नाटकांच्या व स्त्रियांच्या परिस्थितीवर उघड भाष्य करण्याची, “नांदी”

प्रस्तावना

पाश्चिमात्य देशांमध्ये नाटक पहाणे हे खूपच महागडे प्रकरण असूनही एकाच थिएटरमध्ये एकच नाटक वर्षानुवर्षे चालल्याची उदाहरणे अनेक आहेत. हे मुद्दाम इथे नमूद करावयाचे कारण एवढेच की नाटक या कलाप्रकाराला पाश्चीमात्यांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे आणि हा कलाप्रकार त्यानी सर्वतोपरी जोपासला आहे व त्याला एक उच्च दर्जा दिल्यानेच तो महागडा आहे. भारतामध्ये नाटक हा वंशपरंपरागत चालत आलेला कलाप्रकार असल्यानेच या कलेचं फारसं कौतुक होतांना दिसत नाही. कारण आपल्याला त्याचं अपृपही नाही आणि त्याचा उहापोह करण्याची आपली प्रथाही नाही, किंबहुना अशा प्रकारच्या गोष्टींना आपण किंमतच दिलेली नाही. आपल्याकडे नाटकांच्या संहिता जतन केल्या गेल्या आहेत, निश्चितच. परंतु त्या नाटकांच्या ‘मेकिंगच डॉक्युमेंटेशन’ करण्याचा साधा विचारही कोणीही कधीही केलेला नाही. केवळ त्याचमुळे एखादं नाटक कसं लिहिलं गेलं, त्याची संहिता काय होती, त्यामागची नाटककाराची भावना काय होती, दिग्दर्शकाचा दृष्टीकोन काय होता, त्याचं नेपथ्य कसं केलं गेलं, त्यातील तांत्रिक बाबी काय होत्या, त्याची मांडणी, कलाकारांची निवड, ते घडलं कसं व त्याचा दृष्य परिणाम कसा झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही ही अतिशय खेदाची बाब होय. भारतामध्ये नाटक या संकल्पनेची व कलाप्रकाराची सुरुवात ‘भरतमुनी’ यांच्यापासून झाली, मग कालिदास व नंतर अनेक नाटककारांनी त्याच format चा वापर करून उत्तमोत्तम नाटकांची निर्मिती केली, किंबहुना आजही त्याच धर्तीवर हा कधीही न संपणारा कलाविष्कार सलगपणे सुरु आहे ही बाब निश्चितच आश्वासक आहे.

दीडशे वर्षातील प्रत्येक दशकात माईलस्टोन ठरलेल्या नाटकांचा सूक्ष्मात सूक्ष्म अभ्यास करून त्यातील साम्यस्थळांना एका माळेत बांधून तेव्हापासून ते आजच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय एकुणात परीस्थितीवर ‘एक समग्र भाष्य’ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने त्याच्या ‘नांदी’ या नाटकाच्या माध्यमातून केला आहे.

संकल्पना व कार्यप्रणाली

मराठी रंगभूमीला तब्बल दीडशे वर्षांची परंपरा लाभली असून कालानुरूप अनेक नवनवीन प्रयोग करत ती वृद्धिंगत झाली आहे. आजही या रंगभूमीवर नाटकांच्या माध्यमाने नवीन संहिता, नेपथ्य संकल्पना व इतर तांत्रिक बाबी आकार घेत असल्याची बाब कौतुकास पात्र ठरते. नव्या व ताज्या दमाच्या नाटककारांची नाटके सादर होत असतांनाच जुन्या संहितांनाही पुनर्जीवित करण्यात येत आहेत. याचाच अर्थ हा होतो की जुन्या नाटककारांची नाटके आजही नवीन दिग्दर्शकांना प्रेरित करीत आहेत म्हणजेच त्यातील सकसता, संहिता व नाट्य निश्चितच आव्हानात्मक, परिणामकारक व प्रेक्षकांना आनंददायी व समाधान देणारे आहे. मग प्रश्न असा उरतो की वर नमूद केल्याप्रमाणे या नाटकांचे ‘डॉक्युमेंटेशन व प्रिझर्वेशन’ करण्याची गरज आधीच कुणाला का वाटली नाही? अर्थात यात आशादायी बाब एवढीच की लेखक, दिग्दर्शक व कलाकार ‘हृषीकेश जोशी’ ला सन २००३ ते २००५ या काळात केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व ‘मराठी रंगभूमीवरील वाचिक अभिनयाचा प्रवास’ या विषयावर संशोधन करतांना त्याला अनेक नाटकांचे वाचन करण्यास मिळाले.

तेव्हाच मराठी रंगभूमीच्या इतिहासात, या दीडशे वर्षातील प्रत्येक दशकात ‘माईलस्टोन’ ठरलेल्या नाटकांकडे त्याचे विशेष लक्ष वेधले गेले. या नाटकांचा सूक्ष्मात अभ्यास करतांनाच त्यातील काही ‘साम्यस्थळे’ त्याला आढळली. त्यांना एका माळेत बांधून तेव्हापासून ते आजच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय एकुणात परीस्थितीवर ‘एक समग्र भाष्य’ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने त्याच्या ‘नांदी’ या नाटकाच्या माध्यमातून केला आहे. ‘अभिज्ञान शाकुंतलम’ ते आजच्या ‘चाहूल’ या नाटकापर्यंतचा हा प्रवास होय. मूळ कालिदासांनी संस्कृमध्ये सादर केलेल्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाला १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठीत भाषांतरित करून ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणलं होतं. मग तेव्हापासून ते आत्तापर्यंत नाटक या कला प्रकारात कायकाय बदल होत गेले व त्यातून आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत की अधोगतीच्या हे जाणून घेण्याचा हा त्याने प्रामाणिकपणे केलेला प्रथम विचार निश्चितच कौतुकास पात्र ठरतो.

या नाटकांच्या माध्यमातून काळाच्या बरचसं मागे आणि काळाच्या थोडं पुढे जाऊन नाटक या कलाप्रकारातील स्थित्यंतरांचा वेध व नोंद घेतली आहे. लेखक दिग्दर्शक हृषीकेश जोशी याची बेजोड मेहनत, सूक्ष्मात जाऊन केलेला अभ्यास व त्या उतख्ल्नातून शोधून काढलेली ही नाट्यसंहिता याचं कोठेतरी चीज व्हावं ही कळकळ असल्याने एका ऐवजी चार निर्मात्यांनी दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे व संज्योत वैद्य एकत्र येऊन, या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आणि हृषीकेश जोशीच्या मेहनतीचे चीज झाले. आता इतकी ताकदवर संहिता सादर करायची म्हणजे त्याच तोडीचे कलाकारही हवेच, त्याशिवाय प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचणारच नव्हते. मग त्यासाठी हृषीकेश जोशी, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, अजय पुरकर, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित व स्पृहा जोशी असे दहा आघाडीचे व नाटक सिनेमा व मालिका मधील व्यस्त कलाकारांना पाचारण करण्यात आले. परंतु इतक्या मोठ्या कलाकारांना एकाचवेळी एकत्र आणणे व या नाटकाचे प्रयोग करणे हेच मुळी अत्यंत खर्चाचे व कर्मकठीण होय!

सादरीकरण व नाट्यानुभव

हृषीकेश जोशीने गडकरी व खाडिलकर यांच्या बहुतेक सर्व नाटकांचा विचार व समावेश करून शाकुंतल, संगीत सौभद्र, कीचकवध, याच बरोबर जयवंत दळवी याचं ‘ब्यारीस्टर’, शिरवाडकरांच ‘नटसम्राट’, कानेटकरांच ‘अश्रूंची झाली फुले’, तेंडूलकरांच ‘सखाराम बाईंडर’, च्य.प्र.देशपांडेचं ‘बुध्दिबळ आणि छब्बु’ आणि प्रशांत दळवींच चाहूल यातील निवडक प्रसंगाचा समुच्चय करून या नाटकाची संहिता बांधली गेली आहे. ही सगळी नाटके त्या त्या कालची क्लासिक्स आहेत आणि त्यातील ‘साम्यसूत्र’ हृषीकेश जोशीने अभ्यासपूर्वक व अचूक हेरलंय यात काही वादच नाही. अगदी सुरुवातीचं ‘शाकुंतल’ ते आजच्या ‘चाहूल’ या अत्यंत प्रदीर्घ कालावधीनंतरही नाटकातील नायिकेच्या म्हणजेच एकुणात स्त्रीच्या परिस्थितीत आजही काहीही फरक पडला नसल्याचं ‘भीषण सत्य’ या नाटकाच्या निमित्ताने व माध्यमाने समाजासमोर मांडलेलं आहे.

एका टीव्ही च्यानेलच्या स्टुडीयोमध्ये लाईव्ह टेलीकास्टच्या मुलाखतीमध्ये ‘साक्षात भरतमुनी’ यांनाच रंगमंचावर पाचारण करून ‘सूत्रधाराच्या रुपात’ पेश केले आहे. निवेदिकेला उत्तर देण्याच्या प्रक्रियेत ‘भरतमुनी’ स्वत: त्यांचा उग्द्वेग व त्रागा व्यक्त करतांनाच त्यांच्याकडील ‘टॅबलेट’ च्या सहाय्याने नाटकातील प्रसंगांना एकामागे एक असे कथन करतांनाच त्याचं ‘दृष्यस्वरूप’ यातील कलाकार प्रेक्षकांना सादर करतात असा एक आगळावेगळा प्रयोग या निमित्ताने बघायला मिळतो. बॅरिस्टर व नटसम्राट यातील व्यक्तिरेखा साकारतांना ‘शरद पोंक्षे’ या कलाकाराने आपल्या स्वत:च्या प्रतिमेला बाजूला सारून केवळ मिळालेल्या संधीचा लाभ उठवत त्याचं त्या व्यक्तिरेखांवरचं प्रेम व आकर्षण या भावभावनांसह दाखवल्याने एक वेगळाच अभिनयाविष्कार बघायला मिळतो, त्यामुळे त्या पात्रांमध्ये जान येते. एका वेगळ्याच धाटणीचा व शैलीचा ‘अप्पासाहेब बेलवलकर’ बघतांना प्रेक्षक स्तंभितच होतात. तद्वतच ‘अविनाश नारकरचा’ शाकुंतल मधला दुष्यंत व अश्रूंची झाली फुले मधला विद्यानंद केवळ अप्रतिम! शिवाय ‘दुष्यंत’ साकारतांना दिग्दर्शकाने इथे तर कमालच केली आहे.

ज्या काळातील हे नाटक आहे तो काळ, त्यानुसार नेपथ्य, वस्त्रप्रावरणे व एकुणात वातावरण निर्माण करत त्याकाळची भाषा संस्कृत असल्याने त्याच भाषेतल्या संवादांनी प्रसंग सुरु होतो, ती निवेदिका आणि प्रेक्षक गोंधळातच पडतात आणि मग भरतमुनी आपल्या टॅबमध्ये आजच्या काळातील मोड बदलून मग मराठीत संवाद पुन्हा नव्याने सुरु होतात. या साठी दिग्दर्शकाने वापरलेली ‘रीवाइंड – फॉरवर्ड ‘ ची आयडिया विशेष लक्ष वेधून घेते आणि टाळ्यांचा कडकडाट होतो, अगदी नकळत! ‘प्रसाद ओक’ रुक्मिणीच्या वेशात भाव खातांनाच त्याने गायलेल्या गाण्याला प्रेक्षक भरभरून दाद देतात. त्याच्याच ‘चाहूल’ मधल्या भूमिकेसाठी तर शब्दाशब्दाला व प्रसंगाप्रसंगातील अभिनयाला टाळ्यांचा कडकडाट होतो. या तीन पुरुष कलाकारांच्या पंक्तीत ‘तोडीसतोड’ अभिनय केला आहे तो ‘अश्विनी एकबोटे’ या अभिनेत्रीने. आपल्या सहज, सक्षम व सकस अभिनयाच्या जोरावर शकुंतला, राधाक्का व सुमित्रा या व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केल्या आहेत. ‘अजय पुरकर’ या गायक नटाने जुन्या नाट्यपदांना नव्याने सादर करून प्रेक्षकांच्या स्मृती जाग्या केल्याने प्रेक्षक स्वत: गुणगुणत उस्फुर्त दाद देत असल्याने त्याच्या गायकीला द्यावयाचा वन्समोअर मनातल्या मनातच रहातो. स्वत:चीच संकल्पना, संहिता, लेखन, दिग्दर्शन यासोबतच ‘भरतमुनी’ ही व्यक्तिरेखा साकारतांना ‘हृषीकेश जोशी’ याने त्याच्यामधील कलाकाराला पुन:श्च सिद्ध केलं आहे.’चिन्मय मांडलेकर’, सीमा देशमुख’, ‘तेजस्विनी पंडित’, यांनीही प्रत्येकी दोनदोन भूमिका साकारत आपापली भूमिका चोख बजावली आहे.त्यातही तेजस्विनी पंडित जास्त लक्षात रहाते.पडदा उघडल्यापासून पडदा पडेपर्यंत निवेदिकेची व अत्यंत जबाबदारीची भूमिका ‘स्पृहा जोशी’ हिने पेलतांना प्रेक्षक व भरतमुनी यांच्यातला दुवा बनण्याचा हा रोल उत्तम निभावलाय. एकंदरीत नाट्यशास्त्राचा अभ्यासक, संकल्पक, लेखक व दिग्दर्शक हृषीकेश जोशी याच्या मनातील कलाकृती रंगमंचावर साकारतांना जादुगार नेपथ्यकार व प्रकाशयोजनाकार प्रदीप मुळ्ये, संगीतकार राहुल रानडे, कास्च्युम डीझायनर गीता गोडबोले या सर्वांनी दिग्दर्शकबरहुकुम सुयोग्य कामगिरी केल्यानेच कलाकारांना त्या त्या भूमिकेचे रूप लाभले व त्यांनी अभिनित केलेल्या पात्रांना आवश्यक वातावरण निर्मिती होवू शकली.सुयोग्य व नेत्रदीपक रंगमंचाचा कलाविष्कार या सोबतच पार्श्वसंगीत प्रेक्षकांना त्या त्या काळाची अनुभूती देतं.हा संपूर्ण खटाटोप नाटक या कलाप्रकाराची प्रदीर्घ वाटचाल आपल्यासमोर मांडतांना त्यातून स्त्रियांच्या बाबतीत न बदललेल्या परिस्थीतीच नेमकं वर्णन दर्शवल्याने प्रेक्षक विचारमग्न होतात.

सारांश

वरील विषय व सामाजिक घडामोडींवर केवळ चर्चाच केली जात आहे.परंतु एकुणात जे प्रकार घडत आहेत त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्नच केला जात नसल्याची खंत ‘हृषीकेश जोशी’ याच्या मनात होती म्हणुन स्त्रीवादी विषयांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्याने या नाटकाच्या माध्यमातून केला आहे.खरंतर पुरुषांच्या स्पर्धेत स्त्री कुठेही कमी नाही किंबहुना पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांनी या समाजात स्वत:च एक वेगळं स्थान व लक्षणीय प्रतिमा तयार केली आहे.त्याचमुळे सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता स्त्रियांच्या सुधारक मनोवृत्तीचा स्वीकार व स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा दर्जा देऊन पुरुषांसोबत समान अधिकार देण्याची गरज आहे.परंतु पुरुषप्रधान संस्कृतीने आजवर हे होवू दिलेले नाही.या आधीही अनेक नाटकांच्या माध्यमातून स्त्रीवादी विषयांची सशक्त मांडणी करून समाजाला शिकवण देण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु या नाटकाच्या माध्यमातून ‘हृषीकेश जोशी’ याने जुन्या स्मृतींना उजाळा देत, उत्तुंग अभिनयाचा अविष्कार दाखवत, नाट्यसंगीताचा आस्वाद देत, प्रेक्षकांना आनंद व समाधान देत गुंतवून ठेवलं आणि मोठ्या खुबीने प्रेक्षकांच्याही नकळत स्त्रियांच्या न बदललेल्या परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे.आजवरच्या सर्व यशस्वी नाटकांच्या आठवणीत रमवतांना केवळ पुरुष पात्रांनाच महत्व मिळाल्याचे सांगत स्त्रियांच्या उपेक्षितपणाचं कटू सत्य सहेतुक व जाणीवपूर्वक प्रेक्षकांच्या नजरेत आणून दीलेलं आहे.नाटक या संकल्पनेच्या उगमापासून आजवर सादर होणाऱ्या प्रदर्शनात स्त्रियांना लाभलेलं दुय्यम स्थान निश्चितच विचार करावयास भाग पाडतं, हेच या टिमच यश होय. आता या नाटकाचे प्रयोग होत नाहीत कारण अर्थातच वर नमूद केलंच आहे तरी परंतु ही कलाकृती मला सादर करता आली याचं संपूर्ण श्रेय्य हे केवळ निर्मात्यांच आहे, हे आजही हृषीकेश आवर्जून सांगतो! ज्यांना ही कलाकृती बघायला मिळाली ते खरे नशीबवान असेच म्हणावे लागेल!पुनश्च या नाटकाचे प्रयोग सुरु होवोत हीच इच्छा!
एनसी देशपांडे

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय