अनंत वाचाळ बरळती बरळ.. त्या कैसा दयाळ पावे हरी|| साध्वी प्रज्ञासिंह

राजकारणात लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. पात्रता नसणाऱ्यांना तर ती जरा जास्तच.. त्यामुळेच आजच्या राजकारणात ‘वाचाळवीर’ बनून सवंग प्रसिद्धी मिळविणाऱ्यांचाच बाजार जास्त भरलेला दिसतो. काहीही करून चर्चेत राहण्याच्या हव्यासापोटी ह्या वाचाळांच्या जिभा बेतालपणे वळवळत असतात. आपल्या वक्तव्याचा पक्षावर, समाजावर, देशावर काय परिणाम होईल, याची यांना कुठलीच तमा नसते..

एकदा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली कि ही मंडळी बुद्धिभ्रंश झाल्यासारखी बोलायला लागतात. काहीवेळा पक्षही अश्या वाचाळवीरांना आवर घालण्याऐवजी त्यांच्याकडे कानाडोळा करतो. त्यामुळे यांची हिम्मत अजूनच वाढते. आणि त्यांच्या सुटलेल्या जिव्हा सामाजिक नीतिनियम, सामाजिक आदर, परंपरा, नीतिमूल्यं आणि सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करून जातात.

आपण काय बोलतोयं, त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याची त्यांना किंचितही तमा उरत नाही. ‘उचलली जीभ कि लावली टाळ्याला’ या उक्तीनुसार हातात माईक पडला कि ही मंडळी बेफाम सुटतात. मग, त्यांचे बोलणे ‘बरळणे’ कधी होते.. ते त्यांच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि सद्याच्या भाजपाच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या मुखातून शाहिद हेमंत करकरे यांच्याबाबतीत जी गरळ ओकल्या गेली, हा याचाच एक नमुना असून त्यामुळे सुसंस्कृतपणाच्या मुखवट्यामागील असंस्कृतपणाचा विद्रुप चेहरा समोर आला आहे.

भारत ही साधू-संतांची भूमी आहे. मानवतेच्या उद्धरासाठी अनेक महापुरुषांनी आपले जीवन या भूमीला अर्पण केले. दया, क्षमा, शांती, प्रेम आणि मानवतेचा पाठही भारतानेच संपूर्ण जगाला शिकवला. आपल्या शत्रूवरही प्रेम करण्याची शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती. पण, आता स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणारेच तिचे धिंडवडे काढायला निघाले असल्याचे चित्र बघायला मिळतंय. परवा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून ही बाब पटवून दिली आहे.

दहशतवाद्यांचा मुकाबला करताना मानवता आणि देश रक्षणासाठी ज्या हेमंत कारकरेंनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या त्या कारकरेंना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशद्रोही संबोधून अकलेचे तारे तोडले. कुठलाही पुरवा नसताना करकरे यांनी आपल्या जेलमध्ये टाकले. आपला छळ केला. त्यामुळे मी कारकरेंना तुझा सर्वनाश होईल, असा शाप दिला. आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी आपले सुतक संपले, असे वादग्रस्त विधान स्वत:ला साध्वी म्हणवणाऱ्या प्रज्ञासिंह यांनी केले आहे.

देशासाठी शहीद होणाऱ्या एका अधिकाऱ्याबद्दल साध्वीनी वापरलेली भाषा नुसती निषेधाहार्य नाही, तर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम हुतात्म्यांचा तो अवमान आहे. त्यामुळे त्याचा निषेध व्हायला हवा. तसा तो झालाही. इतक्या मोठ्या प्रमाणात झाला कि, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना त्याबद्दल माफी मागावी लागली.

अर्थात, माफीने संपणारा हा विषय नाही. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरेंनी कर्तव्यनिष्ठतेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.. देशाने वीरचक्र देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला. आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपाहार्य विधान करून एकप्रकारे शहिदांच्या शौर्याचा अवमान केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे. पण, स्वतःला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या पक्षाकडून अजून याबाबत कोणतीच भूमिका घेतल्या गेली नाही. अहो, कारवाई सोडा. ‘साध्वीचं वक्तव्य म्हणजे त्यांचं वयक्तिक मत आहे.’ इथपासून ते ‘त्यांना त्रास झाला म्हणून त्या ‘तसं’ बोलल्या असाव्यात.’ असं म्हणत आता त्यांचं समर्थन केल्या जातंय.

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलूनही प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी कायम राहत असेल, आणि ‘वैयक्तिक मत’ च्या पडद्याआड त्याकडे कानाडोळा केला जात असेल. तर एकप्रकारे हे समर्थनच नाही का होणार? साध्वी प्रज्ञासिंह यांना जेलात त्रास झाल्याचं सांगण्यात येतंय. कारकरेंनी आपल्याला तुरुंगात अडकवून ठेवल्याचा आरोप साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलायं. पण एटीएस प्रमुख एका आरोपीला कसं काय अडकवू शकतात? कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली कि २४ तासाच्या आत त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाते.

सदर आरोपीला जमानत द्यायची, पोलीस कोठडी द्यायची, न्यायालयीन कोठडी द्यायची, किती दिवस द्यायची हे तपास अधिकारी नाही तर न्यायालय ठरविते. आरोपीला जेंव्हा जेंव्हा न्यायालयात आणले जाते तेंव्हा त्याला काही त्रास असेल तर तो न्यायालयाला सांगू शकतो. त्यामुळे छळ वैगरेच्या ज्या गोष्टी सोशल मीडियावर सांगितल्या जातायेत त्या तेंव्हा न्यायालयाला का सांगितल्या गेल्या नाहीत?

कोणत्याही आरोपीची कुठलीही तपासणी किंवा टेस्ट ही न्यायालयाच्या परवानगीशिवाय केल्या जात नाही. आणि सबळ कारण असल्याशिवाय न्यायालय तशी परवानगी देत नाही. समाज माध्यमावर तपास पद्धतीचा संभ्रम निर्माण करणाऱ्यांना इतकंही ज्ञान असू नये का? अर्थात, ‘त्याकाळच्या सरकारचा दबाव होता’ असा युक्तिवाद काही अतिबुद्धिवाले करतीलही. पण, मग मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आल्यानंतर २००९ ला एटीएसने चार्जशीट दाखल केली असतानाही देशात सत्तांतर झाल्यानंतर एनआयएने मे २०१६ मध्ये या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करून मालेगाव हत्याकांडात प्रज्ञासिंह ठाकूरचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे सांगितले गेले.

नेमकं सत्तांतरण झाल्यावरचं तपास यंत्रणेकडून हा ‘यू टर्न’ का घेतला गेला? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. हेच नाही तर, सत्ताधारी पक्षातील लोक साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार असतील तर शहीद हेमंत कारकरेंना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर बहाल करण्यात आलेलं वीरचक्र ते परत घेणार आहेत का? याचंही उत्तर त्यांनी जनतेला द्यायला हवं.

महत्वाचं म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह यांची त्याच्या केससंदर्भात एखाद्या व्यक्तीसंदर्भात काय जी तक्रार असेल किंवा त्यांचं जे काही वैयक्तिक मत असेल, ते त्यांनी योग्य वेळी उचित माध्यमाकडे व्यक्त करायला हवं होती. पण त्यांनी लोकसभा निवडणुकीचं व्यासपीठ त्यासाठी निवडलं आहे. अर्थात, राजकारणी कोणत्याही मुद्याला राजकारणासाठी केंव्हा वापरतील हे सांगता येत नाही. त्यामुळे एखाद्यावेळी साध्वी प्रज्ञासिंह यांचं वक्तव्य उस्फुर्त येण्याऐवजी यामागे ‘सोची समझी चाल’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही राजकारणाची एखादी चाल असेल किंवा नसेलही. पण त्यावरून राजकारण करणाऱ्या आणि तमाम शहिदांचा अवमान करणाऱ्यांचा बुद्धिभ्रंश झाला आहे की बुद्धिनाश, असा प्रश्न कोणत्याही सुबुद्ध माणसाला पडल्याशिवाय राहत नाही.

देशाच्या राज्यघटनेने सर्व भारतीयांना मूलभूत हक्काद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. पण हा अधिकार देशहित, सामाजिक आदर, परंपरा आणि नीतिमूल्यांची होळी करण्यासाठी दिलेला नाही. हे ध्यानात घेण्याची गरज आहे. या देशात स्त्रीचा नुसता आदर नाही तर स्त्रीची पूजा केली जाते. पण सोबतच देशासाठी शहीद झालेल्या वीरपुत्रांचा अवमानही हा देश सहन करत नाही. त्यामुळे जाहीर बोलतांना तारतम्य ठेवणे जरुरीचे आहे.

अनंत वाचाळ बरळती बरळ.. त्या कैसा दयाळ पावे हरी||

संत ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठातून बेताल बडबड करणाऱ्यांना आवर घालण्याचा सल्ला दिला आहे.

शब्द संभालके बोलिये, शब्द के हात ना पाव.. एक शब्द करे औषधी. एक शब्द करे घाव.. ||

या कवितेच्या ओळीतून कवींनी शब्दांचं माहात्म्य वर्णन केलं आहे. आपण शब्द मृदू वापरतो की कठोर, यावरून तो शब्द औषधीचे काम करतो की घावाचे, हे ठरत असते. शस्त्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्दाने केलेली जखम भरून येण्यास दीर्घ कालावधी लागतो किंबहुना ती अनेकदा भरूनही येत नाही, त्यामुळे शब्दांचा वापर जपून करण्याचा उपदेश संत-महात्म्यांनी केलायं. अर्थात, ज्यांनी जगाला ज्ञान सांगायचं, त्यांना उपदेश करण्याचा हेतू नाही. पण आपल्या वर्तनातून आपलं मोठंपण सिद्ध होत असतं, हे मोठ्या व्यक्तींनी लक्षात घ्यावं. बाकी, शहीद हेमंत करकरे देशाचे हिरो होते.. आणि, ते कायम राहतील. कुणी कितीही प्रयत्न केला तरी हा देश हुतात्म्यांचा सन्मान विसरणार नाही.

जय हिंद.. जय भारत


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय