सतत खावंसं वाटतंय? जाणून घ्या यामागची ही गंभीर कारणं

जेव्हा तुम्ही कंटाळलेले असता किंवा तुमचा मूड ऑफ झालाय, कोणावर तरी खूप रागावलाय अशा वेळी तुम्ही कंटाळा, राग घालवण्यासाठी काय करता?

मूड सुधारावा म्हणून नकळत तुम्ही आईस्क्रीम, चॉकलेट किंवा अशाच काही चटकमटक गोष्टींकडे वळता का?

कोणतंही टेन्शन असेल तर तुमच्या मनात पहिला विचार खाण्याचाच येतो का? मग हे तुम्हाला वाटतं तेवढं साधं, सोपं नाहीय.

आणि ही गोष्ट तुम्ही कॅज्युअली न घेता यामागची वैज्ञानिक कारणं जाणून घेतली पाहिजेत.

या लेखातून आम्ही खाण्याची अनावर भूक आणि त्यामागे दडलेला भावनांचा खेळ तुमच्यासमोर मांडणार आहोत.

यातून आपल्या दबलेल्या भावना खाण्याच्या व्यसनापर्यंत कशा पद्धतीने प्रवास करतात हे तुम्हाला समजेल आणि त्यावरचे उपाय काय याची माहिती सुद्धा आम्ही सांगणार आहोत.

भावनांशी जोडल्या गेलेल्या या खाण्याच्या सवयीला “इमोशनल इटिंग” असंही नाव दिलेलं आहे.

या व्यसनात अडकलेल्या लोकांना आपण चुकीच्या पद्धतीने खातोय हे समजतं.

आता यापुढे असं वेळीअवेळी खायचं नाही असा निर्धार ते करतात पण पुन्हा असाच एखादा तणावाचा प्रसंग येतो आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ते परत खाणं हाच मार्ग निवडतात. हे दुष्टचक्र असंच सुरू रहातं.

इमोशनल इटिंग मागील कारणे काय आहेत?

अन्न हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जगण्यासाठी अतिशय आवश्यक अशा अन्नाचा संबंध आपल्या मानसिक स्थितीशी जोडलेला आहे.

आयुष्यातील आनंदाचे प्रसंग साजरे करताना आपण खास पदार्थांची मेजवानी देतो. त्याचप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम अन्न आहे.

आवडत्या व्यक्तीसाठी आपण खूप मेहनत घेऊन छान छान पदार्थ बनवतो. आणि बक्षिस म्हणून सुद्धा खाऊच देतो !!! लहानपणापासून खाण्याशी भावनांची नाळ जोडली गेलेली असते.

तरीही प्रत्येक वेळी काहीतरी खाण्यापूर्वी आपण हे चेक केलंच पाहिजे की आता मला खरोखरच भूक लागली आहे की इतर कोणत्याही कारणाने मी खातोय?

खरी भूक आणि इमोशनल इटिंग यात कोणता फरक आहे?

शरीराला जेव्हा नैसर्गिकरीत्त्या भूक लागते ती ठराविक वेळी, काही तासांच्या अंतराने लागते.

ही नैसर्गिक भुकेची भावना हळूहळू जाणवते आणि मग टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन तीव्र होते.

याउलट इमोशनल इटिंगचे आहे. एखादी लहर किंवा सणक यावी त्याप्रमाणे ही अनावर भुकेची भावना असते.

ही थोडाच वेळ टिकते आणि तुमचे ट्रिगर फूड पाहताच ही भूक उफाळून येते.

राग, भीती, चिंता या भावना मनात असताना याप्रकारे भूक लागते.

यावरून भावनांचा भुकेशी असलेला संबंध लक्षात येतो. पण आता आपण यामागची कारणे जाणून घेऊया.

भावना आणि भूक यांचा संबंध नेमका काय आहे?

आपल्याला राग, चिंता, भीती, अस्वस्थता या भावना नेहमीच अनुभवाला येतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी म्हणून दरवेळी काहीतरी खाणं अशी सवय जर लागली असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या.

या नकारात्मक भावना तुम्ही अन्न खाल्ल्याने दूर जाणार नाहीत. फक्त तुम्हाला काही काळापुरतं बरं वाटेल.

अशा ताणतणाव निर्माण करणाऱ्या प्रत्येक प्रसंगात तुम्ही काही तरी खात असाल किंवा अशा वेळी खाण्यापासून लांब राहूच शकत नसाल तर?

मग तुम्ही हे शोधून काढले पाहिजे की, अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे काहीतरी खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही?

यालाच म्हणतात तुमचा ट्रिगर. म्हणजे तुम्हाला खाण्यापर्यंत ओढून नेणारी परिस्थिती!!!

एकदा का हा ट्रिगर लक्षात आला की, मग तुम्ही त्यावर कंट्रोल कसा आणायचा याबद्दल विचार करु शकता.

कोणती परिस्थिती ट्रिगर असू शकते?

कंटाळा, आळस, भीती, चिंता, कामाचा ताण यापैकी कोणतीही परिस्थिती ट्रिगर असू शकते.

जेव्हा तुम्हाला कंटाळा आलेला असतो त्यावेळी कितीतरी वेळा तुम्ही टाईमपास म्हणून फ्रीज उघडून काहीतरी तोंडात टाकता.

ऑफिसमध्ये सुद्धा कामाचा ताण असेल तर काम करता करता तुम्ही अख्खा बिस्कीटचा पुडा कधी संपवला हे तुम्हाला कळत सुद्धा नाही.

म्हणजेच या त्रासदायक भावनांपासून तात्पुरते का होईना पण दूर जाण्यासाठी तुम्ही खाण्याचा आधार घेताय.

अशाच काही भावना इतक्या त्रासदायक असतात की त्यांचा अनुभव आपण घेऊच नये असं वाटतं.

या तीव्र, नकारात्मक भावनांना एखाद्या शस्त्रासारखी धार असते. आणि या भावना मनावर ओरखडा उमटवतात.

अशा वेदनादायक भावनांची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणून खाण्याचा आधार घेतला जातो.

तुमच्या पार्टनरशी कडाक्याच्या भांडणानंतर डोक्यात गेलेली रागाची तिडीक शांत करता करता कधी तुम्ही आईस्क्रीमचा भला मोठा बार पोटात ढकललात हे कळत सुद्धा नाही.

ही इमोशनल इटिंग ची उदाहरणं तुम्ही सुद्धा अनुभवली असतील. कधीतरी भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी खाण्याचा आधार घेणं हे समजण्यासारखे आहे पण जर कोणत्याही लहान सहान कारणाने तुम्ही सतत ताणतणावापासून दूर पळण्याचा सोपा मार्ग म्हणून उठसूठ खायला लागलात, तर हे मात्र खूपच गंभीर आहे.

यामागचे कारण डिप्रेशन, चिंता किंवा इतर दाबून ठेवलेल्या भावना असू शकतात. आणि ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देणारी आहे.

इमोशनल इटिंगवर उपाय काय?

खरी भूक ओळखणे आणि खोट्या इमोशनल इटिंग पासून दूर रहाणे हाच यावरचा उपाय आहे. पण या दोन्हींमधील फरक कळला तरच तुम्ही उपाय करु शकता.

आणि हा फरक समजण्यासाठी काही निरीक्षणे करणे आवश्यक आहे. स्वत:ची परीक्षा घ्या, काही प्रश्न स्वतःलाच विचारा आणि या समस्येचा पूर्ण अभ्यास करा.

स्वतःला विचारा हे तीन प्रश्न

१. मला खरी कडकडून भूक लागली आहे का?

खरी नैसर्गिक भूक आणि भावनिक पातळीवर काही त्रास असल्याने खाण्याचं क्रेव्हिंग यातला फरक समजून घ्या. आणि जर खरी भूक नसेल तर पुढचा प्रश्न स्वतः ला विचारा.

२. आता या क्षणी माझ्या भावना कोणत्या आहेत?

खाण्याचे व्यसन लागलेल्या व्यक्तीला खरी भूक कळतच नाही. अशा वेळी जेव्हा खावेसे वाटते त्या वेळी आपल्या भावना नीट तपासून पहा.

किंवा डायरी मध्ये लिहून ठेवा. आपल्या जवळच्या व्यक्तीशी या भावना शेअर केल्या तरीही खूप हलकं वाटतं. काही वेळा तर तुम्हाला रडू सुद्धा येईल पण भावनांचा निचरा होणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.

३. माझी गरज कोणती आहे?

एखादी अपूर्ण राहिलेली गरज भरुन काढण्याचा मार्ग म्हणून वारंवार खाण्याची सवय लागली असेल तर ती गरज कोणती हे शोधून काढा.

म्हणजे एखाद्या वेळी असं खाणं हे ठीक आहे पण रोजच संध्याकाळी कंटाळा आला म्हणून तुम्ही टिव्ही पहात पहात चिप्स किंवा चॉकलेटचा ढीग संपवताय तर हे नक्कीच अयोग्य आहे.

आणि आता आरोग्यासाठी उपयोगी असे ऑप्शन्स तुम्ही शोधून काढणे आवश्यक आहे. बाहेर जाऊन फेरफटका मारणे, हलका व्यायाम करणे, पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, जॉगिंग, पोहणे अशा इतर ठिकाणी मन गुंतवून तुम्ही अनावश्यक खाण्याची सवय टाळू शकता.

यावरून हाच निष्कर्ष निघतो की भावनांचा आणि भुकेचा संबंध पूर्वापार चालत आलेला आहे.

त्याचप्रमाणे निकोप भावना आणि निरोगी शरीर यांचाही जवळचा संबंध आहे. तुमच्या भावना किती चांगल्या प्रकारे तुम्ही ओळखता हे खूप महत्त्वाचे आहे.

भावनांशी मैत्र बाळगणे म्हणजे ज्या भावना मनात निर्माण होतात त्यांना आहे तशा स्विकारणे. मग त्यापासून पळून जाणे किंवा त्या जबरदस्तीने दाबून टाकणे असं काहीही करण्याची गरज भासत नाही.

या भावनांना ओळखता आलं नाही की मग त्यांच्या प्रकटीकरणाच्या पद्धती सुद्धा चुकतात. खाण्याचे व्यसन किंवा ट्रिगर हा याचाच भाग आहे.

भावनांची अभिव्यक्ती आणि खाणे यातला संबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा.

जर तुम्हाला खाण्याचे क्रेव्हिंग होत असेल तर वरचे प्रश्न स्वतः ला विचारुन आपल्या भावनांचा आढावा घ्या. भावनिक दृष्ट्या सजग होऊन निरामय आयुष्याचा आनंद घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय