सतत एकत्र राहून लॉकडाउनच्या काळात घरात नवरा बायकोमध्ये वादावादी हेण्याला बराच वाव आहे.. आणि म्हणूनच बघा या टिप्स कशा वाटतात.
नवरा बायकोची भांडणे ही त्यांच्या म्हातारपणासाठी आठवणींची पुंजी असते. मात्र टोकाची भांडणे होऊ देऊ नये.. भांडण संपल्या नंतरचा दुरावा घालवण्यासाठी, पुन्हा खेळीमेळीचं वातावरण तयार करण्यासाठी काही आयडीयाज आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार.
कारण भांडण कधीतरी सम्पणार हे तर नक्की पण त्यानंतर स्मशान शांतता आणण्यात काहीही शहाणपण नाही म्हणून लेख शेवट पर्यंत नीट वाचा.
मग यातलं सगळंच जरी तुमच्या स्वभावाला जमेल असं वाटत नसलं तरी तुमच्या स्वभावाला, घरातल्या वातावरणाला जमतील अशा गोष्टी तुम्हाला नक्की सुचतील. आणि मग त्या कमेंट्स मध्ये आम्हाला सांगायला मात्र विसरू नका.
असे म्हणतात पुरुष हे मंगळावरून तर स्त्रिया ह्या शुक्र ग्रहावरून आल्या आहेत. म्हणजे खरोखरीच असं काही नाहीये बरंका..
पण त्या ग्रहांचे गुणधर्म ह्या दोन मनुष्यप्राण्यांमध्ये असतात. आता असे भिन्न गुणधर्म असल्यामुळे ह्यांच्या नात्यांमध्ये आंबट, गोड, तिखट, कडू असे सगळेच रस निर्माण होतात..
आयुष्यभर ह्या सगळ्या रसांची मौज ते घेत राहतात.. मुळात म्हणजे मौज घेतली पाहिजे. या भिन्न गुणधर्मांना न ओळखून त्याची परिणीती दुष्मनीत झाली तर मग मात्र…
नवरा-बायको हे तर सगळ्यात भन्नाट नातं.. कारण हे दोघे महत्प्रयासाने एकमेकांना शोधतात आणि एकमेकांच्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी सगळ्यांसमक्ष आणाभाका घेतात..
राजा-राणी चा संसार सुरू होतो आणि एकत्र चाललेले हे दोघे ‘लव्ह बर्डस’ अचानक ‘अँग्री बर्डस’ बनून एकमेकांच्या समोर उभे राहतात..
त्यातून दोन वेगळ्या ग्रहांवरच्या दोन भिन्न स्वभावाचे हे दोघे म्हणजे भांडण तर जोरदारच असेल नाही का..??
नवऱ्या-बायकोचे भांडण हा काही लपून राहणारा मुद्दा नाही.. सगळेच भांडतात.. सोप्पे तर असते.. कोणत्याही मुद्द्यावरून ते भांडू शकतात..
पण अवघड असते ते पुन्हा एकमेकांच्यातला संवाद सुरू करणे..!! कारण भांडण झाल्यावर रुसवे फुगवे असतात.
ते सहजासहजी काढता येत नाहीत. कधी कधी अबोला असतो. आणि हा अबोला एक दिवसापासून एक महिन्यांपर्यंतही असू शकतो.
ते भांडणाच्या आपापल्या क्षमतेवर अवलंबून असते. हे सगळे वाचून तुमच्या पुढे तुमच्या घरातील पेल्यातली वादळे सरकत असतील हो की नाही..??
मग कसे बरे करता तुम्ही पुन्हा संवादाला सुरुवात..? नाही आठवत..?? बरं.. त्यासाठी पुन्हा भांडून पाहू नका हं..
त्यापेक्षा पुन्हा वादावादी झालीच तर या लेखात आम्ही काही मजेदार टिप्स आणल्या आहेत त्या करून पहा..
१. सकाळी सकाळी नाष्ट्याला बसलेले असताना लग्नाआधी कधी असे नाष्ट्याला जायचा योग आला असेल तर त्या वेळच्या आठवणी काढून गोड संवाद सुरू करा.
अगदी असेच इडली सांबार आणि चहा कसा तुम्ही एन्जॉय केला आणि कसे पुन्हा आपापल्या ऑफिसला गेलात त्याबद्दल एखादी आठवण नक्कीच असेल.
नाश्त्याचे पदार्थ वेगळे असू शकतात, विस्मरणात गेलेले असू शकतात पण आठवणी ताज्या नक्कीच करू शकता..
२. भांडण झालेले असताना कधी बाहेर जायचे असेल. आणि अगदीच कमी शब्दात एकमेकांशी बोलले जात असेल तर कपडे ह्या विषयाला हात घालून कम्युनिकेशन सुरू करू शकता.
म्हणजे, ‘आठवतंय का ही साडी किंवा हा शर्ट? त्या मागचा किस्सा..’ त्यावर काही गमतीशीर आठवणी असल्यास. बघा बोलता बोलता चेहऱ्यावर हास्य उमलेल.
भांडण बाजूला सारून तुम्ही गप्पांमध्ये कधी बिझी व्हाल कळणारही नाही..
३. सुट्टीच्या दिवशी मुद्दाम जुन्या फोटोंचा अलबम काढून बसा. एखादा फोटो काढून त्यातले नातेवाईक कोण? एखाद्या काका, मामाचा मजेदार प्रसंग ह्यावर चर्चा करा..
एक दोन तास कुठे गेले कळणारहि नाही.. भांडण बिंडण विसरूनही जाल..
फोटो आणि त्यातल्या ‘पॉझ’ झालेल्या आठवणी ह्या कोणताही संवाद कधीही सुरू करायला अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. आजमावून तर पहा..
४. जोडीदार रागामुळे तुम्हाला हाक मारत नसेल तर स्वतःच जाऊन सांगा की रोजची जी हाक आहे, आज ती मारल्याशिवाय दिवस सुरूच होणार नाही.
भांडण कालचं काल संपलं आज पुन्हा लाडीगोडी सुरू. ‘अहो, अरे, अगं ऐकलस का? ह्या शिवाय कानाला काही गोडच वाटत नाही’ हे बोलून दाखवा.
५. तुमच्या छंदाबद्दल बोलायला सुरुवात करा. त्याबद्दल काही क्लास, कोर्स आहे का हे विचारा. जोडीदाराकडे काही माहिती असेलच तर संवादही सुरू होईल.
काही शिकायची इच्छा असेल तर त्याबद्दल बोला. दोघेमिळून भांडण्यापेक्षा एखादा हॉबी क्लास लावला तर ह्या मुद्द्याकडे लक्ष वेधा.. बघा कसे सकारात्मक परिणाम दिसू लागतील.
६. जेवताना, टीव्ही बघताना, एखाद्या आवडीच्या सीरिअल बद्दल, एखाद्या ऍक्टर बद्दल किंवा आवडीच्या सुपरमॅन/वूमन बद्दल प्रश्न उपस्थित करा.
अवेंजर्स, बॅटमॅन, हिटमॅन किंवा अगदी लहानपणीचा शक्तिमान ह्या पैकी कोणत्याही आवडीच्या पत्रांबद्दल बोलायला सुरुवात झाली तर विषय थांबणारच नाही.
आवडलेले सिन, डायलॉग असे कित्येक आवडीचे विषय घडाघडा बोलले जातील आणि भांडणाला पूर्णविराम मिळेल.
७. मुलांच्या समोर, पुढच्या फॅमिली ट्रिप ला कुठे जायचे हा विषय काढा. बस.. मुले तुम्हाला तुमचे भांडण विसरायला लावतील.
ट्रिप प्लॅन करण्यात तुम्ही सगळे इतके गुंतून जाल की कशावरून भांडलो होतो हे आठवेनासे होईल..
८. रागावलेल्या बायको साठी किंवा नवऱ्यासाठी काही खास ऑर्डर करा. जेवण असो किंवा गिफ्ट.. अवडले की भांडण छु मंतर.. आणि ‘अँग्री बर्डस’ आपल्याआपण पुन्हा ‘लव्ह बर्डस’ होऊन जातील.
९. क्रिकेट..!! ह्याला विसरून कसे चालेल..? भारतीयांच्या नात्यातला अतूट धागा.. तुमच्या भांडणाच्या दिवसात क्रिकेटच्या मॅचेस असतील तर तुमचे भांडण अगदीच झट की पट शेवटच्या घटका मोजेल.
कारण बायकोला किंवा नवऱ्याला शिकवण्यापेक्षा क्रिकेटपटूला शिकवणे आपल्याकडे जास्त महत्वाचे असते.
एखादी भाजी बेचव झाली असेल किंवा नवऱ्याने वाण सामान आणले नसेल तरी सुद्धा भारताने मॅच जिंकणे ह्यापालिकडे जगात काहीही महत्वाचं असू शकत नाही.
दोघेही तेव्हा एकाच टीमचे असता नाही का.. भारत के खिलाडी तुम आगे बढो.. हम ‘जोडीने’ तुम्हारे साथ है..
१०. अशी गाणी लावा जी तुमच्या दोघांच्या आवडीची आहेत. जोडीदारासाठी म्युझिक जॉकी व्हा.. पुढचे गाणे कोणते असेल ते ओळखायला लावा किंवा त्याला/ तिला कोणते हवे आहे ते विचारून प्ले करा.
मूड आपल्याआपणच ठीक होईल. Music heals हे आपल्याला माहीतच आहे. सगळे बेसूर झालेले संवाद सुरेल होऊन जातील अगदी..
तर मंडळी आयडीअली कोणामध्ये भांडण कधीही होऊच नये पण भांडणाशिवाय नात्याला मजाही नाही. आयुष्य कसे अळणी होऊन जाईल.
थोडी फार वादा वादी, धुसफूस, तंटे झाले की जीवनाला फोडणी मिळते. त्यातून एकमेकांना समजवताना, रुसवे काढताना आपण एकमेकांच्या पुन्हा जवळ ही येत असतो.
नवरा बायकोची ही भांडणे त्यांच्या म्हातारपणासाठी आठवणींची पुंजी असते. मात्र टोकाची भांडणे होऊ देऊ नये..
ह्या लेखातील काही आयडियाज तुम्ही करून पाहा. नक्कीच तुमच्या आयुष्यात चाट मसाल्याची लज्जत येईल.. तुमच्याकडेही काही भन्नाट कल्पना असतील तर आमच्याबरोबर शेअर नक्की करा हं..!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice I like it 👍
Pan jar jodidaravar vishwas urla nasel tar….doghat nako to tisra tyane Anla.. Jyamule bolaychi eccha ch hott nasel tar….kontah hi naatyat vishwas asel tar apan manapasun tadjod karto….