भारतीय नागरिकांसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवण्याच्या आणखी ५ उत्तम स्किम. लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
५ उत्तम मंथली इन्कम स्कीम बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
१. रिव्हर्स मॉर्टगेज
ही एक वेगळ्या प्रकारची गुंतवणुकीची पद्धत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे स्वतःचे राहते घर असते परंतु त्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे काहीच साधन त्यांच्याकडे नसते. अशावेळी असे ज्येष्ठ नागरिक आपले राहते घर ते हयात असेपर्यंत बँकेकडे गहाण ठेवून या बदल्यात बँकेकडून दरमहा ठराविक रक्कम उत्पन्न म्हणून मिळवू शकतात. घराचे मालक असणारे ज्येष्ठ नागरिक हयात असेपर्यंत असे करता येऊ शकते. बहुतेक सर्व शासकीय आणि नावाजलेल्या खाजगी बँका अशा पद्धतीचे घराचे रिव्हर्स मॉर्टगेज करतात.
फायदे
१. इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसलेल्या घर मालक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक नियमित उत्पन्न देऊ करणारी चांगली योजना आहे.
२. यातील सर्वात महत्त्वाची आणि चांगली असणारी गोष्ट म्हणजे घर जरी बँकेकडे गहाण ठेवले तरी ते ज्येष्ठ नागरिक त्याच घरात राहू शकतात.
३. घर मालकाचा मृत्यू झाल्यानंतर बँकेकडे गहाण असलेले त्यांचे घर त्यांचे वारस बँकेला योग्य ते पैसे परत करून ताब्यात मिळवू शकतात. त्यामुळे वारसांना घर देखील मिळते.
४. ज्येष्ठ नागरिकांची प्रतिष्ठा राखणारी अशी ही योजना आहे.
तोटे
१. ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
२. एकावेळी रिव्हर्स मॉर्टगेज करताना बँक जास्तीत जास्त वीस वर्षाचा कालावधी देते. त्यापेक्षा जास्त काळ जगणार या ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा असे रिव्हर्स मॉर्टगेज करावे लागते.
३. रिव्हर्स मॉर्टगेजची योजना घेण्यासाठी बऱ्याच प्रमाणात पेपर वर करावे लागते.
४. घर मालक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असणारी मॉर्टगेजची रक्कम रु. ५० लाख ते रु. १ करोंड इतकी असते. त्यामुळे त्यापेक्षा जास्त महागड्या घरांचे मालक असले तरीही त्या ज्येष्ठ नागरिकांना मर्यादित स्वरूपातच उत्पन्न मिळते.
२. प्रॉपर्टी भाड्याने देऊन रेंटल उत्पन्न मिळवणे
सधन असणाऱ्या नागरिकांसाठी नियमित उत्पन्न मिळण्याची ही एक योजना आहे. हे कोणत्याही रेसिडेन्शिअल अथवा कमर्शियल प्रोपर्टीमध्ये गुंतवणूक करून म्हणजे अशी प्रॉपर्टी खरेदी करून ती भाड्याने देता येते. रेसिडेन्शिअल प्रॉपर्टीचे ३ % ते ४ % तर कमर्शियल प्रोपर्टीचे ८ % ते १० % या दराने उत्पन्न मिळू शकते.
फायदे
१. प्रॉपर्टीवरील भाडे म्हणजेच रेंट हा दरवर्षी वाढतोच. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्याची हमी असते.
२. भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टी वरील उत्पन्नापैकी ३० % रक्कम तसेच प्रॉपर्टीच्या मेंटेनन्स साठी येणारा खर्च आणि भरावे लागणारे म्युनिसिपल टॅक्सेस हे सर्व प्रोपर्टी धारकाच्या उत्पन्नातून स्टॅंडर्ड डिडक्शन अंतर्गत वजा करून इन्कम टॅक्समध्ये सूट घेता येते.
३. सदर प्रॉपर्टी कायमस्वरूपी आपल्या मालकीची असते.
तोटे
१. प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची गुंतवणूक करावी लागते.
२. अडचणीची वेळ आल्यास , प्रॉपर्टी विकून पैसा उभा करायचा असल्यास मिळेल त्या दराने प्रॉपर्टी विकण्याची निकड भासू शकते.
३. प्रॉपर्टी कमर्शिअल असो अथवा रेसिडेन्शिअल ती नीट मेंटेन करावी लागते.
४. जर एखादी प्रॉपर्टी भाड्याने गेली नाही तर उत्पन्नाचे साधन बंद होऊ शकते.
३. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा बॉन्डस्
रिझर्व बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या वतीने दरवर्षी गव्हर्मेंट सिक्युरिटी बॉन्डस् इशू करते. अशा बॉन्डस् मध्ये 30 वर्षासाठी गुंतवणूक करता येऊ शकते आणि दर सहा महिन्यांनी त्यातून नियमित उत्पन्न मिळते. मिळणाऱ्या व्याजाचा दर ५ ते ७ % इतका असतो.
फायदे
१. सदर योजना भारत सरकारची असल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीची आणि नियमित उत्पन्नाची हमी असते.
२. योजनेचा कालावधी भरपूर मोठा म्हणजे तीस वर्षाचा असल्यामुळे पुन्हा पुन्हा गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही.
३. ही गुंतवणूक ऑनलाईन पद्धतीने डिमॅट अकाऊंट द्वारे देखील करता येते.
४. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर टिडिएस कापला जात नाही.
तोटे
१. मिळणाऱ्या उत्पन्नावर जरी टिडिएस कापला जात नसला तरी ते उत्पन्न टॅक्सेबल मात्र असते. योजना धारक इन्कम टॅक्सच्या ज्या स्लॅब मध्ये येत असेल त्या दराने सदर उत्पन्नावर देखील टॅक्स कापला जातो.
४. टॅक्स फ्री बॉन्डस्
टॅक्स फ्री बॉन्डस् हे इन्कम टॅक्सच्या हायर स्लॅब मध्ये येणाऱ्या लोकांसाठी नियमित उत्पन्नाचे चांगले साधन आहे. योजनेच्या नावातच असल्याप्रमाणे या योजनेतून मिळणारे उत्पन्न टॅक्स फ्री असते. अशा प्रकारच्या बॉन्डस् मधून ६ ते ६.५ % या दराने व्याज मिळू शकते.
फायदे
१. मिळणारे व्याज टॅक्स फ्री असते.
२. गुंतवलेल्या रकमेचा ची तसेच मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी असते.
३. बॉन्डस् चा कालावधी वीस वर्षाचा असल्यामुळे मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणे शक्य होते.
४. सदर बॉन्डस् ची खरेदी व विक्री डिमॅट अकाऊंट द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येते.
तोटे
१. या योजनेतून मिळणारे उत्पन्न दरमहा नसून ते वार्षिक असते. त्यामुळे दरमहा रकमेची आवश्यकता असणाऱ्या लोकांसाठी ही योजना सोयीची नाही.
२. मुदतीपूर्वी असे बॉन्डस् विकले असता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावा लागू शकतो.
५. म्युच्युअल फंडाचा सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून एस डब्ल्यू पी (SWP) म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन पद्धतीने दरमहा उत्पन्न मिळवता येऊ शकते. ही गुंतवणूक बँकेच्या एफडी प्रमाणेच असते परंतु तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केल्यास टॅक्स मध्ये फायदा होऊ शकतो.
फायदे
१. या पद्धतीने गुंतवणूक करून इन्कम टॅक्स मध्ये बचत करता येते.
२. सर्व गुंतवणूक ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे अतिशय सोपी असते.
तोटे
१. म्युचल फंड गुंतवणूकीना मार्केटच्या चढ-उताराचा फटका बसू शकतो. त्यामुळे गुंतवलेल्या मूळ रकमेची बँकेतील एफ डी इतकी सुरक्षितता गृहीत धरता येत नाही.
तर या आहेत अशा पाच स्कीम ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळवू शकता. सर्व योजनांचा नीट अभ्यास करून आपल्याला सोयीची असेल अशा योजनेमध्ये गुंतवणूक करा. शेअर बाजारातील चढ उतारांचा तसेच प्रॉपर्टीच्या दरांचा, बँकांच्या सुरक्षिततेचा अभ्यास करूनच आपली गुंतवणूक करावी म्हणजे कोणताही तोटा सहन करावा लागत नाही.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.