या लेखात वाचा निर्णयशक्ती वाढवणाऱ्या आठ सवयी

योग्य वेळी अचूक निर्णय घेणं हि पण एक कला असते. ती जर तुम्हाला जमली तर येणारे सगळे चॅलेंजेस चुटकीसरशी सोडवणं तुम्हाला सोप्प होऊन जाईल.

या लेखात सांगितलेल्या काही सवयी किंवा बिहेवियरल चेंजेस म्हणजे वागण्यातले काही बदल जर तुम्ही करून घेतले तर अफाट निर्णयशक्ती आत्मसात करण्याची कला तुम्हाला नक्की जमेल.

आयुष्यात बिनचूक निर्णय घ्यायला शिकताना, म्हणजे अगदी नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना कोणते कपडे घालायला पाहिजेत, इथपासून ते पार तुमचा पैसा तुम्ही कसा आणि कुठे गुंतवायला पाहिजेत, इथपर्यंत सगळे निर्णय जर तुम्ही सहज घेऊ शकलात ना, तर ती एक तुमच्या यशस्वी आणि आनंदी आयुष्याची “गुरुकिल्ली” ठरेल.

हे निर्णय तुम्ही योग्य वेळी आणि आत्मविश्वासाने घेऊ शकलात तर हे योग्य निर्णय घेण्याचं तुमचं कौशल्य तुमचा कितीतरी अमूल्य वेळ वाचवेल आणि अडचणी सुद्धा फटाफट दूर होत जातील.

आपलं सुदैव समजा, की आजच्या परिस्थितीत आपल्यातला प्रत्येक माणूस हा आपले स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन एक चांगला निर्णय घेणारा व्यक्ती बनू शकतो…. याचे कारण म्हणजे, रिसोर्सेस तेवढे उपलब्ध आहेत निर्णय घेण्यासाठी.

मग तुम्हाला सुद्धा असे चांगले निर्णय योग्य वेळेला घ्यायला शिकायचं असेल ना तर काही सवयी तुम्हाला स्वतःला लावून घ्यायला लागतील. कुठेही जाऊन फी साठी पैसे खर्च करायचे नाहीत, फक्त ह्या आठ सवयी आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला लावून घ्यायच्यात.

बघा तर मग कोणत्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्यात ते…..

१- तुमची ओव्हरकॉन्फिडन्सची पातळी नीट तपासा…

काही लोकांना सवय असते की समोरच्याला प्रभावित करण्यासाठी अति आत्मविश्वासाने एखादी गोष्ट सांगणे.

किंवा स्वतःच्या केलेल्या कामाला जास्त महत्व देऊन सांगायचं. पण जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो अति आत्मविश्वासाने घेतला ना तर त्याचा काहीतरी भयानक परिणाम झालेला दिसेल.

तुम्हाला एखाद्या ऑफिसला भेट द्यायची असेल आणि ते ऑफिस तुम्हाला नक्की कुठं आहे हे माहीत नसेल तरी तुम्ही जर सांगितलं की मला नक्की ऑफिस माहिती आहे तर तो अति आत्मविश्वास असेल.

आणि तुम्हाला तिथं पोचायला जास्त वेळ लागेल. आणि तुमचं काम कदाचित होणार नाही.

म्हणजे असा निर्णय हा तुमचा घात करू शकतो. जर तुमची एखादी गोष्ट ८०% च बरोबर असेल तर तुम्ही तुमच्या बॉसला १००% बरोबर आहे असं म्हणू शकत नाही.

जर तुम्ही बॉस ला म्हणालात की माझं १००% बरोबर आहे तर तुमचा निर्णय अति आत्मविश्वासाचा ठरतो. त्यामुळं होईल काय तर तुम्हाला बॉस प्रमोशन देणार असेल तर ते कॅन्सल होऊ शकेल. हीच गोष्ट इतर कुठल्याही बाबतीत अशीच असते.

आपल्या बोली भाषेत ह्याला फाजील आत्मविश्वास म्हणतो आपण. हा फाजील आत्मविश्वास तुम्हाला धोका देतो. कारण तो योग्य विचार नसतो.

आपली अति आत्मविश्वासाची लेव्हल कमी करा आणि निर्णय घ्यायला थोडा वेळ द्या.

निर्णय घेण्याच्या आधी हवी ती सगळी माहिती गोळा करा. आणि निर्णय घेण्या पूर्वी माहिती बरोबर आहे ना ह्याची पूर्ण खात्री करून घ्या. आणि नंतरच निर्णय घ्या.

तुमचा जास्त वेळ त्यात जाईल पण तुमचा निर्णय बरोबर असेल.

थोडक्यात काय तर अति आत्मविश्वासाने तडकाफडकी निर्णय नको. योग्य माहिती घेऊन वेळ देऊन शांतपणे निर्णय घ्यायची सवय लावून घ्यायला पाहिजे.

२- जी जोखीम तुम्ही उचलता ती ओळखा….

तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, रोजच्या व्यवहारात तुम्ही कुठला धोका पत्करत आहात आणि तो ओळखायची सवय स्वतः ला लावून घ्या.

आपण रोज छोटे छोटे धोके, जोखीम पत्करत असतो. पण त्यातून आपलं काय नुकसान होऊ शकतं ह्याचा विचार आपण करत नाही.

समजा तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी रोज कार किंवा बाईक वरून जात असाल तर रोज तोच रस्ता असल्यामुळे तुम्हाला तो चांगला ओळखीचा, किंवा नजरेत बसलेला असतो.

सराव झाल्यामुळे तुम्ही त्या ओळखीच्या रस्त्यावरून स्पीड ने जाता. कारण प्रत्येक वळण, खड्डा, स्पीड ब्रेकर तुम्हाला माहिती असतो.

म्हणून सराईत होता आणि स्पीडने जाता. पण ती एक तुमच्या आयुष्यातली जोखीम असते कायद्याने सुद्धा ती जोखीम असते.

पण जास्त स्पीडची ती जोखीम तुम्ही उचलता. पण त्यात कधी काही झालं तर तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता.

असे तुम्ही नकळत छोटे मोठे धोके रोज पत्करत असता. पण त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचारच करत नाही. म्हणून असली जोखीम उचलताना त्याचे परिणाम ओळखा. ही सवयच लावून घ्या.

३- तुमचे प्रश्न किंवा समस्या तुम्ही कशा हाताळाल त्या प्रमाणे तुमचं यश तुम्हाला मिळतं.

तुम्ही आयुष्यात असंख्य प्रश्नांना, समस्यांना सामोरं जात असता.

ते तुम्ही कोणत्या प्रकाराने हाताळायला पाहिजेत ते जरा लक्षात घ्या..

एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे सहज कळेल, दोन डॉक्टर एकाच भागात आहेत.

पहिला डॉक्टर आपल्या पेशंटला सांगतो, ‘मी जी पद्धत वापरतो त्या पद्धतीने ९०% पेशंट अगदी खडखडीत बरे झालेत’ आणि दुसरा डॉक्टर पेशंटला सांगतो ‘मी जी पद्धत वापरतो त्या पद्धतीने आत्तापर्यंत फक्त १०% लोकांचा मृत्यू झालाय.’

ह्या दोन्ही डॉक्टरांच्या बोलण्याचा अर्थ सारखाच आहे. पण दुसऱ्या डॉक्टर च्या बोलण्यामुळे पेशंट जास्त घाबरला असावा कारण दुसऱ्या डॉक्टरच्या बोलण्यात नकारात्मक विचार दिसतो आणि पहिल्या डॉक्टरच्या बोलण्यातून सकारात्मक विचार स्पष्ट दिसतात.

आपण लोकांशी बोलताना पण पॉझिटिव्ह बोललं तर त्याचा परिणाम पॉझिटिव्हीच दिसायला लागतो.

म्हणजे समस्या हाताळताना सुद्धा तुम्ही आधी त्या समस्येचा पॉझिटिव्ह विचार करून मार्ग काढा, ते सोपं जाईल.

सकारात्मक विचार करून आपले प्रश्न किंवा समस्या हाताळल्या तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.

म्हणून प्रश्न असे सकारात्मक विचारातून हाताळायची सवय लावून घ्या.

४- प्रश्न किंवा समस्या ह्या गोष्टींवर अतिविचार करू नका.

तुमच्या समोर कोणत्याही समस्या असू द्यात. अगदी सर्वात मोठी समस्या असुद्यात, म्हणजे असं समजा की तुम्हाला तुमचं गाव किंवा शहर सोडून दुसऱ्या शहरात जायची वेळ आली आहे.

आणि तुमचं संपूर्ण करियरच बदलायची वेळ आली आहे. तरी टेन्शन घेऊन सतत त्याच प्रश्नावर किंवा समस्येवर विचार करत बसू नका.

म्हणजे एखाद्या अंडी उबवणाऱ्या कोंबडीसारखं काहीही न करता सगळा वेळ अंड्यावर बसून राहते, तसंच तुम्ही दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्याच प्रश्नावर विचार करण्यात घालवू नका.

असा सतत विचार करत बसलात तर तुमचा मानसिक ताण खूप वाढेल. मानसिक ताण वाढणं ही चांगली गोष्ट नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे?

तुम्ही तुम्हाला तुमच्या दुसऱ्या काहीतरी छंदात गुंतवून घ्या, अगदी काहीही नसेल तर पाय लांब करून ताणून द्या.

मस्त झोप झाली की तुमच्या डोक्यातला तो विचार हलका झालेला असेल आणि मानसिक ताण सुद्धा गायब होईल.

खूप विचार करून त्रास झाला तर ताण घालवण्याचा आणखी एक जालीम उपाय सांगतो. छानपैकी अंघोळ करा. अंगावरून पाण्याचा फव्वारा उडाला कि विचारांची धूळ उडून जाईल.

तुम्हाला काही नवीन विचार सुचतील आणि तुमच्या समस्येवरचा उपायही शोधून काढाल.

कोणत्याही समस्येवर जास्त विचार करत बसलात तर ती समस्या आणखी मोठी होऊन समस्येचीच समस्या बनून जाते.

त्यापेक्षा अतिविचार करायचं टाळून उपाय शोधायची सवय लावून घ्या. बघाच करून, प्रश्न किंवा समस्या तुमच्या समोर टिकणारच नाहीत. मग काय? काम सोपं, तुम्ही जो निर्णय घ्याल तो परफेक्ट असेल.

५- तुम्ही दिवसभरात काही चुका केल्यात का ते पाहण्यासाठी दिवसाच्या शेवटी थोडा वेळ तुमच्यासाठी बाजूला काढा.

तुम्ही निर्णय घेताना कधी कधी तुमचे काही निर्णय सुरुवातीला चुकतही असतील ते निर्णय परत तपासून बघण्यासाठी थोडा वेळ द्या.

त्याची सवयच लावून घ्या. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत जे काही तुम्ही केलं असेल त्यात काही चूक झाली आहे का? हे रोजच्या रोज तपासून पहा.

सकाळी तुम्ही घरातून निघाल्यापासून काय काय झालं? तुम्ही ऑफिसला जाताना तुमची छत्री घ्यायला विसरलात. आणि जोरदार पावसाने तुम्हाला भिजवून टाकलं.

किंवा तुम्हाला खरेदी करताना एखाद्या वस्तूची भुरळ पडली आणि तुमचं खरेदीचं बजेट तोडून तुम्ही ती वस्तू विकत घेतली. हे तुमचे निर्णय तुम्ही घेतलेत.पण हे योग्य निर्णय होते का? हे तुम्ही स्वतःलाच विचारा.

ज्या ज्या वेळी तुमचं मन तुम्हाला तुमचा निर्णय योग्य होता असं सांगेल तेंव्हा तुम्हाला निर्णय घेणे सहज वाटायला लागेल.

समजा आज तुमचा एखादा निर्णय चुकला असेल, तर तो का चुकला ह्याचं कारण तुम्हाला कळलं की डोक्यातून काढून टाका.

त्या चुकीला डोक्यात ठेऊ नका. ती चूक परत करू नका, की झालं.

तोच विषय डोक्यात ठेऊन स्वतः ला दोष देऊ नका. ते चांगलं नाही. त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडेल.

प्रत्येक वेळी तुम्हाला काही नवीन नवीन अनुभव येतील. त्यातून तुम्ही शिकत जाल.

तुम्ही लावून घेतलेली ही चांगली सवय तुम्हाला सतत उपयोगी पडेल आणि तुमची निर्णय क्षमता चांगली होत जाईल.

६- निर्णयशक्ती चांगली होत असताना निर्णय घेण्याचे काही ठोकताळे (शॉर्टकट्स) तुम्ही तयार करता, त्या ठोकताळ्यांचा उपयोग तुम्ही करा.

ह्या शॉर्टकट्स चा वापर करायला लागलात की तुमचे निर्णय घेण्याचं काम फटाफट होईल.

म्हणजे काही मोठे निर्णय घेताना तुम्हाला या पूर्वी जे परिश्रम घ्यायला लागले होते, खूप वेळ लागत होता.

ते काम ह्या शॉर्टकट चा वापर केल्यामुळे कष्ट कमी करायला लागतील आणि वेळेची सुद्धा बचत होईल.

७- निर्णय घेण्याची ताकत वाढवण्यासाठी काही ‘विरुद्ध’ गोष्टी मान्य कराव्या लागतील त्या करा.

सर्वसामान्यपणे प्रत्येक माणूस हा व्यवहारात एखाद्या गोष्टीवर पक्का विश्वास ठेवतो. असा पक्का झालेला विश्वास कायम राहतो. सहज बदलता येत नाही.

ह्याला मानस शास्त्रात ‘बिलिफ ऑफ प्रिझर्वन्स’ असं म्हटलं जातं.

हा विश्वास बदलायला काही भरीव किंवा आकर्षक पुरावे द्यायला लागतात तरच हा विश्वास बदलू शकतो.

त्याचं एक उदाहरण देऊन सांगतो. समजा की तुम्ही उत्तम वक्ते असाल आणि तुम्हाला जर कोणी तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वक्ता म्हणाला की तुला अजून चांगलं बोलता येत नाही.

तर ते बोलणं तुमच्या मनात पक्कं घर करतं की तुम्हाला चांगलं बोलता येत नाही. मग तुम्ही भाषण द्यायचं टाळता.

तुमचा विश्वास पक्का होतो की तुम्हाला चांगलं बोलता येत नाही. असा हा पक्का विश्वास तुमच्या मनातून जाता जात नाही.

त्याला घालवण्यासाठी तुम्हाला विरुद्ध गोष्टी तुमच्या मनात भरवाव्या लागतील. म्हणजे तुमचा नकारात्मक विचार सकारात्मक व्हायला लागेल.

मग तुम्ही कसे चांगले वक्ते आहात ह्याचे पुरावे तुमच्या समोर ठेवा. तुमची पूर्वीची सगळी चांगली भाषणं परत परत ऎका. तरच तुमच्यात परत पहिल्या सारखा बदल होऊ शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो.

म्हणजेच चांगला निर्णय घेताना आपल्यातली नकारात्मकता घालवून सकारात्मक व्हायला लागतं. ही सवय आपली आपण लावून घ्यायला लागते. कधीही तुम्हाला ही गोष्ट जमणार नाही असं तुमचं ठाम मत झालं असेल तेंव्हा तुम्हाला आत्तापर्यंत काय काय जमलंय आणि तो प्रश्न कसा सहज सुटला ते विचार करून डोळ्यासमोर आणा. विषय संपलाच म्हणून समजा.

८- तुमचा सगळ्यात चांगला मित्र म्हणजे तुम्ही स्वतः, त्याला तुम्ही विचारा तुमचा निर्णय कसा आहे ते.

मोठे निर्णय घेताना सुद्धा तुम्हाला सगळीकडून माहिती मिळवून नंतर निर्णय घ्यायचा असतो. सगळी तयारी झाल्यावर तुमचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे तुम्ही स्वतः असता.

ह्या मित्राला तुम्ही नेहमी त्याचा सल्ला विचारण्याची सवय लावा. आणि तो जे काही सांगेल त्या प्रमाणे निर्णय घ्या. तुमचे निर्णय अगदी परफेक्ट असतील.

स्वतःला प्रश्न विचारला की पुढे येणाऱ्या सगळ्या प्रश्नांना, समस्यांना आपण स्वतःच सोडवणार असतो, त्याची तयारी झालेली असेल तर होकार मिळेल आणि तयारी झालीच नसेल तर नकार येईल.

म्हणजे जो निर्णय तुम्ही घ्याल तो चुकणार नाहीच. खात्री करून बघा. आणि घ्या कोणतेही निर्णय. कारण तुम्ही जबाबदारी घेणार आहात, हे पक्कं ठरलेलं असेल.

मग ते चुकले तरी बेहत्तर. तुम्ही कोणतीही समस्या सोडवायला खंबीर असाल. कारण तुमच्या सगळ्या चांगल्या सवयी ह्या निर्णय घ्यायला तुमच्या मदतीला असतील त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असेल. मग निर्णय घेणं काहीच अवघड नसेल.

मग आता वाट नका बघू, घ्या निर्णय ह्या चांगल्या सवयी आपल्यात उतरवायचा आणि करा मात तुमच्या सगळ्या समस्यांवर.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “या लेखात वाचा निर्णयशक्ती वाढवणाऱ्या आठ सवयी”

  1. मस्तच लिहिता तुम्ही. मनापासून धन्यवाद!

    Reply
  2. Thanks, je काही पोस्ट तूम्ही मनाचे talk vor टाकतात ते वाचून छान समाधान मिळते
    🙏🙏🙏👍

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय