ख्यातनाम मराठी कवयित्री, लेखिका आणि अनुवादक शांताबाई शेळके यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ चा. हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने आज आपण शांताबाईंच्या आठवणी जागवूया.
शेकडो मराठी चित्रपट गीते आणि भावगीते लिहून त्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांचे भावविश्व सर्वार्थाने समृद्ध केले. चित्रपट गीते, भावगीते, नाट्यगीते, कविता, लहान मुलांसाठी गाणी, कोळीगीते अशा सगळ्याच प्रकारची गाणी लिहून त्यांनी आपली लेखणी किती सिद्धहस्त आहे हे जणू दाखवूनच दिले. याशिवाय ललित लेखन आणि अनुवाद देखील त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे लिहिले. तसेच वर्तमानपत्रातील स्तंभलेखनही केले.
शांता शेळके यांचा जन्म पुण्यातील इंदापूरचा. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण राजगुरुनगर येथे तर त्या पुढील शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. पुण्यातील एसपी कॉलेजमधून पदवी मिळवून पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या मुंबई विद्यापीठात गेल्या. मुंबई विद्यापीठात मराठी आणि संस्कृत मधून एम ए करत असताना त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सुरुवातीचा काही काळ त्यांनी आचार्य अत्रे यांच्या नवयुग या साप्ताहिकात उपसंपादक म्हणून काम केले. परळच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये अनेक वर्षे त्यांनी प्राध्यापकी देखील केली. परंतु त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे गीतलेखन. त्यांची गाणी माहीत नाहीत असा मराठी माणूस सापडणे विरळाच.
गजानना श्री गणराया, जय शारदे वागेश्वरी यासारखी भक्तीगीते, किलबिल किलबिल पक्षी बोलती सारखे बालगीत, सजणा का धरीला परदेस, काटा रुते कुणाला, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, तोच चंद्रमा नभात यासारखी विरह गीते, माझे राणी माझे मोगा, राजा सारंगा, शालू हिरवा पाचू नी मरवा, शारद सुंदर चंदेरी राती यासारखी प्रेम गीते, दाटून कंठ येतो सारखे वात्सल्याने ओथंबलेले गीत, शूर आम्ही सरदार यासारखे स्फूर्तीदायी गीत आणि रेशमाच्या रेघांनी ही लावणी एकाच व्यक्तीच्या लेखणीतून उतरली आहे यावर विश्वास ठेवणे अगदी अवघड आहे. परंतु शांताबाईंच्या सिद्धहस्त लेखणीने हे सिद्ध करून दाखवले आहे.
रेशमाच्या रेघांनी ही लावणी लिहिणाऱ्या शांताबाई मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार. शांताबाईंनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांची मोजदाद करणे अशक्य आहे. वर्षा, गोंदण, रुपसी, जन्म जान्हवी, कळ्यांचे दिवस फुलांच्या राती, तोच चंद्रमा, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह.
शांताबाईंनी ललित लेखन देखील खूप केले. धूळपाटी, आनंदाचे झाड, पावसाआधीचा पाऊस, वडीलधारी माणसे अशासारखी त्यांच्या ललित लेखांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली.
अनुवादाच्या क्षेत्रातही शांताबाईंनी उत्तम कामगिरी बजावली आहे. कालिदासांच्या मेघदूताचे जे मराठी अनुवाद झाले त्यातील शांताबाईंनी केलेला अनुवाद सर्वाधिक लोकप्रिय आहे. लिटल विमेन या गाजलेल्या इंग्रजी कादंबरीचा शांताबाईंनी केलेला “चौघीजणी” हा अनुवाद देखील अतिशय लोकप्रिय आहे.
इतक्या प्रतिभावंत असणाऱ्या शांताबाई प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय साध्या होत्या. त्यांची राहणी अगदी साधी होती. स्वभाव अगदी सरळ आणि निगर्वी होता. त्यांच्या सरळ आणि निगर्वी स्वभावाचे एक उदाहरण म्हणजे सुरेश भटांचे अतिशय गाजलेले गीत “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” जेव्हा उंबरठा चित्रपटासाठी वापरायचे ठरले तेव्हा त्यातील एका अंतऱ्यातील “कुणीतरी आरशात आहे” हे शब्द चित्रपटाला योग्य ठरत नव्हते. सुरेश भटांना त्याक्षणी तेथे दुसरे शब्द सुचत नव्हते. अचानक लतादीदींना भेटायला म्हणून शांताबाई तेथे आल्या असताना त्यांना सगळी हकिकत समजली आणि अगदी सहजपणे त्यांनी “कुणीतरी आरशात आहे” ऐवजी “तुझे हसू आरशात आहे” हा बदल सुचवला. ते शब्द गाण्यात इतके चपखल बसले की खुद्द सुरेश भटांनी देखील “वाह शांताबाई!“ अशी दाद दिली. त्या गाण्याचे संगीतकार असणारे हृदयनाथ मंगेशकर यांनी ही आठवण सांगितली आहे.
इतक्या साध्या आणि निगर्वी स्वभावाच्या शांताबाईंनी लिहिलेले “असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे” हे गाणे जणू त्यांच्या जीवनाचे सारच आहे. मनाचेTalks कडून शांताबाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.