पहिले महायुद्ध!….. संघर्षाचा आरंभ

विषय प्रवेश

११ नोव्हे १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे कि तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर युद्ध विराम लागू झाला. युरोपभराच्या चर्चमधून घंटानाद करून हे वर्तमान लोकाना सांगितले गेले. लंडनचे प्रसिद्ध बिग बेन हे घड्याळ १९१६पासून बंद होते. त्याने सकाळी ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकांना ती भेसूर वाटली कारण…. ती भेसुरच होती.

सव्वाचार वर्षे सतत चाललेल्या ह्या नरमेधातून जे वाचले ते स्वत:ला सुदैवी समजत होते कि नाही, हे नक्की सांगता येणार नाही पण त्यांनी बरेच काही गमावले होते. शरीराचे अवयव, मानसिक संतुलन, सौंदर्य, चेहरा अन् आयुष्यावरचा, एकूणच सौन्दर्यावरचा विश्वास, जगण्याची अभिलाषा आणि इतरही बरेच काही. “पुन्हा कधीही असे होऊ द्यायचे नाही…” असे सगळेच जेते म्हणाले. पण फक्त २० वर्षात परत अशाच एका भयानक आवर्तात सगळे ओढले गेले. का झाले असेल असे? काय कारण असेल? ह्याचा इतिहास रंजक आहे हे तर खरेच. तसाही युद्धाचा इतिहास रंजकच असतो पण मग दूरवरच्या युरोप नावाच्या खंडात शंभर एक वर्षांपूर्वी घडलेल्या एका युद्धाबद्दल आपण भारतीयांनी का जाणून घ्यावे? काय गरज आहे?

आपण अनेकदा ‘युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत, हिंसाचाराने मूल्यांचा ऱ्हास होतो, संस्कृती नाश पावते’ अशा प्रकारची विधाने ऐकतो आणि त्यात तथ्यांश आहेच पण त्याबरोबर मानव जेव्हापासून आपली संस्कृती / सभ्यता म्हणून जे काही स्थापत आला आहे तेव्हापासून युद्ध आणि हिंसा त्याबरोबरच आहेतच. इतिहासातला असा एकही कालखंड नसेल ज्यात मानव समूह आपसात लढले नसतील. तेव्हा युद्ध आणि हिंसाचार, आक्रमणे ही दरवेळी टाळता येत नाहीत हा इतिहासाचाच धडा आहे त्यामुळेच ती दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट नक्कीच नाहीत. सर्व युद्धांचा नाश करणारे अंतिम युद्ध म्हणून ज्याचा उल्लेख झाला ते पहिले महायुद्ध सर्व युद्धांचा नाश तर करू शकले नाहीच पण पाव शतकापेक्षा कमी काळात दुसऱ्या एका अशाच महाभयनक संगराची सुरुवात व्हायला मात्र कारणीभूत झाले.

फ्रांस इंग्लंड सारखी जी साम्राज्य ह्या झन्झावातातून वाचली त्यांनाही इतका जबर तडाखा ह्या युद्धाने दिला कि त्यांच्या साम्राज्याचा पाया त्यामुळे भुसभुशीत झाला. भारत पाकिस्तान सारखे अनेक देश ह्या युद्धामुळेच पुढे स्वतंत्र होऊ शकले. आतापर्यंत मायभूमी, देव आणि धर्मासाठी, धन्याच्या खाल्ल्या मीठाला जागून लढणाऱ्या लोकाना पुन्हा नव्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांना राष्ट्र, राष्ट्रवाद, देशभक्ती अशा नव्या संकल्पना सापडल्या. सध्याचा काळ भारत देशासमोर मोठा धामधुमीचा आणि संक्रमणाचा आहे. धर्म,जात, प्रांत, भाषा ह्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींबरोबरच लोकशाही, हुकुमशाही, देशभक्ती, देशप्रेम, देशद्रोह, संविधान, संविधानावरची निष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अशा नव्या अवजड शब्दांच्या आणि संकल्पनाच्या गदारोळात भारतीय समाज मन गोंधळून गेलेले आहे. राष्ट्रवाद ही शक्ती आहे हे खरेच, पण हि शक्ती शुभ कधी असते? आणि अशुभ कधी होते? शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजाला देखिल अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य ह्या संकल्पनात कोठून येते?सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्वाकांक्षा आणि अहंकार, कशाप्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतात? समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावर निष्ठा? भारतासारख्या शतकानुशतके सरंजामशाही आणि व्यक्तिपूजा रक्तामांसात भिनलेल्या, प्रेरणास्थानांना मर्मस्थान बनवून ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अस्मितेचे सतत कढ आणणाऱ्या समाजात लोकशाही नक्की रुजणार कशी? तिचे स्वरूप आणि कार्य नक्की कसे काय असेल? आपण मूळ उद्दिष्टापासून भरकटत तर चाललो नाहीत ना हे कसे ओळखायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडायला ह्या इतिहासाने मदत होईल अशी मला अशा वाटते.

दुसरे असे कि मराठीत एक दि. वी. गोखले ह्यांनी लिहिलेला इतिहास आणि युद्ध चालू असतांना त्या निमित्ताने नवाकाळ मध्ये खाडिलकरांनी लिहिलेली लेखमाला ह्यापेक्षा ह्या विषयावर फार काही कुणी लिहिलेले नाही. खाडीलकरांच्या लेखमालेचे पुढे पाच सहा खंड प्रकाशित झाले होते. पण आज तरी ते वाचकांना सहज उपलब्ध नाहीत. तेव्हा मराठीत ह्या विषयावर काही लिहावे असे मला अनेक दिवस वाटत होते म्हणूनही हा लेखन प्रपंच…

यंदा म्हणजे २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण होताहेत. त्यानिमित्त ही लेखमाला, त्या महान घटनेचा हा संक्षिप्त इतिहास.

तर मग करायची सुरुवात!

पहिले महायुद्ध!….. संघर्षाचा आरंभ

पहिले महायुद्ध

सॉमच्या युद्धभूमीवर मृत्युच्या दाढेत जात असलेले सैनिक. (अर्थात हा अतिप्रसिद्ध फोटो खोटा म्हणजे नंतर फ्रांस मध्ये चित्रित केलेला आहे. सैनिक खरे असले तरी ते सॉम च्या युद्धभूमीवर मृत्युच्या दाढेत जात नाहीयेत )
विसावे शतक हे अनेक अर्थाने अभूतपूर्व होते. मानवी संस्कृतीच्या / सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ ह्याआधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल. विज्ञान-तंत्रज्ञानाची, कृषीपासून वैद्यकीय आणि इंजिनियरिंग पासून ते अवकाश संशोधन, अशा सर्वच क्षेत्रातली झंझावाती प्रगती आणि त्यानेच निर्माण केलेले असंख्य अक्राळ विक्राळ प्रश्न हे तर ह्या शतकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विज्ञानाप्रमाणेच समाजकारणातही नवनव्या संकल्पना, नवे प्रयोग झाले. औद्योगिकरणामुळे नवी समाजव्यवस्था येऊन फक्त मजूर वर्गाचा उदय आणि त्यांच्या समस्या ह्याच गोष्टी विसाव्या शतकात महत्वाच्या ठरल्या नाहीत तर एकूणच औद्योगिकरणाने शेती, व्यापाराबरोबर सत्ता, सत्तासंघर्ष इथपासून ते युद्ध, युद्धतंत्रापर्यंत सगळीकडे आमूलाग्र परिवर्तन घडून आले. अनेक राजघराणी संपली, सरंजामशाहीचा अस्त, साम्यवादाचा उदय, विजय आणि त्याचे पतन, अनेक हुकुमशाह्यांचा उदय आणि अस्त हे देखिल पाहायला मिळाले. (बाय द वे हुकुमशाही जरी राजेशाहीचेच एक “भेस बदला हुआ रूप” असले तरी विसाव्या शतकातल्या बहुतेक हुकुमशहांना समाजवादाचे कातडे पांघरावे लागले हि विशेष उल्लेखनीय बाब. तसेही हुकुमशहा हे विसाव्या शतकातच उदय पावले त्याधी राजे, सरदार, सामंत वर्ग आणि धर्मगुरू त्यांची गादी चालवत.) विसाव्या शतकातच हि परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनली कि इथे अब्राहम लिंकन च्या १९ व्या शतकातल्या भाषणातील एक भाग उदधृत करायचा मोह आवरत नाही

The dogmas of the quiet past are inadequate to the stormy present. The occasion is piled high with difficulty, and we must rise with the occasion. As our case is new, so we must think anew, and act anew. We must disenthrall ourselves, and then we shall save our country.

Abraham Lincoln
Washington, D.C.
December 1, 1862
Speech at Annual Congress meet

भावार्थ

गत-इतिहासातून मिळणारे धडे ‘झंझावाती-वर्तमानातले’ प्रश्न सोडवायला पुरेसे पडत नाहीत. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनलेली असते कि आपल्याला बऱ्याचदा नवा विचार/ नवे उत्तर, नवी समीकरणं शोधावी लागतात. आणि म्हणून गतानुगतिकता सोडून देऊन नव्या- मुक्त विचारांना, संकल्पनांना संधी द्यावीच लागते. त्याशिवाय पर्याय नसतो. जे समाज, देश हे करू शकत नाहीत, त्यांचं नष्टचर्य लवकरच सुरु होतं.

ह्या विसाव्या शतकाने पूर्वार्धातच दोन महायुद्ध पहिली. खरे पाहू जाता पहल्या महायुद्धाचेच extension दुसरे महायुद्ध होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कल्पनातीत अशी हानी, संहार त्या पिढीने पहिला, अनुभवला, नव्हे त्यात स्वत: भाग घेऊन तो केला. कोणत्याही प्रकारचे उच्च तत्व राखण्यासाठी किंवा दमनाविरुद्ध म्हणून हे युद्ध सुरु झाले नाही, (अर्थात तसा दावा ह्या युद्धातल्या जेत्यांनी केलाच जसा तो दुसऱ्या महायुद्धाबाबत देखील केला.) तरीदेखील ह्या युद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला, एक अंटार्क्तीका हे खंड सोडलं तर प्रत्येक खंडातले कुठले न कुठले राष्ट्र ह्या युद्धात सामील झाले. युद्ध संपे पर्यंत चार प्रचंड मोठी साम्राज्य लयाला गेली. युरोपचा आणि जगाचा नकाशा पार बदलून गेला. सुरुवातीला चार साडे चार महिन्यातच ही सगळी धामधूम आटोपून सैनिक परत १९१४चा नाताळ साजरा करायला आपापल्या घरी जातील असे सगळ्यानांच वाटले होते. प्रत्यक्षात साडेचार वर्ष हे युद्ध चालले आणि ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारण १ कोटी ६५ लाख लोक कामी आले तर २ कोटी १२ लाखाच्यावर लोक जखमी झाले. १९१४ चा काळ पहिला तर ही आकडेवारी भयानक आहे. ह्या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २% लोक ह्या युद्धात कामी आले. १९व्या शतकापर्यंत तग धरून असलेली समाज व्यवस्था हादरून गेली… हे युद्ध जमिनीवर, जमीनीखालून, समुद्रावर, समुद्राखालून, आकाशात लढले गेले. प्रचंड प्रमाणावर विषारी वायूचा वापर करून हवा हे देखील जणु एक युद्ध क्षेत्रच बनवले गेले, मशीनगन सारख्या शस्त्राचा वापर आधीही माहिती होता पण चाल करून येणाऱ्या सैनिकाच्या शिस्तबद्ध रांगा तितक्याच शिस्तबद्ध रीतीने मशीनगनच्या साह्याने कापून काढण्याचे तंत्र मात्र इतक्या प्रभावीपणे ह्या आधी वापरले गेले नव्हते. साधारणपणे युद्ध किंवा लढाई झाल्यावर जेत्यांच्या आक्रमणाला आणि क्रौर्याला बळी पडणारी नगरे प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रच बनून गेली आणि सर्वसामान्य जनता आता युद्धात अगदी सुरुवाती पासून भरडली जाऊ लागली.

पण त्याच बरोबर आतापर्यंत गुलामीत असलेले अनेक देश, मानव समूह, समाज स्वतंत्र होऊ लागले. स्वयंशासन, स्वयंनिर्णय, समाजवाद, लोकशाही, साम्यवाद अशा अनेक विचारधारा आतापर्यंत मागास, गुलाम राहिलेल्या समाजात रुंजी घालू लागल्या. विज्ञान-तंत्राज्ञान, उद्योग, उड्डयन, दळणवळण, रेल्वे, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली. वैद्यकीय क्षेत्र हे ह्या साडेचार वर्षात आधी कधीच झाले नव्हते इतक्या झपाट्याने विकसित झाले. सेवा शुश्रुषा सर्जरी प्लास्टिकसर्जरी, कृत्रिम अवयव, प्रथमोपचार, वेदनाशामक औषधे, प्रत्यारोपण, मानसोपचार अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या असंख्य शाखांचा विकास झाला. युद्धाआधीही लोकाना विमान, मोटारी माहिती होत्या रेल्वे गाड्यातर अगदी नित्यपरिचयाच्या झाल्या होत्या पण ह्या युद्धाने त्यांच्या वापराला आणि विकासाला प्रचंड गती दिली. आफ्रिका आशियातल्या अनेक देशांना/ मानव समूहांना स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बदल ही घडू लागले. स्त्रियांच्या अधिकारासाठीचे/ स्वातन्त्र्यासाठीचे, समानतेसाठीचे लढे त्यांचे राजकीय हक्क, नागरीहक्क मिळवण्यासाठीचे संघर्ष आणि त्यात मिळालेले यश (मर्यादित का होईना)हे देखील अंशत: ह्या युद्धाचेच फलित.

वसाहत वाद आणि त्या वसाहतीतून मिळणाऱ्या उर्जेवर इंग्लंड फ्रांससारखे युरोपिय देश आपले उच्चतर मानवी संकृतीचे मळे फुलवत होते. तर इटली जर्मनी सारखे खेळात उशीरा सामील झालेले भिडू आपल्याला ह्या आधीच जुन्या भिडूनी बळकावलेल्या वसाहतीताला हिस्सा कसा लाटता येईल ह्या विवंचनेत होते. खरेतर त्यामुळेच ह्या युद्धाचा वणवा पेटला होता. ह्या युद्धाने प्रचलित साम्राज्यावादाला आणि वसाहतवादाला धक्का बसला. अर्थात साम्राज्यवाद किंवा वसाहत वाद पूर्ण नष्ट झाले नाहीत पण त्यांचे बाह्यस्वरूप इतिहासात प्रथमच बदलले गेले. अमेरिकेसारखा भांडवलवादावर बलवान झालेला मोठा भिडू आता मैदानात आला. त्याने जागतिक सत्तेचे केंद्रच युरोपातून हलवले. तोपर्यंत युरोपातील सत्तेचा समतोल हा युरोपातीलच राष्ट्रात फिरत्या करंडकाप्रमाणे फिरवला जात असे आणि जो ह्यात वरचढ ठरत असे तोच सगळ्या जगाच्या सत्ता सामातोलावर प्रभाव टाकत असे. ह्या युद्धाला महायुद्ध, जागतिक महायुद्ध, सर्व युद्धांचा अंत करणारे युद्ध अशा विशेषणांनी गौरवले गेले. अर्थात तसे काही जरी झाले नाही तरी आधुनिक युद्धाची संहारक क्षमता लक्षात येऊन जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आपसातले तंटे सामोपचाराने मिटवावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघा सारख्या संस्थेची उभारणी करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले. त्यालाही मर्यादितप्रमाणात का होईना पण यश मिळाले.

दिवे मालवू लागले …

“Lamps are going out all over europe: We shall not see them lit again in our life time.”

सर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला नाही वाटत कि आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पहायला मिळणार आहेत…

-सर एडवर्ड ग्रे – ब्रिटनचे परदेश सचिव (तत्कालीन)

परिस्थिती इतकी स्फोटक बनली कशी ?

आपल्या सर्वांना हे माहिती आहे कि पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारण झाले ते म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स) आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक ह्यांचा २८ जुन १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे झालेला खून. बोस्निया हा त्यांच्या – ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात नव्यानेच सामावला गेलेला, मांडलिक बनवला गेलेला (प्र)देश. सर्वसाधारणपणे जे लोक पहिल्या महायुद्धबद्दल थोडेफार काही ऐकून वाचून असतात त्यांना ही एवढी माहिती असतेच असते. आणि म्हणूनच सध्या हा फ्रांझ फर्डिनांडच्या खुनाच्या तपशिलाचा भाग बाजूला ठेवून आपण एकंदर युरोपातल्या परिस्थिती पासून सुरुवात करूयात.

१९व्या शतकातल्या घडामोडी आणि जर्मन राष्ट्राची पायाभरणी

ज्याप्रमाणे १८५७च्या बंडाची कारण शोधताना आपल्याला फक्त काडतुसाच्या प्रकरणाशी थांबून चालत नाही तसेच पहिल्या महायुद्धाचे कारण शोधताना आपल्याला इतिहासात कमीतकमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते. १९व्या शतकातल्या युरोपचा विशेषत: जर्मनीचा एकीकरणापूर्वीचा इतिहास तर इतका गुंतागुंतीचा आहे कि ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड पाल्मरस्टन असे म्हटला होता कि जगात फक्त तीन लोकांना ह्या प्रश्नाची खरोखर माहिती आहे एक म्हणजे प्रिन्स अल्बर्ट (इंग्लंडच्या राणी विकटोरीयाचा नवरा) पण तो आता हयात नाही, एक जर्मन प्रोफेसर आहे पण तो वेडा झालाय आणि मी, पण आता मी ते सगळे विसरलो आहे.

मुळात १९व्या शतकाचा बराचसा काळ (साधारण ७० वर्षे) जर्मनी हा देशच नव्हता, होता तो प्रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेली जर्मन भाषक फुटकळ राज्य. इसवीसनाच्या १५व्या शतकापासूनच कधी पोलंड कधी फ्रांस, कधी रशिया, तर कधी ऑस्ट्रियाशी संघर्ष करत करत हा प्रशिया आपले अस्तित्व टिकवून होता. ह्याचे फ्रेडरिक नावाचे इतके राजे होऊन गेले कि प्रशिया मध्ये राजाला समानार्थी शब्द म्हणून फ्रेडरिक म्हणत कि काय असे आपल्याला वाटावे! असो तर ह्या असंख्य फ्रेडेरिकांपैकी अतिशय प्रसिद्ध अशा फ्रेडरिक द ग्रेट (फ्रेडरिक दुसरा) ह्याने पोलंड, फ्रांस आणि ऑस्ट्रियाचा निर्णायक पराभव करून आपले प्रशियाचे छोटेसे पण शक्तिशाली साम्राज्य (खरेतर राज्य!) स्थापले. साल होते १७७२. इतक्या दीर्घ काल म्हणजे जवळपास २५० वर्षे युद्धरत राहिल्याने हा देश अत्यंत लढाऊ वृत्तीचा आणि आक्रमक थोडक्यात युद्धखोर बनला असल्यास नवल नव्हते. मात्र पुढे जेव्हा फ्रांस मध्ये नेपोलीयनने सत्ता काबीज केली तेव्हा प्रशियाच्या गादीवर होता फ्रेडरिक विलियम दुसरा.

हा एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात प्रशियाला स्वातंत्र्य, शांतता, स्थैर्य आणि संपन्नता सर्वकाही लाभली पण हे स्थैर्याचे दिवस लवकरच पालटले. हा फ्रेडरिक काही उत्तम लढवय्या नव्हता आणि नेपोलीयनच्या झंझावातापुढे त्याने हार पत्करली. तसा अख्खा युरोपच नेपोलीयनच्या सामर्थ्यापुढे हतबल झालेला होता. १७९५ साली प्रशियाचा पराभव करत नेपोलियनने ऱ्हाईन नदीच्या आसपासचा जर्मन भाषक असा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. त्याचा मुलगा फ्रेडरिक विलियम तिसरा जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने सुरुवातीला नमते घेतले पण अखेरीस आपल्या प्रशियन स्वभावाला अनुसरून नेपोलीयनशी युद्ध छेडले. १८०६ साली त्याला हरवून नेपोलीयनने अक्ख्या प्रशियाच फ्रान्सचा मांडलिक करून घेतला.

ह्या आधी युरोपात जर्मन भाषा आणि संस्कृती असलेली प्रशिया आणि ऑस्ट्रिया ही दोन प्रबळ राज्य सोडली तर इतर जवळपास ३०० फुटकळ राज्ये होती. नेपोलीयनने ह्यातली बरीचशी बरखास्त करून, एकमेकात विलय करून त्यांची एकूण ३९ राज्ये केली. एरवी सतत आपसात भांडत असणारी हि छोटी छोटी राज्य नेपोलियनसारख्या सामाईक आणि प्रबळ शत्रू मुळे आपसातले हेवेदावे विसरून एकत्र आली. पुढे १८१५ साली जरी नेपोलीयनचा वाटर्लुच्या युद्धात निर्णायक पराभव झाला असला तरी ह्या विजयाचे खरे शिल्पकार होते इंग्लंड. ह्या युद्धाने युरोपातला फ्रान्सचा वरचष्मा नष्ट झाला, प्रशिया स्वतंत्र झाला आणि फ्रान्स हा आपला सामाईक शत्रू आहे हे ओळखून प्रशिया आणि हि ३९ जर्मन भाषक राज्ये एकत्र येऊन त्यांनी आपला एक जर्मन राज्य संघ बनवला.

सुरुवातीला ह्यात ऑस्ट्रियादेखिल सामील झाला होता पण व्यापार, अर्थव्यवस्था, संरक्षण अशा निरनिराळ्या महत्वाच्या धोरणांवर प्रशियाशी न जमल्याने त्यातून तो लवकरच बाहेर पडला. १८४० साली प्रशियाच्या गादिवर आला फ्रेडरिक विलियम चौथा. हा बराच उदारमतवादी होता. हे लक्षात ठेवले पाहिजे कि आता पर्यन्त आपण जी भांडणे लढाया गटतट शहप्रतीशह पाहतोय ती सगळी निरनिराळ्या राजवटीमधली होती. देश राष्ट्रवाद वगैरे संकल्पना अजून मूळ धरायच्या होत्या किंवा आज आपल्याला त्या जशा माहिती आहेत त्यास्वरुपात उत्क्रांत व्हायच्या होत्या. खरेतर १८व्या शतकात झालेल्या फ्रेंच राज्य क्रांतीनन्तर स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे नवपर्व युरोपात येऊ घातले होते पण नेपोलीयनने सत्ता काबीज करून आणि स्वत:चेच साम्राज्य स्थापन करून त्याला चांगलीच खिळ घातली.

पहिले महायुद्ध

अर्थात म्हणून काही राष्ट्रवाद नष्ट झाला नव्हता. प्रशियाच्या जर्मन भाषा, परंपरा, संस्कृती आणि भौगोलिक संलग्नता ह्यावर आधारलेल्या राज्यसंघाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला. राजेशाही उखडून फेकून द्यायचे अनेक उठाव १८४८ पासून युरोपात – विशेषत: प्रशियात होऊ लागले.

जरी हे सगळे उठाव फ्रेडरिक विलियम चौथा ह्याने मोडून काढले असले तरी त्याने उठाव करणाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या, कल्पना स्वीकारून राज्यतंत्रात बरेच मूलगामी बदल केले. त्याने प्रशियन जनतेला राज्यकारभारात सामावून घेत, त्यांचे मत-मागण्या मांडण्यासाठी संसद आणि संविधानाची निर्मिती करून ते लागू केले. तसेही नेपोलीयानिक युद्धातून (१८०३-१८१५) युरोप मध्ये सामंतशाहीची पीछेहाट होऊन उदारमतवाद आणि त्याहून जास्त प्रमाणात राष्ट्रवाद वाढीला लागला होताच पण सर्वप्रथम त्याला थोडीफार मान्यता, अधिष्ठान प्राप्त झाले ते प्रशियात. (अर्थात इंग्लंडचा अपवाद) अशा परिस्थितीत प्रशियाचा प्रभाव (किंवा थोरलेपण म्हणू फार झाले तर) असलेले आणि जर्मन भाषा संस्कृती चालीरितींवर आधारलेले एकसंध जर्मन राष्ट्र निर्माण करून त्याचा राजा किंवा अध्यक्ष आपण बनावे असा त्याने प्रयत्न केला (सन १८४९) पण इतर जर्मन राज्यांनी त्याचे मोठेपण मान्य करायला नकार दिल्याने तो प्रस्ताव बारगळला. तशात काही वर्षांनी म्हणजे १८५७ साली पक्षाघाताचा झटका येऊन विकलांग झाल्याने फ्रेडेरिक विलियम चौथा ह्याने गादी सोडली अन् त्याचा भाऊ विलियम किंवा विल्हेल्म पहिला हा गादीवर आला( आणि प्रशियातली राजांची फ्रेडरिक नावाची शृंखलाही तुटली). हा विल्हेल्म मोठा चाणाक्ष आणि धोरणी होता. त्याने लगेच काही गडबड केली नाही पण तो माणसे ओळखण्यात मोठा वाकबगार होता. त्याने प्रशियातील एक उमराव घराण्यातला तरुण, प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क याला प्रशियाचा पंतप्रधान म्हणून नेमला.

ह्या बिस्मार्क बद्दल आणि त्याच्या कामगिरीबद्दल पुढच्या भागात

क्रमश:


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “पहिले महायुद्ध!….. संघर्षाचा आरंभ”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय