गोविंदाss गोssविंदा असा गजर करत अनेक भक्त तिरूमलाला बालाजीचं दर्शन घ्यायला भक्तिभावानं श्रद्धेने येतात.
बालाजीच्या भक्तांच्या अनेक कथा प्रचलित आहेत.
त्यातलीच एक सत्य घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
साल होतं १९८० माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे खाजगी सचिव, श्री प्रसाद हे तिरुपती संस्थानाचे मुख्य अधिकारी म्हणून काम बघत होते.
एके दिवशी त्यांना तातडीनं मंदिरामध्ये बोलावणं आलं.
तिथं नागराज राव यांचा परिवार, त्यांची वाट बघत होता. या परिवारांनं १०८ सुवर्णमुद्रांचा एक हार बालाजीसाठी आणलेला होता.
इतकंच नाही तर, हा हार मुर्तीवर चढवला जावा अशी त्यांची इच्छा होती.
यात अडचण काय? अडचण अशी होती की तिरुपती संस्थानात अशी परंपरा आहे की कुठल्याही भक्ताला जर सोन्याचे दागिने मूर्तीवर घालून दर्शन घ्यायचं असेल तर, त्या दागिन्यांइतकीच रक्कम संस्थानाकडे जमा करावी लागते.
ज्याला “वर्तन” असं म्हटलं जातं. ही प्रथा फार पूर्वीच्या काळी राजे-महाराजांच्या आणि जमीनदारांच्या संपर्कासाठी प्रचलित होती.
नागराज राव यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती.
नागराज राव हे कर्नाटकातल्या चिकमंगळूर चे रहिवासी.
ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज देवस्थानात१०८ सुवर्ण मुद्रांचा हार घेऊन ते उपस्थित होते.
पण या घटनेची सुरुवात १६ वर्ष आधीच झाली होती.
१६ वर्षापुर्वी स्वप्नात येऊन प्रत्यक्ष बालाजीनं नागराज राव यांना सांगितलं की मला १०८ सुवर्णमुद्रांचा हार अर्पण कर.
नागराज राव नेहमीप्रमाणे सकाळी उठले तेंव्हा त्यांच्या घरी तिरूमलावरून परत आलेले काही यात्रेकरू आले होते, ज्यांनी नागराज रावना लाडूचा प्रसादही दिला.
प्रसाद घेतल्यानंतर नागराज रावना त्यांचं स्वप्न आठवलं, पण हा केवळ योगायोग असेल असे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं.
त्याच रात्री पुन्हा स्वप्नात बालाजीनं १०८ सुवर्णमुद्रांचा हार तयार करून अर्पण करण्याचा आदेश दिला.
सकाळी उठल्यानंतर नागराज राव यांनी आपल्या परिवाराला या स्वप्नाविषयी सविस्तर सांगितलं…
खरं तर त्या वेळेला त्यांच्या परिवाराची परिस्थिती अशी होती की १०८ सोन्याची नाणी काय पण चांदीचा एक रुपयाही ते खरेदी करू शकत नव्हते.
शेवटी परिवाराच्या चर्चेतून असं ठरलं की १०८ तांब्याच्या नाण्यांचा हार करून त्यावर सोन्याचा मुलामा चढवून तो हार अर्पण करावा.
त्या रात्री बालाजीने पुन्हा नागराज राव यांच्या स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की मला तांब्याच्या नाण्याचा हार नकोय मला १०८ सुवर्णमुद्रांचाच हार अर्पण कर.
पुन्हा सकाळी संपुर्ण परिवारा समोर ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचं एकमत झालं की जशी परमेश्वराची इच्छा आहे तसंच करावं.
खरंतर नागराज राव यांच्या कुटुंबात कमावती व्यक्ती ते स्वतः एकटेच होते.
शेत जमिन उजाड होती. तिथूनही फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. आता काय करायचं?
परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांनी एक वेळचं जेवण बंद केलं.
त्यात जितके पैसे साठले त्यातून दोन सुवर्णमुद्रा तयार करून घ्यायला सहा महिने लागले.
अशा कठीण परीक्षेतच काळ पुढं सरकत होता.
हळूहळू कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा नोकऱ्या लागल्या आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारली.
शेतीमध्ये चांगलं पीक यायला लागलं आणि बऱ्यापैकी आर्थिक कमाई सुरू झाली.
तरीही १०८ सुवर्णमुद्रांचा हार तयार करून घ्यायला नागराज राव यांच्या कुटुंबियांना १६ वर्षे लागली.
या सुवर्णमुद्रांवर व्यंकटेश, महालक्ष्मी आणि पद्मावतीचा छाप होता.
हार ज्या दिवशी तयार झाला त्या दिवशी बालाजीनं पुन्हा एकदा नागराज राव यांना स्वप्नामध्ये दर्शन दिलं.
प्रसन्न झालेल्या श्री व्यंकटेशानं, तिरुपती बालाजीला हार घेऊन तिरुमालाला येण्याचा आदेश दिला.
हार मला अर्पण कर आणि हार घातलेल्या माझ्या मूर्तीचं परिवारासह दर्शन घे असंही बालाजीनं स्वप्नात सांगितलं.
नागराज राव यांना स्पष्ट आठवत होतं की बालाजीने अशीही एक सूचना दिली की तुला तिथं काही अडचण आली तर माझ्या या भक्ताला भेट आणि त्या भक्ताचा चेहराही नागराज राव यांना स्वप्नामध्ये स्पष्ट दिसला.
नागराज राव यांनी आपली ही कथा तिरूमला संस्थानाचे मुख्य अधिकारी प्रसाद यांना सांगितली आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की बालाजीनं स्वप्नात दाखवलेला भक्ताचा चेहरा हा प्रसाद यांचाच होता.
आता प्रसाद मात्र द्विधा मनस्थितीत होते.
आपल्याला देवानं ही जबाबदारी विश्वासाने सोपवली याचं समाधान तर होतंच, पण त्याचबरोबर मंदिराची परंपरा कशी मोडायची? हाच प्रश्न त्यांच्या मनात होता.
कारण हार मुर्तीला अर्पण करून दर्शन घेऊ द्यायचं तर किमान दोन लाख रुपये तरी नागराज राव यांना भरावे लागणार होते.
पण इतके पैसे त्यांच्याकडे नव्हतेच. कसेबसे ते घरी परत जाऊ शकतील इतकीच रक्कम त्यांच्या परिवाराकडे होती.
मग नियम मोडायचा का? प्रसाद यांची आणि नागराज राव यांच्या परिवाराची बालाजी वर अतूट श्रद्धा होती.
पण तरीही नियम मोडल्यानंतर बाकी विश्वस्तांना काय उत्तर द्यायचं? हीच चिंता प्रसाद यांना सतावत होती.
पण शेवटी मार्ग मिळाला. प्रसाद यांनी नागराज राव आणि त्यांच्या परिवाराचं विशेष अतिथी म्हणून स्वागत केलं.
दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता सकाळी पूजाअर्चा आणि अभिषेकानंतर १०८ सुवर्णमुद्रांचा हार बालाजीला अर्पण करण्यात आला.
राव आणि यांच्या परिवारांनं गोविंदाss गोssविंदा चा गजर करत अत्यानंदाने दर्शनही घेतलं.
पुढे विश्वस्तांच्या बैठकीत हा विषय जेव्हा प्रसाद यांनी मांडला, तेव्हा सगळ्याच व्यंकटेश भक्तांनी आनंदानं ते मान्य केलं.
विशेष उदाहरणात वर्तन परंपरेला छेद द्यायला काहीच हरकत नाही असा ठरावही मंजूर केला.
मित्रांनो तुम्ही कधी निराश असाल, कुठलाही मार्ग जर दिसत नसेल तर डोळे बंद करून ध्यान करा.
तिरुपतीचा हा बालाजी, श्री व्यंकटेश भक्तांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात पोहोचतोच, गोविंदाsss गोssविंदा
हि घटना सांगण्यामागे प्रकाशनाचा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देण्याचा हेतू नाही.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.