घरामध्ये वाहणारा ऊर्जा प्रवाह घराच्या बांधकामामुळं आणि घरातल्या सजावटीमुळं प्रभावित होतो.
अगदी साध्या सोप्या गोष्टींतून तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता.
घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती
इथं असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती
आपलं घर उबदार, प्रेमळ, स्नेहपूर्ण असावं, घरी परतण्याची ओढ असावी असं तुम्हांला वाटत असतं.
घरात आलं की सगळ्या चिंता वा-यावरती उडून जाव्यात आणि नव्या दिवशी नव्या उमेदीने कामाला बाहेर पडावं हे स्वप्न मनाच्या कोपऱ्यात तुम्ही नक्की जपलं असेल.
पण तुमच्या पैकी ब-याच जणांच्या आयुष्यातलं हे स्वप्न भंगलेलं असतं.
तुम्हांला खोटं वाटेल पण ब-याच जणांना घरी जायचं म्हटल़ं की पोटात गोळा येतो.
हे असं घडण्याचं कारण तुमच्या घरातली उर्जा नकारात्मक बनली असेल.
साध्या सोप्या गोष्टींनी तुमच्या मरगळलेल्या निराश घराचं रुपांतर चैतन्यानं भारलेल्या सकारात्मक उर्जेच्या रूपात कसं करायचं ते जाणून घेऊया.
1) मुख्य दरवाजासाठी वास्तु टिप्स.
तुमच्या वास्तुत नांदणारी तत्वं तुमच्या जगण्याची दिशा बदलतात.
वास्तुच्या तत्वात सुसंवाद आणि उर्जेचा अखंड प्रवाह सामावलेला असतो.
तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा मुख्य बिंदू असतो.
जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा बाहेरून उघडणारा असेल तर हा दरवाजा घरापासून ऊर्जा दूर ढकलतो.
त्यामुळे मुख्य दरवाजा घड्याळाच्या दिशेप्रमाणे आतल्या बाजूने उघडा.
समजा तुमच्या घराचं मुख्य दार पूर्णपणे उघडत नसेल तर ते अनेक संधी अडवून धरणारं ठरतं.
मुख्य दरवाजाजवळील लॉबीत अंधार नसल्याची खात्री करा.
चांगली प्रकाशयोजना उर्जेच्या सकारात्मक प्रवाहाला प्रोत्साहन देते. त्याचबरोबर घरातलं आणि परिसरातलं संतुलन आणि सुसंवाद वाढायला मदत करते.
प्रत्येक घराच्या चौकटीला उंबरा असलाच पाहिजे. या उंब-यामुळे बाहेरच्या नकारात्मक प्रभावांपासून घराचं संरक्षण होतं.
घराचं प्रवेशद्वार स्वच्छ नीटनेटकं आहे याची वेळोवेळी खात्री करुन घ्या.
प्रवेशद्वारासमोर शू रॅक ठेवू नका, कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच समृद्धी आणि सकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करणार आहे.
मुख्य दरवाजाजवळ पाणी आणि फुलांच्या पाकळ्यांनी भरलेले भांडे ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं.
पाणी हे उर्जेचं वाहक आहे आणि स्वच्छ पाण्यामुळं सकारात्मक वातावरण निर्माण होतं.
2) पसारा आवरून ठेवा.
घरात कपड्यांचा वस्तुंचा पसारा, नको असलेल्या वस्तूंचा ढीग, तुटक्या, फुटक्या, चिरलेल्या, तडकलेल्या वस्तु असतील तर त्याची वेळच्या वेळी विल्हेवाट लावून घरातला कोपरान् कोपरा साफ, व्यवस्थित मांडलेला ठेवा.
कपडे घडी घालून जागच्या जागी ठेवा, वस्तुंना त्यांची एक जागा दया. पुस्तकं नीट मांडून ठेवा.
अडचणीच्या जागा वेळोवेळी स्वच्छ करा. कपाटं आणि ड्रावर्समध्ये कपडे, वस्तु कोंबून ठेऊ नका तर व्यवस्थितच मांडून ठेवा.
पसारा निर्माण झाला तर त्यातून अस्थिर उर्जा तयार होते जी सकारात्मक उर्जेला अडथळा आणते.
त्याचबरोबर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोळीष्टकं जळमटं तयार होऊ नयेत यासाठी नियमित सफाई करावी.
रोजच्या रोज केर काढून फरशी पुसताना त्यात खडे मीठ (समुद्री मीठ) टाका. या मीठामुळं नकारात्मक स्पंदनं कमी होतात.
3) वास्तू-अनुरूप बांधकाम
घरातील ऊर्जा आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींचं आरोग्य यांच्यात घट्ट नाते असतं.
प्राचीन स्थापत्यशास्त्र हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी आणि रंगांशी सुसंगत राहील अशा पद्धतीनंच डिझाइन केलेलं असायचं.
शुभमुहूर्तावर बांधकाम सुरु करणं, चांगल्या पद्धतीचं साहित्य वापरणं हे ही उत्तम वास्तुसाठी आवश्यक आहे.
प्रत्येक बिल्डिंगमध्ये तीन प्रकारच्या उर्जांचा वावर असतो. वैश्विक उर्जा, पृथ्वीची उर्जा आणि संरचनेची म्हणजेच वास्तुची उर्जा.
तुमचं घर आणि घराचा परिसर सकारात्मक करण्यासाठी आणि तिन्ही उर्जां एकमेकांशी सुसंगत ठरण्यासाठी, जागेच्या मध्यभागी, ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात, त्या जागी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नका.
यामुळे वैश्विक ऊर्जेचा प्रवाह संतुलित होईल.
ईशान्य कोपऱ्याला चैतन्यमय ठेवून पृथ्वीतत्वाची उर्जा संतुलित करा.
कुठलाही पसारा होणार नाही याची काळजी घेऊन वास्तुची उर्जा जपा.
छोट्या दोषांसाठी वास्तु उपाय
1) घरातली नकारात्मक उर्जा शोषून घेण्यासाठी काही भागात काचेच्या भागात समुद्री खडे मीठ ठेवा.
घरातल्या फरशा पुसताना पाण्यात हे खडे मीठ अधुनमधून आवर्जून घाला.
2) तुम्हांला तुमच्या कामात अडथळे जाणवत असतील तर दोन कापराच्या वड्या घरात ठेवा.
जेंव्हा कापूर हवेत वितळून जाईल तेंव्हा नवीन वड्या ठेवा.
3) वास्तुत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या विंड चिमचा वापर करा.
वा-यावर डोलत रुणझुणणा-या या विंड चिममुळं सकारात्मक उर्जा निर्माण होते
4) मुख्य दरवाज्याजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील.
घोड्याची नाल चांगली उर्जा खेचते असं मानलं जातं.
5) लिव्हिंग रुम कुटुंबाच्या फोटोंनी सजवली तर एकमेकांविषयी स्नेह भाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात.
6) वास्तू तज्ञांच्या मते, एखाद्या तयार घरात चुकीच्या पद्धतीनं बांधकाम झाल्याचं लक्षात आलं तर तोडफोड न करता थोडीशी हलवाहलवी करुन रचनेत बदल करा आणि वास्तुदोष टाळा.
तर मित्र मैत्रीणींनो अशा छोटया छोट्या गोष्टीतून तुम्ही घरातली आणि घराजवळची सकारात्मकता वाढवू शकता.
एक सुखी आनंदी आयुष्य एंजॉय करू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.