घरातून माशांना घालवण्याचे घरगुती उपाय

घरातून माशांना घालवण्याचे घरगुती उपाय

घरात सारख्या माश्या येतात म्हणून वैतागलात? माश्या घालवण्याचे सोपे उपाय वाचा या लेखात

पावसाळा आला की चिखल, ओलसर राहणारे कपडे, लाडकावर आलेली बुरशी असे अनेक त्रास असतात त्याचबरोबर आणखी एक डोकेदुखी म्हणजे माश्या!

पावसाळ्यात, खास करून पावसाळयाचे शेवटचे काही दिवस म्हणजे या माश्यांसाठी ब्रीडिंग सीजन.

या पृथ्वीवर जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे माश्या ह्या आहेतच.

खरंतर माश्यांचं आयुष्य जेमतेम वीस पंचवीस दिवसांचं असतं पण तरी त्यांचा एवढा त्रास का होतो?

कारण त्यांनी अंडी घातल्यापासून त्यातून नवीन माश्या बाहेर यायला लागणार वेळ हा फक्त वीस तास आहे आणि इतकंच नाही तर फक्त तीनच आठवड्यात अंड्यातून आलेल्या माशीची पूर्ण वाढ होऊन ती नवीन अंडी घालायला सज्ज होते!

हे वाचल्यावर पावसाळ्यात चार महिने माश्या जो धुमाकूळ घालतात त्याबद्दल नवल ते काय, नाही का?

या माश्या फक्त त्रासदायकच नसतात तर धोकादायक सुद्धा असतात.

माश्यांच्या पायांवर, पंखांवर अनेक प्रकारचे बॅक्टेरीया असतात आणि याच माश्या आपल्या नकळत आपल्या अन्नावर किंवा हातावर बसतात तेव्हा त्यांच्या पायांवरचे आणि पंखांवरचे जीवाणू आपल्या हातावर किंवा अन्नावर येतात आणि मग त्याच हाताने आपण खाल्लं कि रोगराई पसरते.

या माश्यांमुळे टायफॉईड, कॉलरा यासारखे भयानक रोग पसरतात त्यामुळे त्यांच्या आपल्या आजूबाजूला असण्याचा फार फरक आपल्याला पडत नसला तरी त्यांना घालवणं हे आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे.

यावर केमिकल्स, पेस्टीसाईड्स हे उपाय तर आहेतच, ते सोपे, पटकन होणारे किंवा सोयीस्कर ही असतील पण या दोन गोष्टींचे आपल्या आरोग्यावर पण विपरीत परिणाम होतात.

त्यामुळे उगीच एक करता दुसरं काहीतरी व्हायचं आणि म्हणूनच आजच्या या लेखात, मुद्दाम आम्ही असे काही सोपे आणि आजिबात हानिकारक नसलेले असे माश्या घालवायचे उपाय सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

माश्या जर घालवायच्या असतील तर त्याची पहिली पायरी म्हणजे त्यांच्या अंडी घालण्याच्या जागा ओळखणे.

नवीन अंडीच घातली नाहीत तर नवीन माश्या येणार नाहीत आणि आहेत त्या माश्या घालवायला सोपं जाईल.

माश्या अंडी कशावर घालतात तर, उघड्या अन्नावर किंवा कुजलेल्या/कुजणाऱ्या कचऱ्यात. यासाठी काय करायचं?

१. अन्न नेहमी झाकूनच किंवा फ्रिजमधेच ठेवायचं. कधीतरी या माश्या फळांवर बसून सुद्धा अंडी घालू शकतात, खास करून पिकलेली केळी, चिकू यासारख्या मऊ फळांवर.

त्यामुळे फळं सुद्धा जाळीच्या बास्केटमध्ये घालून ठेवायची.

२. ओल्या कचऱ्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावायची आणि इतर वेळेस तो नेहमी झाकूनच ठेवायचा.

आता आपण बघू या माश्यांना घालवण्याचे नैसर्गिक उपाय.

१. झाडं

हो, तुम्ही बरोबर वाचलं. झाडंच. काही झाडांचा, त्यांच्या फुलांचा वास माश्यांना आवडत नाही त्यामुळे ही झाडं आपल्या बागेत किंवा बाल्कनीत किंवा अगदी खिडकीत जरी लावली तरी माश्या घरात येणार नाहीत.

तुळस, पुदीना, झेंडू ही झाडं तुम्ही लावू शकता.

या झाडांमुळे तुमच्या घरी येणाऱ्या माश्यांची संख्या झपाट्याने कमी होईल आणि तुम्हाला फरक जाणवेलच. या झाडांचा आणखी एक फायदा म्हणजे याने डास सुद्धा कमी होतात.

२. प्लास्टिक पिशवी आणि पाणी

आजकाल रस्त्यावरच्या बऱ्याच हॉटेल्समध्ये हा उपाय केलेला दिसतो.

एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीत अर्ध्यापर्यंत पाणी भरून, ती रबरबँडने बंद करून, वरून दोरा लावून माश्या येतात त्या भागात टांगून ठेवायची.

याने काय होतं? नेहमी सरळ रेषेत प्रवास करणारी प्रकाशाची किरणं पाण्यामुळे रिफ्रॅक्ट होऊन ‘बेंड’ होतात.

यामुळे माश्यांचा गोंधळ उडतो आणि त्या अशा पाण्याने भरलेल्या पिशवीच्या आजूबाजूच्या काही भागात फिरकत नाहीत.

कुठल्याही केमिकलशिवाय माश्यांना घालवायचा हा घरच्याघरी करता येण्यासारखा फार सोपा उपाय आहे.

३. व्हिनेगर आणि भांडी घासायचं लिक्विड

एका बाउलमध्ये एक चमचा व्हिनेगर घेऊन त्यात भांडी घासायच्या लिक्विड चे चार ते पाच थेंब घालायचे.

प्लास्टिकच्या पिशवीला भोकं पडून घेऊन ती पिशवी या बाउलवर झाकण म्हणून बांधून ठेवायची.

या मिश्रणामुळे माश्या आकर्षित होऊन पिशवीवरच्या छोट्या भोकातून आत जातील आणि या मिश्रणात बुडतील.

अचानक एखाद्या भागात माश्यांचा खूप त्रास जाणवायला लागला तर हा उपाय करून बघायला हरकत नाही.

४. जुन्या प्लास्टिक बाटलीचा ट्रॅप

आपण जुन्या कितीतरी प्लास्टिकच्या बाटल्या टाकून देतो.

त्याचा असा उपयोग होईल याची कल्पना सुद्धा आपल्याला नसते. एका प्लास्टिक बाटलीचा बुचाच्या इथला थोडा भाग कापून टाकायचा (बाटलीचा साधारण पाव भाग) आणि बाटलीत साखरेचं पाणी भरायचं.

पाणी भरून झाल्यावर कापलेला भाग उलटा करून (फनेल सारखा) त्याच बाटलीत ठेवायच्या.

साखरेच्या पाण्यामुळे माश्या त्या फनेलमधून आत जातात पण फनेल च्या निमुळत्या आकारामुळे त्यांना बाहेर येता येत नाही.

५. कायेन पेपर आणि पाणी

कायेन पेपर म्हणजे जाडसर लाल मिरच्या. या मिरच्यांची पूड पाण्यात मिक्स करून त्याचा स्प्रे घराभोवती मारला तर माश्या घरात येत नाहीत.

मात्र हा स्प्रे मारताना आपण आपल्या त्वचेची आणि डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे.

स्प्रे मारून झाल्यावर मात्र याचा तिखट असा त्रास घरात होत नाही.

६. लाईट ट्रॅप

बाजारात मिळतात त्या लाईट ट्रॅपच्या उजेडाने माश्या आकर्षित होतात आणि या लाईट ट्रॅपला माश्यांचा स्पर्श झाला की छोट्या इलेक्ट्रिक करंट पास होतो.

तेवढा माशी मारायला पुरे असतो. सहसा घरात कोणी असे लाईट ट्रॅप लावत नाही पण घर मोठं असेल, आजीबाजूला खूपच मोकळा परिसर असेल ज्यामुळे माश्यांचा खूप त्रास असेल तर याचा विचार करायला हरकत नाही.

एकदा माश्या घरात घुसल्यावर त्यांना घालवायला किंवा मारायला काय करता येतं ते आपण बघितलं.

पण एकदा घरातून सगळ्या माश्या गेल्या तर त्या परत येऊ नये म्हणून काय काळजी घेणं गरजेचं.

१. अन्न, ओला कचरा, घाण या सगळ्यामुळे माश्या येतात त्यामुळे घरात अशी घाण न ठेवता, शक्य तेवढी स्वच्छता राखली पाहिजे.

२. संध्याकाळच्या वेळेस खूप प्रखर उजेडाचे दिवे लावू नयेत, त्या उजेडामुळे सुद्धा माश्या घरात शिरकाव करण्याची शक्यता असते.

३. खिडक्यांना बाहेरून जाळी लावून घेतल्यावर माश्यांना घरात शिरता येणार नाही.

४. अन्न नेहमी झाकूनच ठेवावे.

५. घरातल्या कचरापेटीला घट्ट झाकण असेल तर चांगलं.

६. खरकटी भांडी तशीच ठेऊ नयेत, वेळच्या वेळी भांडी घासून नाहीतर निदान ओली करून तरी ठेवावीत.

माश्या रोगराई पसरवतात म्हणजेच त्या हानिकारक असतात.

घरात आपण शक्य तितकी स्वच्छता ठेवली तर माश्या घरात येणार नाहीत, म्हणूनच हे सगळे उपाय करताना आणि केल्यावर घरातली स्वच्छता कायम ठेवायची.

या लेखात सांगितलेले उपाय सोपे आहेत ना? मग ते करून बघितल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा लेख तुमच्या मित्रमंडळीत सुद्धा ‘शेयर’ करा!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
error: © Copyrights 2023. All rights reserved!