हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

स्मिता लहानपणापासून तशी हळवीच होती. आई बाबा जरा मोठ्या आवाजात तिच्याशी बोलले की हिच्या डोळ्यात लगेच पाणी.

तिचा स्वभाव बघून कॉलेज मधल्या मुली तिची जास्तच टर उडवायच्या. मनमोकळं जगण्यापेक्षा आपल्याला कोणी काही बोलतंय का याकडे तिचं जास्त लक्ष….

लग्न होऊन सासरी आली तर सासू खाष्ट आणि नवरा अगदीच बेताचं बोलणारा. नवख्या घरात कसं वावरायचं तिला काही उमगेना.

जिथे तिथे गोंधळ. एवढी शिकली सवरलेली मुलगी पण सगळ्यांचा समज झाला, ही अगदी वेंधळी आहे. ‘हिच्या शिक्षणाचा उपयोग काय’ असे टोमणे तर उठता बसता मिळायला लागले.

बिचारीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार. हा बुक्क्यांचा मार टाळायला तिला निर्भिडपणे तोंड उघडणं गरजेचं होतं.

ती ‘हळवी आहे पण दुबळी नाही’ हे सिद्ध होणं गरजेचं होतं. त्यासाठी अगदी समुपदेशक हवा असं नाही पण तिला समजून घेणारं आणि समजून सांगणारं हक्काचं कोणीतरी जवळ हवं होतं.

माणसानं भावनीक असावं पण त्याचा त्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. मग कोणीतरी गॉड फादर भेटला आणि स्मितानं काही गोष्टी आमलात आणायला सुरुवात केली.

त्यासाठी तिने स्वतःमध्ये काय बदल केले, ते पुढे या लेखात वाचा…

१. तुम्हाला जे वाटतं ते लिहून काढा…

मन मोकळं करायचं असेल तर स्वतःची दैनंदिनी लिहीणं उत्तम पर्याय आहे. जे तुमच्या स्वतःच्या भाषेत असेल.

व्याकरण शुद्ध आहे का, अक्षर सुवाच्य आहे का, विषयाची मांडणी बरोबर आहे का अशा तांत्रिक चुका काढून कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही.

हे लिखाण केवळ तुमचं आणि तुमचंच असेल. नेमके कशामुळे तुम्ही दुखावले जाता हे त्यातून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे.

२. नेमके मुद्दे लक्षात घ्या…

जे लिहून काढलं ते तुम्हीच नीट वाचा. कुठं आणि काय बिनसलं ते समजून घ्या. स्वतःचीच चूक असेल आणि ती इतर कोणी दाखवून दिली तर नाराज होऊ नका.

जमलं तर सुधारा नाहीतर त्याकडे दुर्लक्ष करा. चुका दाखवणारी माणसं येतील आणि जातील. त्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका.

३. स्वतःच्याच बाबतीत कठोर होऊ नका…

भावनिक असणं, हळवं असणं हे यात काही वावगं नाही. पण त्याचा अतिरेक होऊन स्वतःलाच त्रास होत असेल तर मात्र विचार केला पाहिजे….

हेच जर दीर्घकाळ चालू राहिलं तर केवळ मानसिक ताणतणाव निर्माण होतात. सतत नाराज असल्यासारखं वाटतं. नको ते विचार डोक्यात घर करायला लागतात.

अशा वेळी हे ओझं फेकून द्यायला बघा. मूड चांगला करायला गाणी ऐका, विनोदी सिनेमे बघा, फ्रेश वाटेल अशा ठिकाणी फिरायला जा. सकारात्मक गोष्टींकडे मन वळवा.

४. अति विचार करणं सोडून द्या….

‘अति तिथे माती’…. अति विचार केला की त्याचा त्रास हा होणारच.

अशा वेळी ज्या गोष्टी होण्याची शक्यता नाही त्याचाही विचार डोक्यात घोळायला लागतो. आपण नकारात्मक विचार केल्यावर परिणाम असा होतो, की लोक आपल्याकडे त्याच दृष्टीने बघायला लागतात आणि आपलीच समाजातली प्रतिमा बिघडते.

स्वतःला शांत आनंदी ठेवायचं असेल तर असे नकारात्मक विचारांचे बंगले बांधणं सोडून द्या.

५. विचार करून प्रतिक्रिया द्या….

एखादी गोष्ट खुपली तर लगेच प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. थोडंसं थांबा.

जमलं तर दोन पावलं मागं जा. वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. बारीक सारीक गोष्टींवरून एखाद्याबद्दल गैरसमज करून घेणं, नकारात्मक विचार करणं टाळा.

कदाचित परिस्थिती चुकीची असेल. गैरसमज होऊन माणसं तोडण्यापेक्षा परिस्थिती समजून घेता येईल का ते बघा. क्षणाचा राग कायमचं दुखवू शकतो.

आपण केलेल्या कृतीचं दरवेळी कौतुक व्हायलाच हवं असं नाही. कोणी कौतुक करत नाही म्हणून खट्टू होऊन सकारात्मकता सोडायची नाही.

६. स्वतःलाच प्रश्न विचारा आणि उत्तर शोधा…

एखाद्याने आपली चूक दाखवली तर फारसं वाईट वाटून घेऊ नका. चूक सुधारण्याचा जरूर प्रयत्न करा.

आजूबाजूचे लोक वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. आपल्या अपेक्षेप्रमाणेच सगळे असतील असं नाही.

त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारायला शिका. इतरांकडून मिळणारी प्रतिक्रिया किती योग्य आहे ते बघा.

दरवेळी अशा गोष्टी मनाला लावून घेतल्याच पाहिजेत असं नाही. जिथल्या तिथे सोडून देता आल्या पाहिजेत.

७. प्रत्येक गोष्ट तुमच्या बाबतीतच घडते असं नाही…

चारचौघांसारखे आपण असतो. जे इतरांच्या आयुष्यात घडतं तसंच काहीसं आपल्या आयुष्यात घडतं.

प्रत्येकाला आपापल्या समस्या सोडवायच्या असतात. त्यामुळे काही कुरबुरी होऊ शकतात. भांड्याला भांडं लागून आवाज होतोच.

नवरा बायको दोघही नोकरदार असतील, दोघांनाही कामाचा ताण असेल तर घरच्या कामावरून थोडीफार तू तू मैं मैं होणारच. म्हणून काही मलाच सगळे त्रास द्यायला बघतात असा समज करून घेऊ नये. शांतपणे तडजोड करावी. पेच सोडवताना एक घाव दोन तुकडे असं धोरण ठेवू नये. अशाने फक्त स्वतःचच नुकसान होतं.

८. संयम ठेवा…

कोणाच्याही स्वभावात एकदम बदल होत नाही. अति हळवेपणा कमी करायलाही वेळ लागतो. तेवढा वेळ स्वतःला द्या.

झटपट बदलाची अपेक्षा स्वतःकडून ठेवू नका. हळूहळू स्वतःमध्ये बदल करा. त्यातून मिळणारी शांतता अनुभवा.

आतताईपणाने निर्णय घेणं, प्रतिक्रिया देणं टाळा. परिस्थितीचा शांतपणे विचार करायला शिका. त्यातून मिळणारे अनुभवच तुमचा अति हळवेपणा कमी करतील.

निनादची आजी त्याला आशीर्वाद देताना नेहमी म्हणायची, ‘शहाणा हो, हुशार हो, मोठा हो’…

आजूबाजूची परिस्थिती माणसाला शहाणं बनवते. अटीतटीच्या प्रसंगी हुशारीनं वागता आलं पाहिजे.

अवखळपणा सोडून संयम ठेवला, हळवेपणा कमी केला तर अनुभवातून माणूस आपोआपच मोठा व्हायला लागतो.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

1 Response

  1. विजय says:

    खुपच छान ऊपयुक्त लेख असेच लेख पोस्ट करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!