कितीही वेगवेगळ्या गुंतवणूक योजना आल्या तरीही भारतीयांच्या दृष्टीने सर्वाधिक विश्वासाच्या योजना असतात त्या म्हणजे पोस्ट ऑफिसच्या.
गावागावांमध्ये अगदी जिथे बँकही नसते तिथे देखील भारतात पोस्ट नक्की असते. त्यामुळे पोस्टात गुंतवणूक करणे सगळ्या लोकांना सहजपणे शक्य होते. त्याशिवाय पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक निश्चितपणे सुरक्षित असते असे म्हणता येईल.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुंतवणुक योजनेची माहिती देणारा आहोत. ही योजना आहे पोस्टाची मंथली इनकम स्कीम.
योजनेच्या नावातच दिले आहे की या योजनेतून दर महिना काही रक्कम इनकम म्हणून मिळू शकेल. याचाच अर्थ या योजनेत गुंतवलेले आपले मुद्दल तर सुरक्षित राहीलच त्याशिवाय दर महिना व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळू शकेल.
काय आहे ही मंथली इन्कम स्कीम?
१८ वर्षावरील कोणतीही भारतीय व्यक्ती जवळच्या पोस्ट ऑफिसात जाऊन मंथली इनकम स्कीमचे अकाऊंट उघडू शकते.
कमीत कमी १०००/- रुपये इतके भरून अकाउंट उघडता येऊ शकते.
एखाद्या व्यक्तीने स्वतंत्रपणे अकाउंट उघडल्यास जास्तीत जास्त रु. ४.५ लाख गुंतवता येतात.
जर दोन अथवा तीन व्यक्तींनी मिळून अकाउंट उघडले तर जास्तीत जास्त रु. ९ लाख गुंतवता येतात.
तीन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र अकाउंट (जॉइंट अकाउंट) उघडू शकत नाहीत.
या योजनेचा व्याजदर दर साल दर शेकडा ६.६ % इतका आहे.
आपण एक उदाहरण घेऊया.
जर एखाद्या व्यक्तीने ह्या मंथली इन्कम स्कीममध्ये रु. ४.५ लाख एक रकमी गुंतवले तर दर महा त्या व्यक्तीला रु. २४७५/- मिळतील. हे अर्थातच केलेल्या गुंतवणुकीवरचे व्याज असेल. गुंतवलेले मुद्दल तसेच सुरक्षित राहील.
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम मध्ये एक रकमी ४.५ लाख रुपये गुंतवा आणि दर महिन्याला २४७५ /- इतके व्याज मिळवा… योजनेतील इतर बारकावे पुढे समजून घ्या.
या योजनेचा लॉकिन पिरियड ५ वर्षांचा आहे. म्हणजेच गुंतवलेले मुद्दल रु. ४.५ लाख हे पाच वर्षानंतर परत मिळू शकते. तोपर्यंत दरमहा रु. २४७५/- किंवा वार्षिक रु. २९,७०० /- इतके व्याज मिळत राहील.
पाच वर्षांचा लॉकिन पिरियड याचा अर्थ गुंतवलेली मूळ रक्कम लॉकिन पिरियड संपेपर्यंत काढता येणार नाही. परंतु काही अडचणीची वेळ आलीच तर गुंतवणूक केल्यापासून एक वर्षापर्यंत मुद्दल अजिबात काढता येत नाही. त्यानंतर एक वर्ष पूर्ण ते तीन वर्ष पूर्ण या कालावधीत जर अकाउंट बंद करायचे असेल तर मुद्दल रकमेपैकी २ % रक्कम दंडापोटी कापून घेऊन उर्वरित मुद्दल परत मिळू शकेल. तसेच गुंतवणूक केलेल्या दिवसापासून तीन वर्ष पूर्ण ते पाच वर्ष पूर्ण या कालावधीत जर अकाउंट बंद करायचे असेल तर मुद्दल रकमेपैकी १ % रक्कम दंडापोटी कापून घेऊन उर्वरित मुद्दल परत मिळू शकेल.
लॉकिन पिरियड पूर्ण झाल्यावर मात्र संपूर्ण मुद्दल परत मिळेल. त्यात कोणतीही काटछाट केली जाणार नाही.
मंथली इनकम स्कीम मध्ये शक्यतो लोक दर महिना व्याज मिळवण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करतात. त्यामुळे हे व्याज दरमहा काढून घेणेच इष्ट आहे.
कारण जर आपण दर महिना किंवा वार्षिक व्याज घेणार नसू तरीही व्याजाच्या रकमेवर आणखी व्याज मिळत नाही. मूळ मुद्दलाच्या रकमेवर व्याज मिळते आणि त्या व्याजासहित मुद्दलाची रक्कम योजनेच्या शेवटी परत मिळू शकते. म्हणजेच रु ४.५ लाख गुंतवले आणि पाच वर्षे काहीही उत्पन्न घेतले नाही तर योजनेच्या समाप्तीनंतर दरवर्षीचे व्याज २९७००/- गुणिले ५ = रु. १ लाख ४८ हजार ५०० इतके व्याज अधिक मुळ मुद्दल रु. ४.५ लाख अशी रक्कम परत मिळेल. ह्या व्याजाच्या रकमेवर रक्कम काढली नाही म्हणून पुन्हा व्याज मिळणार नाही.
अशा योजनेत अकाउंट उघडले की त्या अकाउंटला नॉमिनेशन जरूर करावे. दुर्दैवाने अकाउंट होल्डरचा मृत्यू झाल्यास पोस्टकडून अकाउंट बंद केले जाते आणि नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला आदल्या महिन्यापर्यंतचे व्याज आणि मूळ मुद्दल रक्कम परत मिळते.
सध्याच्या गुंतवणुकीच्या अनेक योजनांपैकी चांगला व्याजदर देणारी अशी ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. तेव्हा पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जरूर करा आणि अशा अनेक निरनिराळ्या योजनांच्या माहितीसाठी आपले पेज वाचत रहा.
या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.