‘जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश’ कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरील निर्बुद्ध गदारोळ

कवी श्री. दिनकर मनवर यांच्या कवितेवरुन जो काही निर्बुद्ध गदारोळ आपल्या समाजात सुरु आहे, तो पाहाता आपल्या एकंदर समाजानेच सारासार विचारशक्ती गमावली आहे की काय, याची रास्त शंका यावी अशी परिस्थिती आहे. अलिकडे संस्कृतीरक्षणाकडे लोकांचा ओढा जरा वाढलाच आहे आणि संस्कृतीरक्षकही वाढले आहेत. पुन्हा संस्कृती म्हणजे काय, याची ठराविक अशी व्याख्या नाही. एखाद्याला एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर ते संस्कृतीभंजन समजलं जातं, इतक्या उथळपणे आपण वागू लागलो आहोत. जात-धर्म यांच्याबद्दलच्या जाग्या झालेल्या टोकाच्या अस्मिता आणि आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या उत्कर्षासाठी त्या पुन्हा कधीही झोपू नयेत याची व्यवस्थित काळजी घेणाऱ्या स्वार्थांध राजकारण्यांनी, देशातील माणसांनी विचार करुच नये याची व्यवस्थित काळजी अगदी लोकांच्या शाळेपासूनच घेतलेली आहे, त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत व यापुढेही भोगावे लागणार आहेत.

श्री. दिनकर मनवर यांची कविता मी वाचली. दोन पानांच्या त्या कवितेत आणखीही बरंच काही अर्थपूर्ण आहे. मनवरांनी त्या कवितेतून ‘पाणी’ हे प्रतिक घेऊन, आपल्याकडच्या सामाजिक परिस्थितीमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न कवितारुपाने समाजासमोर ठेवले आहेत, ते गांभिर्याने विचार करण्यासारखे आहेत.

जवळपास ५० ओळींच्या या कवितेत कविॅनी समाजासमोर आजच्या वर्तमानातलं दाहक वास्तव मांडलं आहे. “किंवा अदिवासी पोरींच्या स्तनांसारखं जांभळं” या पाच शब्दांच्या ओळीकडे सर्वांचं लक्ष गेल. त्यातही या ओळीतील पाच शब्दांमधील ‘स्तन’ ह्याच शब्दाकडे जास्त लक्ष गेलं असण्याचीच शक्यता जास्त आणि मग पुढचं सगळं घडलं असावं. ‘या ओळींमळे मनात लज्जा उत्पन्न होते’ अशा आशयाचं विधान काही राजकीय नेत्यांकडून केलं गेलं (खरं तर निर्लज्जपणा कोळून प्यायलेल्या राजकीय लोकांच्या मनातही लाज उत्पन्न झाली, ही या कवितेची आनुषंगिक जमेची बाजू पकडायला हवी).

मला आश्चर्य वाटतं की, याच कवितेच्या एका कडव्यात…..

पाणी स्पृष्य असतं की अस्पृष्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रम्ह?
पाणी ब्राम्हण अस्तं की क्षत्रिय की वैश्य?
पाणी शुद्र असतं की अतिशुद्र?
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

कवी दिनकर मनवर यांनी विचारलेल्या आणि समाजाचा घटक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला आपलीच लाज वाटावी अशा प्रश्नाबाबत मात्र कुणालाच लाज का वाटत नाही किंवा कुणाच्याही मनात लज्जा का उत्पन्न होत नाही, याचं उत्तर कुणाकडेच नाही. या कडव्यात आणि एकूणच कवितेत श्री. दिनकर मनवर यांनी विचारलेला प्रश्न कुणाला बोचत नाही, अस्वस्थ करत नाही आणि ‘स्तन’ मात्र अस्वस्थ करतात, हे माझ्या तरी आकलनाच्या पलिकडचं आहे.

स्त्रियांच्या शरिराच्या एका किंवा अनेक भागांचं वर्णन वाचून अस्वस्थ होणारांना, तिच्या शरिराचे त्यांच्यासहित अनेकांनी अनेकांगानी घेतलेले भोग मात्र अस्वस्थ करत नाहीत. तिचे भोग घेतले जात असताना मात्र ती आपल्या जाती-धर्माची आहे का नाही आणि भोग घेणारा कोणत्या जाती-धर्माचा आहे यावर ज्या समाजाचा पावित्रा अवलंबून असतो, त्या समाजाचं भवितव्य फार चांगलं नसतं. दिलीप मनवरांनी आपल्या कवितेत ‘अदिवासी’ पोरीचा केवळ उल्लेख केलाय म्हणून अदिवासी समाज, म्हणजे अदिवासी नेते भडकले. त्या जांभळ्या स्तनांच्या अदिवासी पोरीच्या जागी कोणत्याही रंगाचे स्तन आणि तो तो रंग धारण करणाऱ्या कोणत्याही समाजाची पोरगी असती तरी त्या त्या समाजात हेच झालं असतं यात शंका नाही.

स्त्री म्हणजे फक्त तिचे स्तन किंवा जननेंद्रिय इतकंच असतं, हेच आपला बहुसंख्य समाज समजतो. दुसऱ्याला त्या अवयवांचा प्रतिकात्मक म्हणून उल्लेख करायची मुभा नाही, असा काहीतरी आपला समज अलिकडे झालाय. तो तसा उल्लेख का झालाय यासाठी त्या लेखक/कविंची ती पूर्ण कलाकृती समजून घ्यावी लागते, हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. अशा लोकांना विंदांच्या ‘झपताल’ या कवितेतल्या, “आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते..” आणि “मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात..” या ओळींमधे सेक्सच दिसणार आणि त्या ओळी वाचून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होणार??

‘प्रेम कुणावर करावं’ या कवितेतील ‘प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं… प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं..” या कुसुमाग्रजांच्या ओळीत अश्लिलता दिसते असे लोक आज आपल्या समाजाचे नेतृत्व करत आहेत, हे दुर्दैवी आहे. उद्या या नितांतसुंदर कवितांवरही बंदी आणल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या व अशांसारख्या कवितांवर बंदी आणायची झुंडशाही मागणी विंदा किंवा कुसुमाग्रजांनी या कविता लिहिल्या तेंव्हा केली गेली नाही याचा अर्थ आपला पूर्वीचा अशिक्षित व अर्ध शिक्षित समाज आताच्या सुशिक्षित उच्च शिक्षित समाजापेक्षा जास्त शहाणा होता, असा होतो. शिक्षणाने पगार आकाशाच्या दिशेने वाढले, अक्कल मात्र जमिनीच्या दिशेने निघाली. आपल्या शिक्षणातच मोठी खोट आहे, असे मी सुरुवातीस म्हणालो ते याचमुळे.

माझी आई रोज देवी महात्म्य वाचते. गेली तीस-पस्तिस वर्ष तरी मी ते ऐकत आलो आहे. त्यातील पंधराव्या अध्यायातील काही श्लोकांत देवीच्या रुपाचं वर्णन आहे. श्लोक सांगतात,

आतां सर्व देवशरिरांपासूनी ।
जी कां प्रकट जाहली भवानी ।
अमितप्रभा त्रिगुणरुपिणी ।
महालक्ष्मी प्रत्यक्ष ॥ ११ ॥

महिषमर्दिनी ती जाण ।
श्र्वेत असे तियेचे आनन ।
जियेचे भुजं नीलवर्ण ।
श्र्वेत स्तनमंडल जिचें ॥ १२ ॥

रक्तमध्य शरीर जाण ।
रक्त असती जियेचे चरण ।
जंघा ऊरु रक्तवर्ण ।
अत्यंत मद जियेचा ॥ १३ ॥

अत्यंत चित्र जियेचे जघन ।
चित्रमाल्यांबरभूषण ।
अंगी शोभे चित्रानुलेपन ।
कांतिरुप सौभाग्य शील ॥ १४ ॥

या ओळींचा सोप्या मराठीतील अर्थ, “महिषासुरमर्दिनी म्हणजेच साक्षात त्रिगुणात्मिका महालक्ष्मीच आहे. तिचं मुख शुभ्र धवल, हात निळे, तिची स्तन मंडलं अत्यंत शुभ्र, कंबर, पाय व जांघा हे अवयव रक्तासारखे लाल असून, ती मद्यपानामुळे उन्मत्त अवस्थेत असते. तिचा जघन भाग चित्रविचित्र असून, तिने चित्र विचित्र रंगाच्या माळा, वस्त्र व अलंकार परिधान केलेले आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी उट्या अंगाला लावल्या आहेत व तिच्या ठायी कांती, सौंदर्य व सौभाग्य यांचा प्रकर्ष झालेला आहे” असा आहे. साक्षात देवीबद्दल असा विचार करणारे शेकडो वर्षांपूर्वीचे ते स्तोत्रकर्ते अधिक शहाणे होते की आताचे स्वत:ला नेते मानणारे अश्लिलमार्तंड अधिक शहाणे, हे मला कळत नाही.

दिनकर मनवर यांच्या कवितेबद्दल जो काही हिडिस तमाशा आपल्याकडे सुरू आहे, त्यामुळे मला काही वर्षांपूर्वी तालिबान्यांनी अफगाणीस्तानातल्या बामियान येथील पुरातन बुद्ध मुर्ती तोफा लावून उध्वस्त केल्या होत्या, ती घटना आठवली. मुनवरांच्या कवितेसंबंधी जो धुडगुस घातला गेला, तो मला तालिबान्यांनी बुद्धमुर्ती उध्वस्त केल्यासारखाच वाटतो. हुल्लडबाजी करुन यावर बंदी, त्यावर बंदी अशा मागण्या आणि त्या बेलगाम झुंडशाहीपुढे झुकणारे लोकनियुक्त सरकार अशा अलिकडच्या वारंवार घडणाऱ्या घटना पाहिल्या की, आपण जागतिक महाशक्ती होण्याच्या दिशेने चाललोय की वेगाने तालिबान्यांच्या दिशेने चालू लागलो आहोत, हेच कळेनासे होते.

गोरेपान स्तन आणि लाल जांघा असलेली ती महिषासूरमर्दीनि लवकरात लवकर अवतार घेवो आणि आजच्या समाजाचं नेतेृत्व करणाऱ्या महिषांचं पुन्हा एकदा निष्ठूरतेने मर्दन करो, हेच तिच्याकडे येणाऱ्या नवरात्रानिमित्त मागणं. शेवटी आपातकालीन स्थितीत देवमंडळाने देवीची मनधरणी केल्याचे व देवीने देवांना तारल्याचे अनेक दाखले पुराणांत आहेतच. आपल्याला तारण्यासाठी तोच नुस्खा आपण मर्त मानवांनी पुन्हा एकदा अजमावावा असं मला तिव्रतेने वाटू लागलं आहे.

वाचण्यासारखे आणखी काही…

भुतांनी स्थापली ‘मनुष्यबाधा निर्मुलन समिती’


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “‘जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश’ कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरील निर्बुद्ध गदारोळ”

 1. उद्या आदिवासी सामाजाची लक्तरे वेशीवर टांगली तरी तुम्हाला ते बरेच वाटणार! असेच अत्याचारांना खतपाणी घाला. आणि स्वतःची पोटे भरा.

  Reply
 2. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गरिब आदीवासी, प्रबळ जाती आणि आम्ही – प्रा. हरी नरके

  १. घासीराम कोतवालमध्ये तेंडूलकरांनी आधी एक दृश्य घातलेले होते. एक मराठा सरदार बावनखणीत [ पुण्याच्या वेश्यावस्तीत] जातात असे त्यात दाखवले होते. त्यावेळचे गृहखात्याचे राज्यमंत्री मराठा समाजाचे जाणते राजकारणी होते. त्यांनी हे नाटक पाहिले आणि तेंडूलकरांना सांगितले, तुमचे हे नाटक तुम्हाला महाराष्ट्रात दाखवायचे असेल तर हे दृश्य वगळा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्या नाटककार विजय तेंडूलकरांनी ते दृश्य ताबडतोब वगळले.

  २. घासीराम कोतवालमुळे ब्राह्मण समाजाची बदनामी होतेय असे ज्यांनी तेव्हा गळे काढले तेच सगळे आज ” पाणी आदिवासी मुलीच्या जांभळ्या स्तनांसारखंही असतं…” ही कवितेची ओळ वाचून अनेक आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या असताना मात्र आदीवासींचा उल्लेख एकजात झुंड असा करीत आहेत. प्रबळ जातींच्या खर्‍या झुंडी जेव्हा रस्ते कब्ज्यात घेतात तेव्हा मात्र आम्ही तमाम सारे विचारीलोक आमच्या नष्ट झालेल्या अवयवासह मौनात गेलेले असतो.

  ३. दया पवारांच्या बलुतंमधल्या बौद्ध समाजाच्या चित्रणातून आमच्या समाजाची बदनामी झाली, आम्ही बलुतंची होळी करणार असा आरडाओरडा करणारेच आज मात्र ” पाणी आदिवासी मुलीच्या जांभळ्या स्तनांसारखंही असतं” असं लिहिणारा कवी जर आपल्या समाजाचा असेल तर अभिव्यक्तीच्या रक्षणार्थ पुढे धावले पाहिजे या कर्तव्यभावनेने सजग झालेत.

  ४. पैठणला धार्मिक कार्यक्रमाच्या नावावर गोरगरिबांची लूट करणार्‍या प्रवृत्तीवर दशक्रिया चित्रपटात भाष्य आहे म्हटल्यावर ब्राह्मण समाजाची बदनामी आहे, या सिनेमावर त्वरित बंदी घाला, अशी ओरड झाली तेव्हा किंवा बाजीराव मस्तानी चित्रपटातल्या नृत्याच्या दृष्यात ब्राहमण स्त्रियांना नाचताना दाखवल्याने या समाजाची बदनामी झालीय, सिनेमावर बंदी झाला असा गदारोळ झाला तेव्हा तोंडाला कुलूप लावून तमाशा बघत बसणारे तमाम इसम आदीवासी मुलीच्या स्तनांचा मुद्दा आल्यावर मात्र अभिव्यक्तीच्या बाजूने सरसावलेत. एखाद्या जात समुहाच्या उल्लेखासह अशा प्रतिमा वापरणे अनावश्यक असल्याची जनभावना असेल तर ती समजून घ्यायला नको?

  ५. पद्मावत चित्रपटाचे सेट जाळले गेले, मोर्चे काढून दिग्दर्शक, नायिका यांची डोकी कापून आणणारांना कोट्यावधींची बक्षिसं जाहीर झाली तेव्हा अभिव्यक्तीबद्दल मूग गिळून चिडीचूप बसलेले तमाम चित्रपटवाले आदीवासी मुलीचा मुद्दा आल्यावर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तळी उचलून धरताहेत. “माझे पती छत्रपती” या नावाचे नाटक पुण्यात उधळले गेले होते. “माझे पती छत्रीपती!” असा नावात बदल करायला भाग पाडले गेले. कन्यादानमध्ये आमच्या जातीची बदनामी करण्यात आलीय म्हणून नाटककार विजय तेंडूलकरांना नाशिकच्या संमेलनात चप्पल फेकून मारली गेली. त्यावेळी खोलखोल मौनात असलेलेच बायाबाप्ये आज मात्र आदीवासींना अक्कल शिकवताना दिसताहेत. आम्ही ताकदवान झुंडींसमोर मौनीबाबा असतो नी दुबळ्यांना मात्र प्रवचनं देतो हे आमचे खरे रूप आहे.

  ६. नट समाजातल्या भटक्या स्त्रियांना दोन घास मिळवण्यासाठी आपलं शरिर विकावं लागतं असा उल्लेख एका शासकीय अहवालात आला तेव्हा एक साहित्य अकादमी विजेते मराठी लेखक तो अहवाल जाळायला सरसावले. आता मात्र आदीवासी स्त्रियांच्या अब्रूचा मुद्दा आल्यावर त्यांना हा कवी आपला वाटायला लागला.

  दलित-आदीवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक, ओबीसी समाजातल्या स्त्रियांवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, हत्या झाल्या, नग्न धिंडी निघाल्या, आदीवासी-दलित लेखकांच्या संपुर्ण पुस्तकांवरच बंदी आल्या तेव्हा या लेखक कवींना पाठींबा न देता मौन राहिलेले साहित्यिक आता आदीवासी स्त्रिच्या भावनांसाठी, जनभावनेसाठी एक कविता अभ्यासक्रमातून काय वगळली, पुस्तक वगळलेले नाही, तर लगेच ” कवींची राष्ट्रव्यापी संघटना असावी. त्यात भिन्न भिन्न विचारधारेचे लोक असतील. पण solidarity च्या बाबतीत एकमत असेल.” अशी पताका फडकावित आहेत. आनंद यादवांच्या वेळी हे सगळ्या कोणत्या बिळात लपले होते?

  ७. कविला धमक्या, शिव्या देणारे, ट्रोल करणारे चुक करीत आहेत. दिनकर मनवर यांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे किंवा ट्रोलिंग करणे हे बेकायदेशीर तर आहेच पण ते अनैतिकही आहे. त्यांच्या कवितेतल्या एका उल्लेखाशी तुमचे मतभेद आहेत. ती कविता आता अभ्यासक्रमातून गाळण्यात आलेली आहे. श्री मनवर हे आदीवासींचे शत्रू तर नाहीतच, विरोधकही नाहीत. ते आदीवासींबद्दल कळवळा असलेले मोठे कवी आहेत. त्यांना आदीवासीविरोधी गोटात बळजबरीनं ढकलू नका. त्यांना ज्यांनी पाठींबा दिलाय त्यातलेही बहुसंख्य कवी, लेखक हे दलित-आदीवासी-भटके-ओबीसी यांच्याबद्दल आस्था असलेले ज्ञानी लोक आहेत. त्यांना टार्गेट करणे किंवा व्यक्तीगत पातळीवर दुखावणे म्हणजे आपल्याच पायावर दगड पाडून घेणे होय याचे भान राखा. आपल्या साहित्याद्वारे ज्यांनी आदीवासी जीवनाबद्दल जागृती घडवलेली आहे ते आपले दोस्तलोक आहेत. संयम सोडू नका. विवेकाने वागा.

  ८. पण दुसरी बाजू अतिशय संयमाने मांडली, नेमक्या काय अडचणी आहेत त्या सभ्य भाषेत संगतवार मांडल्या तर मात्र सगळे प्रतिभावंत कवी-समिक्षक, दुसरी बाजू नावाची काही बाब असूच शकत नाही, आमची बाजू हीच एकमेव बाजू, असं हिरिरीनं मांडताहेत. ह्या कुत्सित आणि दांभिक वृत्तीबद्दल आभारी आहे.

  वेगळं काही सभ्यपणे मांडत असाल तर आम्ही त्याची टिंगळ टवाळी करणार, त्यांना मुर्खात काढणार, प्रतिगामी ठरवणार, लोकांपासून कायम फटकून राहणारे आम्ही तुच्छतावादी क्रांतिकारक, प्रतिभावंत मात्र संतप्त लोक अंगावर आले की ते जर दुबळ्या समाजातले असले तर त्यांना झुंडी म्हणून हिणवणार, तेच आम्ही सारे बुद्धीवादी प्रबळ जातींपुढे मात्र आमची शेपटं घालणार.

  ९. होय प्रश्न गरिब आदीवासींचाच आहे. प्रबळ जातींच्या स्त्रियांबद्दल अवाक्षर लिहून बघा, एकतर तुमची तशी हिंमतच होणार नाही, केलीत तर तुमचा विजय तेंडूलकर होईल. तर आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे मोजून मापून हिशेबी असलेले. तर अशा तमाम दुटप्प्यांनो, दुतोंड्यांनो हार्दीक धन्यवाद.

  सगळंच उत्तम चाललंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच हवे, तुमच्या जातीला हवे, गरिब दुबळे आदीवासी, त्यांच्या भावना मात्र झुंडी, आदीवासी स्त्रियांच्या नाजूक आणि खाजगी अवयवांचा उल्लेख झाला तर त्यात काय बिघडले? आमच्या जातीवर मात्र अवाक्षर लिहाल, बोलाल तर याद राखा. जिभा छाटल्या जातील. धिंड काढली जाईल. छान आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद. आम्ही सारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले, संवेदनशील, प्रतिभावंत, कवी, पत्रकार, सिनेमावाले जिंदाबाद.

  १०. आज समर्थनार्थ पुढे सरसावलेल्या किती जणांनी हा कविता संग्रह विकत घेऊन वाचलाय? कवितासंग्रह अभ्यासक्रमाला लावला म्हणून नविन आवृत्ती काढावी लागली. वादंग झाल्यावर त्याच्या प्रती मिळेनाश्या झाल्या. तोवर त्याच्याकडे कितीजणांचे लक्ष गेले होते? काही पोलीसांनी घेतल्या. काही स्वत: कवीनेच. मर्ढेकरांसारख्या सर्वश्रेष्ठ मराठी कवीचा कवितासंग्रह “मर्ढेकरांची कविता” १३० पृष्ठांचा आहे. तो अवघ्या ३० [तीस] रूपयांना मिळतो. आज २५ वर्षात ज्याच्या ५०० प्रतीही संपल्या नाहीत. फुकटात अभिव्यक्तीच्या नावाने चांगभलं म्हणणार्‍या फेसबुक्यांनो, आधी कोणत्याही कवीच्या कवितासंग्रहाची एकतरी प्रत विकत घ्या. संग्रही ठेवा. वाचा आणि मगच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोला. अवघी दांभिकांची पंढरी.

  ११. अभिव्यक्तीवाल्यांनो, किती आदीवासी तुमच्यासोबत आहेत? एकतरी आदीवासी स्त्री तुमच्या बाजूने आहे? कसल्या गमजा मारताय? शेवटी परदु:ख शितळ हेच खरे.

  Reply
 3. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली २५० साहित्यिकांनी दिनकर मनवर याला पाठिंबा जाहिर केला म्हणे . या साहितिकांची विचारसरणी काय आहे हे या वरून दिसून येते .
  अभिव्यक्ती स्वातंत्रय म्हणजे ठराविक जाती जमातीच्या स्त्रियांची मानहानी करणे असे आहे काय?हा अधिकार या लोचट काविला कोणी दिला ?याचा जाब यासाहितिकांना विचारावासा वाटतों .
  तुमचे अभिव्यक्ती स्वातंञ्य आबाधित ठेवण्यासाठी तुमच्या स्त्रियांच्या स्तनांचा उल्लेख का केला नाही ?त्यातून पाणी कसे असते हे आधीक स्पष्ट झाले असते .
  स्त्री मग ती आपल्या घरातील असो अगर कोणत्यादी जातीधर्माची असो तिचा योग्य तो मान सर्वानी ठेवताच पाहिजे . दिनकर मनवर याने आदवासी स्त्रीचाच नाही तर समस्त स्त्री यांचा अपमान केला आहे याचा पाठींबा देणाऱ्या सादित्यिकांना विसर पडलेला आहे का?खरं तर स्त्रीयांचा अपमान करणाऱ्या व साहित्यिकांची पत वेशीवर टांगणाऱ्या पाणचट नालायक कविचा या साहित्यिकांनी निषेध केला पाहिजे होत, त्याऐवजी त्यांनी पाठिंबा दिला हे विद्वान कविचे लक्षण नाहीं . या सर्व पाठिंबा देणाऱ्या साहित्यिकांचा माझ्या समाज बांधवांच्या वतीने जाहिर निषेध व धिक्कार असो .

  Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय