आपल्या गरजेच्या वेळी, हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्यास किंवा कोणत्याही औषधोपचारांसाठी पैसे मिळावेत म्हणूनच बरेचजण असा हेल्थ इन्शुरन्स काढतात. आणि जे काढत नाहीत त्यांनी तो काढावा. कारण आजाराच्या वेळी तो खूप मोठा आधार होतो.
जेव्हा पॉलिसीधारकांपैकी कोणी आजारी पडतो आणि क्लेम येतो तेव्हा वेळीच योग्य त्या गोष्टी करणे गरजेचे असते. बरेच लोकांचा अनुभव असाही असतो कि, क्लेम केल्यावर अनेकदा तो क्लेम रिजेक्ट होतो किंवा क्लेमचे संपूर्ण पैसे मिळत नाहीत.
काही प्रमाणातच पैसे मिळतात. असे झाले कि मग आपल्याला धक्का बसतो. आपला मेडिकल इन्शुरन्स आहे या विचाराने आश्वस्त असणारे आपण असा क्लेम रिजेक्ट झाला की अस्वस्थ होतो. त्यातूनच मग इन्शुरन्स कंपनी चांगली आहे की नाही, आपण योग्य पॉलिसी काढली आहे की नाही अशा शंका मनात येतात.
असे नक्की का होत असेल? इन्शुरन्स कंपन्या ग्राहकांची फसवणूक करतात का? का आणखी काही कारण असू शकते?
खरे तर बहुतांश वेळा ग्राहकाला हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे नियम नीट माहीत नसल्यामुळे अशा घटना घडतात. आज आपण अशीच पाच महत्त्वाची कारणे जाणून घेऊयात ज्यामुळे मेडिक्लेम पॉलिसीचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.
१. प्रपोर्शनेट डिडक्शन (प्रमाणबद्ध कपात)
बरेच वेळा पॉलिसी धारकाकडून क्लेम करताना हा मुद्दा विचारात घेतला जात नाही. जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या नियमाप्रमाणे हॉस्पिटलमधील विशिष्ट प्रकारच्या खोलीसाठी एलिजिबल असेल तर त्यापेक्षा महाग दर असणाऱ्या खोलीत तो राहू शकत नाही.
तसे केल्यास वरचे पैसे पॉलिसीधारकाला स्वतः भरावे लागतात. उदाहरणार्थ पॉलिसी धारकाच्या पॉलिसीच्या नियमाप्रमाणे तो दरदिवशी रु. ५०००/- दर असणाऱ्या खोलीत राहू शकत असेल आणि तो रु.१००००/- दर असणाऱ्या खोलीत राहिला तर फरकाची रु. ५०००/- ही रक्कम त्याला स्वतः भरावी लागते.
ती क्लेम मध्ये सेटल होऊ शकत नाही. अशाच पद्धतीने ह्या प्रमाणात संपूर्ण क्लेमच्या रकमेतून कपात केली जाते. हे नियम माहीत नसल्यामुळे पॉलिसीधारकाच्या ते लक्षात येत नाही आणि आपला संपूर्ण क्लेम सेटल झाला नाही असे त्यास वाटते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये खोलीची आणि इतर सुविधांची निवड करताना आपल्या पॉलिसीची संपूर्ण माहिती आधी असणे आवश्यक असते.
२. आधीपासून असणाऱ्या आजारांची माहिती न देणे
मेडिक्लेम इन्शुरन्सच्या बाबतीत पॉलिसीधारकाला आधीपासुन असणारे आजार हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. पॉलिसीची सुरुवात करताना धारकाने स्वतःला असणारे सगळे आजार, झालेल्या शस्त्रक्रिया या सर्वांची माहिती देणे अतिशय आवश्यक असते.
अन्यथा अशी माहिती नंतर उघड झाल्यास ती ग्राहकाच्या विरोधात वापरली जाऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांशी निगडित असणाऱ्या आजारांना मेडिक्लेम पॉलिसीमध्ये सुरुवातीपासून कव्हर मिळत नाही.
त्यासाठी इन्शुरन्स कंपनीच्या नियमांप्रमाणे २ ते ४ वर्षे थांबावे लागू शकते. त्या मुदतीआधी असा आजार उद्भवल्यास केलेला क्लेम सेटल होत नाही. त्यामुळे पॉलिसीची सुरुवात करताना आपल्याला असणाऱ्या सर्व आजारांची आधीपासून कल्पना देणे आणि त्या संदर्भातील सर्व नियमांची माहिती करून घेणे अतिशय आवश्यक आहे.
३. योग्य आणि रास्त असणाऱ्या बिलांचा क्लेम सेटल होतो
जरी मेडिक्लेम पॉलिसी किंवा हेल्थ इन्शुरन्स काढलेला असेल तरी असे अजिबात नाही की हॉस्पिटलचे बिल कितीही झाले तरी इन्शुरन्स कंपनी ते पैसे देईल.
इन्शुरन्स कंपनीकडून हॉस्पिटलने आकारलेल्या बिलाची संपूर्ण तपासणी केली जाते आणि सध्याच्या काळात लागू असणारे दर आणि वाजवी रक्कम आकारलेली असेल तरच क्लेम सेटल होतो.
अवास्तव बिल, विनाकारण लावलेला खर्च इन्शुरन्स कंपनीकडून दिला जात नाही. असे करणारे हॉस्पिटल इन्शुरन्स कंपन्यांकडून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जाते. सध्याच्या परिस्थितीत एखाद्या आजारासाठी येणारा खर्च किती असेल ह्याची नीट चौकशी करून मगच आपले हॉस्पिटल निवडावे.
सरासरी खर्चापेक्षा खूप जास्त दर आकारणाऱ्या हॉस्पिटलची निवड केल्यास आपला क्लेम रिजेक्ट होऊन बिल स्वतः भरावे लागू शकते. इन्शुरन्स कंपनीच्या अशा नियमामुळे हॉस्पिटलला देखील रास्त दर लावणे बंधनकारक होते.
४. वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंचा खर्च दिला जात नाही
हॉस्पिटलकडून वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू जसे की मास्क, डिस्पोजेबल हातमोजे, कापूस, सॅनीटायजर आणि इतर अनेक वस्तू यांचा खर्च इन्शुरन्स कंपनीकडून दिला जात नाही. तो खर्च पेशंटला स्वत: करावा लागतो. या खर्चाची एकूण रक्कम संपूर्ण बिलाच्या २ ते १० % इतकी असू शकते.
इन्शुरन्स कंपन्यांच्या नियमांप्रमाणे सदर खर्च पेशंटला स्वतः करावा लागतो. ह्या वस्तूंना कंझ्यूमेबल्स असे म्हणतात. ह्या वस्तूंमध्ये पेशंटसाठी वापरली जाणारी हियरिंग एड्स, चष्मे, हेअर रिमूविंग क्रीम देखील समाविष्ट असते. जर अशा वस्तूंचा खर्च इन्शुरन्स कंपनीने देणे अपेक्षित असेल तर तशी तरतूद असणारीच पॉलिसी घेणे आवश्यक आहे.
५. विनाकारण हॉस्पिटल मध्ये भरती होणे
जर एखादा रुग्ण विनाकारण हॉस्पिटल मध्ये भरती झाला तर त्यासंबंधीचा खर्च इन्शुरन्स कंपनी देत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या पन्नाशीच्या व्यक्तीच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे तिला दवाखान्यात आणले जाते.
जास्त काही झालेले नसते परंतु ऑब्झर्वेशनसाठी दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तेव्हा अशा वेळी होणारा खर्च हेल्थ इन्शुरन्समध्ये समाविष्ट केला जात नाही कारण सदर व्यक्तीला प्रत्यक्षात कोणतीही ट्रीटमेंट दिली जात नाही. फक्त देखरेखीखाली ठेवलेले असते.
अशाच पद्धतीचा अनुभव कोवीड पेशंट्सना देखील येत आहे. कोविड पेशंट केवळ विलगीकरणासाठी दवाखान्यात दाखल झाल्यास त्याचा खर्च इन्शुरन्स कंपनी देत नाही. काहीतरी आजार झालेला असून त्यावर प्रत्यक्ष ट्रीटमेंट होणे क्लेम सेटल होण्यासाठी आवश्यक असते. अन्यथा काही हॉस्पिटल्स विनाकारण रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांची लूट करू शकतात.
तर ही आहेत अशी पाच प्रमुख कारणे ज्यामुळे मेडिक्लेमचे क्लेम सेटल होत नाहीत किंवा क्लेमची संपूर्ण रक्कम मिळत नाही. त्यामुळे आपली मेडिक्लेम पॉलिसी निवडताना या सर्व कारणांचा तसेच आपल्या तब्येतीचा संपूर्ण विचार करा.
इन्शुरन्स कंपनीचे सर्व नियम आधी माहीत करून घ्या आणि मग आपल्याला सूटेबल असेल अशीच मेडिक्लेम पॉलिसी निवडा. म्हणजे भविष्यात गरज पडेल तेव्हा उपचारांवर होणारा संपूर्ण खर्च आपल्याला मिळू शकेल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
या लेखाद्वारे खूप महत्वाची व उपयुक्त माहिती मिळाली. पुष्कळ वेळा अपुऱ्या माहितीमुळे आपण इन्शुरन्स कंपन्यांना दोष देतो.
धन्यवाद.