पांढरे डाग, कोड याची कारणे, लक्षणे आणि उपाय वाचा या लेखात

समाजात वावरताना काही व्यक्तींच्या अंगावर पांढरे डाग किंवा ज्याला कोड म्हणतात ते दिसतात.

या डागांमुळे त्या व्यक्तींना दुसऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. बरेच लोक अशा व्यक्तींशी फटकून वागतात.

मुलींमध्ये हे डाग दिसले तर लग्न ठरायला खूप अडचणी येतात.

“महाश्वेता” या कादंबरीत सुमती क्षेत्रमाडे यांनी या विषयाला वाचा फोडली.

या कादंबरीवर आधारित “महाश्वेता” नावाची दूरदर्शन मालिका ही गाजली.

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांची “नितळ” ही फिल्मसुद्धा कोड किंवा पांढरे डाग यामुळे एखाद्या व्यक्तीला कशी चुकीची वागणूक मिळते यावर आधारित होती.

समाज सातत्याने नाकारत असणारा हा कोड किंवा पांढरे डाग म्हणजे नेमकं काय? कशामुळे हे डाग शरीरावर दिसतात? त्यावर उपाय आहेत का? याच गोष्टींची आज चर्चा करुया.

पांढरे डाग याला ल्युकोडेर्मा किंवा कोड म्हणून ओळखले जातं.

हा एक विकार आहे ज्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या भागांतल्या त्वचेवर पांढरे डाग दिसतात.

त्वचेतील रंगद्रव्य पेशी काहीवेळा नष्ट होतात, या पेशींना मेलॅनोसाइट म्हणतात, त्यांच्या कमतरतेमुळे हे पांढरे डाग निर्माण होतात.

पांढरे डाग नाकाच्या आणि तोंडाच्या आतल्या भागांवर तसंच डोळ्यांवर सुद्धा परिणाम करतात.

पांढऱ्या डागांची चिन्हं किंवा लक्षणं म्हणजे त्वचेचा रंग मंदावणे किंवा पांढरा होणे, शरीराच्या कोणत्याही भागाच्या त्वचेवर डाग येणे ही आहेत

हे पांढरे डाग काही वेळा शरीराच्या एका भागावर दिसतात तर काही वेळा शरीराच्या वेगवेगळ्या भागात किंवा काही वेळा संपूर्ण शरीरभर पसरतात.

शरीरावर पांढरे डाग येण्याचं नेमकं कारण काय असावं ते अजुनही स्पष्ट कळलेलं नाही.

काही तज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्तीची ती एक हानीकारक स्थिती आहे.

जेंव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच चुकून त्वचेच्या निरोगी पेशी नष्ट करते, तेंव्हा शरीरावर पांढरे डाग पडतात.

पांढरे डाग अनुवांशिक असतात. जे कुटुंबातील एका व्यक्तीकडून पुढच्या पिढीतल्या व्यक्तीकडे जाऊ शकतात.

थायरॉईड किंवा आणखी काही विकारात सुद्धा ही पांढरे डाग त्वचेवर दिसतात.

पांढरा डाग एकाच ठिकाणी राहील की शरीरभर पसरतील हे नक्की सांगता येत नाही.

पांढ-या डागांमुळं कोणत्याही वेदना होत नाहीत, आरोग्यासाठी कुठलाही धोका निर्माण होत नाही, मात्र याचे मानसिक परिणाम खोलवर होऊ शकतात.

योग्य पद्धतीने वैद्यकीय उपचार घेऊन या पांढऱ्या डागांची दाहकता कमी करता येऊ शकते, पण या डागांवर संपुर्ण खात्रीशीर उपचार आजही उपलब्ध नाहीत.

बरेचदा पांढरे डाग असलेल्या त्वचेला मेकअप करून, सनस्क्रीन लावून तात्पुरतं झाकण्याचा पर्याय सुद्धा निवडला जातो.

हा त्वचारोग असलेल्या बहुतेकांना या विकाराने चाळीशीच्या आतच गाठलं आहे. त्यातले निम्मे लोक तर 20 च्या आतच कोड या विकाराला बळी पडले आहेत.

पांढऱ्या डागांचे प्रकार

कोडाचे प्रकार डागाच्या रंगावर (विरळ किंवा गडद) आणि त्याच्या आकारावर अवलंबून असतात.

1) काही पांढरे डाग किंवा कोड शरीराच्या एका ठराविक भागात दिसतात.

या प्रकारच्या त्वचारोगाला सेगमेंटल विटिलिगो एकाच भागात दिसणारं कोड म्हणतात. हा सहसा तरुण वयात होतो, एक किंवा दोन वर्षांपर्यंत पसरतो आणि नंतर थांबतो.

2) शरीराच्या एकाच भागात किंवा ठराविक भागातील कोड.

या प्रकारच्या त्वचारोगाला स्थानिक म्हणजेच फोकल किंवा लोकलाईज्ड कोड म्हणतात.

3) शरीराच्या अनेक भागांमध्ये पसरणारा कोड

पांढ-या डागांच्या सर्वसामान्य प्रकाराला सामान्य कोड, जनरलाइज्ड कोड म्हणतात, ज्यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागावर पांढरे डाग दिसतात आणि ते शरीरभर पसरतात.

कोडाची लक्षणं

शरीरावरच्या त्वचेचा रंग काही ठिकाणी फिका होतो, किंवा त्वचा पांढरी दिसते.

थेट सुर्यप्रकाश त्वचेच्या ज्या भागावर पडतो त्या त्वचेचं जास्त नुकसान होतं.

हात, पाय, दंड ,चेहरा ओठ या भागांत कोड पटकन पसरतो.

लक्षणं

1) त्वचेचा रंग फिका पडणे,पांढरा होणे.

2) लहान वयातच डोक्यावरचे, दाढीचे, भुवईचे किंवा पापण्याचे केस पांढरे होणे.

3) नाक आणि तोंडाच्या आतील त्वचेवर अस्तर असलेल्या ऊतीं हलक्या होत जाणं किंवा पांढ-या होणं.

4) डोळ्याच्या आतील थराचा म्हणजे डोळयातील पडद्याचा रंग विरळ होणं.

कोड एकदा शरीरावर दिसायला लागले की ते किती मर्यादेपर्यंत वाढतील ते सांगता येत नाही.

काही वेळा कोणत्याही उपचारांविना ते पसरायचे थांबतात. मात्र हे अगदी क्वचित प्रमाणात घडतं.

ब-याच वेळेला हे कोड किंवा पांढरे डाग वाढत जाऊन संपूर्ण शरीरावर पसरतात.

एकदा हे कोड शरीरभर पसरले की त्वचेचा नैसर्गिक रंग पुन्हा दिसणं जवळपास अशक्य असतं.

पांढरे डाग किंवा कोड का होतात?

केस, त्वचा, ओठ यांना रंग देण्यासाठी रंग, म्हणजे मेलॅनीन निर्माण करणाऱ्या पेशी ज्यांना मेलॅनोसाइट म्हणतात, त्या काम करायचं थांबवतात. मेलॅनीन तयार करत नाहीत. किंवा त्या स्वतः नष्ट होतात, तेव्हा त्वचेवर पांढरे डाग तयार होतात.

या आजारात डाग पडलेल्या त्वचेचा रंग फिकट होतो, पांढरा होतो.

मात्र या पेशी काम करायचं का थांबवतात हे तज्ञांना अजूनही कळू शकलं नाही.

यासाठी काही ठोकताळे बांधले आहेत की कोड कशामुळं होतो.

1) कोड हा एक असा विकार आहे ज्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या रंगद्रव्य-उत्पादक पेशींना म्हणजे मेलॅनोसाइटना नष्ट करते.

2) ऑटोइम्यून रोग जसे की ऑटोइम्यून थायरॉईड रोग किंवा टाइप 1 मधुमेहामुळे कोड उद्भवू शकतो.

3) तीव्र सूर्यप्रकाश (सनबर्न), तणाव किंवा औद्योगिक रसायनं यांच्या अति संपर्कामुळे कोड होऊ शकतो.

4) कुटुंबात एखाद्या व्यक्तीला कोड असेल तर आनुवंशिकतेमुळं हा रोग होतो.

कोड किंवा पांढरे डाग यापासून कसं वाचायचं?

1) त्वचेवर तीव्र सूर्यकिरणांचा किंवा यु.व्ही. लाईटसचा मारा होऊ देऊ नका.

कोणताही त्वचारोग किंवा कोड असेल तर किंवा तुमच्या त्वचेचा रंग फिकट झाला असेल तर चांगल्या रेंजचं आणि जलरोधक (water resistant) सन स्क्रीन लोशन वापरा.

सनस्क्रीन लोशन पुरेशा प्रमाणात वापरा, घाम येत असेल तर किंवा पाण्यात काम करत असाल तर सनस्क्रीन लोशन दर दोन तासांनी लावा.

टँनिंग बेड, सन लँम्पचा वापर करु नका.

2) प्रखर सुर्यकिरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करा, म्हणजे या सुर्यकिरणांमुळं त्वचा जळणार नाही, किंवा त्वचेचं नुकसान होणार नाही.

प्रखर सुर्यकिरणांमुळे तुमची त्वचा शेकली गेली तर गंभीर परिस्थिती निर्माण होते.

सनस्क्रीन लोशनमुळे टँनिंगचा प्रभाव कमी होतो, आणि नॉर्मल त्वचा आणि फिकट त्वचा यातला फरक कमी व्हायला मदत मिळते.

3) कोड असलेल्या त्वचेला झाका.

कोड समजा चेहऱ्यावर पसरलं असेल तर काही खास उत्पादनांचा वापर करून तुम्ही ते झाकू शकता, चेहरा एकसारखा टोन करू शकता.

बाजारात उपलब्ध असणाऱ्या अशा उत्पादनांतून तुम्ही तुमच्या त्वचेच्या शेडशी मिळतीजुळती शेड एखाद्या तज्ञाच्या मदतीने निवडू शकता.

ही खास उत्पादनं पाण्याबरोबर धुतली जात नाहीत, मात्र काही दिवसांनी ती फिकट होतात.

अशी खास उत्पादनं निवडताना डायहाईड्रोक्सियासिटोन(Dihydroxyacetone) असलेली प्रॉडक्ट निवडा, कारण ती अन्न आणि औषधं प्रशासनाने मान्यता दिलेली असतात.

3) टँटू काढणं टाळा

टँटू गोंदवून घेणं हा कोडावरचा उपचार नाही. तर, ही एक धोक्याची घंटा आहे.

हौसेनं गोंदवून घेतलेल्या टँटुमुळे त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं.

टँटुच्या प्रभावामुळे काही वेळा अगदी 2 आठवड्याच्या आत त्वचेवर पांढरे डाग दिसायला लागतात.

पांढरे डाग हे कोडच आहेत याचं निदान कसं केलं जातं?

शरीरावरचे पांढरे डाग पाहून डॉक्टर शारीरिक चाचण्या करतात.

आधी सुरु असणाऱ्या औषधांबद्दलची माहिती घेताना काही प्रश्नांच्या आधारे समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात.

1) कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला
कोड आहे का?

2) तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण किंवा शारीरिक आजार आहे का?

3) कुटुंबातील कोणत्याही सदस्याला रोगप्रतिकारक शक्तीचा कोणता आजार आहे का?

4) सूर्य किरणांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला संवेदनशील वाटते का?

5) पांढरे डाग दिसण्यापूर्वी तुम्हाला पुरळ, सनबर्न किंवा त्वचेच्या इतर काही समस्या जाणवल्या का?

6) वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी तुमच्या केसांचा रंग
पांढरा झाला का?

याशिवाय डॉक्टर काही शारीरिक तपासणी सुचवू शकतात, जसं की

  • रक्त तपासणी
  • तपासणीसाठी प्रभावित त्वचेचा एक छोटा तुकडा घेणे (बायोप्सी)
  • डोळयांची तपासणी
पांढरे डाग किंवा कोडावर उपचार

कोडावरील उपचारांमुळे त्वचा सामान्य दिसण्यास मदत होते, पण हे उपचार काही गोष्टींवर अवलंबून असतात

i) शरीरावर पसरलेल्या पांढ-या डागांची संख्या.

ii) पांढरे डाग किती पसरले आहेत किंवा त्यांचा आकार किती मोठा आहे.

iii) बाधित व्यक्तीनुसार उपचार.

अनेक उपचार असे आहेत जे सरसकट प्रत्येकासाठी वापरता येत नाहीत, कारण त्यांचे बरेच दुष्परिणाम असतात.

कधीकधी उपचारासाठी बराच वेळ लागतो.

त्वचारोगाच्या सध्याच्या उपचारांमध्ये कोडासाठी वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया आणि बाकी काही पर्याय उपलब्ध आहेत.

बहुतेक उपचार हे त्वचेचा रंग परत आणण्याच्या दृष्टीने करतात.

वैद्यकीय उपचार साधारण असे असतात.

i) डागांवर लावायला मलम

ii) पोटातून घेण्यासाठी औषधं

iii) अतिनील प्रकाशाचा वापर करून उपचार

iv) जर डाग शरीराच्या ब-याच भागात पसरला असेल, तर शरीराच्या उर्वरित भागांचा रंग फिकट करायचा म्हणजे वेगळेपणा जाणवणार नाही.

सर्जिकल उपचार

i) ऊती लावणे

डाग काढून टाकण्यासाठी, शरीराच्या दुसऱ्या भागातून त्वचा काढून डाग असलेल्या भागावर जोडली जाते. कोडाचे छोटे डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय बरेचदा केला जातो

ii) डाग असलेल्या लहान भागावर गोंदणे.

याचबरोबर आणखी काही उपचार केले जातात.

i) समुपदेशन

ii) सनस्क्रीन

iii) पांढरे डाग लपविण्यासाठी सौंदर्यप्रसाधनं, मेकअप आणि रंग यांचा वापर.

पांढरे डाग किंवा कोड असलेल्या लोकांमध्ये काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

1) अशा व्यक्तींना सामाजिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो.

2) सनबर्न आणि त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

3) डोळ्यांचे आजार जसे की बुबुळाची जळजळ आणि सूज येणं हे घडू शकतं.

4) श्रवणशक्ती म्हणजे ऐकण्याची शक्ति कमी होते.

पांढरे डाग किंवा कोड यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत.

पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करून घ्या.

पांढरे डाग किंवा कोड हा संसर्गजन्य रोग नाही, त्यामुळं ज्यांना हा रोग झाला आहे त्यांनी हिंमत हरु नये, ज्यांना हा रोग झाला नाही त्यांनी मात्र पांढऱ्या डागानं हैराण असलेल्या व्यक्तीला आदरानं वागवावं.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “पांढरे डाग, कोड याची कारणे, लक्षणे आणि उपाय वाचा या लेखात”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय