आंबेडकर-ओवेसी यांच्या दलित-मुस्लिम राजकीय मैत्रीची ‘वंचित आघाडी’

राजकारण हे बुद्धिबळाच्या पटावर प्यादी हलवावीत तसे चालू असते. त्यातल्या प्रत्येक डावपेचाचा अर्थ निकाल लागेपर्यंत ठामपणे सांगता येत नाही. किंबहुना, प्रतिस्पर्ध्याला आपल्या खऱ्या डावपेचांचा अंदाज येऊ नये, ही खऱ्या चतुर खेळाडूची खरी चाल असते. डाव टाकण्यात आणि डाव रचण्यात माहीर असलेले असे अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यासाठी ही मंडळी राजकारणाच्या सारीपाटावर सातत्याने चाली टाकत असतात. निवडणुकीच्या हंगामात तर या खेळाला मोठी रंगत येते. प्रत्येक राजकारणी आपापल्या सोयीनुसार आघाड्या-युत्या संदर्भात समीकरणं मांडतो. त्यावर राजकीय वक्तव्ये करतो. कधी कधी ही वक्तव्य नुसता अंदाज घेण्यासाठी, चाचपणी करण्यासाठी केली जातात. तर कधी कधी त्यामागे निश्चित राजकीय भूमिकासुद्धा असते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्राश्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंचित आघाडी’या नावाने एमआयएम सोबत युती करून नवं राजकीय समिकरण मांडण्याचं वक्तव्य केलं आहे. सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्षीय एकजूट करण्याचे नगारे दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाजत असताना राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पर्याय सोडून ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेल्या या नव्या डावामुळे राज्याच्या राजकरणात खळबळ उडणे साहजिकच. अपेक्षेप्रमाणे या वक्तवव्यावर प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत.

भारिप- एमआयएम आघाडीची चाल भाजपच्या सोयीच्या राजकारणासाठी खेळली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केलायं, तर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी यावर मौन पाळले आहे. अर्थात, भारिप-एमआयएम एकजुटीची घोषणा ‘चाल’ आहे कि राजकीय ‘भूमिका’? यात ‘वजीर’ कोण ठरणार आणि प्यादी कोण? आंबेडकरानी हा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी घेतलाय, की आजवरच्या राजकीय कोंडमाऱ्यातून या भूमिकेची उत्पत्ती झालीये? याची उत्तरं मिळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल . पण, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणात मांडलेल्या या नव्या प्रयोगाचे फायदे-तोटे आणि त्याच्या भवितव्यावर चर्चा करणे नैमित्तिक ठरणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारिपचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर हे नाव राज्याच्या राजकारणात कायम वलयांकित राहिले आहे. दादर येथील डॉ. आंबेडकर भवनच्या विध्वंसापासून सर्वाधिक चर्चेत आलेले ऍड. आंबडेकर नुकतेच झालेल्या भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतरचा बंद आणि संभाजी भिडे विरोधातील आंदोलनामुळे सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यातच असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम सोबत युती करण्याचे संकेत देऊन आंबेडकरांनी राज्याचे लक्ष पुन्हा आपल्याकडे खेचून घेतले आहे.

दलित आणि मुस्लिम ऐक्याची मोट बांधून वंचितांना न्याय देण्याची भूमिका सध्या ऍड. आंबेडकर मांडत आहेत. मात्र, त्यांच्या ह्या हेतूवर संशय घेतला जात असून, युतीमुळे दलित आणि मुस्लिम या दोन समाजांच्या घडणाऱ्या एकगठ्ठा ध्रुवीकरणाचा फायदा राज्यात नेमका कोणाला मिळणार, हा प्रश्न मुख्य चर्चेचा विषय बनला आहे. ऐक्याच्या नावाखाली मत विभाजनाचे राजकारण करून भारिप आणि एमआयएम भाजपच्या सोयीचं राजकारण करत असल्याची टीका ह्या युतीवर केल्या जातोय. सध्याची परिस्थिती बघितली तर, या एकीकरणाचा आणि मतविभाजनाचा फायदा भाजपच्या पारड्यात जाताना दिसतोय. त्यामुळे या टीकेतील तथ्य नाकारता येण्यासारखे नाही. याचा अर्थ भारिप-एमआयएम एकजुटीला कुणाची फूस आहे, असे आम्हाला मांडायचे नाही. पण, यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी असेल किंवा सेना-भाजप असेल सर्वांनीच प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाकडे कायम संशयाच्या नजरेने बघितले आहे. यातून त्यांचा बऱ्याचवेळा राजकीय कोंडमारा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी कदाचित ही भूमिका घेतल्या गेली असावी. अर्थात, यामुळे राजकीय कोंडी फुटेल आणि वंचितांना न्याय मिळेल? असं ठामपणे म्हणता येत नाही.

महाराष्ट्रात दलित-मुस्लिम राजकीय मैत्रीचा प्रयोग ३० वर्षांपूर्वी प्रा. जोगेंद्र कवाडे आणि हाजी मस्तान यांनी “दलित मुस्लिम मुक्‍ती सेना’ च्या माध्यमातून केला होता, पण काँग्रेसला फटका देण्यापलीकडे त्यांच्या पदरात कुठलेही राजकीय यश पडू शकले नाही. आणि त्यांचे ऐक्य ही फार काळ टिकू शकले नाही. आता पुन्हा आंबेडकर-ओवेसी तसाच प्रयत्न करत आहेत. या दोन्ही नेत्यांना जनाधार असल्याने हा प्रयोग निश्चितच दखलपात्र ठरेल. परंतु त्यांना राजकीय यश कितपत मिळेल, हे सांगता येत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचा अकोला-वाशीम-बुलडाणा सह विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी प्रभाव आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाला बाळापुर ची एक जागा जिंकता आली. परंतु ज्या ठिकाणी भारिपने जागा लढविल्या त्यातील बहुतंशी ठिकाणी पक्षाला लक्षणीय मते मिळाली होती. शिवाय या चार वर्षाच्या काळात बुलडाणा नगराध्यक्ष पदासह अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेत ‘भारीप’ने आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे.

मुस्लिम मतदारही काँग्रेसपासून काहीसा दुरावत असून एमआयएमकडे आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या विधानसभेत एमआयएमने २४ जागा लढवून भायखळा आणि औरंगाबाद मध्ये या दोन जागांवर विजय मिळवत महाराष्ट्र विधानसभेत चंचूप्रवेश केला होता. औरंगाबाद, नांदेडसह काही पालिकांमध्ये त्यांचे नगरसेवकही निवडून आले आहेत. त्यामुळे हे ऐक्य बुलडाणा, अकोला, वाशीम, औरंगाबाद, नांदेड अशा ठिकाणी प्रभाव दाखवेल असं सध्यातरी म्हणता येईल. शिवाय, महाराष्ट्रातील अनेक ‘वंचित घटक’ या वंचीत आघाडीत सामील होऊ शकतात. त्यामुळे हा गट मोठा झाला तर प्रभाव क्षेत्र वाढू शकेल! त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काही जागा पाडण्याला तो कारणीभूत ही ठरेल. पण, यातून राज्याला तिसरा पर्याय देता येईल, असे म्हणणे अतिशयोक्तीचं ठरेल.

महत्वाचे म्हणजे या युतीचे भवितव्य काय? हा सुद्धा मोठा प्रश्न राहणार आहे. आजवरच्या आशा युत्या- आघाड्यांचा इतिहास बघितला तर असा प्रयोग फार काळ टिकल्याचे दिसून येत नाही. जे काही थोडे फार राजकीय यश यांना मिळते, ते एक तर पचवता येत नाही किंवा फंदफितुरी होऊन या आघाड्या यथावकाश नामशेष होतात. या पार्श्वभूमीवर भारिप-एमआयएम युतीकडे बघायचे झाल्यास भारिप आणि एमआयएम. ऍड. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी. या दोन नेत्यात, दोन पक्षात, त्यांच्या विचारात काही मूलभूत फरक आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण बऱ्याच अंशी पुरोगामीत्वाकडे आणि डाव्या विचारांकडे झुकलेले दिसते. तर नाही म्हणले तरी ओवैसी यांच्या राजकारणात कट्टरतावाद ठळकपणे समोर येतो. त्यामुळे यांचे सूर भविष्यात कसे जुळतील आणि जनता त्यांना कसे स्वीकारेल. यावरच ह्या युतीचं भवितव्य अवलंबुन राहील. सोबतच ही ‘ठाम’ भूमिका आहे की काँग्रेसने आपल्याला गांभीर्याने घ्यावे, यासाठी टाकलेली ‘चाल’? हे स्पष्ट झाल्यानंतर चित्र अजून क्लीयर होईल. तसेही प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमशी युतीचे संकेत देताच काँग्रेस आघाडीकडून आंबेडकरांना चर्चेसाठी बोलावणं धाडण्यात आल्याचं एक वृत्त वाचण्यात आलंय. त्यामुळे वाटाघाटी होण्याला अजूनही चान्स आहे. एकंदरीत निर्णय काहीही होवो. पण राज्याचे राजकारण आता तापू लागलंय, हे निश्चित..!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय