मुलं आईला गृहीत का धरतात? जाणून घ्या ही कारणं

आई आणि मुलाचं नातं अगदी स्पेशल असतं. बाळ या जगात येण्याआधीच आईचं जग त्याच्याभोवती फिरत असतं.

एकदा का मूल जन्माला आलं की चोवीस तास आई त्याच्या सेवेत गुंतलेली असते. हळूहळू हे मूल मोठं होतं.

एरवी लहानसहान गोष्टींसाठी आईवर अवलंबून असलेलं मूल काहीवेळा मात्र तिला अगदी जुमानत नाही.

वरवर साधे दिसणारे प्रसंग कधीकधी आईसाठी खूप दु:ख देणारे असतात.

आपली मुलं आपल्याला गृहीत धरतायत हे तिला समजतं आणि मग मात्र आईमुलाच्या नात्यात काहीतरी मिसिंग आहे हे तिच्या लक्षात येऊ लागतं.

असं का बरं झालं? आपलं काय चुकलं? हे प्रश्न सतत तिच्या मनात फेर धरून नाचू लागतात.

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. काही उदाहरणे पाहू म्हणजे हे समजून घेणे सोपे जाईल.

प्रसंग नं. १

निधी तिच्या दीड वर्षाच्या मुलीमागे खाऊची वाटी घेऊन घरभर फिरतेय.

अक्षरशः एक एक घासासाठी तिच्यापुढे नाक घासतेय. पण ही मुलगी आईचं अजिबात ऐकत नाहीय.

मुलीला भरवण्यात निधीचे दिवसातले कित्येक तास निघून जातात. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण भरवणं हा मोठाच कार्यक्रम असतो.

निधीला यामुळे प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. पण रात्री निखिल, निधीचा नवरा घरी असतो तेव्हा मात्र ही मुलगी आईला जेवणासाठी एवढा त्रास देत नाही.

प्रसंग नं. २

आराध्य हा आठ वर्षे वयाचा मुलगा आहे. गेल्या दोन दिवसांपासून समर कॅम्पला जाण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून त्याने अक्षरशः आपल्या आईचं डोकं फिरवलंय.

बाबा दोन दिवसांसाठी ऑफीसच्या कामानिमित्त बाहेर गेले आहेत. ते परत येताच त्यांच्याकडून समर कॅम्पला जायची परमिशन मिळवायचीच हे आराध्यने आधीच ठरवलंय.

आणि ते येताच या विषयावर चर्चा सुरू झालीय. आईचं म्हणणं आहे की आराध्यला त्याची लहानसहान कामं पण स्वतःहून करता येत नाहीत.

शिवाय त्याला अस्थमाचा आजार असल्यामुळे तिथलं वातावरण आणि धूळ यामुळे त्याला त्रास होऊ शकतो. म्हणूनच ती परवानगी देत नाहीय.

पण आराध्यने मात्र आपलं म्हणणं बरोबर बाबांच्या गळी उतरवलं आणि तो आता समर कॅम्पला जायच्या तयारीला पण लागलाय.

प्रसंग नं. ३

आज दिनेश आणि दिशा यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस आहे. म्हणून आपल्या दोन मुलांना घेऊन ते डिनरसाठी बाहेर आले आहेत.

मोठा मुलगा कॉलेजला जातो आणि मुलगी अकरावीत आहे. काय ऑर्डर करायचं हे ते ठरवत आहेत.

दिनेश आणि दोन्ही मुलांना चायनीज खायचंय. पण दिशाला मात्र अगदी अस्सल भारतीय जेवण जेवायचं आहे. पण कसचं काय….!!!

नेहमीप्रमाणेच तीन विरुद्ध एक असा निकाल लागतो. समोर आलेलं अन्न नाईलाजाने चार घास कसंबसं पोटात ढकलून दिशा आपली नाराजी मनातच लपवून परत घरी यायला निघते.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो या घटना तुमच्या ओळखिच्या असतील.

किंबहुना थोड्याफार फरकाने आपल्या प्रत्येकाच्या घरात यासारखे प्रसंग घडत असतील. वरवर किरकोळ वाटणाऱ्या या प्रसंगांमागे मात्र गंभीर अर्थ दडलेला आहे.

यातून निघणारा स्पष्ट अर्थ असा की आईचं मत विचारात घेणं मुलांना तितकसं महत्त्वाचं वाटत नाही.

आपल्या भारतीय समाजात पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना वडिलांचे मत विचारात घेतले जाते.

त्यांच्या शब्दाला जेवढा मान मिळतो तेवढा आईच्या विचारांना दिला जात नाही. काही अपवाद वगळता किंवा एकट्या आईने वाढवलेली मुलं सोडून बहुतेक घरांमध्ये हेच दृश्य दिसते.

जसजशी मुलं मोठी होतात तसतशी ती आपल्या आईला अधिकच गृहीत धरून चालतात.

आईला टेक्नॉलॉजी, आधुनिक जगातले प्रश्न समजत नाहीत असं त्यांना वाटतं.

पण या सगळ्यात सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर ही मुलं आपली आई ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिच्याही काही इच्छा, आकांक्षा आहेत हेच विसरून जातात.

एक कुटुंब म्हणून पाहिलं तर आई आणि वडील हे दोघेही घराचे आधारस्तंभ आहेत. मग त्यातील एक जास्त खंबीर आणि दुसरा दुबळा समजणं योग्य आहे का?

आपल्या संस्कृतीत आईचे किती गोडवे गायले जातात. ‘स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी’ किंवा ‘आई हाच मुलांचा पहिला गुरु’ हे सर्व आपण निबंधात लिहितो. भाषणात ही वाक्यं वापरून हमखास टाळ्या मिळवतो.

पण प्रत्यक्षात तसं वागतो का? मग यासाठी आपण मनापासून आपल्या आईला सॉरी म्हटलंच पाहिजे.

आणि प्रत्येक आईने पण आपल्याला मुलं गृहीत का धरतात याचा आढावा घेणं गरजेचं आहे. शांतपणे विचार केलात तर यामागची काही कारणं तुमच्या लक्षात येतील. बघा तुम्हाला पटतात का हे मुद्दे.

१. मुलांना अवास्तव महत्त्व देणं.

खरं तर प्रत्येक आईसाठी तिचं मूल हे स्पेशल असतंच. पण कुटुंबातील सर्वांपेक्षा या मुलाला वेगळी वागणूक देणं चुकीचं आहे.

त्यांचा शब्द खाली पडू न देणं, सर्व हट्ट पुरवणं यामुळे आपण सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहोत असं मुलांना वाटतं.

आणि इथेच आईला गृहीत धरण्याची सुरुवात होते. पुढे जाऊन ही मुलं अतिशय हट्टी, जरासुद्धा तडजोड न करणारी होतात.

२. मुलांना कधीच नकार न देणे.

मुलाने एखादी मागणी करण्याचा अवकाश, मागचा पुढचा विचार न करता त्याला हवं ते देऊन टाकणं.

यामुळे होतं काय की मुलांना वाटतं आपली आई कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. ती फक्त आपल्या हो ला हो करते.

याऐवजी खरंच या वस्तूची मुलांना गरज आहे का हे पाहिले पाहिजे. योग्य त्यावेळी ठामपणे नकार दिला पाहिजे.

जसं मुलांना अती धाकात ठेवणं चुकीचं आहे तसंच त्यांच्यावर जरासुद्धा अंकुश नसणं हे सुद्धा अयोग्य आहे.

काही झालं तरी आई आपल्याला पाठीशी घालणार याची खात्री झाली की मुलं तुम्हाला सर्व बाबतीत गृहीत धरणारच.

३. अनुकरणातून शिकवण.

आपल्या आईला घरातील इतर माणसे कशी वागणूक देतात हे लहान मुले पहातात.

मुलांची निरीक्षण शक्ती अफाट असते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांची मतं आणि विचारसरणी घडत जाते.

म्हणूनच जेव्हा तुम्हाला समजेल की घरातील इतर माणसे तुमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत किंवा तुमचा आदर करत नाहीत तेव्हा गप्प बसू नका.

स्वतःचे विचार ठामपणे व्यक्त करा. या घरात कोणीही तुम्हाला गृहीत धरु शकत नाही याची वेळोवेळी जाणीव करून द्या.

यातून तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही आणि तुमची मुले हे समजून जातील की आपली आई ही एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती आहे.

४. मुलांना स्वातंत्र्य द्या.

सतत चोवीस तास मुलांच्या अवतीभवती पिंगा घालत बसू नका.

अगदी तान्ह्या मुलांची गोष्ट वेगळी आहे. पण हळूहळू मुलांना स्वतःची जबाबदारी घेता आली पाहिजे.

त्यांना धडपड करु दे, चुकू दे पण यातूनच त्यांना शिकता येईल. अती काळजी करणे, सतत प्रत्येक कामात मदत करणे यामुळे मुले परावलंबी होतात.

आणि आई नेहमीच आपल्यासाठी हजर असते हे समजले की तुमचे कष्ट, धडपड याची त्यांना किंमत वाटेनाशी होते.

खरंच जेव्हा गरज असेल तेव्हाच मदतीचा हात पुढे करा. त्यामुळे मुलं स्वावलंबी होतील आणि तुम्ही मदत केलीत याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील.

५. आत्मपरीक्षण करा.

तुमच्या मुलांसमोर आपल्या वागण्यातून तुम्ही कोणतं उदाहरण ठेवताय?

तुम्ही स्वतःला प्राधान्य देता का? की कोणत्याही लिस्टमध्ये स्वतःला शेवटच्या नंबरवर ठेवता?

आपली आवडनिवड जपता का?

स्वतःची काळजी घेणं, छंद जपणं हे तुम्ही महत्त्वाचे समजता का?

स्वतःचे निर्णय स्वतः घेता की इतरांवर अवलंबून असता? भावनिक दृष्ट्या तुम्ही स्वतंत्र आहात का?

तुमचं स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता का? नवीन कौशल्ये शिकून घेण्याची तुमची तयारी असते का?

या प्रश्नांची उत्तरे शोधून पहा. मग आपल्या मुलांसमोर आपली प्रतिमा कशी आहे हे तुमच्या लक्षात येईल.

एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली खंबीर स्त्री की पावलोपावली इतरांचा आधार शोधणारी, कणाहीन, गरीब बिचारी !!!

लक्षात ठेवा ही दुनिया कमजोर व्यक्तीला पायदळी तुडवून पुढे जाते. मग अगदी ती आपली स्वतःची, जवळची माणसे का असेनात. म्हणून आपलं व्यक्तिमत्त्व कणखर बनवा.

इतरांची काळजी घ्या. त्यांच्यावर भरभरून प्रेम करा पण त्याचबरोबर स्वतः वर प्रेम करायला मात्र विसरू नका.

मनमोकळेपणाने व्यक्त व्हा. खळखळून हसा, रडू आलं तर मनसोक्त रडून घ्या. दमला असाल तर आराम करा.

नवरा, मुलं यांच्याव्यतिरिक्त स्वतःची मित्रमंडळी सुद्धा असू द्या. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करा. स्वतः ला वेळ द्या आणि स्वतः चे लाड सुद्धा करा.

मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही स्वतःलाच गृहित धरून चालता….. “चलता है, त्यात काय एवढं!” असा ऍटिट्यूड ठेवता, तेव्हा इतरांच्या लेखी तुम्ही महत्त्वाच्या रहात नाही.

आईपण म्हणजे दुबळेपणा किंवा परावलंबीत्व मुळीच नाही. एक नवीन जीव या जगात आणणारी आणि माणूस म्हणून त्याला घडविणारी ती तेजस्वी मातृशक्ती आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा. या लेखातील कोणता मुद्दा तुम्हाला जास्त पटला हे आम्हाला जरूर कळवा.

लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय