आत्मसात करा या बारा सवयी, या तुमचे पूर्ण जीवन आंनदी करतील- प्रेरणादायी लेख

सकाळपासुन रात्रीपर्यंत आपण सगळे धावतच असतो. कित्येकवेळा आम्हाला हेच कळत नसते, की आपण जे करत आहोत, ते का करत आहोत?

आयुष्य रोज कसले ना कसले धक्के देतच राहतं, कधी सुखाचे आणि कधी दुःखाचे! कधी कधी अशा परिस्थितीला सामोरे कसं जावं हे आपल्याला उमजत नाही, कधी कधी चुकीचं काय आणि बरोबर काय ते आपल्याला ठरवता येत नाही.

असं होतं, कारण आपण स्वतःला काही ठराविक चांगल्या सवयी लावुन घेण्यात कमी पडतो.

रोजच्या जगण्यात साध्या सोप्या बारा सवयी आत्मसात केल्याने आपण आपले जीवन अजुनच जास्त फुलवु आणि खुलवु शकतो, नैराश्य आणि निरुत्साहाला पळवुन लावु शकतो असा दावा जॉर्डन पीटरसन नावाच्या कॅनडाच्या एका विख्यात मानसशास्त्राने जगासमोर मांडला.

जॉर्डन पीटरसन डॉक्टर आहेत, मानसशास्त्राचे प्रोफेसरही आहेत. गेली कित्येक वर्ष हजारो पेशंट्स वर ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यांचे युट्युबवरचे व्हिडीओज पाहिले की त्यांना ऐकताक्षणीच आपल्याला त्यांच्या बुद्धीमत्तेविषयी आदर वाटु लागतो.

आजच्या लेखात मी तुम्हाला आत्मविश्वास वाढवणार्‍या आणि जीवन फुलवणर्‍या त्या बारा सवयींबद्द्ल सांगणार आहे.

सवय पहिली – चालताना ताठ चाला, उभे असताना ताठ उभे रहा.

हे एकदम सोप्पं आहे, पण कित्येकदा आपल्या लक्षातच येत नाही. केवळ ताठ उभे राहील्याने, ताठ चालल्याने आत्मविश्वास कित्येक पटीने वाढतो. स्व-प्रतिमा (सेल्फ इमेज) कित्येक पटीने सुदृढ होते.

तुम्ही कधी मिल्ट्रीतल्या सैनिकांना चालताना, उभे असताना, बारकाईनं निरीक्षण केलं आहे? ते ताडामाडासारखे उंच भासतात, कारण त्यांना आपल्या उंचीचा सर्वाधिक वापर करायची ट्रेनिंग दिलेली असते.

ते आपल्या पोटाला कधीही शिथील सोडत नाही, त्यांची छाती आणि पोट एका पातळीवर असते.

चालताना पोट आत घेऊन चालल्याने खांदे आपोआपच एकदिड इंचाने वर जातात. आपोआपच तुम्ही उंच, सडपातळ आणि दिमाखदार, आकर्षक भासता.

मन आणि शरीर, अकल्पनीयरित्या एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा आपले शरीर जास्तीत जास्त प्रसरण पावते तेव्हा आपोआपच आपल्या अंगात शक्तीचा आणि उत्साहाचा संचार होतो, म्हणुणच व्यायाम केल्यावर आपली सारी दुःखे छुमंतर होतात.

सवय दुसरी – आपल्या प्रियतम व्यक्तीला जसे वागवतो, तशी वागणुक स्वतःला द्या.

माझ्या मते ही खरचं आयुष्य बदलावणारी सवय आहे.

तुम्ही जर प्रेम केलं असेल तर तुम्हाला माहित असेल की आपण प्रेमात एखाद्यासाठी किती वेडेपिसे होतो, व्याकुळ होतो.

आपण ज्यांच्यावर मनापासुन प्रेम करतो, त्यांना आपण तळहातासारखे जपतो. काय हवं काय नको ते बघतो, हो ना!

समजा तुम्ही तुमच्या मुलांवर अतोनात प्रेम करता, मग तुम्ही त्यांना जंक फुड अजिबात खाऊ देणार नाही.

आपल्या पतीला किंवा पत्नीला अचानक बीपी, शुगर डिटेक्ट झाला, तर आपला जोडीदार दिर्घायुषी आणि निरोगी जगावा, म्हणुन आपण त्याला आवडु वा न आवडो, आग्रह करुन त्याला पथ्य पाळायला लावतो, चालायला, व्यायाम करायला पाठवतो.

प्रियकर आणि प्रेयसीचं मन जिंकण्यासाठी तर प्रेमवीर अशक्य वाटणार्‍या थक्क करणार्‍या गोष्टीही सहज करतात.

मग आपल्या प्रिय व्यक्तींवर असं जीव तोडुन प्रेम करणारे आपण, आपल्या स्वतःवर असं जीवापाड प्रेम का करत नाही?

विचार करा, आपण स्वतःवरच हे असं अनोखं प्रेम करायची सुरुवात केली तर आयुष्य किती भव्य दिव्य असेल? नाही?

व्यसनं पळुन जातील, वाईट सवयी सुटतील, निश्चितच अर्थिक प्रगतीही होईल.

सवय तिसरी – आपल्या हितचिंतकासोबत मैत्री घट्ट करा.

ज्याप्रकारची लोकं तुमच्या आजुबाजुला असतील, त्यावरुन निश्चित होत असतं की तुम्ही स्वतःबद्द्ल कसा विचार करत आहात?

सकाळ संध्याकाळ आपल्यावर टिका करणार्‍या लोकांच्या सहवासात आपण असु तर आपण आपला आत्मविश्वास गमावुन बसु.

समजा, तुम्हाला काहीतरी बक्षीस मिळालय, तुम्ही आनंदाने हुरळुन जावुन मित्रांना उत्साहाने दाखवता, पण त्यात काय एवढं विशेष? अशी प्रतिक्रीया आल्यास तुमचा सगळा आनंद विरघळुन जाईल ना!

तुमची प्रमोशनची बातमी तुम्ही आनंदाने सहकार्‍यांना सांगता, आणि ते म्हणाले, ठिक आहे, ह्याने तुझ्या आयुष्यात काय फरक पडेल? तर आपलाही आनंद क्षणात नाहीसा होईल.

अगदी त्याउलट आपलं कौतुक करणार्‍या माणसांमध्ये राहील्याने आपली कला फुलेल, रोज नवनवी क्षितीजे गाठेल.

मित्रांनी प्रोत्साहन दिले आणि लोकांना माझे लेख, कविता आवडतात, ह्या एकाच कारणाने मला नवनवीन लिहण्याची उर्जा, शक्ती, उत्साह मिळाला, त्यामुळेच मी फेसबुक, व्हॉट्सएपवर नियमित लेख लिहु लागलो. ह्या सगळ्याचं क्रेडीट माझ्या मित्रांनाच!

म्हणुन अशाच लोकांच्या सहवासात वावरावं, जे आपल्याला नेहमी शुभेच्छा देतात, मनापासुन आपलं हित चिंततात.

कधी आपण चुकीच्या मार्गाने जात असु, तर हे मित्र आपल्याला सावधही करतील.

सवय चौथी – तुलना करायची तर करा, पण फक्त स्वतःशी!

ज्याक्षणी आपण स्वतःची आपल्यापेक्षा यशस्वी माणसाशी तुलना करु लागतो, दुःखाचा, असुयेचा, द्वेषाचा, निराशेचा जन्म होतो.

तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे, तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे.

ह्या जगात कोणीही व्यक्ती तुमची झेरॉक्स कॉपी नाहीये, तुमच्यासारखे तुम्ही फक्त तुम्हीच आहात, तुम्ही एकदम ‘युनिक’ आहात.

प्रत्येकाचं स्वतःचं एक वेगळं असं आयुष्य आहे. त्याची एकमेकांशी तुलना होवुच शकत नाही.

तुलना करायचीच तर स्वतःशी स्वतःची करावी, कालच्यापेक्षा आज मी काही विशेष जगलो का? चार गोष्टी चांगल्या केल्या का? कालच्यापेक्षा आज माझ्यात काही सुधारणा झाली का?

सवय पाचवी – आपल्या वागणुकीतुन मुलांना चांगले संस्कार द्या!..

एक चांगला उत्कृष्ट पालक एक पिढी घडवु शकतो, आदर्श पालक बना.

मुलांवर इतके प्रेम करा, की त्याला तुमच्याबद्द्ल आदर, सन्मान, आपलेपणा वाटेल. मग त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरजच पडणार नाही.

तुमच्याकडे एकतर अस्ताव्यस्तपणा असेल किंवा शिस्त, तुमची मुलं कळत-नकळत तुमचं अनुकरण करत आहेत.

तुमची मुलं बिघडलीच तर अख्ख्या समाजालाही त्यांचा त्रास होणार आहे.

सवय सहावी – जगाला नावे ठेवण्याआधी स्वतःमधले दोष नीट करा.

भारतामध्ये प्रत्येक जण सरकारने काय करावे, इतरांनी कसं वागावं ह्यात तज्ञ आहे. पण स्वतःवर काम करताना, स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर, आमचा किती भर आहे?

जग वाईट आहे असं सतत म्हणल्याने ते सुधारत नाहीच, उलट अजुनच भेसुर आणि वाईट भासु लागतं.

जगाला नावं ठेवणारे लोक स्वतःच्या आयुष्यात अपेक्षित प्रगती साधु शकत नाहीत, हेच सत्य आहे.

ह्या जगातल्या वाईट गोष्टींचा इतका त्रास होतच असेल तर नुसतं ओरडुन शक्ती वाया घालवु नका, बाह्या सरसवुन पुढे व्हा, आणि वाईट गोष्टी बदलण्यासाठी प्रत्यक्ष कृती करा. परिस्थितीवर विजय मिळवल्याचा आनंद प्राप्त करा.

सवय सातवी – तुम्ही असंच काम करत रहायला हवं, ज्यामुळे तुमचं भविष्य घडत आहे, निश्चित आकार घेत आहे!

लेखक म्हणतो, बऱ्याचदा आपण स्वतःचा एक रुटीन बनवुन घेतो, आणि काही वर्ष त्या ठरविक साच्यात जगल्यावर ती चौकट मोडायलाच आपण घाबरतो. नको म्हणतो.

आम्हाला सोप्या गोष्टी करायला खुप आवडतात, अवघड गोष्टी हातात घ्यायला नकोशा वाटतात! हाच आमचा स्वभाव आहे.

आपण करत असलेलं दिवसभराचं काम आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहे का, असं रोज रात्री स्वतःला विचारा, असं सांगणारी ही सर्वात बहुमुल्य सवय आयुष्याला कलाटणी देणारी आहे.

वरील प्रश्नाचं उत्तर ‘नाही’, असल्यास, तुम्हाला हव्या असलेल्या नवीन कल्पना, नवीन उर्जा, आणि नवीन उत्साह ह्या सवयीमुळे आपोआप मिळत जातो.

रिझल्ट न देणाऱ्या, टंगळमंगळ करत करत केलेल्या, त्याच त्या दहा कामांपेक्षा, ध्येयाजवळ एक पाऊल घेऊन जाणारी, रिझल्ट देणारी दोन कामे केलेली उत्तम!

वॉर झोन पेक्षाही जगामध्ये एक भयाण जागा आहे, तिला म्हणतात ‘कंफर्ट झोन’!.

ही सवय नेमकी तुमच्या कंफर्ट झोनवर हल्ला करते, तिला जमिनदोस्त करते, तुम्हाला नवनवीन क्षितीजे गाठण्यास तुम्हाला मदत करते.

‘फक्त’ पैसा आणि प्रसिद्धीसाठी काम करु नका, आत्मिक समाधान मिळवण्यासाठी हातातले काम मन लावुन करा. त्यात स्वतःला झोकुन द्या.

सवय आठवी – नेहमी खरे बोला, शक्य नसेल तर कमीत कमी खोटे बोलायचे टाळा.

‘खोटारडी’ आणि ‘थापाडी’ माणसं कोणालाही आवडत नाहीत.

खोटे बोलुन नात्यांचे बंगले उभारता तर येतात, पण ते इतके तकलादु असतात, की एक हलकी फुंकर दिल्यानेही ते कोसळतात, उध्वस्त होतात.

कितीही सफाईदार पणे बोलले तरी खोटे कधी ना कधी, कुठे ना कुठे उघडे होतेच!

खरं बोलण्याची सवय असणारी माणसे मोकळ्या आणि निर्मळ मनाची असतात.

‘विश्वास पानिपतात मेला.’ हे गंमत म्हणुन ठीक आहे, पण विश्वासावरच जग चालतं, म्हणुन विश्वास अमर आहे.

घर असो वा व्यवसाय, पैसा असो वा प्रेम दोन्ही ठिकाणी एकमेकांवर विश्वास निर्माण करणं, अतिशय महत्वाचं आहे, जो फक्त आणि फक्त, खरं वागल्याने, खरं बोलल्यानेच कमावता येतो.

मान्य आहे, कधी कधी खरं बोलणं अडचणीचं असतं, पण मग अशा ठिकाणी तोंड उघडण्यापेक्षा गप्प बसणेच, आम्हाला का जमु नये?

सवय नववी – ‘तुमच्याशी बोलणारा, तुम्हाला माहित नसलेली माहीती सांगणार आहे.’

हे खुप इंट्रेस्टींग आहे. आपल्यातल्या बहुतांश लोकांना, ‘त’ म्हण्टलं की ‘ताकभात’ असा विचार करायची सवय असते.

कोणाशी बोलताना आपण ते काळजीपुर्वक ऐकण्याऐवजी, त्याला प्रत्युत्तर काय द्यावे, ह्या विचारात चटकन गर्क होतो.

कारण आपण समजुत करुन घेतो, की जे समोरचा व्यक्ती सांगत आहे ते तर मला अगोदरच माहित आहे,

पण बऱ्याच वेळा तसे नसते.

म्हणुन आपण जर स्वतःला पुन्हा पुन्हा बजावले की समोरचा व्यक्ती मला असं काहीतरी सांगणार आहे, जे मला माहित नाही, तर आपण त्याला लक्षपुर्वक ऐकु शकु.

‘काळजीपुर्वक ऐकणे, बोलणाऱ्याशी समरस होणे आणि त्याला अधुनमधुन दाद देणे’ ह्या एका सवयीने मनं जोडली जातात. नाती घट्ट होतात.

फक्त लक्ष देऊन ऐकल्याने आणि आनंदी हावभाव व्यक्त केल्याने समोरच्या माणसाला तुम्ही आवडु लागता, हे गुपित तुम्ही अनुभवलं आहे का?

सवय दहावी – बोलताना नेमकं बोला, स्पष्ट बोला, मोजकं आणि प्रभावी बोला, आणि गप्प व्हा!

कित्येक लोकांना सतत बोलत राहण्याची एक प्रकारची मानसिक भुक असते, तर कित्येक लोकांना आपला नेमका मुद्दा काय हेच माहित नसतं, तरीही ते बोलत राहतात.

कित्येक लोकांना उगीचच अघळपघळ बोलण्याची सवय असते, कुठे थांबावं हेच त्यांना समजत नाही, अशा लोकांना टाळलं गेलं तर त्यात नवल ते काय?

अतिबडबड करणाऱ्या लोकांना कोणीही गांभीर्याने घेत नाही, ह्याउलट नेमकं मोजकं बोलणाऱ्या लोकांना ऐकायला सगळेच उत्सुक असतात.

तेव्हा आजपासुन हे पथ्य पाळा. कमी बोला, गोड बोला, सावकाश बोला.

बोलण्याच्या आधी स्वतःलाच एकदा विचारत चला, मी जे म्हणणार आहे, ते खरचं आवश्यक आहे का?

उगीच मनात आलं आणि बोलुन गेलं, मग उगीच बोलुन गेलो, बोलायला नको होते, ह्याने आपल्या अनमोल उर्जेचा अपव्यय होतो. कामावरचा फोकस ढासळतो.

सवय अकरावी – नवीन काही करु पाहणाऱ्या लोकांचे खच्चीकरण करु नका, त्यांना प्रोत्साहन द्या.

इथे लेखकाला म्हणायचे आहे की कोणाच्या मार्गातली आडकाठी बनु नका.

एखाद्याचं मनोधैर्य ढासळेल असं नकारात्मक बोलु नका.

आजुबाजुच्या प्रत्येक व्यक्तिला प्रोत्साहन देण्याची एक खास सवय तुमच्या मित्रांच्या संख्येत आणि पर्यायाने बॅंक बॅंलन्समध्येही नियमित वाढ करुन देत राहील.

उधळपट्टी करणाऱ्या धनिक माणसासारखी ज्याची त्याची छोट्या छोट्या गोष्टींसाठी भरभरुन स्तुती करत रहा, दोष दाखवताना मात्र महाकंजुष वृत्ती अंगी बाणवुन घ्या.

सतत प्रोत्साहन देत राहिल्याने आपल्या लोकांच्या अचंबित आणि थक्क करणाऱ्या क्षमता बाहेर येतात.

टिका अत्यावश्यकच असेल तर चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवुन अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी शब्दात नाराजी प्रकट करा! पुढच्या क्षणी विसरुन जा! तुम्ही तुमचे काम केले आहे, आता मोकळेपणाने वागा.

सवय बारावी – प्रेम करा.

ह्याविषयी काही लिहणं खरचं आवश्यक आहे का?

ह्या जगावर, इथल्या माणसांवर, इथल्या प्राण्यांवर, झाडांवर, आपल्या वस्तुंवर, डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अगदी मनापासुन प्रेम करा. बस्स!… विषय संपला.

ह्या बारा सवयी आत्मसात करुन तुम्ही आनंदाची आणि यशाची नवनवी शिखरे अनुभवावीत, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!

लाईक, कमेंट आणि शेअर तर तुम्ही करणारच आहात! मला खात्री आहे. तुमचा प्रत्येक लाईक माझा उत्साह वाढवतो. हा लेख वाचुन तुमच्या प्रियजनांना मदत होईल असे वाटल्यास लेख शेअर करा. मनःपुर्वक आभार, धन्यवाद .

लेखांबद्दल वाचकांचे अभिप्राय..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

9 thoughts on “आत्मसात करा या बारा सवयी, या तुमचे पूर्ण जीवन आंनदी करतील- प्रेरणादायी लेख”

 1. खूप छान लेख आहे.विद्यार्थीवयापासूनच या सवयी अंगी बाणवल्या तर प्रगतशील आयुष्य घडण्यास नक्कीच मदत होईल.
  पुनश्च धन्यवाद.

  Reply
 2. या बारा सवयी खरोखरच खूप प्रभावी आहेत..धन्यवाद….

  Reply
 3. Yes. Definitely it’s really helpful to improve our life style and get more success in our life.. Keep sharing such thoughts.

  Reply
  • अतिशय सुरेख, सुंदर अशा बारा सवयी आजच्या लेखात सांगितल्या आहेत अतिशय शांतपणे, एकांतात लक्षपूर्वक वाचून त्यावर दहा मिनटं सखोल विचार केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल . लेखकाचे व मनाचे talks टीम चे मनापासून धन्यवाद व खुप साऱ्या शुभेच्छा.

   Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय