गरम पाण्यात बसून घेतलेल्या ‘सिट्झ बाथ’ चे फायदे आणि ते घेण्याची पध्दत

सिट्झ बाथ म्हणजे नेमके काय? काय आहेत त्याचे वेगवेगळे उपयोग?

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यन्त वाचा.

अंग दुखत असेल किंवा पाठ, कंबर दुखत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे ही काही आपल्याला नवीन गोष्ट नाही. आपल्या आई, आजीने आपल्यावर लहानपणापासून असे उपचार केलेले असतातच. घरोघरी शेकण्याची गरम पाण्याची पिशवी किंवा बाटली असतेच.

sitz bath

ह्याच पद्धतीचा पण जरा निराळा उपाय म्हणजे सिट्झ बाथ (Sitz Bath).

गरम पाण्यात बसून अंग शेकणे म्हणजे सीट्झ बाथ. वेगवेगळ्या आजारांवर सीट्झ बाथचा उपयोग होतो.

आज आपण सीट्झ बाथ नेमका कसा घ्यायचा आणि त्याचे वेगवेगळे कोणते फायदे आहेत हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

शरीराचा जननेंद्रिये, गुदद्वार आणि आसपासचा भाग शेकण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी सीट्झ बाथचा उपयोग होतो. सीट्झ बाथ नेहेमीच्या टब मध्ये बसून घेता येतो तसेच ह्यासाठी विशिष्ट उपकरण देखील बाजारात तयार मिळते. दोन्ही प्रकारे घेतलेला सीट्झ बाथ उपयुक्त आणि प्रभावी असतो.

सीट्झ बाथचा उपयोग मुख्यत्वे गुदद्वाराला झालेल्या जखमा किंवा आजार ह्यांवर उपयोगी असतो. ह्या आजारांमध्ये मूळव्याध, पाइल्स, फिशर, जेनीटल हर्पीस आणि प्रोस्टेट ग्रंथींशी संबंधित आजार ह्यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे गरोदर स्त्रियांना योनिमार्ग सैल होण्याच्या त्रासापासून तसेच सर्वच स्त्रियांना जर जननेंद्रियात काही इन्फेक्शन झाले असेल तर सीट्झ बाथ घेण्याचा उपयोग होतो.

सीट्झ बाथ घेण्यामुळे शरीराच्या त्या भागातील रक्तप्रवाह वाढतो तसेच तेथे होणारी आग, जळजळ आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. जननेंद्रिये आणि आसपासच्या भागात जर खाज येण्याची समस्या असेल तर त्यावरही सीट्झ बाथ घेण्याचा उपयोग होतो.

सीट्झ बाथ घेण्याचे नेमके फायदे

१. पेरीनेम म्हणजेच गुप्तांग आणि आजूबाजूचा भाग. शरीराच्या पेरीनेम ह्या भागात वेदना, सूज येणे, आग होणे, खाज येणे असे त्रास होत असतील तर सीट्झ बाथ घेण्याचा फायदा होताना दिसून येतो. सीट्झ बाथमुळे सूज कमी होते, जननेंद्रियांचा रक्तपुरवठा वाढतो.

त्यामुळे इन्फेक्शन असेल तर ते लवकर बरे होण्यास मदत होते. इन्फेक्शन कमी करण्यासाठी शेकण्याच्या पाण्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने आयोडीन किंवा इतर औषध मिसळता येते. गुदद्वार किंवा आसपासच्या भागात काही शस्त्रक्रिया केली असेल तर सीट्झ बाथचा खूपच उपयोग होतो.

२. बवासीर किंवा मुळव्याधीने ग्रस्त असणारे लोक नेहेमीच अस्वस्थ असतात कारण त्यांना बसताना नेहेमी वेदना होतात. परंतु ह्या समस्येवर सीट्झ बाथ हा अगदी प्रभावी उपाय आहे.

पाइल्सचा त्रास असणाऱ्या लोकांना दिवसातून किमान दोन वेळा सीट्झ बाथ घेण्याचा सल्ला दिला जातो. सीट्झ बाथ घेण्यामुळे त्या जागी होणाऱ्या वेदना कमी होतात आणि झालेल्या जखमा भरुन येण्यास मदत होते.

३. महिलाना वेळोवेळी योनिमार्गातील संसर्ग किंवा खाज, जळजळ यांचा सामना करावा लागतो. काही वेळा अंगातून पांढरे पाणी जाणे, दुर्गंधी येणे अशा समस्या देखील आढळून येतात. या सर्व आजारांवर सीट्झ बाथ फायदेशीर ठरतो. अर्थात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा.

४. नैसर्गिक प्रसूतिनंतर बऱ्याच महिलांना योनिमार्ग सैल होणे, गुदद्वाराला जखम होणे असे त्रास होऊ शकतात. ह्या त्रासावर देखील सीट्झ बाथ हा प्रभावी उपाय आहे. प्रसूतिनंतर योनिमार्ग पूर्ववत करण्यासाठी सीट्झ बाथ घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

५. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासावर सुद्धा सीट्झ बाथ उपयुक्त आहे. सीट्झ बाथ घेतल्यामुळे त्या भागातील रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळे पाळीचा रक्तस्त्राव होताना होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

sitz bath

सीट्झ बाथ कसा घेतात?

सीट्झ बाथ घेतल्यामुळे इन्फेक्शन कमी होणे, वेदना कमी होणे, जखम भरुन येण्यास मदत होणे असे फायदे जरी होत असले तरी सीट्झ बाथ घेताना शरीराच्या त्या त्या भागातील रक्तप्रवाह वाढतो हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सीट्झ बाथ घेताना तो अतिशय काळजीपूर्वक घेतला पाहिजे.

सीट्झ बाथ घेताना खालील काळजी घ्यावी.

१. सीट्झ बाथ घेताना फार गरम पाणी वापरू नये. शरीराला सहन होण्याइतपत कोमट पाणी असावे.

२. सीट्झ बाथ घेण्यासाठी पाण्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेले औषध वापरावे. इतर कोणताही साबण, शॉवर जेल, बॉडी वॉश इत्यादीचा वापर करू नये.

३. सीट्झ बाथ १५ ते २० मिनिटे घ्यावा. त्यापेक्षा जास्त काळ सलग सीट्झ बाथ घेऊ नये. आवश्यकता असल्यास दिवसातून तीन ते चार वेळा सुद्धा सीट्झ बाथ घेता येऊ शकतो.

सीट्झ बाथ नेमका कसा घ्यावा?

सीट्झ बाथ बाथटबमध्ये बसून किंवा त्यासाठी मिळणारे विशिष्ठ उपकरण वापरुन घेता येतो.

बाथटबमध्ये बसून सीट्झ बाथ कसा घ्यावा?

१. टबमध्ये २ ते ३ इंच इतके सोसवेल असे गरम पाणी घ्यावे.

२. टबमध्ये आरामात बसून शरीराच्या ज्या भागाला शेक मिळणे अपेक्षित आहे तो भाग पाण्यात नीट बुडवावा.

३. किमान १० ते १५ मिनिटे तसेच बसून रहावे.

४. त्यानंतर बाहेर पडून स्वच्छ आणि मऊ टॉवेलने अंग पुसून घ्यावे.

सर्वांकडे काही बाथटब असतील असे नाही. परंतु ह्यावर अगदी सोपा उपाय आहे. सीट्झ बाथ सहजपणे घेता येईल असे टब असणारे किट बाजारात तयार मिळते. हे किट वापरणे खूपच सोपे, सोयीचे आणि आरामदायी असते. तसेच ह्याची किंमत देखील सर्वांना सहज परवडेल अशी असते.

सीट्झ बाथ किट वापरुन सीट्झ बाथ कसा घ्यावा?

१. सर्वप्रथम सीट्झ बाथ किटचा टब टॉयलेट सीटवर नीट ठेवावा. टब हलणार अथवा पडणार नाही ह्याची खात्री करून घ्यावी.

२. सहन होईल इतपत गरम पाण्याने किटचा टब भरुन घ्यावा.

३. डॉक्टरांनी काही औषध दिले असेल तर ते पाण्यात मिसळावे.

४. त्यानंतर त्या पाण्यात १५ ते २० मिनिटे बसावे.

तर अशाप्रकारे सीट्झ बाथ निरनिराळ्या आजारांवर अतिशय उपयुक्त आहे असे दिसून येते. तसेच सीट्झ बाथ घेण्याची पद्धत अतिशय सोपी असून सहजपणे करता येण्यासारखी आहे.

मित्रमैत्रिणींनो, ही उपयुक्त माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय