टेकडी

माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टी असतात, की ज्या त्याच्या भावविश्वाचा भाग बनलेल्या असतात. मानवी नातेसंबंध, विशिष्ट वस्तु, प्राणी, अनेक भौगोलिक स्थळे या व अश्या अनेक गोष्टी त्याच्या भावविश्वाच्या भागीदार असू शकतात.

मनस्वी अशी भावनिक गुंतागुंतं हि आपली नेहमी आपल्याला आवडणार्‍या गोष्टींशी असते.. अनेक स्मृतींची साखळी त्यांच्याशी जोडलेली असते. काळ बदलला तरी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेलल्या अनेक स्मृति आपणास भूतकाळात नेतात व पूर्वस्मृतींची सफर घडवतात.

त्यातून बर्‍याचदा विरंगुळाही घडतो. माझं गाव गर्भागिरीच्या डोंगररांगेलगत वसलेलं असल्यामुळे अगदी कळत्या वयापासून डोंगर पाहत आलेलो आहे. त्याच्याशी अगदी वेगळ्या प्रकारच्या स्मृतीही माझ्या काळजात खोलवर दडलेल्या आहेत. डोंगररांगामुळं कमी अधिक उंचीच्या दोन तीन टेकड्या माझ्या गावाच्या परिसरात आहेत. मुळात माझा गावच एका टेकडीलगत वसलेलं आहे.

गेल्या अनेक पिढ्यांपासून टेकडीवर वसलेले खंडोबाचे मंदिर गावाचे रक्षण करत आले आहे. त्यामुळेच की काय गावाचे नाव खंडोबाचीवाडी पडले. खंडोबा टेकडी, लगतच अगदी पोटाला उत्तरेकडून लमानांचा तांडा व पूर्वेकडून धंनगरांची घरे आईला लेकरू चिटकावं तसी चिगटलेली आहेत.

गावात फक्त धनगरांची आणि लमानांचीच लोकवस्ती. जेमतेम पाचशे फुट उंच असलेल्या टेकडीवरुन पंचक्रोशीतील गावांच यथायोग्य दर्शन घडतं. पूर्वेकडेच मढी देवस्थान, वृद्धेश्वरचा काही भाग यांचही मनमोहक दर्शन याच टेकडीवरून होतं.

अगदी लहान वयापासून या टेकडीशी जोडलेला ऋणांनुबंध पुढे पुढे दृढ होत गेला. अनेक सुखादुखाच्या क्षणांची साक्षीदार असलेली टेकडी गावातील प्रतेयकाच्या जगण्याचा, जीवनाचा अविभाज्य भाग होती आहे तशी माझ्याहि आहे.

लहानपणापासून अनेक वेळा याच टेकडीच्या अंगाखांद्यावर आम्ही बागडलेलो आहोत. आई इतक्याच मायेनं तिने आमचा सांभाळ केला. टेकडीवर असलेल्या खंडोबा मंदिरामुळे दर रविवारी हमखास देवाला पाणी घालण्यासाठी चक्कर व्हयायची. खंडोबा हे आमचे कुल व ग्राम दैवत. रविवार हा खंडोबचा वार..

त्यामुळे इच्छा असो वा नसो रविवारी टेकडीवर जावंच लागायचं.. आईच्या हुकूमावरून. सुरूवातीला कंटाळवाणी वाटणारी ती सफर नंतर नंतर हवीहवीशी वाटू लागली ती अनेक कारणांनी. पाहायला गेलं तर टेकडीवर प्रेक्षणीय असं काही नव्हतच.

एक जुनं हेमाडपंती खंडोबाचं छोटं मंदिर बस. बाकी काहीच नव्हतं. पण टेकडीवर गेल्यावर मात्र खूप उंच आल्यासारखं वाटायचं. तिथून सार्‍या गावचा शिवार दिसायचा. रानात माणसं काम करताना दिसायची. दूरवरच्या करंजीच्या घाटातून वाहनांची ये जा पाहण्यात भारी मौज वाटायची.

दूरवरच्या साखर कारखान्यातून निघणारे धुराचे लोट पाहताना कित्तेकदा हरखून जायचो. मढीचं कानिफनाथ मंदिरही छान दिसायचं. आम्ही मुलं खूप हौसेने ती सफर करायचो. वर गेल्यावर मात्र टेकडी सपाट होती. त्यामुळे इकडे तिकडे पळताना मजा यायची. शाळेत असताना गुरुजी बर्‍याचदा न्यायचे टेकडीवर. एकदा असेच आम्ही सर्व मुले टेकडीवर गेलो होतो. खेळता खेळता कुणीतरी मारलेला दगड डोक्यावर बसला. खूप रक्त वाहिललं. कपाळावर अजून त्याची खून आहे.

रविवार व्यतिरिक्त कुठल्याही सणावाराला देवाला नैवद्य दाखवण्यासाठी, नारळ फोडण्यासाठी टेकडीवर गर्दी व्हायची. बाया माणसांनी टेकडी फुलून जायची. पोळ्यासारख्या सणाला तर मंदिरभर नारळाचं पाणी सांडायचं . गाभारा आगरबत्तीच्या सुवासनं भरून जायचा. दसर्‍याचा सीमा उल्लंघनाचा कार्यक्रमही टेकडीवरच व्हायचा.

सगळ्या गावातील लोक त्यासाठी सायंकाळी टेकडीवर जमायचे. पारंपरिक धनगरी वाद्याच्या साथीने अनेक धनगरी ओव्या व वान गायले जायचे. गावातीलच भगताकडून मग व्हयकाचा कार्यक्रम व्हायचा. ते सगळं कधी कधी डोक्यावरूनही जायचं. पण गम्मत यायची. अंगात येणार्‍या माणसाची यथासांग टिंगल केली जायची. जुनी जाणती माणसं मात्र मोठ्या भक्ति भावाने ते सगळं एकायची.

खूप आनंद वाटायचा. ती एक पर्वणीच असायची आम्हा मुलांसाठी. दसरा सणाला आज कुठेही असलो तरी गावाकडचा दसरा मनात रुंजी घालतो अन अनेक स्मृतींना ढवळून काढतो. पुढे गावाचं नेतृत्व करताना याच दसरा मेळाव्यातून अनेकदा भाषणं केली. विशिष्ट निरोप, निर्णय पोहचविण्यास बरं पडायचं.

टेकडी आणखी एकदा गजबजून जायची ती यात्रेला म्हणजे चम्पाषष्ठीला. साधारणपणे डिसेंबर महिन्यात यात्रा यायची. जल्लोष रहायचा. घराघरातला तसेच पंचक्रोशीतला प्रत्येक माणूस त्या दिवसी टेकडीवर हमेशा हजेरी लावायचा. गावातील तरणी मुलं पैठणहून आणलेल्या कावडीने जलाभिषेक करायची. सवाद्य देवाच्या काठीची मिरवणूक व्हायची. भंडारा खोबरं उधळल जायचं. खड्डयाखड्डयात पडलेलं खोबरं मिळाल्यावर खूप आनंद व्हायचा बालगोपाळांना. सायंकाळी पुन्हा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम व्हायचा. आपआपल्या परिनं जोतो शेरणी(गूळ) वाटून देवाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा.यात्रेचा दिवस मोठ्या आनंदात जायचा. दिवसभर सारखं वरखाली वरखाली करून आमचे पाय दुखायचे.

यात्रा, सणवार, रविवार या व्यतिरिक्त टेकडीची आठवण यायची ती पावसाळ्यात. पाऊस पडून गेल्यावर कुठे कुठे पाणी साचलं, कुठे किती पाऊस झाला याचा अंदाज घ्यायला अनेक मानसं टेकडीवर यायची. सगळीकडे पाणीच पाणी दिसायचं. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने तयार केलेले छोटे छोटे पाण्याचे तळे न्याहाळताना मी कित्येकदा हरखून जायचो.

ओल्याचिंब पावसाळयातल्या अनेक आठवणी माझ्या स्मृतिपटलावर कायमच्या कोरलेल्या आहेत. जवळच्या डोंगरातून कोसळणारा धबधबा बंदच होऊ नये असं वाटायचं. पाऊस पडल्यानंतरचे भुरभुरते थेंब अंगावर घेत सारे गावकरी शिवार न्याहाळत बसायचे. एक मात्र खरं पावसाळ्यातली टेकडी हिरवीगार वाटायची. छोटं छोटं गवत बाळसं धरायचं. चुकारीचं एखादं जनावर मनमुक्त चरताना त्याचा गळ्यातील घुंगरमाळेचा आवाज ऐकतच बसावं असं वाटायचं..

एरव्ही मात्र टेकडीवर फारसं कुणी फिरकायचं नाही. त्याला कारणही तसंच होतं. टेकडीवर जायला चांगला रस्ता किवा पायर्‍या नव्हत्या. पायर्‍या करायच्या असं गावाने कितीदा ठरवले पण शक्य झालं नाही. अनेकदा प्रयत्न झाले पण सारे असफल. नंतर करंजीचे एक भक्त दिनकर भाऊ अकोलकर यांनी त्या बांधून दिल्या. जाण्यायेण्यासाठी आता चांगल्या पायर्‍या आहेत. त्यामुळे वर्दळही बर्‍यापैकी असते. अनेक तरुण मित्रांचा अड्डा या पायऱ्यांवरती असतो उन्हाळ्याच्या दिवसात. पायऱ्यां बरोबरच दिनकर भाऊंनी बसायला बाकडे दिली. त्याचाही उपयोग होतो. धार्मिक स्थळ असल्यामुळे गावाने आपल्या कुवतीप्रमाणे सुविधा त्याठिकाणी निर्माण केल्या. पालीच्या खंडोबाचं एक मंदिरही गावातील काही मंडळींनी उभं केलं.

कॉलेजला असताना माझ्या बरोबर गावातलं कुणीच नव्हतं. खूप एकटा असायचो बरोबरीची गावातील इतर मुलं वेगवेगळ्या वाटेने निघुण गेले. मला कुणाचीच सोबत उरली नाही. बर्‍याच वेळा मग टेकडीवर एकटाच येऊन बसायचो राबणार्‍या गावाचं निरीक्षण करत.

बरं वाटायचं पुढे पुढे सवय वाढत गेली. माझ्या अनेक कवितांची निर्मिती याच टेकडीवर झाली. मला उदास वाटायला लागल्यावर माझी पावलं आपोआप टेकडीकडे वळायची. पुढे शिक्षण नोकरीनिम्मीत गाव दुरावलं. मी लिखाणात, अभ्यासात, कामात स्वताला गुंतवून घेतलं.

गाव हळू हळू डोक्यातून निघून गेलं. पण कधी कधी प्रसंगान्वे जुन्या आठवणी उफाळून यायच्या. पुन्हा तीव्र व्हायच्या. दरम्यानच्या काळात शेवगावला प्राध्यापकी करत होतो. कधीकधी गावाकडं येणं जाणं व्हायचं. गाव पाहिल्यासारखचं केविलवानं वाटायचं. गावात राम राहिला नव्हता. आमच्याही जाणिवा समृद्ध झाल्या होत्या. खरं खोटं सगळं गावाला समजत होतं.

हेवा मत्सराच्या राजकारणामुळ गावाचं बरंच नुसकानही झालं होतं. गाव पुन्हा कधीकधी साद घालायचं. गावासाठी काहीतरी करावं असं मनातून वाटायचं. ग्रामपंचायतीला गावाने निवडून दिले. आणि पुन्हा गावाशी जोडलो गेलो ते एका जबाबदारीने. संपूर्ण गावचा कारभार हातात आला. कामाला कुठून सुरवात करावी हे देखील समजेना.गावासाठी काहीतरी करावं असं मनातून वाटायचं. ग्रामपंचायतीला गावाने निवडून दिले. आणि पुन्हा गावाशी जोडलो गेलो ते एका जबाबदारीने. संपूर्ण गावचा कारभार हातात आला. कामाला कुठून सुरवात करावी हे देखील समजेना. एकदा असाच टेकडीवर बसलो होतो. याच टेकडीसाठी काहीतरी करावं असं नकळत मनात वाटून गेलं. सहज मंदिरकडं लक्ष गेलं.

मंदिर बरंच लहान वाटत होतं. गर्दीच्या वेळी बर्‍याच लोकांना बाहेरच थांबाव लागत होतं. नवीन मंदिर बांधण्याचा निर्णय गावकर्‍यांसामवेत घेतला आणि तडीसही नेला. टेकडीला शोभेल असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. टेकडीवर चारचाकी वाहने येण्यासाठी मागच्या बाजूने रस्ताही केला. झाडे लावलीत. वर सपाटीकरणही केलंय. टेकडी आता बर्‍यापैकी सुंदर दिसते. आजही उदास झाल्यावर मी गाडी घेऊन टेकडीवर जातो. देवाचं दर्शन घेतो. बर्‍याच वेळ बसतो. उदासी कुठल्याकुठे पळून जाते. नवा उत्साह येतो. पुन्हा नव्या उमेदीने मी कामाला लागतो तेही याच टेकडीमुळे……


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय