एक विलक्षण आयुष्य जगलेल्या ‘ललिता पवार’ यांचा जीवनपट

lalita pawarयुट्युब खंगाळताना एक दिवस मला एक व्हिडियो मिळाला. किती तरी वर्षांनी आज अचानक हा व्हिडीयो हाती आला. मना सारखा…एका मुलाखती दरम्यान ती बोलत होती…… वडीलां बद्दल, भावा बद्दल….. अगदी भरभरून… तिच्या चेहऱ्यावर फारशा सुरकुत्या नव्हत्या पण जेवढ्या होत्या त्या प्रत्येक सुरकुतीत आपल्या वडील आणि भावा संबंधीची अफाट करूणा दडलेली मला स्पष्ट दिसत होती…….. ती म्हणत होती, “ माझे वडील खूपच भावनाशील… ते मला मुलगी नव्हे तर मुलगाच समजत.

प्रचंड प्रेम करत माझ्यावर. माझ्यात जे काही आलंय ती सर्व त्यांचीच देण. साने गुरुजींवर त्यांची नितातं भक्ती. त्यांचेकडे ते नेहमीच जातयेत असत. भाऊ देखिल तितकाच प्रेमळ… मी तर म्हणेन माझ्या पित्या सारखा पिता आणि माझ्या भावा सारखा भाऊ जगात कुणालाच लाभला नसेल….

माझ्या संबंध आयुष्यात या दोघां शिवाय माझे कुणीच नव्हते आणि नाही” डोळ्यातले पाणी अडवताना तिचा सत्तरी पार केलेला देह गद्गद्त होता. तिचे असे भरून आलेले डोळे मी पहिल्यांदाच बघत होतो आणि हा अभिनय मुळीच नव्हता. हे अश्रू खरेच होते. पडद्यावर तिच्या डोळ्यातुन पाझरलेले असे अश्रू क्वचितच दिसले असतील.

लहाणपणी ती भावा सोबत रामलीला बघायला जायची. तिला खूप आवडायाची रामलीला. भाऊ स्वत:ही त्यात काम करत असे. तिचं नाव ‘अंबिका लक्ष्मण सगूण’ आणि भावाचे नाव ‘शांताराम लक्ष्मण सगूण’. वडील लक्ष्मणराव रेशीम आणि सुती कापडांचा व्यापार करत. वडील आणि भाऊ तिला सर्व प्रेमाने अंबू म्हणत. नाशिक जवळचे येवला हे गाव तिचे जन्मस्थान. पण तिचे निम्मे आयुष्य इंदोर तर निम्मे पुण्यातच गेले.

त्यावेळी चित्रपट प्रकार काय असतो हे तिला अजिबातच माहित नव्हतं. त्यावेळी ती आपल्या आत्याच्या घरी पुण्यात आली होती. तिच्या कानांवर “पिक्चर बघायला जावू…… “पिक्चर बघायला जावू” असे संवाद नेहमीच ऐकू येत. मग एक दिवस ती गेली पिक्चर बघायला. तिने बघितले की पांढऱ्या भितिंच्या समोर एका बाजूला पुरूष आणि एका बाजूला स्त्रीया बसलेल्या आहेत. तिल्या आश्चर्य वाटलं….

इथे तर एकही गॅसबत्ती दिसत नाही, सगळीकडे अंधारच अंधार..मग या अंधारात काय बघायचं? रामलील कशी दिसणार या अंधारात? तिच्या बालमनाला काही समजेना. थोड्या वेळाने समोरच्या पांढऱ्या भिंतीवर काही पाट्या दिसू लागल्या. मग कधी हात तर कधी चेहरा तर कधी शरीराचे दुसरे अवयव.

तिला समजेना शरीराचे असे तुकडे तुकडे का दिसत आहेत? रामलीलेत तर असे काहीच दिसत नाही. ती चक्क घाबरली व बाहेर पळाली. मग तिला अशी माहिती मिळाली की भिकादास मारूती मंदीरात जर ती गेली तर तिला इथे पाहिलेल्या रामलीलाचा खुलासा होईल.

Lalita Pawarदुसऱ्या दिवशी मग ती तिथे गेली. तिथे एक शाळा होती. शाळा फक्त अर्धा दिवसच चालायची. मुलांना अर्धा दिवसा नंतर सुट्टी मिळायची. ती अशासाठी की तिथे चित्रपटाचे शुटींग चालायचे. ती तिथे पोहचली तर समोरच्या भितींवर काही तरी बघत खूपजण बसलेले.

मग एकाजणाच्या खांद्ययावर चढून समोर काय चाललंय ते बघायचा ती प्रयत्न करू लागली एवढ्यात लाकडाची एक फळी तिच्या हातावर पडली आणि हात चांगलाच कापला गेला. समोर एका टेबलावर त्यावेळचे प्रसिद्ध कॅमरेमन वाय.डी.सरपोदार चित्रण करत होते. त्यांच्या बाजूलाच इंद्र देवाचा मेकअप केलेला कलाकार उभा होता.

तो धावत अंबू जवळ आला आणि तिला उचलून आत नेले. तिच्या हातातून रक्त येत होते. आत आल्यावर अंबूचे लक्ष आजूबाजुला गेले आणि तिला आश्चर्यच वाटले. काल ज्या पांढऱ्या भितींवर आपण ज्यांचे कधी हात, कधी तोंड तर कधी अर्धे शरीर तुकड्या तुकड्याने बघत होतो ते सर्वचजण तिथे उपस्थित आहेत आणि चांगले शाबूत आहेत. ती हाताचे दुखणेही विसरून गेली. मग एक व्यक्ती आत आली आणि जोरात तिला म्हणाली- “अरे कशाला तडफडता इथे? आम्हाला जरा शांतपणे काम का करू देत नाहीत तुम्ही लोक? कशाला आली तू इथे?”

यावर अंबू म्हणाली- “काल मी तिकडे रामलीला बघायला गेली होती पण त्यात सगळे शरीर तुकड्या तुकड्याने दिसत होते म्हणून इकडे आले की रामलीला कशी दिसते.” यावर ती व्यक्ती एकदम शांत होत म्हणाली- “तुला रामलीला आवडते का? तू करशील का काम रामलीले मध्ये?”

यावर अंबू म्हणाली – “हो करेन की.” ……काय चाललंय हे बघण्यासाठी धडपडणारी अंबू चित्रीकरणाच्या सेटवर जी पडली ती पुन्हा बाहेर आलीच नाही. तिच्या आयुष्यातील हा पहिला अपघात घडला तेव्हा ती १२ वर्षांची होती. आणि या अंबूला पूढे तिच्या अभिनयाच्या जोरावर ललिता पवार या नावाने अख्खं जग ओळखणार होतं.

काही व्यक्तींचं अख्खं आयुष्यच अपघातानं भरलेलं असतं. आणि या अपघातामुळे आयुष्यला सतत वेगवेगळी वळणं मिळत राहतात. चित्रपटाचे चित्रीकरण चाललं आहे हे कळण्याचं अंबूच वय नव्हत.

तिच्या डोक्यात रामलीला घट्ट होतं. आर्यन पिक्चर्स या त्यावेळच्या प्रसिद्ध कंपनीचे तिथे चित्रकरण चालू होतं आणि जी व्यक्ती अंबूवर ओरडली होती ते होते प्रसिद्ध दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदार. अंबूला चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती पण तिच्या अबोध मनाला इतकेच समजले होते की आपण रमालीलेत काम करणार आहोत.

Lalita Pawarअंबूला टांग्यात बसवून नाना सरपोतदार तिच्या घरी गेले. घरा जवळ टांगा येताच अंबू उडी मारून आत्याकडे पळाली व सांगतिले की तिला रामलीलेत काम करायची संधी मिळाली आहे आणि तिला काम करायची परमिशन द्या.

आत्याने परमिशन तर दिली पण चित्रपटाचे एका आठवड्याचे चित्रकरण पूर्ण झाले असेल नसेल तोच वडील आले आणि तिला आपल्या घरी घेऊन् जाण्याची तयारी करू लागले. अंबू खट्टू झाली.

तिने वडीलानां सांगितले की मी रामलीलेत काम केले आहे तेव्हे ते काम आपण सोबत घेऊन जाऊ व नानांना सांगू की आम्ही परत जात आहोत. वडील नाना साहेबानां भेटले मग नाना साहेबांनी सर्व उलगडून सांगितले की अंबू चित्रपटात काम करत आहे आणि तिला असे मध्येच घेऊन् गेलात तर चित्रपट अर्धव्ट राहीन. वडीलानां पटले.

पण अंबू राहणार कुठे? नानासोबांनी अंबूची सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली आणि १८ रूपये प्रति महिना या वेतनावर अंबू एकदाची या मायावी नगरीत दाखल झाली.

आर्यन फिल्मच्या जवळपास ३-४ चित्रपटात अबूंने काम केले. नंतर अंबूला स्वतंत्रपणे काम करण्याच्या ऑफर्स येत गेल्या. हा काळ मूक चित्रपटांचा होता. १९२८ ते १९३४ या काळात गनिमी कावा, आर्य महिला, सुभद्रा हरण, श्री बालाजी, पृथ्वीराज संयोजिता, प्रिन्स ठकसेन, पारिजातक, चतूर सुंदरी, श्रीकृष्ण माया, मस्तीखोर माशूक, कैलास भवानी तलवार वगैरे वगैरे.

मराठी व हिंदी असे दोन्ही चित्रपट यात होते अर्थात भाषा कोणतीही असली तरी चित्रपट मूकच होते. नंतर चित्रपट बोलू लागले. बोलपटातही अंबूला कामे मिळू लागली. त्याकाळात निर्माते दिग्दर्शक वजा जाता चित्रपटात कुणाचेही नाव नामावलीत नसत आणि असलीच तरी मूळ नाव नसे.

त्यामुळे चित्रपटागणिक अभिनेत्रीचे नाव बदलले जाई. हा काळ तो होता जेव्हा स्त्रियांनी चित्रपटात काम करणे वाईट समजले जाई त्यामुळे कदाचित मूळ नाव दाखवले जात नसावे.

१९३५ मध्ये “हिम्मते-मर्दा” हा चित्रपट प्रदर्शित झाला. मास्टर भगवान या चित्रपटाचे नायक होते आणि अंबू नायिका. हा चित्रपट खूप चालला. या चित्रपटाने अंबूला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि जीवनसाथी देखिल. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गणपत पवार. या चित्रपटाच्या दरम्यान दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्नही केले.

या चित्रपटा नंतर ‘अंबू लक्ष्मण शगुन’ झाली ‘ललिता गणपत पवार’ आणि नंतर फक्त ‘ललिता पवार’. त्यांच्या कारिर्दीची जोमात सुरूवात झाली. मद्रास, मुंबई, पुणे असे दौरे सुरू झाले. १९३८ मध्ये त्यांनी स्वत:एका चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट होता “दुनिया क्या है”. घनश्याम, माधव काळे, इंदिरा वाडकर (चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांची आत्या) हे मूख्य भूमिकेत होते. या चित्रपटात ललिता पवार यांनी वेश्येची भूमिका केली होती.

दिग्दर्शक अर्थातच गणपत पवार हे होते. या चित्रपटात सर्व प्रथम त्यांनी आपले नाव ललिता पवार असे ठेवले जे नंतर त्यांच्या मृत्यू पर्यंत कायम राहिले. हे सर्व व्यवस्थित चालू असतांना एक अपघात त्यांची जणू वाटच बघत होता. हा अतिशय जीवघेणा आणि वेदनादायी ठरणार होता आणि याचा सुगावा कोणालाच नव्हता.

Lalita Pawar१९३९ मध्ये ललिताजी कोल्हापूरला भालजी पेंढारकर यांच्या “नेताजी पालकर” या चित्रपटाचे शुटींग करत होत्या. एकदा मास्टर भगवानदादा त्यांच्याकडे आले आणि त्यांनी ते दिग्दर्शन करत असलेल्या एका चित्रपटात काम करण्याची विनंती केली.

स्वत: भगवानदादा, चंद्रराव कदम (हे सहनिर्माते पण होते), ललिता पवार या चित्रपटात मूख्य भूमिकेत होत्या. चित्रपटाचे नाव होते “गुनेहगार”.

यात एक प्रसंग असा होता- दोन गावच्या मुखियांचे वैर असते. यातील एका मुखियाची मुलगी ललिता पवार असते. तिला किडनॅप करण्यासाठी एका तळ्या जवळ मास्टर भगवान येतात. तळ्यात तरूणी अंघोळ करत असतात. यात मूख्य नायिका पण असते.

तिच्यात आणि मूख्य नायक मास्टर भगवान यांच्यात वाद होतो आणि नायक एक जोरदार थप्पड तिला मारतो. सिन ओके झाला. पण ललिता पवार खाली कोसळल्या. त्यांच्या डाव्या कानातुन रक्त येऊ लागले. भगवान दादा मुळातच पैलवान. त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक जोरात थप्पड मारली होती.

ललिताजींना लगेच हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यानां पॅरालेसिसचा झटका आला. जवळपास दोन वर्षे त्या बेडवर होत्या. या आजारपणात त्यांच डावा डोळा बारीक झाला. अवघ्या २३ व्या वर्षी अत्यंत व्यस्त आणि लोकप्रिय होऊ घतलेल्या एका अभिनेत्रीसाठी हा अपघात साधासुधा कसा असेल?

या अपघाताने त्यांच्याकडे असलेले सर्व चित्रपट करार रद्द झाले शिवाय एक वगळता. मास्टर विनायक (अभिनेत्री नंदाचे वडील) यांच्या “अमृत” या चित्रपटात त्या नायिका होत्या. मास्टर विनायक म्हणाले – “तुमच्या शिवाय हा चित्रपट दुसरा कोणी करणार नाही मी वाट बघतो”.

आणि खरंच ते दोन वर्षे थांबले. ललिता पवार पूर्ण बऱ्या झाल्यावर मगच चित्रपटाचे शुटींग सुरू केले. या चित्रपटा नतंर मात्र त्यानां नायिकेच्या भूमिका मिळणे बंद झाले वाट्यास आल्या त्या चरीत्र नायिका. या अपघाताने त्यांच्या नायिकेच्या प्रवासाला जबरदस्त खिळ बसली.

यातुन सावरणे खरोखरच अत्यंत अवघड होते. एकाद-दुसरी कुणी असती तर हताश होऊन कायमची अंधारात गेली असती. पण ललिता पवार यांनी मात्र मनाशी नक्की केले, काहीही झाले तरी आता परत फिरायचे नाही. तुम्हा आम्हाला ज्या ललिता पवार माहित आहेत त्या चरीत्र अभिनेत्री म्हणून.

अपघात झाला नसता तर कदाचित एक यशस्वी नायिका म्हणून त्यांची नोंद झाली असती……पण तरीही उत्कृष्ट चरीत्र अभिनेत्री म्हणून त्यांची दखल चित्रपटसृष्टीला घ्यावी लागलीच.

१९४४ मध्ये प्रदर्शित झाला प्रभातचा “रामशास्त्री” हा महत्वकांक्षी चित्रपट. २८ वर्षांच्या ललिताबाई यात होत्या त्या चरीत्र अभिनेत्री म्हणून. पूढच्या वर्षी आलेल्या “यतीम” चित्रपटामध्ये त्या नायकाची आई बनल्या.

संतान, झुमके, जय मल्हार, रंग महाल, फूल और काँटे, संत नामदेव, धन्यवाद, मानाचं पान, दिल की बस्ती असा प्रवास सुरू झाला. १९४८ मध्ये त्या एकाच वेळी दोन चित्रपटाचे शुटींग करत होत्या. पैकी एक होता “गृहस्थी” आणि दुसरा व्ही.शांताराम यांचा “दहेज” दोन्ही चित्रपटात दोन टोकाच्या भूमिका होत्या.

गृहस्थी मध्ये अत्यंत प्रेमळ आई तर दहेज मधली अत्यंत कजाग सासू. गृहस्थी खूप चालला. यातील कोणाची भूमिका चांगली झाली यासाठी पब्लिक मतदान ही निर्मात्याने घेतले व तो मान ललिताबाईनां मिळला. चित्रपटातील त्यांची प्रेमळ आई सर्वांनाच खूप आवडली. ५ तोळे वजनाचे विशेष पदक त्यांना त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच हस्ते बहाल केले.

Lalita Pawarललिताबाईंचा जीवना बद्दलचा दृष्टीकोन कायम सकारात्मक असल्यामुळे आणि वास्तवाचा स्विकार केल्यामुळे त्या चित्रपटसृष्टीत आपले नाणे खणखणीतपणे वाजवू शकल्या. त्या जेव्हा शांताराम बापूकडे काम करत असत तेव्हा मेकअपरूम मध्ये कधीच जास्तवेळ बसत नसत. कायम सेटवर बसून बारकाईने निरीक्षण करत असत.

या निरीक्षणात अभिनेत्यांच्या अभिनयाचेच नाही तर तत्रंज्ञ कसे काम करतात याचाही त्या अभ्यास करीत असत. अशाच एका प्रसंगी त्या एकदा शांताराम बापूंना म्हणाल्या की “या प्रसंगाचे परत चित्रीकरण तुम्हाला करावे लागेल”.

बिनचूक काम करणाऱ्या बापूनां राग आला. ते म्हणाले – “का करावे लागेल परत?” त्यावर ललिताबाई म्हणाल्या “काल या अभिनेत्रीने जी साडी घातली होती ती आज वेगळी आहे. कन्टीन्युनीटाचा प्रॉब्लेम होऊ शकतो.”

यावर बापू म्हणाले “तुला कसे माहित ?”. यावर बाई म्हणाल्या “काल शुटींग चालू असतानां मी येथे होते आणि त्यात आज जी साडी घातलेली आहे ती काल नव्हती”. बापूनी खात्री करून घेतली. त्यानां असे समजले त्यांचे काम संपले तरी त्या संपूर्ण पॅकअप होई पर्यंत सेट सोडत नाहीत. नंतर त्या बापूच्या खास आवडत्या कलावंत झाल्या.

१९५२ मध्ये त्यांचे ११ चित्रपट प्रदर्शीत झाले. यापैकी महत्वाचे म्हणजे- अमर भूपाळी, राजा हरिश्चंद्र, परछायीयाँ, दाग, छत्रपती शिवाजी, ठोकर आसमान वगैरे. १९५२ मधील अमिया चक्रवर्ती यांच्या “दाग” आणि “पतीता” मध्ये अनुक्रमे दिलीप कुमार व देव आनंद यांच्या आईच्या भूमिकेत त्या होत्या आणि त्यांनी तेव्हा पस्तिशी देखील पार केली नव्हती. “दाग” मधील आई अत्यंत गरीब आणि दारिद्र्यात आपल्या मुलाचं संगोपन करणारी तर “पतीता” मध्ये उच्चकुलीन सुविद्य मुलांची खानदानी आई. एकीकडे व्याकूळ, हतबल तर दुसरीकडे खानदानी ईभ्रत सर्वस्व मानणारी करारी. १९५५ मध्ये राजकपूरचा ‘श्री ४२०’ आला. त्यातली महाराष्ट्रीयन केळेवाली तर केवळ अप्रतिमच आहे.

त्याच वर्षीचा गुरूदत्तच्या “मिस्टर अन्ड मिसेस-५५” मधील पुरूषांच्या पुरूषी वर्चस्वा विरूद्ध तलाक बिलासाठी आग्रह धरणारी सितादेवी तर अफलतुन. स्लिव्हलेस ब्लाऊज, ऐटदार केसाचा अंबाडा आणि डोळ्यावर किमती चष्मा. “पॉकेटमार” चित्रपटातील देवानंदची भोळी भाबडी देवावर अपार विश्वास असणारी आई. तर किशोरकुमारच्या “आशा” मधील खानदानी जहागिरदार ठकुराईन. ललिता पवार कोणत्याही कॅरेक्टर मध्ये शोभून दिसत आणि अभिनयातही वेगळेपणा स्पष्टपणे दिसे.

ललिता पवारने सर्वच प्रकारच्या चरित्र व्यक्तीरेखा तितक्याच ताकदीने साकार केल्या जितक्या की खलनायिका सासू. ५०-६० चे दशकात तर कजाग सासू म्हणजे ललिता पवार इतके घट्ट समिकरण झाले होते. अशा भूमिका साकार करतानां त्यांनी आपल्या डाव्या डोळ्याचा असा वापर केला की तेच त्यांचे वैशिष्ठ्य ठरावे.

खाष्ट सासूचा रागाने चढलेला पारा आणि बारीक होणारा डोळा….मला तर सुरूवातीचे कित्येक वर्षे हे माहितच नव्हते की त्यांच्या अपघातामुळे डोळ्याची समस्या आहे. आजही भारतीय परंपंरेतील सासूसुनांचे नाते खूपच बदलले आहे असे नाही. या नात्यांच्या समिकरणामुळेच कदाचित त्यांची कजाग सासू अधिक लोकप्रिय झाली.

young lalita pawar१९५९ मधील हृषिकेश मुखर्जीच्या “अनाडी” मधील वरून फटकळ पण आतुन प्रेमळ घरमालकीन डिसूजा त्यांनी अप्रतिम साकारली. अनाडी तर केवळ डिसूजाचा चित्रपट आहे. सर्व चित्रपटाचा आत्मा ही डिसा. या डिसावरच एक अख्खा लेख होऊ शकतो इतकी अप्रतिम भूमिका आहे ही.. या भूमिकेसाठी त्यानां सहअभिनेत्रीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारही मिळाला.

अशीच एक नर्स त्यांनी राजेश खन्नाच्या “आनंद” मध्येही साकारली. यातील छोट्याशा भूमिकेत त्यांनी प्राण ओतला. शम्मीकपूरच्या “प्रोफेसर” मधील कडक शिस्तीची व नंतर नकली प्रोफेसरच्या प्रेमात पडलेली सीतादेवी वर्मा….काहीशी कॉमिक ढंगातील ही भूमिका कोण विसरेल!!!!

६०-७० च्या दशकातील घराणा, हम दोनो, ससूराल, ऑपेरा हाऊस्, माया, जंगली, झुमरू, छाया, ब्लफ मास्टर, भरोसा, खानदान, लव्ह इन टोकियो, सूरज, लाट साहब, बहू बेगम, दुनिया, इज्जत, आंखे, लाख्खे मे एक, बॉम्बे टू गोवा, बुढा मिल गया, दो फूल, हमराही, गूंज…….खूप मोठी यादी आहे न संपणारी.

हिंदी, मराठी आणि गुजराती मधील आपल्या प्रत्येक भूमिकेने ललिताबाई आपली छाप सोडत. “चतुर सुंदरी” या चित्रपटात ललिता पवार यांनी चक्क १७ प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. “घराणा” मधील दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ हे त्यांच्यावर चित्रीत झालेले गाणे त्याकाळची पिढी आजही विसरली नाही.

८०च्या दशकातील टीव्ही मालिकेतील त्यांनी अजरामर केलेली भूमिका म्हणजे रामायणातील मंथरा. रामानंद सागर यांच्य या मालिके बद्दल बोलताना ललिताबाई म्हणाल्या होत्या- “मी आगोदर अनेक दागिने व उंची वस्त्रे घालून त्यांच्याकडे गेली. पण त्यांना माझा हा पेहराव नाही आवडला. मग त्यांनी मला एक विटकरी रंगाचा घागरा आणि चांदीचे कडे तोडे घालायला दिले. मला तर हा वेष धोबनचा वाटला.

मग मी ठरवले की वेष कोणताही असो मंथराला आपल्या अंगात भिनवून टाकायचे. यातील सर्व पात्रे सरळ चालतात मी मात्र तिरके तिरके चालायचे ठरविले आणि अख्खी मालिका मी तिरकी चाल चालले.” ६५ वर्षांच्या या अभिनेत्रीने मंथराच्या इतक्या विविध प्रकारच्या छटा दाखविल्या आहेत की तिच्या अभिनय क्षमतेला अख्ख्या चित्रपटसृष्टीनं सलाम केला. त्यांच्या अंगात त्या त्या व्यक्तीरेखा संचारत असत. फारशी न शिकलेल्या या अभिनेत्रीने मात्र सर्वच उच्च शिक्षित अभिनेते, सहकलाकार आणि दिग्दर्शका सोबत सहजतेने काम केले.

इतके सर्व असूनही शेवटाला त्यांची परवड व्हायची ती झालीच. पहिले पती गणपतराव पवार यांचे त्यांच्या धाकट्या बहिणी बरोबर संबंध जुळले आणि ते सोडून गेले. मग ललिताबाईनी दुसरे लग्न प्रसिद्ध निर्माते व अंबिका स्टुडियो मुंबईचे मालक राजप्रकाश गुप्ता यांच्या बरोबर केले.

१९९० मध्ये त्यांना तोंडाच्या कर्क रोगाने ग्रासले. त्या पुण्याला आपल्या सून व मुलगा जय पवार याच्याकडे आल्या. त्यांच्यावर केमो थेरपी व रेडियो थेरपीचे वेदनादायी उपचार सुरू झाले. आयुष्यभर शरीराने तसाही बराच छळ सहन केला होता तो काही माघार घ्यायला तयार नव्हता.

मी जे सुरूवातीला म्हणालो त्याप्रमाणे काहीजणांचे आयुष्य अपघातमय घटनांनी इतके भरलेले असते की शेवटही मनाला चटका लावणाराच होतो. त्यांच्या पतीच्या उपचारासाठी मुलगा व सून मुंबईला गेले होते. घरात त्या एकट्याच होत्या. २६ फेब्रुवारी १९९८ ला त्यांच्या पतीने जेव्हा फोन केला तेव्हा काहीच उत्तर मिळाले नाही. त्यांना शंका आली म्हणून ते जेव्हा घरी परतले तेव्हा घरात ललिताबाईचे निष्प्राण कलेवर दिसले.

पोस्टमार्टमच्या अहवालानुसार दोन दिवसा पूर्वीच म्हणजे २४ फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी ललिता पवार ८८ वर्षांच्या होत्या.

आजच्या पिढीला या प्रतिभासंपन्न अभिनेत्रीची फारशी माहिती असण्याची शक्यता कमीच आहे. १९६१ मध्ये ललिताजींचा भारत सरकारच्या संगीत नाटक कला अकादमीने भारतीय चित्रपटाची पहिली स्त्री असा गौरव करून राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता ती भारतीय नारी अखेरच्या क्षणी मात्र संपूर्ण एकटी होती, हे वास्तव कुठल्याही संवेदनशील मनाला नक्कीच बोचत राहील.

वाचण्यासारखे आणखी काही…..

पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका
हिंदी सिनेमाची ट्रॅजिडी क्वीन : मीना कुमारी
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय