शिमगा

बाई, हा बोहार्‍या वानाचा माणूस! तीन दिवस झाले शुद्धीवर नाही! रात्रंदिवस दारुत आहे बिचारा! पिंट्याला कपडे आणायला पैसे दिले होते. म्हटलं शिमगा आहे. पोराला कपडे आणा! कसलं काय, टाकले दारुत गमावून पैसे! आता चार, सहा महिने कपडे घेणं होते का? निरा एकच जोडी कपडे आहेत त्याला शाळेसाठी! रुखमाबाईच्या तोंडाचा पट्टा सकाळीच चालू झाला होता.

पिंट्या गोठ्यात गाईचं शेण जमा करत होता. गोठ्याच्या बाजुलाच समाधान तोंड वासून पडलेला होता. त्याच्या नाका, तोंडावर माशांचं मोहोळ उठलं होतं. रस्त्यावरच्या वडाच्या झाडाची सावली जाऊन त्याच्या अंगावर कडक उन्ह पडलं होतं. उन्हाच्या चटक्यांनी बेजार झाल्याने तो उठण्यासाठी धडपडत होता. राहून राहून पिंट्याला हाक मारत होता.

पिंटू बाबू मला सावलीत घे बरं! मला उठता येत नाही! तू असं नको समजू की, तुझा बाप दारुत आहे. मला सगळं समजते! ये बरं बाळा! मला त्या खाटेवर झोपव! उठण्यासाठी धडपडत समाधान बोलत होता.

काही गरज नाही! पिंट्या, अजिबात हात लावू नको! दारु पिताना नाही समजत का? जास्त होते तर कशाला इतकी पिता म्हणावं ! तेव्हा नाही येत आठवण पोराची! कपड्यांच्या पैशांनी दारु पितांना लाज नाही का वाटली? तावातावानं रुखमाबाई बोलत होती.

बायकोच्या बोलण्याने समाधान अंगविक्षेप करत तिला शिव्यांची लाखोली वाहत होता. समाधानच्या ओरडण्याने त्यांच्या दारात लहान मुलांची गर्दी जमली होती. समाधान त्या मुलांना हातवारे करुन त्याला सावलीत घेण्यासाठी सांगत होता. पिंट्या आईचं बोलणं ऐकत बापाकडे शांतपणे पाहत होता.

महादेव काकाला आणतं का बाबू बोलावून? त्यांना म्हणा, माझ्या आईनं बोलावलं तुम्हाला आत्ताच्या आता! …..मान डोलावून पिंट्या धावत सुटला.

पिंट्या काय झालं रे! एवढा धापा टाकत कशाला धावतोस? महादेव तांबडेनं विचारलं

काका, तुम्हाला माझ्या आईनं बोलावलं!

आई म्हणाली सोबतच घेऊन ये काकांना!

का? काय झालं आता?……. पिंट्या अनुत्तरीत होऊन शांतपणे उभा होता.

बरं ठीक आहे. तु हो पुढे, मी आलोच!…….. दोरीवचा सदरा अंगात चढवत महादेव झपाझप पावलं टाकत समाधानच्या घरी पोहोचला होता. समोरचं दृश्य बघून त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले होते. काय झालं, रुखमाबाई! कशासाठी बोलावलं होतं!

महादेव भाऊजी, तीन चार दिवस झाले पिंट्याच्या बाबाच्या पोटात अन्नाचा कण नाही! ….सारखं रात्रंदिवस दारु पितात. हे असे कुठेही लोळत असतात. चांगलं वाटते का?
पोरगा चांगला पाचवीत आहे! कसं वाटतं असेल त्याला बापाला असं बघून! यांना नाही कळत काहीच! पण तुम्ही! तुम्ही तर समजदार आहात! शिमग्याला पिंट्यासाठी कपडे आणायला दिलेले पैसे तुम्ही दोघांनी दारुत गमावले…… बोलताना रुखमाबाईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

पिंट्या महादेव आणि त्याच्या आईचा संवाद ऐकत बापाला विव्हळताना बघत होता.

वहिनी माझं ऐकून तरी घ्या! मला खरंच माहित नव्हतं त्या पैशांबद्दल!…. खरचं विश्वास ठेवा माझ्यावर! परवाच्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते. मी घरी बसलो होतो. समाधान संध्याकाळी माझ्याकडे आला. मला म्हणाला, चल जरा बाहेर तुला काहीतरी सांगायचं आहे. मला तोच तिकडे घेऊन गेला. टेबलवर बसल्यावर म्हणाला, त्याच्या आवडीची हिरोईन, श्रीदेवीचं दुबईत निधन झालयं. त्यामुळे त्याला खूप दुःख झालय! आज गममध्ये मला खूप दारु प्यायची आहे. तेव्हापासून आम्ही बसतोय तिकडे, बिलही तोच देतोय! महादेव खाली मान घालून बोलत होता.

भाऊजी, कमीत कमी विचारायचं तरी त्यांना पैसे कुठुन आले एवढे! यांची कमाई तर कवडीची नाही! एवढसुद्धा कळलं नाही तुम्हाला!…बरोबर आहे तुमचं! विचारायला पाहिजे होतं मी! माफ करा मला! यापुढे असं नाही होणार!

याला थोडं सावलीत घेतो. पिंट्या बादलीभर पाणी घे बरं! तुझ्या बापाची दारु उतरवतो!

तुमच्या पुढ्यात आहे भरलेली बादली! ….. घ्या करा काय करायचं ते! रुखमाबाईनं सांगितलं.

महादेवनं बादलीभर पाणी समाधानच्या अंगावर ओतलं. भिजल्यामुळे समाधान थरथरायला लागला होता. महादेवला पाहून किंचित हसत होता. थोड्याचवेळात रडत आचके-विचके देत होता. तशा परिस्थितीत त्याचे दोन्ही हात धुरुन महादेवनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. शिव्या घालत समाधान उठण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचे पाय गळून पडत होते. मध्येच तोल जाऊन तो खाली कोसळत होता. जमलेली लहान मुलं जोरजोरात हसत होती. मुलांचं हसणं ऐकून समाधान हातवारे करुन बडबडत होता.

पिंट्या हे सगळं शांतपणे बघत होता.

वहिनी, याला खाटेवर झोपवणं शक्य नाही! इथेच पडून राहू द्या! सावलीपण आहे इथे!…भिजल्यामुळे लवकरच याची दारु उतरेल!…..तुम्ही काही काळजी करु नका!….तुम्ही जा तुमच्या कामावर! मी घरीच आहे. काही असेल तर मी बघतो.

आम्ही कशाला थांबतो घरी. दारुड्या माणसासाठी कामधंदा सोडून घरी राहू का? पिंट्या जाईल शाळेत. मी तर निघालीच आता शेतात जायला. भाकर बांधली. पाण्याची कळशी भरुन ठेवलेली आहे. हे बघा तुमच्या समोरच निघते मी! दारु पितांना सोबत असता की नाही तुम्ही त्यांच्या! सांभाळा आता तुम्हीच! रुखमाबाई इतकं बोलून निघून गेली होती.

पिंट्या तू पण जा बाळा शाळेत! मी पण जेवायला जातो. तुझ्या बापाच्या जवळ बसण्यात काही अर्थ नाही! याची उतरल्याबरोबर हा थेट माझ्या घरी येईल! याची काळजी करण्याचं कारण नाही. बोलता बोलताच दोघेही बाहेर पडले होते.

दुपारनंतर समाधान महादेवच्या घरी आला होता. त्याला पाणी देऊन महादेव ओट्यावर बसला होता. त्याच्या मनात रूखमाबाई आणि पिंट्याच्या विचारांचे चक्र सारखे फिरत होते. त्यामुळे सकाळपासूनच त्यांचं डोकं दुखत होतं. दोघेही एकमेकांकडे बघत होते.

महादेव खूप डोकं धरलंय यार कालच्या दारूनं. आज उतारा घेतल्याशिवाय जमणार नाही….. समाधानने कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.

नको गड्या वहिणी मला खूप ओरडल्या सकाळी. तु कशाला पिंट्याच्या कपड्याचे पैसे दारूत उडवले.

जाऊ दे न यार झालं ते झालं…. परत नाही करणार असं. पण आज चल ना यार! माझ्याकडे पैसे पण नाहीत. कर ना काहीतरी सोय! गयावया करत समाधान बोलत होता.
ठीक आहे. चल जाऊ! माझं पण डोकं खूपच दूखतय सकाळपासून! महादेवकडू होकार मिळताच समाधानच्या अंगात एकप्रकारची ताकद आली होती. अगदी थोड्याचवेळात दोघेही नेहमीच्या जागेवर पोहोचले होते.

टेबलवर बसल्याबरोबर दोघांनी घटाघटा दोन पेग मारले होते. तिसर्‍या पेगला समाधानची बडबड सुरू झाली होती. पुन्हा तो श्रीदेवीच्या विषयावर घसला होता. श्रीदेवीच्या मुत्यूचं खरच खूप दुःख झालं यार मला! श्रीदेवीचा मृत्यू हॉटेलच्या बाथटबमध्ये पाण्यात बुडून झाल्याचं बातम्यांमध्ये सांगतात. पुन्हा दारुमुळे श्रीदेवी बाथटबमध्ये बुडाल्याचं सांगतात टीव्हीवाले. पण मला त्यात काही तथ्य वाटत नाही. दारुमुळे कसा काय कुणाचा मुत्यू होईल. सांग बरं मला! ते पण बाथटबमध्ये बुडून! पटते काय तुला तरी! आपण इतक्या वर्षांपासून सोबत दारु पितो. झालं असं कधी? भरलेला ग्लास एकादमात रिकामा करत समाधान म्हणाला.

महादेवच्या डोळ्यांसमोर रुखमाबाईचा रडवेला चेहरा सारखा येत होता. मध्येच पिंट्याची शांत मुद्रा नजरेसमोर तरळत होती. याच विचारात महादेव ग्लासमधील दारु घोटा घोटानं घशाखाली ओतत होता. वाकडं तिकडं तोंड करुन प्लेटमधील शेव तोंडात टाकत होता. समाधान टेबलजवळ लावलेल्या मधुबालाच्या चित्राकडे बघून बडबडत होता.

बोलता बोलताच समाधान हेलपाटत, हलत-डूलत घराच्या दिशेने निघाला होता. चालताना तो स्वतःला सावरत होता. तरीही त्याला चालायला रस्ता कमी पडत होता. महादेव टेबलवर बसून शांतपणे घोट घोट रिचवत समाधानचा प्रवास बघत होता.

वाचण्यासारखे आणखी काही…..

श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
पेढे घ्या पेढे…..
“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय