शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख ह्यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपतराव देशमुख हे एक लोकप्रिय नेते होते.
१९६२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सलग आमदारकी केली. परंतु आयुष्यभर अतिशय साध्या पद्धतीने राहिलेल्या गणपतरावांनी सच्चा राजकारणी कसा असतो याचे उदाहरण घालून दिले आहे.
सलग ५४ वर्षे आमदारकी करणं शक्य होणं, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काही दुर्मिळ गुण गणपतराव देशमुख यांच्यामध्ये होते.
आमदार असताना तसेच मंत्रीपदही भूषवताना गाडी न वापरता आयुष्यभर एसटीने प्रवास करणारे साधेसुधे गणपतराव शेतकरी आणि उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते.
गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२७ मध्ये झाला. मोहोळ पंढरपुर रस्त्यावर असणारे पेन्नुर हे त्यांचे गाव. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गणपतराव पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. याच कालावधीत स्वातंत्र्य चळवळी विषयी त्यांच्या मनात आस्था निर्माण झाली.
सुरुवातीला ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. हळूहळू शेतकरी कामगार पक्षाचे नेते शंकरराव मोरे, नाना पाटील यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यावर त्यांचा प्रभाव पडू लागला आणि ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जास्त सजगतेने पाहू लागले.
महाराष्ट्रात झालेली पहिली विधानसभा निवडणूक गणपतरावांनी लढवली आणि ते जिंकले ही. तब्बल अकरा वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री होऊन त्यांनी लोकांच्या हिताची अनेक कामे केली.
२०१९ मध्ये वयोपरत्वे थकल्यामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेल्या गणपतरावांना निवडणूक लढवाच अशी गळ लोकांनी घातली. अक्षरशः फॉर्म भरून होईपर्यंत लोक विनंती करत राहिले. परंतु वृद्धापकाळामुळे गणपतरावांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. परंतु इतकी लोकप्रियता लाभलेला नेता सध्याच्या काळात विरळाच.
गणपतराव देशमुख हे सर्व सामान्य लोकांमध्ये अतिशय प्रिय असणारे नेते होते आणि त्यांच्याशी संपर्क साधणे कसे सोपे होते ह्याचा पुरावा म्हणजे हे पत्र.
एका शाळकरी मुलीने थेट गणपतराव ह्यांना पत्र लिहून आपल्या गावात बस थांबणे कसे आवश्यक आहे हे कळवले. गणपतरावांनी तिच्या पत्राची नुसती दखलच घेतली नाही तर त्या पत्रात केलेल्या विनंतीनुसार पंढरपूर आगार प्रमुखांना त्या गावात बस थांबवण्या विषयी सूचना दिल्या.
शिवाय स्वतः पत्र लिहून त्या मुलीला या सर्वाची माहिती दिली. तसेच बस थांबली नाही तर थेट आपल्याला दूरध्वनी करून तसे कळवावे अशा सूचना त्यांनी त्या मुलीला दिल्या. ह्यावरून गणपतराव कसे सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी कळवळ असणारे लोकाभिमुख नेते होते हेच आपल्याला दिसून येते.
‘तब्बल चार पिढ्या मतदारांशी नाळ जोडला गेलेला नेता आज आपण गमावला’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांना आदरांजली वाहिली.
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 30, 2021
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘साधी राहणी उच्च विचारसरणी याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे गणपतराव देशमुख आज आपल्यातून गेले’ अशा शब्दात आपले दुःख व्यक्त केले आहे.
राज्यपाल कोश्यारी ह्यानी ‘सर्वसामान्यांचा नेता कसा असावा ह्याचे उदाहरण गणपतरावांनी घालून दिले आहे’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
असे हे निस्पृह, शेतकरी आणि उपेक्षितांसाठी सतत काम करणारे, अत्यंत साधे राहणारे गणपतराव देशमुख आज आपल्यात नसले तरीही कायम आपणा सर्वांच्या स्मरणात राहतील यात शंका नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.