सशक्तपणे विचार करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

विचारांमध्ये खूप शक्ती असते. म्हणून तर म्हणतात ना, की सतत सकारात्मक विचार केले पाहिजेत.

कितीही संकटे आली तरी नकारात्मक विचारांपासून लांब राहाण्याचा आपण यासाठी प्रयत्न करतो.

एखादी घटना घडली की आपण त्याबद्दल विचार करत राहतो किंवा काही घडण्याआधी सुद्धा आपण विचार करत बसतो.

म्हणजे विचार ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते.

या विचारांचा आपल्या वागण्यावर, बोलण्यावर हरप्रकारे परिणाम होत असतो.

म्हणूनच आपले विचार नेहमी चांगले असले पाहिजेत म्हणजे आपल्या वागण्यात आणि बोलण्यात त्याचे प्रतिबिंब येते आणि त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो.

आपल्या विचारांचा परिणाम आपल्या कामावर सुद्धा होतो.

अति विचार, नकारात्मक विचार या गोष्टींमुळे आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर मर्यादा येतात आणि कामे ठरल्या वेळेत पूर्ण होत नाहीत. या साठी काय करायचे?

काही वेळा आपल्या मनातून आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटत असते पण आपला मेंदू, आपले विचार आपल्याला ते करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात.

अशावेळेला काय करायचे? हे कोडे सुटत नाही.

विचार करत बसायचे कि, मनाला वाटते ते करू मोकळे व्हायचे? अशावेळेला आपले विचार सगळ्या दिशांनी धावतात पण हाती काहीच लागत नाही.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत.

आपल्या भरकटलेल्या विचारांना मार्गावर आणून ते एकाच दिशेने जातील यासाठी काय करायचे?

योग्य पद्धतीने विचार करण्याची सवय स्वतःला कशी लाऊन घ्यायची हे या लेखात सांगितले आहे.

१. विचारांची दिशा बदला – सकारात्मकता स्वीकारा

समजा एखादी नवीन गोष्ट तुम्हाला कोणी करायला सांगितली, तर त्यावर बऱ्याचदा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? “मला हे जमेल की नाही माहीत नाही?” बरोबर ना?

एखाद्या वेळी ती गोष्ट करायचा तुम्ही पूर्वी कधीतरी प्रयत्न केला असेल आणि तेव्हा त्यात यशस्वी न झाल्यामुळे तुम्हाला परत ती गोष्ट करायला भीती वाटत असेल, पुरेसा आत्मविश्वास नसेल आणि म्हणून तुमची विचारांची गाडी नकारात्मकतेच्या दिशेने धावत असेल.

पण अशाच वेळी जाणीवपूर्वक विचारांची दिशा बदलली पाहिजे.

“मला हे जमणार आहे, मी हे करणार आहे.” असा विचार सतत केल्याने आपल्या विचारांना नेहमीसाठीच योग्य दिशा मिळते.

सुरुवातीला जर जाणीवपूर्वक असा विचार करायची सवय लाऊन घेतली तर नंतर काही प्रयत्न न करताच तुमच्याकडून नेहमी सकारात्मक विचारच केला जाईल.

मित्रांनो, लक्षात ठेवा!! प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार असतील तर तुम्ही काहीही करू शकाल.

२. विचारांमध्ये ठामपणा आणा

वरचा मुद्दा लक्षात घेऊन, सकारत्मकता स्वीकारली की जाणीवपूर्वक करयची अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या विचारांमध्ये एक ठामपणा आणायचा.

“मी हे करायचा प्रयत्न करणार आहे.” या पेक्षा “मी हे करूनच दाखवणार आहे.” यामध्ये आपला निश्चय दिसून येतो.

मी अमुक करण्याचा प्रयत्न करणार आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण स्वतःला अपयशी होण्यासाठी जणू चान्स देत असतो.

पण त्यापेक्षा आपण अमुक एक गोष्ट करूनच दाखवणार, असा विचार केला तर तितक्याच निग्रहाने आपण ती कृती करतो आणि त्यात हमखास यशस्वी होतो.

३. लक्षात ठेवा – तुमचे विचारच तुम्हाला घडवतात

तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? तुम्हाला जर आत्मविश्वास कमी वाटत असेल आणि तुम्हीच जर स्वतःच्या कार्यक्षमतेला कमी लेखत असाल, तर तुम्ही साहजिकच इतरांवर प्रभाव पाडण्यात अयशस्वी होता.

एकदा दोनदा एखाद्या गोष्टीत अपयश आल्यानंतर जर तुम्ही प्रत्येक नवीन गोष्टीच्या आधी घाबरून जाऊन, ती गोष्ट करताना दहा वेळा विचार करून, केवळ अपयशाचीच शक्यता गृहीत धरली तर त्याचा परिणाम तसाच होण्याची शक्यता असते.

त्यामुळे आपल्याला स्वतःकडून काय अपेक्षा आहेत, आपल्याला किती यशस्वी व्हायचे आहे याचाच फक्त विचार आपण केला पाहिजे.

४. अपयशातून धडे घ्या

जेव्हा तुमचे नियोजन फसते, तुमच्या हातात काहीच उरले नाही.. तुम्ही अयशस्वी झाला आहात असे तुम्हाला वाटते, तेव्हा तुमच्या हातात एक गोष्ट असते ती म्हणजे, त्या घटनेतून तुम्हाला मिळालेला धडा.

अपयशाने खचून न जाता त्यातून काय शिकता येईल हे बघण्याची सवय लाऊन घेतली तर तुमचे विचार भरकटणार नाहीत.

अपयशामुळे निराश होणे ठीक आहे पण एका ठरविक काळापुरतेच. त्यानंतर आपण त्यातून काय शिकलो, भविष्यात कोणत्या चुका आपण टाळू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे.

अशा पद्धतीने विचार केल्याने आयुष्यात आपल्या मनासारखे झाले नाही, तरी आपली उम्मेद कायम राहील.

५. विचारांवर नियंत्रण ठेवा

हे वाचायला किंवा लिहायला जितके सोपे आहे तितके प्रत्यक्ष नाही.

विचार स्वैर असतात, त्यावर कसे नियंत्रण आणणार? असा प्रश्न पडला तर त्यात काही नवल नाही.

पण प्रयत्न केल्यावर ते ही शक्य आहे. विचारांची दिशा कशी बदलायची हे आपण बघितले पण त्याबरोरच विचारांना कुठे ब्रेक मारायचा हे समजणे सुद्धा महत्वाचे आहे.

आपण जर विचारच करत राहिलो, मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक, तर मग कृती कधी करणार?

म्हणूनच विचारांमध्ये वाहवत न जाता, योग्य वेळीच विचारांना नियंत्रित करून काम कधी व कसे सुरु करायचे हे समजले पाहिजे.

आपण जर विचारांच्या ओघात वाहवत जात असू तर ते आपल्याच लक्षात येते. अशावेळी प्रयत्न करून विचार थांबवले पाहिजेत आणि कामाला सुरुवात केली पाहिजे.

असे करत राहिल्याने ही अति विचार करायची सवय अपोआपच कमी होईल.

६. दुसऱ्यांच्या बोलण्यामागचा हेतू समजून घ्या

क्वचित आपल्याला कोणी काही सांगितले, सूचना दिली, सल्ला दिला की चूक दाखवून दिली तर आपल्याला लगेच राग येतो.

मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक अढी तयार होते.

असे झाल्यावर त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीही आपल्या कानावर आले तरी आपण त्याच्याबद्दल विचार करताना पूर्वग्रह बाळगतो.

अशामुळे आपण आपलेच नुकसान करून घेत असतो हे आपल्या लक्षात येत नाही.

लोकांच्या सूचनांचा अर्थ लावत, त्या सूचनांमुळे लोकांबद्दल मत तयार करून आपण एकप्रकारे आपली विचारशक्ती वाया घालवत असतो.

सांगणाऱ्याचा हेतू स्वच्छ असू शकतो. असे न करता त्यांनी अमुक सूचना का केली असेल? त्यामुळे खरेच आपल्यात सुधारणा होऊ शकते का? असे विचार करून आपण आपला फायदा करून घेऊ शकतो.

७. तुमच्या विचारांवर इतरांचा प्रभाव पडू देऊ नका

जर आपले विचार पक्के नसतील तर आपल्यावर इतरांच्या मतांचा प्रभाव फार पटकन पडतो.

आपले मित्र, नातेवाईक, भावंड काय विचार करतात याचा विचार करून आपण आपले निर्णय घेतो. तसेच इतर आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल, ते काय म्हणतील हे सुद्धा सतत आपल्या विचारांमध्ये असते.

तसे न करता, आपण स्वतः ठामपणे विचार करायची क्षमता अंगिकारली पाहिजे.

आपल्याला जर हे जमत नसेल तर त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. आपले विचार, आपले निर्णय हे केवळ आपलेच असले पाहिजेत.. इतरांचे नाही.

८. विचारांना दाबून ठेऊ नका

जेव्हा सकारात्मक विचारांचे महत्व अधोरेखित केले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की नकारात्मक विचार येउच द्यायचे नाहीत.

असे करणे शक्य नाही कारण डोक्यात नकारात्मक विचार येणारच. एखाद्याबद्दल राग, एखाद्या गोष्टीबद्दल असुरक्षितता, दु:ख, हळहळ हे सगळे विचार कधीनाकधीतरी आपण करणारच.

त्यामुळे राग-लोभ, दु:ख आणि असे इतर नकारात्मक भावनांचे विचार आपल्या मनात आले तर ते येऊ द्यावे. त्यांना थोपवले तर ते मनाच्या कोपऱ्यात लपून राहतात.

आणि वेळोवेळी डोके वर काढून आपल्याला वर आपल्या आजूबाजूच्यांना त्रास देत राहतात. पण जर त्यांना येऊ दिले तर ते जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने त्यांचा आवेश शांत सुद्धा होतो.

त्यामुळे जर नकारत्मकता आपल्या आत भिनणे नको असेल तर त्या विचारांना पूर्णपणे थोपवून काही फायदा नसतो हे लक्षात घेतले पाहिजे.

मित्रमैत्रिणींनो, आपल्या विचारांमध्ये प्रचंड ताकद असते… या ताकदीचा योग्य प्रकारे उपयोग करणे हे आपल्या हातात असते. यासाठी या टिप्सचा वापर नक्की करून बघा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “सशक्तपणे विचार करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा”

  1. खुप छान माहिती मनापासून धन्यवाद 🙏 आणि मनाचे talks टीमच्या या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय