शिक्षण: धोरण आणि उद्दिष्ट ! (भाग १)

मी काही शिक्षणतज्ञ नाही. माझा लौकिकार्थाने शिक्षणक्षेत्र अथवा शिक्षकीपेशाशी काहीही संबंध नाही. शालेय, महाविद्यालीन शिक्षणानंतर माझा या क्षेत्राशी गेली १५-१६ वर्षे काहीही संपर्क नाही. पण माझ्यासारखे अनेक जण, ज्यांची मुलं आताशा शाळेत जाऊ लागली आहेत अशांचा, या ना त्या कारणाने शिक्षणाच्या सद्यस्थितीशी आणि एकंदर शिक्षण नावाच्या ह्या कमालीच्या गुंतागुंतीच्या आणि जराशा भीतीदायक अशा गोष्टीशी, मनात इच्छा असो वा नसो संबंध येतोच. त्यात जे मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातील पालक आहेत ते तर या बाबत जास्तच हळवे/ संवेदनशील असतात.

श्रीमंत, अतिश्रीमंत किंवा ज्यांचे उद्योगधंदे, व्यवसायातले हितसंबंध सुरक्षित आहेत, ते लोक ह्या गोष्टीला फारशी किंमत देताना दिसत नाहीत आणि गरिबांना तर रोजच्या जगण्याच्या संघर्षातूनच फुरसत नसते. पण मध्यमवर्गीयांची तशी गोष्ट नसते. त्यांना मध्यम वर्गीयातून उच्च मध्यम वर्गीय आणि तिथून पुढे श्रीमंत किंवा अतिश्रीमंत गटात जाण्याची सुप्त/ प्रकट मनीषा असतेच पण हितसंबंध प्रस्थापित नसल्यामुळे परत पुन्हा गरिबीत ढकलले जाण्याची भीतीही असते. त्यामुळे एकंदर शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या करता जिव्हाळ्याचा असतो, भले त्यातले त्यांना फारसे काही कळत नसेल. त्यामुळेच पुस्तकं, टीव्हीवरची चर्चासत्र,वर्तमानपत्र, सोशल मिडिया या सर्व ठिकाणच्या साधक बाधक (आणि बर्याचदा बाष्कळ ) चर्चांमध्ये हा वर्ग हिरीरीने भाग घेताना आढळतो. ‘तसं पाहू जाता शालेय शिक्षण हे काही मुलांच्या शिक्षणाचे एकमेव साधन नाही. माणूस आयुष्यभर जीवनाच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी असतो.’ असली भरमसाठ आणि टाळ्या खेचणारी विधानं आपण बऱ्याचदा ऐकतो पण शिक्षणाबद्दल असे काही बोलायचा मोह टाळणेच श्रेयस्कर.

शालेय शिक्षण म्हटले कि मातृभाषेतून शिक्षण हा आपल्याकडचा सर्वात महत्वाचा आणि बहुधा सर्वाधिक चर्चिला जाणारा मुद्दा आहे.(जणू मातृभाषेतून शिक्षण एवढा एक मुद्दा सोडला तर दुसरे कोणतेही प्रश्न, आव्हानं शिक्षणक्षेत्रात नाहीतच.) जवळपास सगळे तज्ञ, सूज्ञ, शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे ह्या एका मुद्द्यावर सहमत होताना दिसतात. कमीत कमी प्राथमिक शिक्षण तर मातृभाषेतूनच झाले पाहिजे ह्यावर तरी एकमत असतेच. सर्वसाधारण मनुष्य सुद्धा बोलताना मातृभाषेतून शिक्षणाची भलावण करताना आढळतो.ह्यावर अगदी पु. लं. देशपांडे ते भालचंद्र नेमाडे, आणि इतर अनेक मान्यवर दिग्गजांनी अनुकूल अभिप्राय दिले आहेत. तरीही आज मुंबई-पुण्यात तरी खाजगी मराठी शाळांची अवस्था काय आहे? ह्यावर मी वेगळे भाष्य करायची गरज नाही. कारण सरळ आहे. जे आपल्या मुलांना खाजगी शाळात पाठवू शकतात अशा जवळपास सर्व मध्यम व उच्च मध्यम वर्गीय पालकांनी खाजगी मराठी शाळाकडे पाठ फिरवली आहे.

महानगर पालिकांच्या शाळांबद्दल न बोललेलंच बऱ. कारण तिथे सरकारी अनास्था, अनागोंदी आणि भ्रष्टाचार ह्यांचा फार जास्त प्रमाणात संबंध आहे आणि त्यावर बोलू जाणे म्हणजे विषयांतर होणे. मुंबई-पुण्यात खाजगी मराठी शाळा विद्यार्थी नसल्याने बंद पडू लागल्या आहेत किंवा माध्यम बदलाकडे वळू लागल्याआहेत. मातृभाषेतून शिक्षणाच्या आग्रहामध्ये बऱ्याच जणांचा ‘त्यामुळे मुलांना विषय नीट समजतात’ या कारणाच्या आड मराठी भाषेच्या संरक्षणाची काळजी आणि संवर्धनाची एक आस असते. तसे असणे काही गैर नाही पण विषय मुलांच्या शिक्षणाचा आहे भाषेच्या संवर्धनाचा नाही याचे भान बऱ्याचदा सुटलेले आढळते. १९२६ मध्ये पुण्याच्या तत्कालीन सुप्रसिद्ध( पुण्यात सर्व संस्था नुसत्या प्रसिद्ध नसतात तर त्या सुप्रसिद्ध असतात, जसे पुण्यातला प्रत्येक विद्वान हा महापंडित असतो. नुसते पंडित हे आडनाव असते.) अशा ‘शारदा मंदिर’ या साहित्य सेवक संस्थेच्या पहिल्या वार्षिक ‘शारदोपासक संमेलनाचे’ अध्यक्षपद कधी नव्हे इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्वीकारले आणि व्यासपीठावरून “मराठी हि मुमुर्षु भाषा आहे. (म्हणजे मरण पंथाला लागलेली भाषा आहे) तिचे सोहळे कसले करता” असे म्हणून मराठीच्या एकूण अस्तित्वाबद्दलच चिंता व्यक्त केली होती. तेव्हा पासून आजपर्यंत ९० वर्षात मराठी नष्ट झाली नाहीच पण तिची अनेक अंगांनी भरभराट झाली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तरीहि सतत ह्या मराठीच्या अस्तित्वाबद्दल जाणकार लोक गळे काढताना आपण बघतो आहोत.इतिहासाचार्य राजवाडे आणि या दिग्गजांना वाटणारी भीती, चिंता काहीशी अनाठायीच होती असे मला प्रामाणिकपणे वाटते.

मी माझा अनुभव सांगतो. आमच्या कॉलनीमध्ये २७ बंगले आहेत. त्यामध्ये साधारण ४५-५० शाळेत जाणारी मुलंआहेत. हि मुलं विविध वयोगटातली आहेत त्यामुळे अगदी अंगणवाडी पासून ९वी-१०वी पर्यंत ची मुलं यात येतात. महाविद्यालयातली मुलं यात धरली नाहीत. एक श्री. मुळे म्हणून आहेत त्यांच्या नातीचा सन्माननीय (!) अपवाद सोडला तर सर्व मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळात जातात. तरीही ही मुलं आपापसात खेळताना अस्खलित मराठी बोलतात. त्यांना मराठी की इंग्रजी असा पेच पडत नाही. त्यांचे आजी आजोबा लोक, जे मराठीच बोलतात, त्यांच्याशी संवाद साधताना ह्या मुलांना काहीही ‘प्रॉब्लेम’ येत नाही. ह्याचं कारण साधंसरळ आहे मुलांना आपण जरी शाळेत शिकायला पाठवत असलो तरी त्यांचं शिक्षण त्या आधीच सुरु झालेलं असत आणि ते घर, आसपासचा परिसर त्याच्या मित्रपरिवाराकडून बरंच काही शिकत असतात.

माझी मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते आणि तिथे असलेल्या हिंदी भाषक मुलांच्या संगतीने तिच्या वयाच्या मानाने बरे हिंदी बोलते. आम्ही गुजरात मध्ये राहत असतो तर तिला गुजराती सहजगत्या आले असते. ते कशाला, माझा मित्र बलराम छप्पर म्हणून एक कानडी आहे. त्याचा ८ वर्षांचा मुलगा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कानडी अस्खलित बोलतो. तेव्हा मातृभाषेतून शिक्षणाचा फार बागुलबुवा करायची गरज नाही. आणि तसही इंग्रजी माध्यमामुळे मुलांना मराठी नीट बोलता येत नाही असे बोम्बलणाऱ्या लोकांना ‘म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?’ असे विचारले तर त्यांना नीट सांगता येत नाही. मराठी बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची फार सरमिसळ होते असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो . ठीक आहे, पण मग आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षापूर्वी वापरात होती काय? आणी १०० वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं? आज किती जणांच्या बायका पंजाबी ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख किंवा पेहेराव घालतात? साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते? आपण मोटार सायकल वरून (सांप्रत काळी तर बाईक वरून) नाहीतर स्वयंचलित दुचाकीवरून कितीवेळा जातो? पेट्रोल टाकणे, स्पार्कप्लग बदलणे , पंक्चर काढणे हे मराठीतून कसे सांगणार? आणि ज्याला ते सांगू त्याला समजेल काय? जुनेच पण रोजच्या वापरातले शब्द सुद्धा मराठी नसतात. पगार, बंब, इस्त्री, चावी, जबाब, जबाबदारी, हरकत, घड्याळ, हे शब्द काय मराठी आहेत कि संस्कृत? पण ते वापरताना आज आपल्याला उष्टावाल्यासारखे वाटत नाही. अस्खलित मराठी वापरून आज आपण कुणाशी संवाद साधू शकू? ते सोडा आजच्या विषयांवर तर आपण मराठीत बोलूच शकणार नाहि. मोबाईल, सीडी, पेन ड्राईव, digital, Analogue यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज नाही. फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय? दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे. सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे तर Window म्हणजे खिडकी हा पोर्तुगीज शब्द आहे. भाषा जिवंत असते म्हणजे तिच्यात सतत बदल घडत असतो आणि तिचा एकूण तोंडावळा तोच राहिला तरी स्वरूप मात्र बदलत असते. नव्हे तोंडावळा सुद्धा बदलतोच.

असो विषय शिक्षणाचा आहे म्हणून भाषा ह्या विषयावर जास्त लिहित नाही. एक भाषा हा विषय सोडून शिक्षणाच्या इतर पैलूंवर हळू हळू बोलायचा माझा मानस आहे, आणि शिक्षणाच्या मूळ उद्दिष्टांमध्ये भाषा हा विषय माझ्या मते तरी येत नाही. तसेच गणित, शास्त्र इतिहास भूगोल हेही येत नाहीत, मग काय आहेत हि उद्दिष्ट? माझ्या मते शिक्षणाची ढोबळ मानाने ४ उद्दिष्ट आहेत त्यातलं पहिल आणि अत्यंत महत्वाच पण जवळपास सर्व तज्ञांच्या(एतद्देशीय) मते दुर्लक्षिल गेलेलं उद्दिष्ट म्हणजे

आर्थिक स्वायत्तता:

मी फक्त स्वायत्तता लिहिणार होतो, पण तस करणं ढोंगीपणाचं झालं असतं.आपण सगळे आपल्या मुलांना शाळेत का पाठवतो? तर त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे अशी आपली इच्छा असते म्हणून. हे नागड सत्य आहे आणि ते आपण, (आणि खरतर शिक्षणतज्ञांनी आणि शिक्षणविषयक धोरण ठरवणारे शासकीय अधिकारी तसेच पुढारी यांनी) सगळ्यात आधी स्वीकारलं पाहिजे. चार पैसे कमवायची योग्यता आणि ते योग्यप्रकारे खर्च करण्याची अक्कल मुलांना यावी म्हणून मुलांना शाळेत पाठवले जाते. अत्यंत गरीब घरातले लोक तर, जे अनेक खस्ता खाऊन,पोटाला चिमटा घेऊन, प्रसंगी कर्ज काढून आपल्या पोरांना शाळेत पाठवतात, त्यांना आपलं पोर पुढे शिकून चांगले पैसे कमावेल, स्वत:ची आणि आपलीही गरिबी दूर करेल हि एकच आशा असते. पोरांच्या अंगच्या सुप्त गुणांचा विकास,त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास असल्या (खरतर तितक्याच महत्वाच्या) गोष्टींशी त्यांना फार काही देण घेण नसतं. (आधुनिक जगात पैसे कमावण आणि खर्च करण हि इतकी महत्वाची गोष्ट किंवा कला असताना एकंदर भरपूर पैसे कमावणाऱ्या आणि खर्च करणाऱ्याकडे बुद्धिवादी लोकांकडून काहीशा नाराजीनेच बघितले जाते. सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या, नेहमी खादी किंवा साध्या कपड्या मध्ये वावरणाऱ्या विश्वंभर चौधरीला सहकुटुंब ५ स्टार हॉटेल मधून बाहेर पडताना पाहून मला उगाचच धक्का बसला होता. जणू तो काही पापच करीत होता ते सुद्धा सहकुटुंब! ह्याचं कारण म्हणजे हि आमच्या हाडीमाशी भिनलेली मानसिकता.)

मग आजची प्रचलित शिक्षण व्यवस्था ह्या मुलभूत उद्दिष्टाला पूरक अशी आहे का? तर याच उत्तर सरसकट हो कि नाही असे देता येत नाही. मुळात मेकालेने भारतात दृढमूल केलेली हि आजची भारतीय शिक्षण व्यवस्था हि इंग्रजांचे इथले राज्यशकट सुरळीत पणे हाकण्यासाठी कारकून आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांची पैदास करण्यासाठी होती आणि आपण पारतंत्र्यात असे पर्यंत तिने आपले उद्दिष्ट व्यवस्थित पूर्ण केले. हि आजची शिक्षणव्यवस्था तशी साम्राज्यशाहीच्या/ सरंजामशाहीच्या गरजेतून जन्माला आली आहे.याआधीच्या शिक्षण पद्धतीहि अशा सरंजामशाहीला पूरक अशाच होत्या फक्त इंग्रजांच्या राज्यात औद्योगिक क्रांतीचं एक उपांग जोडले गेल्यामुळे आधीच्या शिक्षणपद्धतीमध्ये नसलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय त्यात आले तसेच इंग्रजांचे राज्य जवळपास सर्व जगभर पसरलेले असल्यामुळे त्यांची भाषा अधिक समृद्ध झालेली होती त्यामुळे इंग्रजी शिकल्यावर सर्व जगात निरनिराळ्या ठिकाणच्या कला, विज्ञान, तंत्रज्ञान, विविध विचारधारा ह्यांची तोंडओळख नवशिक्षित वर्गाला होऊ लागली.आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्था हि निरनिराळ्या ‘इझम्स’ ने प्रभावित असतात. समाजवादी, साम्यवादी, मूलतत्ववादी, धार्मिक, भांडवलशाही अन काय काय! एक फक्त लोकशाहीवादी शिक्षणव्यवस्था मला काही कुठे आढळली नाही. असो…

तेव्हा आजची आपली शिक्षणव्यवस्था मुलांना आर्थिक स्वायत्तता देण्याच्या कामी काही प्रमाणात यशस्वी होते असं आपण म्हणू शकतो कारण साधारण १०-१२ शिकलेल्या माणसाला चार पैसे कमावण्याला फारशी अडचण येत नाही. पण फक्त एवढच पाहून समाधान मानणं फसव ठरत. पैसे कमावण्याची अक्कल म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याची हुशारी नाही तर इतर बरेच काही असते.

मी एक उदाहरण देतो म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते पुरेसं स्पष्ट होईल. हे माझं निरीक्षण आहे. पण सर्वसाधारण कुणीही हे असेच असते. असाच अभिप्राय देईल. एखाद्या इंजिनियरिंग कंपनीमध्ये कामगार हा I.T.I., NCVT झालेला असतो तर सुपरवायझर/अधिकारी वर्ग DIPLOMA/ DEGREE झालेला, तसेच व्यवस्थापनेतील उच्च पदस्थ हे B.E. with MBA,किंवा MS, ME असे POST GRADUATE(उच्चविद्याविभूषित) असतात. नुसते उच्च विद्या विभूषित नसतात तर त्यांच्या पदव्या ह्या नामांकित शिक्षण संस्थांमधून घेतल्या गेलेल्या असतात.क्वचित एखाद दुसरा अपवाद सोडला तर कुठल्याही लुंग्यासुन्ग्या ठिकाणाहून PART TIME,किंवा CORRESPONDANCE DEGREE, POST GRADUATE DEGREE प्राप्त केलेला कामगार EXECUTIVE GRADE पर्यंत पोहोचू शकत नाही.हे असे असणे चूक कि बरोबर ह्याच्यावर मला काही मतप्रदर्शन करायचे नाहीये पण हि एक वस्तुस्थिती आहे.तरीही सर्वसाधारण पणे ६०ते६५% कामगार नोकरी सांभाळून बाहेर काहीतरी उद्योग करीत असतात. कोणी वेल्डिंग करतो तर कुणाचं एखाद-दुसरं मशीन शॉप, ग्यारेज असतं. अगदी काही नाही तर ते विमा एजंट किंवा इस्टेट एजंट म्हणून काम करतात.पण Management मधील लोक जे MBA किंवा MS असतात ते फक्त नोकरी करतात. अगदी २-४% लोक असतील जे असे कामगारांप्रमाणे बाहेर काही उद्योग करतात. ह्याचा संबंध फक्त उत्पन्नाशी नाही. माझे अनेक कामगार मित्र जे बाहेर उद्योग करतात ते पगार वाढला, बढती घेतली म्हणून स्वत:चा उद्योग, व्यवसाय बंद करीत नाहीत. नोकरी, धंदा हा जसा पेशा आहे तशीच ती मानसिकताही आहे आणि ह्या मानासिकतेची जडण घडण किंवा मोड-तोड आपली सध्याची शिक्षण व्यवस्था करते.नोकरीत कुणाचा न कुणाचा हुकुम मानणारे कामगार स्वत:च्या व्यवसायात निर्णय घेणारे मालक जसे असतात तसेच स्वत:च्या कौशल्याचा वापर ते स्वत: करता संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरतात.संपत्ती(Wealth) आणि पैसा(Money)ह्यांत फरक असतो. हीच तर ती उद्योजकता/ उद्यमशीलता आहे. पण ती कुठल्याही शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवली जात नाही. मोठ्या नामांकित कॉलेज मधून लक्षावधी रुपये भरून MBA,किंवा MS, ME झालेला विद्यार्थी नोकरीच शोधतो. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताना दिसत नाही अगदी लगेच नाही म्हणत मी पण नंतर सुद्धा. तो उलट बढत्यावर बढत्या घेतो, कदाचित जास्त पैसेही कमावतो पण संपत्ती निर्माण करत नाही, स्वत:चा उद्योग व्यवसाय चालू करत नाही बऱ्याचदा त्याचा मालक हा पूर्वाश्रमीचा कामगार असतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. पुण्यातल्या अनुसया, वर्हाडे, एस एम रोलिंग ह्या कंपन्यांचे मालक पूर्वी कामगार होते. आज त्यांच्या कडे असे अनेक BE, MBA,किंवा MS, ME झालेले लोक काम करतात. चाकरी, हुकुमाची ताबेदारी हि एक मानसिकता असते आणि ती आपल्या शिक्षण व्यवस्थेत मुलांच्या शरीरात, मनात भिनवली जाते म्हणूनच जास्त शिकलेला माणूस बहुधा चाकरीच करताना दिसतो. आपल्याकडे अत्यंत हुशार विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन सनदी अधिकारी होण हि फार मोठी उपलब्धी मानली जाते म्हणजे शेवटी सरकारी चाकरच ना? जरा जास्त मोठा एवढच.

तेव्हा पालकांची हि जबाबदारी आहे कि शिक्षण/ किंवा उच्च शिक्षण आपल्या मुलाच्या अंगभूत कौशल्य, गुण, उर्मी, सुप्त आकांक्षांना खतपाणी घालतंय कि मारून टाकतय हे पाहण आणि योग्यवेळी त्याला सावध करणं. शिक्षण व्यवस्था फारशी बदलेल असे मला वाटत नाही कारण तीचं उद्दिष्ट अधिकाधिक कार्यक्षम चाकर निर्माण करणे हेच आहे.

मला वाटते आर्थिक स्वायत्तता ह्या मुद्द्यावर एवढे विवेचन पुरेसे आहे. आता पुढचे उद्दिष्ट

समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट )

माणूस हा समुहात रमणारा प्राणी असल्यामुळे लहानपणापासून त्याचे सामाजिक शिक्षण सुरु झालेलेच असते. सामाजिक शिक्षण घेण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाजात मिसळणे, अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येणे आणि लहान वयात हे शाळेत सगळ्यात उत्तम तऱ्हेने होते. शाळेतल्या वर्गात काय शिकवतात! हा वादाचा मुद्दा असू शकतो पण तिथे ४०-५० मुलांमध्ये, सदासर्वकाळ आपल्या पाठीशी असणाऱ्या आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय स्वतःच्या हिम्मतीवर एखादे मूल इतर मुलांशी कसे वागायचे, बोलायचे हे स्वत: ठरवते, शिकते.. आपण लहान मुलांना कितीही निरागस, निष्पाप, देवाघरची फुले वगैरे वगैरे काही-बाही म्हटले तरी त्यांचे एकूण सामजिक आयुष्य चांगलच गुंतागुंतीचे आणि संघर्षमय(त्यांच्या करता) असते. त्यात मग मित्रत्व,शत्रुत्व, राजकारण, गटबाजी, आपल्या गोटातल्यांचे हितसंबंध सांभाळणे, दुसर्या गोटातल्या लोकांवर (पक्षी मुलांवर ) कुरघोडी करणे हे असले उद्योग फार चालतात. यातून काही जण पुढारीपण करताना आढळतात तर काहीजण उत्साही कार्यकर्ते असतात, तर काही(खरेतर बहुतांश) नुसते अनुयायी असतात. मी हे सगळे मोठे मोठे शब्द लहान मुलांच्या, आपल्या दृष्टीने नगण्य असलेल्या त्यांच्या क्रियाकलापांसाठी का वापरतो आहे? असा तुम्हाला प्रश्न पडेल, पण मुलांकरता ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि जोपर्यंत मोठी माणसं यात नाक खुपसायला येत नाहीत तो पर्यंत ह्या गोष्टी अशाच बिनबोभाट चालू असतात.

जी मुलं लहानसहान गोष्टींच्या तक्रारी घेऊन शिक्षक किंवा आई वडिलांकडे जातात त्यांची एकंदर प्रतिष्ठा आणि मगदूर त्यांच्या गटातल्या मुलांमध्ये काय असतो हे आपण जरा माहिती काढून पहा किंवा आपले लहानपण आठवूनहि आपण हे सहज ठरवू शकतो. एवढंच नाही तर जी मुलं असल्या गटबाजी पासून दूर असतात, ‘आपण बरे आपला अभ्यास बरा’ अशा विचारांची असतात, किंवा त्यांना तसे व्हायला भाग पडले जाते (बहुधा त्यांच्या पालकाकडून आणि नंतर शिक्षकांकडून) त्यांची खरंतर गोची झालेली आढळून येते. अशा मुलांना एकटे पडले जाते, अप्रिय ठरवले जाते, मग ती मुलं अधिकाधिक कोषात जातात. अशी मुलं नंतर एकलकोंडी, हेकेखोर, चार लोकाशी जुळवून घ्यायला नालायक, झालेली आढळतात. त्यांचा मित्रपरिवार हि मर्यादित आणि अगदी जुजबी संबंध ठेऊन असलेला आढळतो. अभ्यासात ती कदाचित हुशार असतात. त्यामुळेच शिक्षक आणि पालक त्यांच्या बाबतीत समाधानी असतात पण खरोखर त्या मुलांची प्रगती होत असते का? हा मोठा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे. ‘अशी मुलं संख्येने कमी असतात, पुढे आयुष्यात अनुभव आले कि सुधारतात’ अशा प्रकारच्या विचारांनी ह्या प्रश्नांचे समाधान व्हायचे नाही. जसा आजकाल मुलांचा IQ- Intelligence Quotient (बुद्ध्यांक) मोजून त्यांची हुशारी आपण ठरवतो तसाच मुलांचा EQ- Emotional Quotient ( भावनांक) हाही महत्वाचा असतो. बऱ्याच शाळांमध्ये(अर्थात खाजगी-इंग्रजी माध्यमाच्या जास्त करून) ह्याची जाणीव आजकाल होऊ लागली आहे आणि मुलांकरिता आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांकरता समुपदेशकाची सोय ह्या शाळांमध्ये असते. आणखी एक, आपण हे सगळे आठवून पाहू आणि मग माझ्याशी बरेच जण सहमत होतील कि आपण शाळेत असताना वर्गातली जी ‘वाह्यात, होपलेस, ज्याचं काहीही होऊ शकत नाही, आयुष्यात ती काही करू शकणार नाहीत’ अशी शेलकी विशेषणं लावून कायम शिक्षकाकडून हिणवली गेलेली मुलं पुढे आयुष्यात जास्त यशस्वी झालेली दिसतात. हुशार मुलं अयशस्वी होतात असे नाही पण चांगले मार्क घेऊन उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी घेतात, नाही असे नाही पण हि नालायक मुलं अनेक वाटा चोखाळत, नाना उद्योग करत चांगलीच पुढे आलेली असतात. मी तर आमच्या वर्गातल्या हुशार क्याटेगीरीतल्या मुलाना अशा वाया गेलल्या मुलांच्या कंपनीत नोकरी अर्थात चांगल्या पगाराची करताना पहिले आहे. आता आम्ही देखील जिथे नोकरी करतो त्या कंपनीचा मालक त्याच्या वर्गातला हुशार मुलगा होता असे थोडेच असणार. असो…

ह्या बाबत आपण पालक लोक काय करू शकतो? तर मुख्य म्हणजे मुलांच्या ह्या छोटेखानी आयुष्यात उगाचच लुडबुड करणे, सतत अवाजवी हस्तक्षेप करणे सोडून देणे. हे अत्यंत महत्वाचे आहे तितकेच नाजूकही. मी हस्तक्षेप करणे सोडून द्या म्हणतो आहे दुर्लक्ष करा असे नाही. गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या किंवा काही गंभीर वळण घेऊ लागल्या कि आपण पालक म्हणून मध्ये पडणे कर्तव्यच आहे आणि त्यासाठी विवेक आणि संयम अंगी असावा लागतो. नसेल तर कमावून अंगी बाळगावा लागतो. शिवाय मुलाकरता वेळ द्यावा लागतो. शाळेतल्या, शिकवणीच्या मास्तरांवर भर टाकून निश्चिंत होणे उपयोगाचे नाही.ती एकतर पैशापासरी माणसं, ४०-५० पोरांची जबाबदारी डोक्यावर असलेली.

आणखी एक बाब म्हणजे बऱ्याचदा मूलच काहीतरी तक्रार घेऊन आपल्याकडे येते.आपल्याला हस्तक्षेप करायची गळ घालते.ते तर लहान मुलच असते आणि आपल्यावर सर्वच बाबतीत अवलंबून असते. आपण त्याचे आई बाप असतो.आणि इथे प्रॉब्लेमला सुरुवात होते.(हा प्रॉब्लेम आया आणि आज्यांच्या बाबतीत जास्त होतो,बाप आणि आजोबांच्या बाबत इतका जास्त होत नाही असे आमचे नम्र निरीक्षण आहे. माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजे निरागस, सद्गुणांचा पुतळा- सगळे जग(म्हणजे शेजारी आणि त्यांची वाह्यात कार्टी) त्याला छळायचे एकमेव उद्दिष्ट घेऊन जन्माला आले आहेत. असा त्यांचा अभिनिवेश असतो.) त्यावेळी तक्रारीचे स्वरूप नीट समजून घेऊन, गरज नसेल तर हस्तक्षेपाला स्पष्ट नकार दिला पाहिजे आणि नकार देताना मूलाला आपण निराधार आहोत, आपलेच बाप किंवा आई आपल्या पाठीशी नाही असे वाटता कामा नये. नाहीतर काही म्हणता काही व्हायचे. त्याच बरोबर स्वतःच्या लढाया, स्वतः लढायला, स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायला त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि काही झाले तरी आपण पाठीशी आहोत ह्याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. हे ऐकायला, बोलायला सोपे आणि करायला खूप अवघड वाटेल. पण नाही, हे करायाला खूप सोपे आहे पण त्याकरता खूप वेळ देणे आणि संयम मात्र आवश्यक आहे (म्हणूनच तर ते खूप अवघड आहे. नाहीका?)

तसेही आपण मुलांचे चांगले पालक व्हायचा प्रयत्न करतो म्हणजे काय करतो. तर सगळ्या गोष्टी त्यांना तयार हातात देतो, रागवत, मारत नाही, कायम त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो नाहीका! चांगले आई बाबा असेच असतात हो ना?. चूक! हे असे आई बाबा सगळ्यात वाईट आई बाबा असतात आणि अशा लोकांना जे मुल असेल ते त्याच्या कडून काढून घेऊन त्यांना पुन्हा मूल होऊ द्यायला कायद्याने खरेतर बंदी केली पाहिजे- असो… ते काही होणार नाही (तसे व्हावे अशी माझी इच्छाही नाही ) पण असे आई बाबा स्वतःला सुधरवू नक्कीच शकतात. माझ्या पत्नीकडे त्याच्या शाळकरी मुलांचे प्रॉब्लेम घेऊन येणाऱ्या (ती मानसिक समुपदेशक आहे) पालकांपैकी ९०% पालकांमध्येच प्रॉब्लेम असतात, त्यांच्या मुलांमध्य नाही आणि त्यांनाच समुपदेशनाची गरज असते, मुलाना नसते. हि वस्तुस्थिती जवळपास सगळेच समुपदेशक मान्य करतील. मानसशास्त्रात helicopter parenting नावाची एक संज्ञा आहे. म्हणजे मुलांची अति काळजी घेणे, सतत त्यांना मदत वं संरक्षण पुरवणे त्यांनी मागितली नसताना, गरज नसताना. आणि मग मुलं सुद्धा परावलंबी आणि रडी होत जातात.

एक उदाहरण देतो. जवळ पास सर्वजण आपल्या मुलांना सायकल चालवायला शिकवतात. आमच्या कॉलनीतहि हे घरगुती सायकल प्रशिक्षण वर्ग चालतात ज्यात बाबा मास्तर आणि पोरगा किंवा पोरगी विद्यार्थी असतात. नवी छान कोरी ( आणि अतिशय लहान तरीही साईडव्हील लावलेली )सायकल आणली जाते. मुलाला त्यावर बसवून मागून बाप धरतो आणि ढकलतो. तो घामाघूम झालेला असतो धापा टाकत असतो. पण पोराची सायकल काही लवकर सोडत नाही. आता खरतर साईडव्हील असताना मुल पडायची शक्यता कमीच पण तरीहि हे होत असतं.जस काही मुल पडलं तर आकाशच कोसळणार आहे किंवा बाबाच्या सायकल शिकवण्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उमटणार आहे. मुल तर मग पायडल हि मारीत नाही.बाप ढकलतोय तर का मारेल. साईडव्हील पुढे ६-६ महिने राहतात. बाबांचा शिकवण्याचा उत्साह लवकरच मावळतो आणि मुल एकटेच सायकल चालवू लागते. पुढे मोठ्या मुलांचे किंवा भावाचे पाहून आणि त्यांनी चिडवाल्यामुळे ते साईडव्हील काढते आणि सायकल शिकते. हि मुलं साधारण ५ वर्षांची असतात. कॉलनीतल्या कुलकर्णी आजोबांची नात आज ६.५ वर्षांची होऊनही सायकल चालवू शकत नाही, पडेल म्हणून तिचे आजी आजोबा तिला सायकल वर बसूच देत नाहीत.

ह्या आजी आजोबांच्या बाबतीत मला काही म्हणणे भाग आहे. थोडे (म्हणजे बरेच) विषयांतर करण्याचा दोष पत्करून सांगतो. आमच्या कॉलोनी मध्ये हे उपरोल्लेखित कुलकर्णी कुटुंब रहते. तसे बऱ्यापैकी सुखी आणि चाकोरी बद्ध जीवन जगणारे, म्हणजे मुलगा सून दोघे नौकरी करतात, दोन छान नाती आहेत. आजी आजोबा रिटायर्ड आहेत ते नातींच सगळ बघतात। तर त्यांची धाकटी नात माझ्या मुलींबरोबर शिकते, ६.५ वर्षांची आहे आताच फुल फ्लेज म्हणतात तशी शाळा सुरु झालेली आहे. पण आजींना माझ्या मुलींबरोबर स्वतःच्या नातीची तुलना केल्याशिवाय राहवत नाही. त्यांचा सगळा कटाक्ष आपली नात सगळ्यात पुढे असावी याकडे असतो, त्यात अनैसर्गिक असं काहीच नाही फक्त मला प्रश्न असा पडतो की हे सर्व त्या मला किंवा माझ्या बायकोला का विचरतात? म्हणजे त्यांचा मुलगा आणि सून कधी यात पडताना दिसत नाहीत. शेवटी न रहवून मी त्यांना एकदा विचारले की तुमचा मुलगा किंवा सून मुलींच काही बघतात की नाहीं. त्यावर त्या म्हणाल्या ” छे त्यांना वेळ कुठे असतो? आजकाल करियर वगैरे किती अवघड झालय ! आम्ही आहोत म्हणून नातींकडे बघतो तरी नाहीतर पाळणा घराला हजारो रुपये मोजायचे आणि पुनः ते काय आपल्या पोरांकडे नीट बघणार , ती पडली शेवटी पैशापासरी माणसं। “मी म्हटले अहो पण ही तुमची मुल नाहीत ही तुमची नातवंड आहेत. त्यांना वाढवण्याची जबाबदारी तुमची नाही तुमच्या मुलाची आणि सुनेची आहे। तुम्ही थोडिफार मदत करू शकता पण मदतच, संपूर्ण जबाबदारी नाही, तुम्ही तुमचे काम बरं वाइट कसंही असेल ते केलं आहे एकदा (तसं यावरून ही फार बरं काम झालाय असं वाटत नाहीं पण ते एक असो) आता त्यांची पाळी आहे नाहीं का? आणि काय हो ह्या वयात तुम्हाला काही दुखत खपत असेल तर ते तुम्ही पहायच की नातिमागे धावयाचे ?पाळणाघरात काय वाइट आहे ? तुमचा विश्वास नसेल तर घरात एक बाई ठेवा। तिच्यावर अधुन मधून तुम्ही लक्ष ठेवा. पैसे घेऊन काम करणारे सगळे काय कामचुकार असतात, तुम्ही पैसे घेऊनच नौकरी करात होतात न? मग!, तुमच्या घरात कोणी डॉक्टर नाही मग बाहेरचे डॉक्टर पैसे घेऊन उपचार करतात ना आणि वाटते ना बरे तुम्हाला? तुमची सून आणि मुलगा कशाला मध्ये लक्ष घालतील ? फुकट सांभाळणारे गड़ी भेटले आहेत न त्यांना ? एकदा जरा मुलींची शाळा इंग्लिश ऐवजी मराठी मध्यमाची करणे किंवा एखादा या सरखा महत्वाचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊन बघा मग कळेल तुम्हाला गम्मत आणि तुमची किंमत। अहो हा तुमचा संसार नाहीं हा त्यांचा संसार आहे आणि तो त्यांना करू दे तुम्ही फक्त सल्ला आणि अडचणीला मदत म्हणून रहा. अर्थात हे काही त्यांना पटले नाही आणि आवडले तर नाहीच नाही….
असो तर सांगायचा मुद्दा असा कि सामजिक भान आणि समाजात वावरताना लागणारी हुशारी अंगी येणे हा सुद्धा मुलांच्या शिक्षणाचा फार महत्वाचा भाग आहे आणि यात शाळे इतकीच महत्वाची जबाबदारी पालकांची ( आई बाबा- आजी आजोबा नव्हे) आहे.

मुलांच्या शिक्षणातल्या सामाजिक शिक्षणावर एवढे विवेचन पुरेसं आहे. आता पुढील उद्दिष्ट – पुढील भागात

क्रमश:

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय