आपण जेव्हा एखाद्या नवीन माणसाला भेटतो तेव्हा आपले सगळ्यात आधी लक्ष जाते ते त्याच्या डोळ्यांकडे.
असेच तुम्हाला देखील जाणवले असेल की एखाद्या व्यक्तीचे डोळेच आपल्या लक्षात राहतात.
आपल्या डोळ्यातून आपले हावभाव स्पष्ट समजतात.
प्रेम, राग, भीती, काळजी हे सगळे आपण जरी बोललो नाही तरी आपल्या डोळ्यातून व्यक्त होत असते.
थोडक्यात, आपले डोळे हे फक्त आजूबाजूचे बघण्यापलीकडे अजून बरेच काही करत असतात
ज्यामुळे त्यांच्याकडे वारंवार इतरांचे लक्ष जाते.
म्हणूनच आपले डोळे जास्तीतजास्त आकर्षक करण्याकडे आपला कल असायला हवा.
“तुम्हाला बरे नाही का? डोळे असे का दिसत आहेत?”
“झोप झाली नाही वाटतं, डोळे लाल दिसत आहेत.”
अशी वाक्ये तुम्हाला कोणी कधी म्हटली आहेत का?
डोळ्यांचा पांढरा भाग काही वयोमानाप्रमाणे किंवा प्रदुषणामुळे कधीकधी लाल किंवा पिवळसर दिसायला लागतो.
यामुळे प्रत्यक्षात आपण दमलेलो नसलो तरी आपले डोळे थकलेले, दमलेले भासू लागतात.
म्हणूनच डोळे आकर्षक ठेवण्या बरोबरच त्यांचे आरोग्य जपून ते कायम शुभ्र, नितळ कसे राहतील याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे.
पण यासाठी नेमके करायचे काय? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
डोळ्याचा लालसर किंवा पिवळसरपणा कमी होऊन ते जास्तीतजास्त आरोग्यपूर्ण, म्हणजेच स्वच्छ आणि नितळ दिसण्यासाठी काय काळजी घ्यायची, कोणते घरगुती उपाय करायचे हे आपण या लेखात बघणार आहोत.
१. चांगले आय ड्रॉप किंवा सलाईनचे ड्रॉप्स वापरा
नियमितपणे चांगले आय ड्रॉप किंवा सलाईन ड्रॉप्स वापरल्याने हळूहळू डोळ्यांचा लालसरपणा कमी होऊन ते पांढरेशुभ्र व्हायला मदत होते.
कधीकधी जर डोळे कोरडे पडत असतील तर ते लाल दिसण्याची शक्यता असते.
ड्रॉप्सच्या नियमित वापराने डोळ्यात सतत ओलसरपणा टिकून राहील.
डोळे कोरडे पडल्याने डोळ्यांना खाज येते ती सुद्धा हे ड्रॉप्स वापरल्याने कमी होते.
जर खूप वाचनाचे काम असेल किंवा स्क्रीन टाईम जास्त असेल तर हे ड्रॉप्स आवर्जून वापरले पाहिजेत.
सलाईन ड्रॉप्स यासाठी कारण ते जरा कमी हार्ष म्हणजे कमी तीव्रतेचे असतात.
२. ताजी फळे आणि भाज्या खा
आहारात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. खासकरून गाजर, तांबडा भोपळा, बीट, लिंबू, संत्री या भाज्या आणि फळे जास्त प्रमाणात खात जा.
या मध्ये व्हिटामिन आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात.
यामध्ये जास्त प्रमाणात अढळणाऱ्या फ्री रॅडीकल्समुळे डोळे पांढरे आणि स्वच्छ व्हायला मदत होते.
याशिवाय पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे हे सुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
म्हणूनच डोळ्यांच्या एकूण आरोग्यासाठी तसेच डोळ्यांना आलेला लालसरपण किंवा पिवळसरपणा कमी करण्यासाठी आहारात या भाज्यांचा आणि फळांचा जास्त प्रमाणात समावेश केला पाहिजे.
३. साखरेचे आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करा
तुम्ही जसेजसे तुमच्या आहारात फळांचे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवाल तसेतसे साखरेचे आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करा.
हे करताना एक महत्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, कोणताही बदल अचानक न करता, सावकाश करावा.
आहारात जास्त ताज्या भाज्या, फळे घेतल्याने आणि कमी प्रमाणात साखर आणि कार्बोहायड्रेट्स घेतल्याने आपल्या यकृताचे (लिव्हरचे) डीटॉक्सीफीकेशन सुरु होते.
यामुळे आपली सगळीच प्रकृती सुधारते आणि त्याचबरोबर डोळ्याच्या तक्रारी सुद्धा दूर होतात.
याचा अजून एक फायदा म्हणजे जर आपल्याला रात्री लवकर झोप लागत नसेल तर अन्हेल्दी पदार्थ कमी केल्याने आपले झोपेचे गणित सुद्धा बरोबर बसते.
डोळे नितळ आणि टवटवीत दिसायला चांगली झोप गरजेची असते.
४. झोप
वरच्या मुद्द्यात झोपेचे महत्व अधोरेखित झालेच आहे. झोपेच्या आधी डोळे जर लालसर दिसत असतील तर झोप न झाल्याने ते जास्त लाल दिसण्याची शक्यता असते.
म्हणूनच रात्रीची सलग सात ते आठ तासांची झोप आपल्याला अत्यावश्यक असते.
व्यायाम करणे, जंक फूड चे प्रमाण कमी करणे यामुळे शांत झोप लागायला मदत होते.
तुम्हाला शांत, सलग झोप लागायला जर त्रास होत असेल तर त्यावर काहीतरी उपाय करून नीट झोप लागण्यासाठी जास्तीजास्त प्रयत्न केले पाहिजेत.
५ . हेल्थ सप्लीमेंट घ्या
तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात योग्य प्रमाणात व्हिटामिन आणि मिनरल्स गरजेची असतात.
आहारात जास्तीतजास्त भाज्या आणि ताज्या फळांचा वापर केल्यास आपल्या शरीराला योग्य प्रमाणात व्हिटामिन आणि मिनरल्स मिळतात.
परंतु काही कारणाने ते शक्य नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टी व्हिटामिनच्या गोळ्या तसेच शरीरातील ओमेगा ३ फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढवण्यासाठी कॉडलिव्हर तेलाच्या गोळ्या घेतल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारून ते टवटवीत आणि नितळ पांढरेशुभ्र दिसण्यास मदत होते.
६. भरपूर पाणी प्या
जास्त पाणी पिणे हे जसे आपल्या अनेक समस्यांवरचे उत्तर आहे तसेच, ते डोळ्यांच्या समस्यांवरचे सुद्धा अगदी खात्रीशीर उत्तर आहे.
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर डोळे नितळ दिसतात.
दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी आपल्याला गरजेचे असते. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायलाने डोळ्यांच्या खाली आलेली सूज आणि डोळ्यांचा लालसरपणा कमी होतो.
७. धूर, धूळ आणि प्रदूषण टाळा
धूर, धूळ आणि प्रदुषणामुळे डोळ्यांना खाज येते. डोळे सारखे चोळल्याने ते लाल होण्याची शक्यता असते.
त्यामुळे डोळ्यांना खाज सुटेल अशा गोष्टी टाळाव्यात.
तसेच धुळीमुळे किंवा प्रदुषणामुळे डोळ्यात बारीक कण जाऊन ते कोरडे पडण्याची शक्यता असतात.
डोळ्यांचा ओलसरपणा कमी झाला तर ते लाल दिसायला लागतात.
म्हणून शक्यतो धुळीपासून डोळ्यांचे संरक्षण करावे. जर तुम्हाला धूम्रपानाची सवय असेल तरी सुद्धा धूर सारखा तुमच्या डोळ्यात जाण्याची शक्यता असते ज्याने डोळे सतत लालसर दिसायला लागतात.
म्हणूनच जर नितळ डोळे हवे असतील तर धुम्रपान टाळणेच उत्तम.
८. डोळ्यांना कमीतकमी ताण द्या
सतत वाचनाने किंवा जास्त स्क्रीन टाईम असल्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि ते लालसर दिसायला लागतात.
स्क्रीन टाईम जर कामामुळे असेल तर तो टाळता येणे अवघड असते. पण असे असेल तर कामाव्यतिरिक्त फोनचा, कॉम्पुटरचा वापर टाळायला हवा.
कामासाठी फोन किंवा कॉम्पुटर वापरताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी ज्याने डोळ्यांवर कमीतकमी ताण येईल.
जसे की अंधारात स्क्रीनकडे बघणे टाळावे.
अंधारात स्क्रीन बघितल्याने त्याच्या ब्राईटनेसमुळे डोळ्यांवर जास्त प्रमाणात ताण येतो.
म्हणूनच आपण ज्या खोलीत काम करतो तिथे व्यवस्थित उजेड असणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच काम करताना जास्तीतास्त डोळ्यांची आणि पापण्यांची हालचाल करावी ज्यामुळे डोळ्यांना व्यायाम मिळेल आणि त्यांच्यावरचा ताण कमी होईल.
९. गॉगल्सचा वापर करा
उन्हात जाताना डोळ्यांना संरक्षणाची गरज असते. उन्हातल्या धोकादायक युव्ही किरणांपासून गॉगल्स डोळ्यांचे रक्षण करतात. सतत उन्हात गेल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ते लालसर दिसायला लागतात.
म्हणूनच डोळ्यांची काळजी घेऊन त्यांचे आरोग्य जपण्यासाठी उन्हात जाताना गॉगल्सचा नियमितपणे वापर केला पाहिजे.
१०. नेत्र स्नान/नेत्रसेचन/नेत्रप्रक्षालन
अधूनमधून थंड पाण्याने डोळे धुवावेत. तोंडामध्ये पाणी भरून (गाल फुगवून) बंद डोळयांवर साधारण २१ वेळा पाणी शिंपडावे. नंतर तोंडातील पाणी थुंकून द्यावे.
यामुळे डोळ्यातील उष्णता कमी होऊन डोळे तजेलदार होतात. यालाच आयुर्वेदात नेत्रसेचन/नेत्रप्रक्षालन म्हणतात.
डोळ्यांचे आरोग्य जपून ते टवटवीत व नितळ दिसण्यासाठी या सोप्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.