प्रेमात पडली म्हणून कुटुंबाने दिली भयानक शिक्षा, २५ वर्षे केलं अंधाऱ्या खोलीत कैद
प्रेमात पडून लग्न केलं म्हणून, मुलीचा खून करण्याच्या सैराट सारख्या ऑनर किलिंगच्या घटना आपल्याकडे वरचेवर घडत असतात. पण घटना मात्र खूपच वेगळी आहे.
ही वेदनादायक घटना मॅडेमोइसेल ब्लँचे मोनियर या फ्रेंच मुलीसोबत घडली.
ही घटना जरी जुनी असली तरी आजही थरकाप उडवणारी आहे.
झालं होतं असं की १८७६ मध्ये, २५ वर्षांची फ्रेंच मुलगी अचानक गायब झाली.
त्यानंतर जवळपास २५ वर्ष ती कोणालाच दिसली नाही.
पण ज्यावेळी ती सापडली तेंव्हा तिची अवस्था पाहून प्रत्येकाचा थरकाप उडाला.
त्याचं कारण असं, की तिला तिच्याच घरातल्या एका खोलीत दोन दशकं कैद करुन ठेवण्यात आलं होतं, आणि तिला ही शिक्षा कुणी परक्यानं नाही तर तिच्या आई आणि भावानं दिली होती.
होय, ही वेदनादायक घटना मॅडेमोइसेल ब्लँचे मोनियर या तरुणीच्या बाबतीत घडली.
तिची आई, मॅडम लुईस मोनियर, हिने आपल्या मुलाला सोबत घेऊन, तिच्या स्वतःच्या मुलीला २५ वर्षे एका खोलीत कैद केलं.
ब्लँचेचा दोष फक्त एवढाच होता की ती एका पुरुषाच्या प्रेमात पडली होती आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे होते.
मात्र घरच्यांना म्हणजेच तिच्या आईला हे अजिबात मान्य नव्हतं.
ब्लँचेच्या किंकाळ्याही जगाने ऐकल्या नाहीत
ब्लँचेला तिच्या कुटुंबाने कैद केले आणि ती जगाच्या नजरेतून गायब झाली. पण अत्यंत दुर्दैवी भयंकर गोष्ट म्हणजे शेजाऱ्यांना याची पुर्ण कल्पना होती.
ब्लँचे तिच्या खोलीतून मदतीसाठी आरडाओरड करत होती, परंतु तिच्या ओरडण्याकडे शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
यामागे एक कारण असं ही होतं, की ब्लँचेच्या कुटुंबीयांनी काही लोकांना असं सांगितले होतं की ती वेडी झाली आहे.
त्यावेळच्या परिस्थितीनुसार मानसिक आजारी लोकांना खोलीत कोंडून ठेवणे ही सामान्य बाब होती.
ब्लँचे वेडी आहे असं समजून कोणीही तिच्या या ओरडण्याकडे लक्ष दिलं नाही.
२५ वर्षे उंदीर, कीटक यांच्या सहवासात आणि मलमूत्राच्या पसरलेल्या घाणीत काढले दिवस
ब्लँचेच्या आईने तिला एका अंधा-या खोलीत कैद केलं होतं.
तिच्या खोलीत अन्न आणि पाणी भिरकावण्यात येई.
तिने कधी नवीन कपडे घातले नव्हते ना कधी खोली साफ केली होती.
तिने कधी आंघोळही केली नाही. ती तिचं जेवण आणि मलमूत्र विसर्जन तिच्या पलंगावरच करायची.
त्यामुळे लवकरच संपूर्ण खोलीत किडे आणि उंदीर यांचं राज्य सुरू झालं.
ब्लँचे इतकी कमकुवत झाली होती की ती फक्त या सगळ्या गलिच्छ पसाऱ्यात मध्यभागी पडून होती.
ब्लँचे बोलणं विसरली
१९०१ मध्ये, पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून एक पत्र मिळालं, ज्यामध्ये ब्लँचेला कोंडून ठेवल्याची माहिती देण्यात आली होती.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मॅडम लुईस मोनियर यांच्या घरावर छापा टाकला.
पोलिस, जेंव्हा ब्लँचेच्या खोलीत गेले, तेंव्हा तेसुद्धा हादरले, खोलीची अवस्था इतकी वाईट होती की तिथं उभं राहणं कठीण होतं.
खोलीची ती अवस्था पाहून पोलीसांच्या अंगावर काटा उभा राहिला.
पोलीसांनी पाहिलं की त्या अंधा-या खोलीत एक स्त्री विवस्त्र अवस्थेत पडली होती.
तिच्या अंगावर एक घाणेरडी घोंगडी होती आणि संपूर्ण शरीर धुळीनं माखलं होते.
तिच्या आजूबाजूला मलमूत्र, मांसाचे तुकडे, भाज्या, मासे आणि कुजलेले ब्रेडचे तुकडे पडलेले होते.
ती अंधारी खोली उंदीर आणि कीटकांसाठी आश्रयस्थान बनली होती.
तिथे श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
एकूण परिस्थिती पाहून पोलीसांनी लगेचच खिडकीची काच फोडली.
ब्लँचेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कपडे घातले.
ती २५ वर्षे प्रकाशात आली नाही, म्हणून तिचं शरीर पूर्णपणे झाकून घेण्याची काळजी घेण्यात आली.
एवढ्या वर्षात ती बोलायला ही विसरली होती.
तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ती मोठ्या कष्टानं लहान लहान वाक्यं बोलायला शिकली.
आई आणि मुलगा दोघेही शिक्षेतून सुटले.
आश्चर्याची गोष्ट असली तरी हे खरं होतं.
मुळात जेंव्हा मादाम लुईस मोनियरला अटक करण्यात आली तेव्हा ती बरीच म्हातारी झाली होती.
अटक झाल्यानंतर १५ दिवसांतच तिचा मृत्यू झाला.
त्याचवेळी ब्लँचेच्या भावाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
ब्लँचेच्या भावाने सांगितलं की, त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट आईच पहायची.
आईसमोर बाकी कुणाचं काही चालत नव्हतं.
त्याने ब्लॅंचेला जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण आईसमोर तो काही करू शकत नव्हता.
अशा परिस्थितीत त्याला केवळ १५ महिन्यांची शिक्षा झाली.
यावर त्यांने अपील करून ब्लँचेविरुद्ध कधीही हिंसाचार केला नसल्याचं सांगितलं.
न्यायालयानेही त्यांचं अपील मान्य करून त्याची निर्दोष मुक्तता केली.
ब्लँचेला १९०१ मध्ये अंधारकोठडीतून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर ती फक्त १२ वर्षे जगू शकली.
१९१३ मध्ये मॅडेमोइसेल ब्लँचे मोनियरचं निधन झालं.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.