मेरी दोस्ती मेरा प्यार….

कथा, कादंबरी, नाटक आणि चित्रपट या सर्व कला प्रकारातुन मानवी नात्यांची एक गोष्ट नेहमी सादर केली जाते. काळोख असलेल्या बंद खोलीत असलेल्या ऐकमेव झरोक्यातुन प्रकाशचा झोत आत यावा आणि काळोखाचा काही भाग उजळून जावा तसेच काही या नाते संबंधाचे असते. चित्रपटाच्या पटकथेत मग असे उभे आडवे धागे गुंफले जातात आणि प्रेक्षक या गुंत्यात अडकून पडतात. असेच एक नाते म्हणजे मैत्री. या मैत्री नावाच्या नात्याचा प्रवाह इतका विस्तृत आहे की आजही या विषयाला चित्रपटात महत्वाचे स्थान आहे. ६० च्या दशकात कौटुंबिक चित्रपटाचा पसारा बऱ्यापैकी विस्तारला होता. विशेषत: दक्षिण भारतातील महत्वाच्या चित्रपट संस्था यासाठी प्रसिद्ध होत्या. जेमिनी, एव्हीएम, प्रसाद व राजश्री या चार चित्रपट संस्था अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध होत्या. त्यावेळचे प्रेक्षक देखिल पोस्टर्सवर या कंपनीचे बोधचिन्ह बघून सहकुटूंब चित्रपट बघत असत.

meri doatimera pyar१९६२ मध्ये राजश्री प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा ताराचंद बडजात्या यांनी एका बंगाली चित्रपटाचा रिमेक करण्याचे ठरविले. बंगाल, महाराष्ट्र आणि तमिळनाडू हे त्या काळातील चित्रपट निर्मितीचे दर्जेदार स्त्रोत होते. त्यामुळे या राज्यातील हिट चित्रपटांचे रिमेक करणे ही एक व्यावसायिक खेळी असे. अनेकदा तर रिमेकच तुफान व्यवसाय करीत असत. १९५९ मध्ये बंगाली भाषेतील “लालू भूलू” चित्रपटाने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. ताराचंद्र बडजात्यानां या चित्रपटाचा हिंदीत रिमेक करायचा होता. या चित्रपटासाठी १७-१८ वर्षांचे दोन नवीन तरूण त्यानां हवे होते. मग या तरूणांचा शोध सुरू झाला. त्यांची मुलगी राजश्रीने एका तरूणाचे नाव सुचविले. “फूल बने अंगारे” नावाच्या चित्रपटातील त्याचा अभिनय बघून राजश्री प्रभावित झाली होती. काही दिवसांनी दुसराही तरूण मिळाला. या तरूणाने “संत ज्ञानेश्वर” नावाच्या चित्रपटात मूख्य भूमिका केली होती. मग या दोघानां बडजात्या चित्रपट दिग्दर्शक सत्येन बोस यांच्याकडे घेऊन गेले.

नंतर दादरच्या श्री सांऊड सर्व्हीस या स्टुडिओत दोघानां नेण्यात आले आणि त्यांचा मेकअप करून स्क्रीनटेस्ट घेण्यात आली. या स्क्रिन टेस्टमध्ये दोघांना संवाद देखिल दिले होते. दुसऱ्या दिवशी बॉम्बे लॅबध्ये दोघानां मूळ बंगला चित्रपट दाखविण्यात आला. आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. हे दोघेही तरूण वेगवेगळ्या पार्श्वभूमितुन आलेले होते. जवळपास दोन वर्षे ते दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आणि कौटुंबिक मित्रही झाले. १९६४ मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शीत झाला तेव्हा त्याने अनेक विक्रम रचले. चित्रपटाचे नाव होते “दोस्ती”. यातील या दोन मित्रांच्या भूमिका केल्या होत्या सुशील कुमार आणि सुधीर कुमार या दोघा अभिनेत्यांनी.

त्याकाळात चित्रपट एकाचवेळी सर्वत्र प्रदर्शीत होत नसत. वर्ष दिड वर्षानंतर छोट्या शहरात रिलीज होत. त्यामुळे माझ्या शहरात तो उशीराच प्रदर्शीत झाला. पण यातील गाण्यांनी मात्र आगोदरच सर्वांना वेड लावले होते. माझ्या शाळेतील गौतम हिंगोले नावाचा वर्गमित्र “चाहूगाँ मै तुझे” ….हे गाणे खूप सुंदर आवाजात म्हणते असे. या चित्रपटाला फिल्म फेअरचे- उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट कथा(बाणभट),उत्कृष्ट संवाद लेखन(गोविंद मुनीस), उत्कृष्ट संगीतकार(लक्ष्मीकांत प्यारेलाल), उत्कृष्ट पार्श्व गायक (मंहमद रफी), उत्कृष्ट गीतकार(मजरूह सुलतानपूरी) असे सहा पुरस्कार मिळाले. या चित्रपटातुन सजंय खान आणि मराठी अभिनेत्री उमा यांनी पदार्पण केले. खरं तर ६० च्या दशकात चित्रपट सप्तरंगी झाला होता. हलक्या फुलके कथानक, सुमधूर संगीत, गाजलेल्या नायक नायिकेच्या जोडया, नयनरम्य स्थळांवर चित्रीकरण, विनोदांची पेरणी, शेवटची हाणामारी असा सर्व मसाला असलेल्या गर्दीत दोस्ती सर्वस्वी वेगळा होता. मुळात या चित्रपटाचा खरा नायक “मैत्री” हाच होता. कथा खरोखरंच अत्यंत साधी, संवादही मनाला सहज स्पर्शणारे, अख्खा चित्रपट शाळा, शहरातील गल्ल्या आणि झोपडीवजा घरात चित्रीत केलेला. सोकॉल्ड हिरॉईन वा प्रेमाबिमाची त्रिकोण नाही, गाणी म्हणत झाडामागे धावणे नाही की कोणताही क्रूर खलनायक नाही. एक नेत्र नसलेला पण दृष्टी असलेला तर दुसरा एक पाय नसलेला पण अफाट जिद्द असलेला असे दोन मित्र.

जोडीला एक शाळा मास्तर, एक प्राचार्य, एक या मुलानां प्रेम लावणारी म्हातारी, एक हरवलेली बहिण, तिचा पती व त्यांची छोटी मुलगी आणि शाळेतील मुलं…बस्स. एवढेच पात्रे. पण यातील कथेने सर्व प्रेक्षकानां बांधून ठेवले. संवादानी मनात घर केले तर गाण्यांनी हृदयात ठाण मांडले.

meri dosti mera pyarया चित्रपटातील सर्वच अंगावर भरभरून बोलले आणि लिहीले गेले मात्र यातील जे दोन मित्र ज्यांनी साकारले त्यावर फारसे काही वाचायला व ऐकायला मिळाले नाही. गमंत म्हणजे या दोन अभिनेत्याचा खून झाला अशा अफवा पसरवल्या गेल्या. मला चांगलं आठवतं मी बहूदा सातवीत असेल, एका नामवंत मोठ्या अभिनेत्याने अपघात घडवून यानां मारले अशा चर्चा त्यावेळी आम्ही ऐकत असू. अशी अफवा का पसरली असेल? हे एक कोडेच आहे. कारण हे दोन्ही अभिनेते काही कसलेले कलावंत नव्हते की ज्याच्यांमुळे कुणाचे करीअर धोक्यात येईल. शिवाय दोघेही खूपच नवखे तरीही अशी अफवा का? याचे कोडे आजतागयत नाही सुटू शकले. मात्र या चित्रपटाच्या कथेची जी एक मागणी होती त्यात हे दोघेही नैसर्गिक वाटले व भूमिकेत चपखल बसले. मला यातला नेत्रहीन म्हणजे सुधीर कुमार खूप भावला. त्याच्या चेहऱ्यातच एक निरागसता होती शिवाय तो खरोखरच आंधळा आहे असेच वाटत असे. दोघांनीही कुठेही भडक अभिनय केला नाही त्यांचे सवांद आजही अगदी सहज वाटतात. सुधीर कुमारची निवड होण्यामागे कदाचित त्याचा “संत ज्ञानेश्वर”चित्रपटातील एक सोज्वळ आणि शांत चेहरा असावा. या चित्रपटामुळे दोघांनाही चांगली प्रसिद्धी मिळाली पण तीन वर्षांनंतर हे दोघेही गायबच झाले ते कायमचेच. मग त्यांचे झाले तरी काय? नंतर कुठल्याच सिने मासिकात त्यांचे चेहरे झळकले नाही की दोन ओळीची बातमी छापून आली नाही….

जेव्हा जेव्हा हा चित्रपट आठवला जात असे तेव्हा तेव्हा मला या दोन्ही अभिनेत्याचे पूढे काय झाले याची कायम उत्सुकता वाटत असे…अगदी त्यांची खरी नावेही माहित नव्हती…..मग अचानक नेट खंगाळताना एक दिवस २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला श्री. शिशीर कृष्ण शर्मा यांचा एक लेख माझ्या हाती आला आणि अनेक बाबी नव्याने माहित झाल्या. हा लेख म्हणजे श्री शर्मा यांनी हयात असलेले अभिनेते सुशील कुमार यांच्या घरी जाऊन घेतलेली मुलाखत होय. यातुन अनेक नवीन बाबींचा उलगडा झाला. सुशील कुमारचे पूर्ण नाव सुशील कुमार किशनचंद सोमया. कराची येथे ४ जुलै १९४५ मध्ये एका सिंधी कुटूंबात त्याचा जन्म झाला. आईचे नाव तुलसी बाई. भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवतानां अनेक कुटूंबियाना फाळणीचा अंधकारमय प्रवास करावा लागला. तो सोमया कुटुंबालाही करावा लागला. सर्व काही कराचीत सोडून ते आगोदर गुजरातच्या नवसारी मध्ये विस्थापित झाले व नंतर मुंबईतील माहिम भागात स्थिरावले. पण त्यांच्यासाठी हा काळ तसा खडतरच होता. या वेळी किशनचंद यांचे एक मित्र किशनलाल बजाज जे फाळणी नंतर मुंबईत स्थिरावले होते अचानक घरी आले. चित्रपटातुन लहान भूमिका ते करत असत. ते सुशील कुमारच्या आईला म्हणाले- “की मला २० टक्के कमिशन देत असाल तर मी सुशीलला चित्रपटात काम मिळवून देतो.” सिंधी व मारवाडी समाज बहुतांश व्यापार करणारा समाज आहे. आर्थिक व्यवहार करताना मैत्री आडवी येणार नाही याची ते विशेष खबरदारी घेतात. सुशीलच्या आईने ते मान्य केले व १३ वर्षांच्या सुशीलला पहिला चित्रपट मिळाला ज्याचे नाव होते “अबाना” हा चित्रपट सिंधी भाषेत होता. नंतर फिर सुबह होगी, धूल का फूल,मैने जिना सिख लिया, काला बाजार, श्रीमान सत्यवादी,दिल भी तेरा हम भी तेरे, संजोग, संपूर्ण रामायण, एक लडकी सात लडके, फूल बने अंगारे असे चित्रपट त्याला मिळाले. किशनचंदच्या संसार गाड्यात सुशीलही मदत करत होता. १९६२ मध्ये दोस्ती हा चित्रपट मिळाला ज्यात तो प्रमूख भूमिकेत झळकला. इथेच त्याची भेट सुधीर कूमार सोबत झाली व दोन वर्षाच्या सहवासात ते एकमेकांचे कौटुंबिक मित्रही झाले.

सुधीर कुमारचे पूर्ण नाव सुधीर शंकर सावंत.लालबाग मधील जुन्या हाजी कासम चाळीत रहायचा. लालबाग परळ या मुख्यत्वे गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या परीसरात सुधीर मोठा झाला. आई वडील आणि मोठी बहिण शोभा व लहान बहिण चित्रा असे चौकोनी कुटूंब. सुधीर परळ नाक्यावरील आर.एम.भट या शाळेतुन एस.एस.सी. पास झाला. सुधीरचे प्रभाकर नावाचे मामा व्ही.शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत मूख्य मेकअप आर्टीस्ट होते त्यामुळे त्याचे स्टुडियोत जाणे येणे स्वाभाविक होते. याच संबंधातुन सुधीरला “संत ज्ञानेश्वर” आणि “दोस्ती” चित्रपटात भूमिका मिळाली. दोन्ही चित्रपट १९६४ मध्ये प्रदर्शित झाले व दोन्ही चांगले चालले. या दोघानां पुन्हा एकत्र घेऊन ताराचंद बडजात्या यांनी काम सुरू केले होते. ३५०/-रूपये प्रति महीना असा करार पण करण्यात आला. पण याच वेळी ए.व्ही.एम. या दक्षिणेतल्या मोठ्या चित्रपट संस्थेने सुधीर कूमारला एक मोठी ऑफर दिली. ती स्विकारल्यामुळे ताराचंद यांनी सुधीरचे सर्व करार रद्द केले शिवाय नुकसान भरपाई देखिल घेतली. करार रद्द झाल्यामुळे सुशील कुमारचेही काम हातून गेले. ए.व्ही.एम.चा “लाडला” हा चित्रपट १९६६ मध्ये प्रदर्शित झाला. बलराज सहानी, निरूपा रॉय, जगदीप यांच्या सोबत त्याने अभिनय केला. कुमूद छुगानी या चित्रपटात त्याची नायिका होती. यामध्ये तो रोमॅटिंक हिरो होता. लाडात वाढलेला श्रीमंत घरातील मुलगा अशी त्याची भूमिका होती. मात्र यात त्याचे विशेष अभिनय कौशल्य नाही दिसले. १९६८ मध्ये राजदत्त दिग्दर्शीत “घरची राणी” या चित्रपटात सुधीर कूमार बाळा साहेब सरपोतदार या टिपीकल मराठमोळ्या मूख्य भूमिकेत होता. मात्र चित्रपट स्त्रीप्रधान नायिकेचा होता. अनुपमा या अभिनेत्रीने यात नायिकेची भूमिका साकारली. या नंतर सुधीर कूमार अखेरचे दिसला तो “जिनेकी राह” या चित्रपटात. यात संजीवकुमारच्या लहान मुक्या भावाची एक लहानशी भुमिका होती….नंतर मात्र सुधीर कुमार पडद्याआड गेला आणि लोकही सपशेल विसरून गेले.

manache talks१९६५ मध्ये मॉस्को येथे अंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात “दोस्ती” चित्रपटाची निवड झाली होती. सुशीलकुमार या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरीता मस्कोला गेला होता. परत आल्यावर राजश्रीच्या पूढच्या चित्रपटासाठी सुधीर आणि सुशीलचा करार झाला होता पण सुधीरने लाडला चित्रपटासाठी हा करार मोडला. सुशीलला परत आल्यावर हे समजले. ताराचंद बडजात्यांनी त्याला स्वतंत्रपणे पुन्हा संधी देण्याचे ठरविले होते पण तो योग १९६९ मध्ये आला. तत्पूर्वी १९६५ मधील “सहेली” नावाच्या एका चित्रपटात सुशील कुमार २०-२५ सेंकद पडद्यावर एका टपोरी पोराच्या भूमिकेत दिसला. १९६९ मध्ये राजश्रीच्या “तकदीर” या चित्रपटात सुशील कुमारची बऱ्यापैकी मोठी भूमिका होती. राजश्रीच्या या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदरच होती. यातील “जब जब बहार आयी….मुझे तुम याद आए…” या गाण्याचे दोन कडवे त्याच्यावर चित्रीत झाले. नंतर सुशील कुमार देव आनंद यांच्या “हिरा पन्ना” या चित्रपटात काही मिनिटांसाठी दिसला. त्यावेळी तो विमान कंपनीत नोकरीला लागला होता आणि चित्रपटात तो स्टाफचाच व्यक्ती होता. मग अखेरचा दिसला तो १९७४ च्या “सुहानी रात” नावाच्या चित्रपटात. मात्र हा चित्रपट आला कधी अन् गेला कधी हे फक्त् त्या निर्मात्यालाच ठावूक.

या दोन अभिनेत्यांच्या अभिनया बद्दल लिहावे इतपत मोठे ते नाहीत हे जरी मान्य केले तरी या एका चित्रपटासाठी हे दोघेही लाखो प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. अर्थात या चित्रपटाच्या यशाचे खरे शिल्पकार ताराचंद बडजात्या हेच आहेत. ते खरोखर दूरदर्शी होते. चित्रपट या कलेचा व्यवसाय कसा करायचा हे त्यानां उत्कृष्ट माहित होते. स्क्रिनटेस्ट मध्येच ताराचंदनी बरोबर ओळखले असावे की हेच दोन या भूमिकेसाठी का योग्य आहेत. बाकी संवाद, गाणी, संगीत याचे महत्व आणि अचूक निवडीतही ते माहीर होते. सुशील आणि सुधीर या दोघानांही आर्थिक्प रिस्थितीने या मोहमयी जगात आणले. त्यांना स्वत:ला अभिनयाची अत्यांतिक आवड असावी असे वाटत नाही. कारण नंतर दोघांनीही स्वत: होऊन् कधी कुणाकडे खेटे घातले नाही.

सुशील कुमारने नंतर जयहिंद कॉलेज मुंबईतुन पदवी मिळवली आणि १९७१ मध्ये एअर इंडियात नोकरी मिळवली. १९७८ मध्ये त्याने आपली बालपणीची मैत्रीण कोशी कोटवानी हिच्या बरोबर लग्न केले. सन २००३ मध्ये तो निवृत्त झाला. नोकरी लागल्या नंतर व फिरतीचे काम असल्यामुळे सुधीर कुमारच्या व त्याच्या कुटूंबाच्या भेटीगाठी कमी होत गेल्या. एकदा भारतात परत येताना सुशील कुमारला सुधीर कुमारच्या निधनाची बातमी समजली. मुंबईत येताच तो सुधीरच्या घरी गेला. घरी आई व त्याची मुलगी श्रुती त्याला भेटल्या… तेव्हा त्याला समजले की त्याच्या दोन्ही बहिणी लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या होत्या. वडीलाचं खूप पूर्वीच निधन झाले होते आणि सुधीरचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने झाला होता. सुधीर कुमारने ६० चे दशक संपताना श्रद्धा नावाच्या मुलीशी लग्न केले मात्र त्या नंतर त्याला ऑफर्स मिळणे बंद झाले. मग त्यानेही कुणाकडे कामासाठी विचारणा केली नाही. हळूहळू तो चित्रपटसृष्टीला आणि चित्रपटसृष्टी त्याला विसरून गेले. एक दिवस घरी जेवण करत असतानां त्याच्या घशात चिकनचे हाड अडकले व जखम झाली. ही जानेवारी १९९३ मधील घटना. दूर्देवाने याच काळात मुंबईत हिंदू मुस्लिम दंगल झाली. शहरात त्यावेळी संचारबंदी होती त्यामुळे सुधीरला डॉक्टरांकडे घेऊन जाता आले नाही. घशातल्या जखमेने गंभीर रूप धारण केले. जेवण करणे दुरापस्त झाले. दंगल शमल्यावर टाटा हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. तो पर्यंत जखम खूपच चिघळली होती. नळीद्वारे अन्न देण्याचा प्रयत्नही फारसा कामी आला नाही व शेवटी त्यातच त्याचे निधन झाले.

सुशीलकुमार मुंबईतील चेंबूर येथील फ्लॅटमध्ये निवृत्तीचे जीवन आपल्या पत्नी व मुला सोबत जगत आहे. दोस्ती चित्रपटाची आठवण मात्र त्याच्या आत खोल रूजलेली आहे. मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की- “या चित्रपटातील एक गाणे जणू माझ्याच आयुष्याशी निगडीत होते…..राही मनवा दुख की चिंता क्यूँ सतात है…दु:ख तो अपना साथी है…..चित्रपट करत असतानाचा काळ माझ्यासाठी या गाण्या सारखाच होता त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील भाव कदाचित दिग्दर्शकाला हवे तसे आले असावेत…”:

आज दोघेही पूर्णपणे विस्मृतीत गेले आहेत. मला व्यक्तीशा सुधीर कूमार हा मराठी अभिनेता होता हे पहिल्यांदाच समजले आणि मराठी अस्मिता न कळत चाळवली गेली. चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर एकूणातच काळाच्या स्मृतीत कधी ना कधी आपण गडप होणारच हे सत्य आहे. केवळ एका चित्रपटामुळे हे दोघेही चित्रपटसृष्टीत ठळकपणे नोंदले गेले ते कायमचेच. आज इतक्या वर्षानंतरही या चित्रपटाचे विस्मरण रसिकानां होत नाही. दोस्तीचा संबंध भूत व वर्तमान काळाशी कायम जोडलेला असतो हे मान्य होण्यास काहीच हरकत नसावी….

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय