे बोलणे कमी, त्यात ह्या दोनही गोष्टीतल्या फरकावर विस्तृत बोलणे म्हणजे विषयान्तराला आमंत्रण देणे …

मागे एकदा मी ‘शिक्षण : धोरण उद्दिष्ट आणि गफलती’ हि चार भागांची लेखमाला लिहिली होती. त्यात शिक्षणाच्या अनुषंगाने मराठी भाषेबद्दल थोडे काही लिहिले गेले होते. पण त्याचा परिणाम असा झाला कि बहुतेकांनी पुढचा लेख वाचलाच नाही आणि चर्चेचा, प्रतिक्रियांचा सगळा ओघ मराठी भाषा आणि तिचे संवर्धन ह्या बाजूने गेला… आणखी एक, ह्या लेखात वर्णन केलेल्या घटना काल्पनिक नाहीत. त्या खऱ्या आहेत फक्त विषयाच्या आणि लेखाच्या सोयी करता, आणि व्यक्तिगत गोपनियतेसाठी जुजबी फेरफार केलेले आहेत.)

sex-educationह्या वर्षीच्या मार्च महिन्यातली गोष्ट. नुकत्याच मुलीच्या सुट्ट्या सुरु झालेल्या…सकाळी सकाळी पोरगी गळ्यात पडली आणि “बाबा आज कामावर जाऊ नको…” म्हणाली. मी सुद्धा निमित्तालाच टेकलो होतो. मारली दांडी! दोन्ही मुली खुश (म्हणजे माझी आणि सासऱ्यांची मुलगी😘…) आता बायको खुश व्हायचं आणखी एक कारण म्हणजे तिला त्या दिवशी नेहमी पेक्षा एक दोन पेशंट जास्त होते आणि मिहीकाला सुट्ट्या पडल्याने, तसेच ऐन वेळी तिचे नेहमीचे पाळणाघर काही ‘अपरिहार्य’ कारणाने बंद असल्याने तिच्या समोर मिहीकाची सोय काय करायची? हा मोठाच प्रश्न होता, तो आपसूकच सोडवला गेला. असो तर मग ती तिच्या क्लिनिक ला गेल्यावर मी आणि मिहिका थोडावेळ बाहेर वगैरे जाऊन आलो, आईने निग्रहाने नाकारलेल्या चिल्लर खरेद्या नेहमीप्रमाणे माझ्या गळ्यात पडून तिने वसूल केल्या आणि आम्ही अकरा साडे अकराला परत आलो.

तर कॉलनीतली मिहिकाची एक मैत्रीण तिची खेळायला वाटच पाहत होती पण ऊन जास्त असल्याने मी त्या दोघींना घरातच काहीतरी खेळा म्हणून सांगितलं. त्यांनी काहीतरी खेळ चालू केले. मी आतल्या खोलीत जाऊन कम्प्युटर वर बसलो. थोडावेळ गेल्यानंतर, नेहमीप्रमाणे त्या दोघींचा खिदळण्याचा (किंवा भांडणाचा जास्त अपेक्षित) आवाज न आल्याने मी त्या दोघी काय करताहेत ते बघायला बाहेर आलो. तर ह्या दोघी बहुला बाहुली खेळत होत्या. मिहिका कडे एक बराच जुना बाहुला आहे (तो, अंगावर कुठेही दाबले कि रडणारा किंवा निरनिराळे आवाज काढणारा) तिच्या मैत्रिणीने तिची बाहुली आणली होती आणि तिने तो बहुला आणि बाहुली ह्यांच्या अंगावरचे कपडे काढून चक्क त्यांना संभोगाच्या पोझिशन. (मिशनरी पोझिशन) मध्ये ठेवलेले होते. नक्की ती मिहीकाला काय सांगत होती ते मला ऐकू आले नाही पण ती दबक्या आवाजात बोलत होती. (इथे मुद्दाम सांगायचे असे कि मिहिका ६ वर्षांची आहे आणि तिची मैत्रीण साधारण ८ वर्षांची म्हणजे दोघीही वयाने फार काही मोठ्या नाहीत आणि नक्कीच त्या दोघी काय करत होत्या ते त्यांना समजत नव्हतं.) पटकन काय करावे ते मला सुचेना पण मग प्रसंगावधान राखून मी मध्ये येऊन त्याना म्हटलं चला उकाडा फार जास्त आहे आपण मस्त आईस्क्रीम खाऊन येऊ. त्या दोघी अगदी व्यवस्थित हसत खेळत माझ्याबरोबर बाहेर आल्या. तिची मैत्रीण ही दचकली किंवा ओशाळी झाल्याचे मला जाणवले नाही. दोघी तो खेळ विसरूनही गेल्या. मी विसरणे शक्यच नव्हते. बायको क्लिनिक वरून आल्यावर योग्य वेळ बघून तिला झालेला सगळा प्रकार सांगितला.

आम्ही दोघांनी निर्णय घेतला कि मिहीकाशी ह्या विषयावर बोलले पाहिजेच पण तिच्या मैत्रिणीच्या आई वडिलांशी ही बोलले पाहिजे. आता बायको मनोविकार तज्ञ असल्याने, (शिवाय त्या मुलीचे बाबा कामानिमिता बाहेर गावी असल्याने) तिने त्या मुलीच्या आईशी बोलणे जास्त संयुक्तिक होते. त्या प्रमाणे ती बोलली. त्यावर त्या आईची प्रतिक्रिया अगदी अनपेक्षित नसली तरी निराशाजनक होती. म्हणजे, “आम्ही आमच्या मुलीवर चांगले संस्कारच(!) करतो, तिचे बाबा आणि मी तर तिच्या समोर एकमेकांशेजारीहि बसत नाही. तिच्या बाबांना सांगू नका नाहीतर त्यांचा राग फार वाईट आहे ते तिला फोडूनच काढतील, आमच्या मुलीच्या डोक्यात असले घाणेरडे(?) विचार येणे शक्य नाही. तुमच्या मुलीनेच असले काहीतरी घाणेरडे तिला शिकवले असेल, तुम्ही तिला माझ्या मुली पासून दूरच ठेवा कसे…” इ. इ.

नंतर आम्ही दोघेही मिहीकाशी बोललो. बायकोला असल्या गोष्टी हाताळण्याचा चांगलाच अनुभव असल्याने तिने मिहीकाशी ह्या विषयावर व्यवस्थित संवाद साधला. (इथे ती मिहिकाशी काय बोलली हे सांगायचा मोह झाला होता पण तिच्या आईच्या सल्ल्याप्रमाणे तो आवरत आहे. अशा गोष्टी व्यक्ती आणि घटना सापेक्ष असल्याने त्याचा तसा काही उपयोग नसतो, आणि हा मामला नेहमी समुपदेशक आणि रुग्ण ह्यांच्यामधला खाजगी मामला असतो.) पण मी, माझं काय? मला प्रकर्षाने जाणवले कि माझी ह्याविषयावर माझ्या मुलीशी काही बोलायची तयारीच नाही. मला हे असले प्रसंग समोर आल्यावर आपण काय करायचे हेच माहिती नव्हते. आणि मला माझे लहानपण आठवले.

तेव्हा मी साधारण ५वीत असेन. आमचा कुत्रा पिंटू, त्याला घेऊन बाबा रोज सकाळी फिरायला जायचे. कधी कधी मी हि जात असे. एकदा असेच त्यांच्या बरोबर फिरायला गेलेलो असताना रस्त्यावर कुत्रा कुत्री संभोग करताना मी पहिले आणि बाबांना ते काय करतायत हे विचारले. घरी गेल्यावर सांगतो असे बाबा म्हटले. आम्ही घरी जाई पर्यंत मी तो प्रकार विसरलो होतो पण आई आणि बाबा दोघांनी मला समोर बसवुन, व्यवस्थित समजावून सांगितले होते. कोणत्याही प्रकारचा संकोच, लाज, अवघडलेपण त्यांच्यात नव्हते कारण तशा भावना माझ्या मनात ही संक्रमित झालेल्या नव्हत्या. एवढेच नाहीतर ह्या असल्या विषयांवर मी पुढे कधीही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकत असे.

स्त्रीयांना येणारी मासिक पाळी, त्याची कारणं, स्त्री पुरुष संबंध, मुल कसे जन्माला येते, गर्भ धारणा कशी होते हे सगळे मला त्यांनीच वेळोवेळी समजावून सांगितले. एवढंच काय, पण पुढे जेव्हा कधी मी लग्न करायचे ठरवेन तेव्हा मी आणि माझी होणारी बायको दोघांनीही विवाहपूर्व समुपदेशन (Pre Marital Counselling) घेण्याचा सल्ला ही त्यांनीच आवर्जून दिला होता. मी त्यांचा धडधाकट असलेला एकुलता एक मुलगा (माझी मोठी बहिण मतीमंद आणि अर्धांग वायुने आजारलेली होती) त्यामुळे ह्या विषयात त्यांना पूर्वानुभव असणे शक्य नव्हते. नक्कीच त्यांनी कधी ना कधी हा प्रसंग आपल्या समोर येणार आहे. हे ओळखून तयारी केलेली होती. मी सांगतो तो काळ १९८६ ते १९९३ च्या आसपासचा आहे. आणि त्या काळाच्या मानाने हि एक विशेष गोष्ट होती, असे मला बायकोने सांगितले. हेही मला बायकोनेच सांगितले कि “तो काळ सोड, आजही भारतात तरी आई वडलांनी असे शास्त्रशुद्ध तयारी करून मुलांशी बोलणे हे विरळाच आढळून येते.” तिचे स्वत:चे आई वडील उच्च विद्या विभूषित (विशेष म्हणजे वडील डॉक्टर-शल्यविशारद) असूनही ते कधीही तिच्याशी ह्या विषयावर बोलले नाहीत.

sexeducation१३व्या १४व्या वर्षी शाळेत असताना तिला प्रथम पाळी आली तेव्हा ती मनातून प्रचंड घाबरली होते. आपण आता लवकरच मरणार आहोत, आपण केलेल्या कुठल्या तरी पापाची शिक्षा म्हणून आपल्याला असला घाणेरडा(!) रोग झालेला आहे असे तिला वाटले होते. घरी गेल्यानंतर आईला घाबरत घाबरत सांगितल्यानंतर आईने तिला फक्त हे असे सगळ्यांनाच होते तु घाबरू नकोस वगैरे जुजबी सांत्वन आणि Sanitary Pad कसे वापरायचे हे सांगितले बस ह्यापेक्षा अधिक काहिही नाही. हे चित्र आजही फारसे बदललेले नाही. मुलग्यांची अवस्था हि काहीशी अशीच असते. त्यांना मिळणारे लैंगिक ज्ञान हे त्यांच्या मित्र परिवारातून. नाक्या कट्ट्यावरच्या चवदार गप्पातून, कुठेतरी मिळणाऱ्या पिवळ्या पुस्तकातून आणि मुख्य म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून, ब्ल्यू फिल्म्स, पोर्न क्लीप ह्यातून मिळालेले असते. त्यांना मिळालेली माहिती बऱ्याचदा चुकीची, भडक, अतिरंजित, पौरूषत्वाच्या अतिशयोक्त, वेडगळ कल्पना, स्त्री पुरुष संबंधांबद्दल विकृत भावना निर्माण करणारीच असते. ही माहिती पुरवणारे बऱ्याचदा मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेचा, कुतूहलाचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण ही करतात.

बायको कडे येणाऱ्या १० मुलांमागे (मुलगा मुलगी दोघेही) साधारण चार जणांचे लैंगिक शोषण झालेले असते. ही अत्यंत भयानक आकडे वारी आहे आणि हि भारत सरकारच्या आकडेवारीशी जुळते. १९९८,२००६ आणि २००७ ला UNICEF आणि स्त्रिया व बाल कल्याण मंत्रालय, भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून असे समोर आले कि भारतात ४० ते ५३% मुलं हि लैंगिक शोषणाचे बळी आहेत. (१९९८ पूर्वी असला कुठला सर्वे भारतात झालेलाच नाही. १९९८ साली हे प्रमाण ४०%, २००६ साली ४२% आणि २००७ साली ते ५३% होते.) भारतामध्ये ही आकडेवारी जवळपास महामारीच्या स्वरूपाला येऊन पोहोचलेली आहे. आशिया खंडात हे प्रमाण १२% आहे म्हणजे बघा. खाली जगाच्या निरनिराळ्या खंडात असलेली आकडे वारी दिलेली आहे:

आफ्रिका : २०.२% ते १९.३%
आशिया : ११.३% ते ४.१%
ऑस्ट्रेलिया : २१.५% ते ७.५%
युरोप : १३.५% ते ५.६%
साऊथ अमेरिका : १३.४% ते १३.८%
यु.एस./कॅनडा : २०.१% ते ८%

लैंगिक शिक्षणाचा विशेषत: पालकांमध्ये असलेला ह्याबाबाताच्या जागृतीचा अभाव हे ह्या मागचे एक प्रमुख कारण आहे. कोणत्या गोष्टीला लैंगिक शोषण म्हणायचे हेच पालकांना माहिती नसते. आधी आपल्या मुलाच्या बाबतीत असे काही होऊ शकते हेच मान्य करायचे नाही आणि असे काही झालेच तर ते लपवून, दाबून ठेवायचे ह्यामुळे अशा गोष्टीत मुलाना न्याय सोडा, साधे संरक्षण ही मिळत नाही. शिवाय पालक आणि मुलं ह्यांच्यात असलेला सुसंवादाचा अभाव आहेच. ह्यामुळे गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या, नैराश्य, वैफल्य आणि इतर मानसिक प्रश्न निर्माण झाले कि मग मानसोपचार तज्ञाकडे धाव घेतली जाते, ते सुद्धा शहरात आणि त्यातही काहीच पालक असे करतात एरवी वर्षानुवर्ष चालत आलेले देव-देव, नवस-सायास, व्रत वैकल्य असले उपायच केले जातात.

मुलांच्या शिक्षणा संबंधाने बोलताना बहुधा सगळ्यात कमी चर्चिला जाणारा विषय हा मुलांचे लैंगिक शिक्षण हा आहे (कमीत कमी भारतात तरी). मुळात लैंगिक भावना आणि क्रियाकलाप ह्यांचा आणि शिक्षणासारख्या पवित्र (!) गोष्टींचा एकत्र मेळ घालणे हेच अनेकांना पाप (?) वाटते. एकीकडे वरची आकडे वारी पाहता मुलांना लहान वयातच लैंगिक अत्याचाराच्या खाईत लोटलं जात आहे. आणि तरीही आपण पालक लोक अंगावर पडलेली पाल झटकावी तितक्या सहजतेने आणि कदाचित त्यापेक्षा अधिक शिसारी आल्यासारखे हा विषय झटकून टाकत आहेत. वयात आलेल्या, येऊ घातलेल्या, तुमच्या आमच्या मुलांच्या जगण्याशी, जोडलेला हा विषय आहे. त्यापासून इतकं घाबरून, फटकून राहाण्याने भागणार नाही. मुळात लैंगिकता ही निसर्गतःच लहरी, तर्काच्या चौकटींत न बसणारी व मनाचा संपूर्ण ताबा घेणारी असते. लैंगिकता किंवा लैंगिक प्रेरणा माणसाची सहज प्रेरणा असल्याने ती टाळता येणे, थांबवता येणे, काही काळ लांबवता येणे, अशक्यप्राय, अनैसर्गिक तर असतेच शिवाय अनेक समस्या निर्माण करणारेही ठरू शकते, नव्हे ठरतेच. (स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना हल्ली वाढलेल्या दिसतात त्याचे खापर पाश्चात्य संस्कृती, मुलींचे तोकडे कपडे, रात्री उशीरा फिरणे, नोकरी करणे इ.इ. असल्या गोष्टीवर फोडणारे महाभाग मुलांना न मिळणारे किंवा अपूर्ण, विकृत असणारे लैंगिक शिक्षण हे त्याचे प्रमुख कारण असू शकते हे विसरतात.)

ह्या विषयावर सरकारचे धोरण पुरेसे स्पष्ट नाही. पण आपणच फक्त अशी बोटचेपी भूमिका घेतो असे नाही अमेरिके सारख्या देशातही सरकारच्या धोरणाची ह्याबाबत संदिग्धताच दिसून येते. अमेरिकन संघराज्याच्या ५२ राज्यांपैकी फक्त २२ राज्यांमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य आहे आणि त्यापैकी फक्त १३ राज्यात ते वैद्यकीय दृष्ट्या अचूक असावे असा सरकारी निर्देश आहे. मजा आहे कि नाही! मुळात हा असा आग्रह कसा धरला जाऊ शकतो? म्हणजे गणित शिकवताना ते अचूक शिकवले जावे असा आग्रह धरण्या इतके हे हास्यास्पद आहे पण तरीही असा आग्रह ५२ पैकी फक्त १३ राज्य धरतात. म्हणजे उरल्या ठिकाणी अंधारच आहे. त्यामानाने भारत सरकारचे एक बरे आहे. अशी कोणतीही संदिग्धता आपल्या सरकारी धोरणात नाही. (कारण आपल्याकडे तसे काही धोरणच नाही तर संदिग्धता कशी असेल!…)

२००७ मध्ये भारत सरकारने शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण समाविष्ट करण्याचे ठरवले. त्यावेळी त्याचा मुख्य हेतू एड्स सारख्या रोगांचा फैलाव आणि प्रतिबंधात्मक उपाय ह्या दृष्टीने मुलांना जागरूक करणे एवढाच मर्यादित (मुख्यत्वे करून )होता. तरी अपेक्षे प्रमाणे विविध राजकीय, धार्मिक नेते, संघटना, संस्था ह्यांनी ह्याला कडाडून विरोध केला.

ह्यातली धक्कादायक आणि दु:खद बाब म्हणजे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक संघाने तर शालेय पुस्तकांची होळी करण्याची धमकी दिली. जवळपास सगळ्या राज्यांनी ह्याला तीव्र विरोध दर्शवला आणि कठोर संघर्ष करायचे संकेत दिले. वानगी दाखल त्याकाळी आलेल्या काही वर्तमानपत्रातल्या बातम्या खाली दिलेल्या आहेत जिज्ञासूंनी जरूर पहावे.

भारत सरकारचे शिक्षण विषयक राष्ट्रीय धोरण हेच मुळात स्वातंत्र्यानंतर तब्बल ४० वर्षानंतर ठरले. १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले आणि ९२ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांनाही आता पंचवीस वर्षे लोटली आहेत. दोन वर्षापूर्वीम्हणजे जानेवारी २०१५ मध्ये सरकारने शैक्षणिक धोरणाच्या पुनर्विचाराची प्रक्रिया सुरू केली होती. पण त्या मध्ये मुलांच्या लैंगिक शिक्षणा संदर्भात नक्की काय विचार केला गेला हे अजून तरी अज्ञातच आहे. शालेय शिक्षणासाठी विचारविनिमयार्थ १३ विषय निवडण्यात आले त्यात मुलांचे आरोग्य हा विषय होता पण लैंगिक शिक्षण हा विषय त्यात येतो कि नाही हे मात्र सरकारने स्पष्ट केलेले नव्हते. परंतु तत्पूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन ह्यांनी जुन २०१४ शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या लैंगिक शिक्षणावर बंदी घातली जावी असे मत व्यक्त केलेले होते. तेव्हा एकंदरीत फारसे आशादायक काही नसावे. लैंगिक शिक्षण हा एक राष्ट्रीय अजेंडा असून, तो एखाद्या पक्षाचा, राजकीय, धार्मिक किंवा इतर विचारप्रणालीच्या प्रसाराचा अजेंडा नव्हे. अधिक दु:खद बाब अशी कि ह्या निमित्ताने विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी “शाळेतील मुलांच्या लैंगिक शिक्षणावर बंदी घालणे योग्य कि अयोग्य?..” अशा प्रकारच्या ज्या मत चाचण्या घेतल्या त्यात साधारण ५१ ते ६०% लोकांनी बंदी घालणेच योग्य असा निर्वाळा दिला. म्हणजे आम्ही घरी ह्या विषयावर मुलांशी बोलणार नाही, शाळेत शिकू देणार नाही मग मुलांनी करायचे काय?

शाळेत लैंगिक शिक्षण का द्यावे ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे मुलांना ह्या विषयावर बऱ्याच शंका असतात. त्यातल्या काही वेडगळ वाटाव्या अशा, काही अत्यंत गंभीर तर काही अंतर्मुख करायला लावणाऱ्या असतात. एक गोष्ट नक्की कि ह्या सगळ्या शंकांचे समाधान अत्यंत समर्पक, शांत आणि समजूतदारपणे दिलेल्या उत्तरानेच होणे शक्य आहे. पण वर सांगितल्या प्रमाणे ह्या विषयावर मुलांशी बोलायची पालकांची पुरेशी मानसिक आणि बौद्धिक तयारी नसते हे तर आहेच, त्याहून वाईट गोष्ट म्हणजे तशी त्यांची इच्छाही नसते. खरेतर हा फार विसंगत दृष्टीकोन आहे. म्हणजे आपल्या कुणाचीही आपल्या मुलाला खेळताना पडून लागावे अशी इच्छा नसते, तरीही मुल कधी धडपडेल, किंवा आजारी पडेल आणि त्यावेळी डॉक्टर कडे लगेच जाणे शक्य होईल का? हे काही सांगता येत नाही म्हणून घरात वेळ पडली तर उपचार करण्याचे जुजबी सामान, औषधं वगैरे आपण ठेवतोच. पण झपाट्याने वाढत जाणाऱ्या मुलाशी विश्वासाचे आणि सुसंवादाचे नाते, जे सुरुवातीला असतेच, ते टिकवून ठेवावे, वृद्धिंगत व्हावे म्हणून मात्र फारसा प्रयत्न होत नाही. ह्यामुळे मुल ही त्याच्या मनात उदभवणाऱ्या लैंगिक शंका, प्रश्न, जिज्ञासा आपल्या पालकांसमोर मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत. तेव्हा आपण पालकांनी हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ही आपली गरज आहे, तसेच ती आपल्या मुलांची ही गरज आहे, अगदी निकडीची.

मुलांना ह्या संबंधांनी पडणाऱ्या प्रश्नापैकी काही वानगी दाखल खाली दिलेले आहेत. ह्यातले काही प्रश्न मी स्वत: लहान असताना माझ्या आई वडलांना विचारले होते तर काही प्रश्न निरनिराळ्या लेखामधून, युं ट्यूब वरच्या डोक्युमेंटरीज, बायकोच्याकडे येणाऱ्या मुलाकडून तसे त्यांच्या पालकांनी सांगितल्या प्रमाणे घेतले आहे. असले प्रश्न विचारले म्हणून घाबरून हे ‘पालक’ लोक तिच्याकडे मुलांना घेऊन आले होते. (बरं आहे. ह्या व्यवसायाचे भवितव्य उज्वल आहे😜. आम्ही येडयासारखे इंजिनियरिंग करत बसलो…असो.) प्रश्न वाचून ठरवा आपल्या मुलांना ह्या असल्या प्रकारच्या शंका येत असतील कि नाही आणि त्यांचे योग्य निराकरण होणे गरजेचे आहे कि नाही.

तुमच्या आमच्या मुलांना पडणारे प्रश्न :
  • ब्ल्यू फिल्म्स पाहून मला गर्भ धारणा होईल का?
  • हस्तमैथून केल्या मुळे शक्तीपात, एखादा रोग होतो का?
  • हस्तमैथून ही एक मनोविकृती आहे का?
  • हस्तमैथून केल्या मुळे मला कमी मार्क पडतील किंवा मी नापास होईल का?
  • हस्तमैथून पाप आहे का?
  • मुली हस्तमैथून करतात का? असल्यास कसे?
  • हस्तमैथूनात बाहेर पडणारे वीर्य तोंडाला लावले तर तोंडावरच्या पिटीका कमी होतात हे खरे आहे का?
  • समलैंगिक असणे ही विकृती आहे का?
  • वीर्य प्रश्न केल्यामुळे गर्भ धारणा होते का?
  • चुंबन घेतल्याने मी गर्भवती होईल का?
  • टूथ पेस्ट गर्भ निरोधक म्हणून वापरता येते हे खरे आहे का?
  • मुलगा आणि मुलगी एकत्र झोपले तर ती मुलगी गर्भवती होईल का?
  • एड्स झालेल्या मुलाचे/ मुलीचे चुम्बन घेताले तर मला सुद्धा एड्स होईल का?
  • मला ही सगळी (लैंगिक ज्ञान) माहिती घेणे जरुरी आहे का आणि मला ते जमेल का?

हे फक्त वानगी दाखल विचारले जाणारे प्रश्न आहेत. प्रत्यक्षात ह्या प्रश्नांची यादी प्रचंड मोठी आहे. ही आणि अशी प्रश्नावली पहिली कि जाणवते ते हे कि मुलांच्या मनात ह्या विषयासंदर्भाने शंकांचे काहूर उठलेले असते आणि ह्यातील सगळ्या शंकांचे योग्य प्रकारे, शास्त्रीय माहितीच्या आधारेच निराकरण करणे जरुरीचे आहे. कोणताही धार्मिक, सांस्कृतिक किंवा इतर अभिनिवेश अंगी न बाळगता. (“अभ्यास करा, एक थोतरीत ठेवून देईन, असले प्रश्न पुन्हा विचारशील तर!”… अशा प्रतिक्रिया न देता …पण बहुतेक वेळा अशा प्रतिक्रियाच दिल्या जातात.) पण तसे होताना दिसत नाही. अनेक पालकांना ह्यातील अनेक प्रश्नांचे योग्य उत्तर कसे द्यायचे हेही माहिती नसते. तेही एक वेळ क्षम्य मानता येईल, पण म्हणून मग ती माहिती घेऊन मुलांना योग्य प्रकारे सांगायची गरजही पालकांना पटलेली दिसत नाही ही मात्र गंभीर बाब आहे. आता ह्या संबंधाने पालकांचे दृष्टीकोन कसे आहेत किंवा त्यांचे आक्षेप काय आहेत ते ही पाहून घेऊ…..

  • लैंगिक शिक्षणाची आमच्या मुलांना गरज नाही. ती अत्यंत सालस, निरागस(?) आहेत. त्यांच्या डोक्यात नाही त्या गोष्टी भरवून देऊ नका.
  • लैंगिक शिक्षणामुळे ज्या मुलांच्या मनात ह्या संबंधी काही शंका विचार अजून आलेले नाहीत, त्यांना ही उगाच ह्या विषयावर विचार करायला, शंका विचारायला उद्युक्त केले जात आहे.
  • ही पाश्चात्त्यांची थेरं आहेत. आपल्या सारख्या सांस्कृतिक, अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत समाजाला त्याची गरज नाही.
  • मुलांना लैंगिक शिक्षणाची गरजच नाही. हे ज्ञान आपोआप होते, आम्ही नाही शिकलो? झाले ना सगळे व्यवस्थित!
    ह्या विषयावर मुलांशी बोलणे अत्यंत अवघड आहे. आम्हाला शरम वाटते.
  • मुलांनी काही अडचणीचे प्रश्न विचारले तर.
  • लैंगिक शिक्षण मोठ्या (म्हणजे?) मुलांना द्यावे. शाळेत जाणाऱ्या मुलांना नको.
  • शाळेत जे शिक्षक हे शिक्षण देणार आहेत ते पुरेसे माहितगार किमान अर्हताप्राप्त तरी आहेत का?( हि शंका/ आक्षेप मात्र खरोखर योग्य आहे.)

ह्या शेवटच्या शंकेचा धागा पकडून असे काही जण म्हणतात कि आपण जरी मुलांच्या लैंगिक शिक्षणाची अपरिहार्यता मान्य केली तरी शाळा, (खाजगी, शासकीय, अनुदानित, विना अनुदानित सर्व) शासन आणि शिक्षक ह्या आघाडीवर पुरेशी सिद्धता होत नाही तोपर्यंत तरी शाळेत लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्यात काही अर्थ नाही उलट त्यातून अनर्थ होण्याचीच शक्यता जास्त. आता मतामतांच्या गदारोळात हि एक शंका किंवा आक्षेप खरोखरच काही गांभीर्य अंगी बाळगून आहे. पण त्यावर उपाय तो पर्यंत मुलांचे (शाळेतील तरी) लैंगिक शिक्षण लांबणीवर टाकणे कसा काय असू शकेल? भारतासारख्या देशात तरी आता हा विषय पालकांनी शाळेच्या आणि शासनच्या तसेच शासनाने पालकांच्या सद्सद विवेक बुद्धीच्या हवाली (तसेच इतर मतदार गटांच्या मर्जीवर) सोडणे बंद केले पाहिजे. का? कारणकाय? दै. सकाळ मध्ये ४ ऑक्टोबर २०१५ रोजी आलेल्या लेखातील हा भाग पहा.

मुंबई महानगर पालिकेच्या इस्पितळातल्या सन २०१४-१५ या एका वर्षांतील नोंदीनुसार १५ वर्षांखालच्या मुलींच्या गर्भपातामध्ये ६७ टक्के वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. पालिकेतर्फे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार या वर्षांत ३१ हजार महिलांनी गर्भपात केला. त्यात १६०० मुली या १९ वर्षांखालील आहेत. पालिकेने खासगी गर्भपात केंद्रांकडून घेतलेल्या माहितीप्रमाणे २०१३-१४ मध्ये १५ वर्षांखालील १११ मुलींनी गर्भपात केला तर २०१४-१५मध्ये गर्भपाताची संख्या आणखी १८५ ने वाढली आहे. म्हणजे १५ ते १९ वयोगटातील मुलींचे गर्भपाताचे प्रमाण दोन वर्षांत तब्बल ४७ टक्क्यांनी वाढले असल्याचे म्हटले आहे.

गर्भपाताच्या या आकडेवारीनुसार महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट आहे. कुठे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केले जात आहेत. कुठे मुलींचेच नव्हे तर मुलांचेही लैंगिक शोषण होत आहे. त्यामुळे लैंगिकतेविषयीचे शास्त्रीय ज्ञान शालेय अभ्यासक्रमात मिळणे ही काळाची गरज आहेच शिवाय मुलांचा तो अधिकार आहे. बालपणापासून लैंगिक शिक्षण मिळाल्यास त्याच्याकडे अश्लील म्हणून नव्हे तर जीवनविषयक आवश्यक ज्ञान म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रत्येक नागरिकांत विकसित होईल. इंटरनेटसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या माध्यमांमुळे सध्या सर्वाना सर्व प्रकारचे ज्ञान खुले झाले आहे. मात्र त्याबाबतची परिपूर्ण आणि सर्व शंका निरसन करणारी माहिती शालेय अभ्यासक्रमातूनच मिळू शकते.

भारतात मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचारा पैकी ५३% अत्याचार हे ५ ते१२ वर्षे वयोगटातल्या मुलावर होतात. किशोर / पौगंडावस्थेतील मुलींच्या गर्भधारणेचे प्रमाण हजारी ६२ इतके प्रचंड आहे . भ्रष्ट आणि वाह्यात म्हणून हिणवल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशांच्या पेक्षा किती तरी पट अधिक हे प्रमाण आहेच पण आशिया आणि मध्य पूर्वेकडच्या देशातही आपण ह्या बाबत बराच वरचा नंबर पटकावून आहोत. (अर्थात भारतात बाल विवाहांचे प्रमाण अजूनही खूप जास्त आहे म्हणून हि आकडे वारी अशी जास्त दिसते पण त्यामुळे ह्याचे गांभीर्य अधिकच वाढते.)म्हणजे आपली लहानगी, शाळेत जाणारी मुलं अजिबात सुरक्षित नाहीत. हा भस्मासुर आपल्या अगदी दाराशी येऊन ठेपलेला आहे. हा लेख वाचणाऱ्यांपैकी अनेकांच्या घरात कदाचित तो शिरला ही असेल. पण आपण अनभिज्ञ (कि बेदरकार?) आहोत. ह्या बाबत शासन काही करेल न करेल, तो पर्यंत वाट पाहत राहणे महागात पडू शकेल, पण स्वत:च्या मुलांसाठी तरी आपल्याला आता ही गोष्ट दुर्लक्षीत करून चालणार नाही. मुलांच्या शास्त्र शुद्ध लैंगिक शिक्षणासाठी घरून वैयक्तिक/ कौटुंबिक पातळीवर तसेच शासनावर/ शाळांवर दबाव आणण्यासाठी सुज्ञ पालकांनी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत.

मला हे मान्य आहे कि सगळ्यांना नोकरी धंद्याच्या कामाच्या व्यापातून हे शक्य होणार नाही पण कमीत कमी शाळेत दरमहा होणाऱ्या पालक सभांना उपस्थित राहून ह्याविषयावर जमेल तसे बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. शाळेत शिक्षकांमध्ये नक्की ह्या विषयाच्या अनुषंगाने काय विचार किंवा कृती होते ते समजून घेतले पाहिजे. वेळोवेळी आपले विचार सुचना मागण्य आणि शंका उपस्थित केल्या पाहिजेत. किमान एवढे तरी जमायला हरकत नसावी. वैयक्तिक पातळीवर आई बाबा दोघांनीही आपल्या मुलांशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मुलं आपल्याशी मोकळेपणे बोलती झाली पाहिजेत. हे लगेच होणार नाही पण संयम आणि तितिक्षा हे मोठे प्रभावशाली गुण आहेत. सतत प्रामाणिक प्रयत्न केल्यावर यश नक्की मिळेल. एकदा मुलात आणि आपल्यात विश्वासाचे, सुसंवादाचे नाते तयार झाले कि निम्मी लढाई जिंकल्यातच जमा आहे.

लैंगिक शिक्षण देताना ह्यात दोन भाग महत्वाचे आहेत एक म्हणजे शरीर शास्त्र म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्यांच्या शरीरातले मुलभूत फरक, वयानुसार होत जाणारे बदल आणि त्याचे शारारीरिक मानसिक परिणाम- मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, एचआयव्ही, एड्स, गुप्तरोग याबद्दलची माहिती या शिक्षणातून देता येईल. नऊ ते दहा हे अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी हे वय योग्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ज्यांची मुलं आता ७-८ वर्षांची आहेत पण पालकांची ह्या बाबत काही काही तयारी नाही त्यांनी आतापासून तयारी करायला सुरुवात करायला हवी आहे.

दुसरा भाग म्हणजे लैंगिकतेला धरून असलेली सामाजिक, सांस्कृतिक, अशी अनेक परिमाणं. भिन्नलिंगी व्यक्तीला माणूस म्हणून वागवण्याची दृष्टी आधी स्वतःची लैंगिकता समजून घेतल्याशिवाय येणार नाही हे तर झालेच पण चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा इथून सुरुवात असेल तर शालेय वय हे त्यासाठी सर्वात उत्तम आहे.  खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक किमान शैक्षणिक पातळीवरचे तरी आहेत असे गृहीत धरायला हरकत नाही. किशोर वयातील या मुलांना या लैंगिक शिक्षणाची माहिती शास्त्रीयदृष्ट्या दिल्यास प्रगत समाजासाठी एक चांगले पाऊल ठरणार आहे. आणि ही माहिती विविध पुस्तक, युं ट्यूब वरील डॉक्युमेंटरीज अशा नीर निराळ्या प्रकारे उपलब्ध आहे . मला नेटवर ह्या विषयी सुंदर अशी ५ भागांची डॉक्युमेंटरी सापडली. आपल्या भारतीय लोकांनी काम केलेली आणि Durex & Y-Films ने बनवलेली. आपल्या लाडक्या सचिन ने ह्यात काम केले आहे. ह्या बाबतीत त्याचे खरेच कौतुक केले पाहिजे. खाली काही व्हिडीओ दिलेले आहेत नक्की बघा आणि आपल्या मुलांना हि दाखवा.

 




मुल जन्माला आले कि आपण हि आई किंवा बाप म्हणून पुन्हा एकदा जन्माला येतोच पण मुल ज्या प्रमाणात (खरेतर झपाट्याने) नवनवीन गोष्टी शिकते त्या प्रमाणात आपण काही शिकतो का? हा कळीचा प्रश्न आहे. आपण हि त्यांच्या बरोबरच काही गोष्टी शिकलो, स्वत:ला बदलले तर आई बाबा पासून जबाबदार पालक बनू नाही का…

लैंगिक शिक्षण- जवाबदार वर्तनासाठी (मराठी आवृत्ती)

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।