व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे नऊ मंत्र!!

व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे नऊ मंत्र!

कल्याणहुन विXXजी प्रश्न मांडतात,

“सर, मी एक ज्योतिषशास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, रत्नविशारद, अंकशास्त्रज्ञ आणि हस्तरेषा तज्ञ आहे, मी खुप प्रामाणिकपणे काम करतो, पण म्हणावे तसे यश मिळत नाही,

“मला वाटते माझी मार्केटींग कमी पडत आहे, माझ्या बरोबर करीअर सुरु केलेले लोक आता टी. व्ही. वर येतात, त्यांच्याकडे गाडी-बंगला आहे, मी आजही चाळीतच राहतो, मला माझे उत्पन्न वाढवायचे आहे, आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनायचे आहे!”

हा एकट्या विXXजी चा प्रश्न नाही, हा असंख्य लोकांचा प्रश्न आहे, माझ्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले, माझ्या क्षेत्रात असलेले लोक, आणि वयाने माझ्या बरोबरीचे किंवा लहान असलेले लोक, जेव्हा आर्थिक बाबतीत, कित्येक पटीने माझ्या पुढे गेलेले दिसतात, तेव्हा ते मला अंतर्मुख होवुन आत्मपरीक्षण करायला संधी देतात.

आपल्या सर्वांना श्रीमंत व्हायचं आहे, आणि बिजनेस करणं, हा श्रीमंतीकडे घेऊन जाणारा एक रस्ता आहे, पण त्यासाठी, आपली बिझनेसची गाडी सुद्धा सुसाट वेगाने पळणारी हवी, नाही का? महीना दहा हजार रुपये कमवणारा आणि महीना दहा लाख रुपये कमवणारा दोघेही एकच बिजनेस करतात, पण दोघात एकच फरक असतो, जो यशस्वी असतो, त्याने आपला ब्रॅंड डेव्हलप केलेला असतो, म्हणुन तो आपल्या स्पर्धकांच्या फार पुढे निघुन गेलेला असतो.

तुलना जर ईर्ष्या, मत्सर आणि हेवा ह्यांना जन्म देत असेल तर ती वाईटच, पण तुलना जर आत्मपरीक्षण आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या हेतुने केली जात असेल तर तिचे स्वागत आहे.

माझ्या क्षेत्रातल्या टॉपच्या यशस्वी व्यक्तींएवढं, यशस्वी होण्याचं गुपित, त्यांच्याकडून किंवा इतरांकडून, मला जाणुन घ्यायचं आहे, शिकायचे आहे, हा विचार, हे वाक्य आपल्याला एक नवी शक्ती, उत्साह आणि आनंद प्रदान करतं.

तुम्ही तुमच्या व्यवसायात मास्टर आहात, पण प्रचंड यशस्वी आणि श्रीमंत होण्यासाठी ते एकटचं साधन पुरेसं नाही, त्यासोबत तुम्ही तुमच्या दर्जेदार प्रॉडक्ट किंवा जलद सर्व्हिसेससोबत विक्री करण्याचं कौशल्यही प्रभावीरित्या वापरलं पाहीजे. माझ्या व्यवसायात आलेल्या चढउतारांनी मला खुप छळले, खुप वाचन-मन-चिंतन करुन व्यवसायात स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मी नऊ उपाय शोधुन काढले, अंगात मुरवुन घेतले, ज्याचा मला खुप फायदा झाला, आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठीचं हे तंत्र आज तुमच्यासोबत शेअर करत आहे.

१. प्रामाणिकपणा

तुमचा व्यवसाय कितीही लहान असो वा मोठा, यशस्वी होण्यासाठी, तुमचं उत्पादन दर्जेदार असावं लागेल, आणि उच्च गुणवत्तेची सेवा तुम्ही ग्राहकांना द्यावी लागेल. लोक पैसे मोजतात आणि चोख क्वालीटीची अपेक्षा ठेवतात, त्यात गैर काहीच नाही, कारण जेव्हा आपण ग्राहक असतो, तेव्हा आपणही लोकांकडून अशीच अपेक्षा ठेवतोच की!

व्यवसायाची ओळख ही त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावरुन बनते, “हा माणुस चांगला आहे, तो मला करेक्ट मार्गदर्शन करेल, अजिबात फसवणार नाही, असा विश्वास आपल्या बोलण्यातुन वागण्यातुन निर्माण केला गेला पाहीजे, मग खोर्‍याने पैसा ओढता येतो. ग्राहकाचे विश्वासु मित्र बनुन, त्याला खरोखर मदत करुन, त्याचं मन जिंकल्यास, आपण सांगु ती फीस मोजताना तो अजिबात कचरणार नाही, उलट आनंदाने आणि समाधानाने देईल.

याउलट कसल्याही कारणाने आपल्याकडून दुर्लक्ष झाले, उच्च गुणवत्ता राखली गेली नाही, कमिटमेंट पाळली गेली नाही, त्याची अपेक्षापुर्ती झाली नाही तर हाच ग्राहक आपल्याविरुद्ध शंखनाद करेल, विनाजाहीरात, नवनवीन कस्टमर फुकटात मिळण्याचा एक मार्ग कायमचा ब्लॉक होईल.

त्यामुळे आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक रहा, वेळप्रसंगी घस सोसा, पण ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी शंभर टक्के एफर्ट्स द्या.

२. बस्स……युनिक बना!..

हे सगळं करत असताना, स्वतःची शक्तीस्थाने ओळखुन आपलं उत्पादन, आपली सेवा, एकमेवद्वितीय कशी बनेल याचा ध्यास घ्या,

“मी जे देतोय, ते बाजारात तुम्हाला कुठेच मिळणार नाही”, हे वाक्य ग्राहकाला भिडलं पाहीजे, पटलं पाहीजे, त्याच्या मनात खोलवर उतरलं पाहीजे,

तुम्ही करत असलेला व्यवसाय बाजारात हजारो लोक करत आहेत, तेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकाला काहीतरी वेगळं दिलं पाहीजे, तर तो तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या वेगळेपणामुळे कायमचा ग्राहक बनेल. तुमचा प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसल्या ना कसल्या प्रकारे सरस असला पाहीजे.

मग, तुमच्या उत्कृष्ट सेवेसाठी, नकळत तो सगळा खिसाही रिकामा करेल.

३. ध्येय

ग्राहकाला तुम्ही काय देणार आहात हे स्पष्ट करणं, म्हणजे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट. तुमचं व्हिजन आणि मिशन तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यात खुप मदत करतं. पदोपदी तुम्हाला मार्गदर्शन करतं.

नाईके जगातली शुज बनवणारी एक उत्कृष्ट कंपनी, त्यांचे मिशन स्टेटमेंट आहे, तुम्ही एथलिट असाल आमचे शुज वापरा, ते बेस्ट आहेत. त्यांनी सोबत अजुन एक वाक्य जोडून स्वतःला व्यापक केले.

“ज्याच्याकडे बॉडी आहे, तो एथलिट आहे.” नकळत त्यांनी प्रत्येकाला स्वतःचा ग्राहक बनण्याचं निमंत्रण दिलं.

आपण आपल्या संभाव्य ग्राहकाला आपल्याकडे येण्याचं, निमंत्रण देतो का?

जो ग्राहक आला, त्याला वेगळी आणि खास ट्रीटमेंट देतो का?

दर्जेदार आणि आगळवेगळं उत्पादन, सेवा देतो का?

काहीतरी वेगळं म्हणजे तुमचा नम्रपणा असु शकतं, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची कस्टमरबद्दल आपुलकी, तुमचं त्यांना आदरानं बोलणं हेही असु शकतं, आजकालच्या प्रोफेशनल जगात बहुतांश लोक आपापल्या तोर्‍यात वावरत असतात, तेव्हा मन जिंकुन, माणसं आपलीशी करण्यार्‍याला आजही तसा बराच स्कोप आहे.

४. आपलं विक्री करण्याचं कौशल्य डेव्हलप करा.

तुमचं प्रॉडक्ट खुप छान आहे हे फक्त तुम्हाला माहीत असुन चालणार नाही, त्याला जगासमोर आकर्षक स्वरुपात मांडावं लागेल. घरात वाट बघत बसल्याने कस्टमर येत नाही. पहीले एक हजार कस्टमर शोधण्यासाठी आपलं आरामदायी आयुष्य सोडुन, तुम्हाला बाहेर पडावं लागेल, एकेक ग्राहकाला आपलेपणाने जोडा, त्यांन तुमच्या वस्तुची आणि सेवेची चव द्या, आणि तुमच्या उत्पादनात खरच दम असेल तर आता कस्टमर तुम्हाला शोधत तुमच्या दारात येतील.

तुमच्या उत्पादनाचं आगळवेगळं स्वरुप, देखणा लोगो, चटकदार कॅचलाईन यांच्या पाठबळावर शेतात दाणे पेरतात, तसे वेगवेगळ्या माध्यमांच्या सहाय्याने मार्केटमध्ये, जिकडेतिकडे पसरावुन टाकत रहायचे, कधी वर्तमानपत्रे, कधी सोशल मिडीया, कधी बॅनरबाजी, कधी पॉम्प्लेट, कधी पर्सनल कॉन्टॅक्ट अशी वेगवेगळी शस्त्रे वापरायची.

कुठली बी उगवलं, कुठलं बी उगवलं नाही, हे बघत बसायला शेतकर्‍याकडे वेळ नसतो, तो फक्त प्रामाणिकपणाने, कष्टाने पेरत राहतो ,बस्स! आपणही तेच करायचं, पेरत रहायचं, प्रामाणिकपणे पेरलेलं, उगवल्याशिवाय राहील का?

आणि विक्री क्षेत्रात एक मुलमंत्र आहे, हार मानायची नाही, NO म्हणजे New opportunity. एखाद्याची नकार पचवण्याची क्षमता जितकी जास्त, तितका तो उत्कृष्ट सेल्समन!..
आपल्याला मोठ्ठा ब्रॅंड बनवायचा आहे, तेव्हा नकार किंवा छोट्यामोठ्या अपयशांनी निराश होवुन कसं चालेल, त्यापेक्षा विक्री कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहीजे. विक्रीचं एक सिक्रेट म्हणजे, कस्टमरशी रिलेशन वाढवा, ग्राहकाशी जवळीक निर्माण करा. त्याला बर्थडे, एनिव्हरसरी विश केली,
काही अधिकचं फ्री दिलं, कसल्याही पद्धतीने ग्राहकाचा फायदा केला की, तो लाईन लावुन तुमच्या दुकानापुढे उभा राहतो.

५. आवड

विक्रीच्या व्यवसायात उत्साह नावाचं टॉनिक सतत आवश्यक आहे. मरगळलेले, आळसावलेले लोक आपला ब्रॅंड नामांकित बनवु शकतील काय? सळसळता उत्साहामुळे, तुम्ही, सतत, नवनव्या कल्पनांना जन्म देवु शकाल. त्यांना अंमलात आणु शकाल.

६. आपला ग्राहक शोधा

कुठलाही ब्रॅन्ड बनवण्याच्या आधी नो युवर कस्टमरच्या धर्तीवर आपला संभाव्य ग्राहक कोण आहे ते शोधलं पाहीजे. उदा. एखाद्या स्टायलिश कपड्यांच्या दुकानातला ग्राहक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असेल, ते कपडे घेण्याची लो इन्कम ग्रुप मधल्या लोकांची ऐपत नसेल, तेव्हा टारगेट कस्टमर शोधा, त्यांच्याशी संपर्क वाढवा. कॉलेजची मुले, स्टायलिश राहतात, त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असते, मग जमल्यास त्यांची एखादी मोठी गॅदरींग, एखादा इव्हेन्ट स्पॉन्सर करा. आपली जाहीरात आपल्या संभाव्य ग्राहकाला, आपल्यापर्यंत घेऊन आली पाहीजे.

७. एक आकर्षक लोगो आणि टॅगलाईन बनवा.

लोगो असणं, खुप आवश्यक आहे, कालांतराने ती आपली ओळख बनतं. सर्वप्रथम कुठेही, आपलं लक्ष पहील्यांदा लोगोवर जातं. नकळत ग्राहकाच्या मनात आपली ‘ब्रॅंड बिल्डींग’ चालु होते. लोगो ग्राहकांच्या मनावर लवकर ठसतो. ब्रॅंड आहे म्हणजे चांगलाच असणार असे आपल्या बाजुने त्याचे विचार आपोआप वळु लागतात.
लोगो असा असावा, की अधिक माहीती न सांगता तुमचं उत्पादन, किंवा तुमची सेवा, चटकन ग्राहकाला कळाली पाहीजे, जर तुमच्या लोगोतुन तुमच्या व्यवसायाचा बोध होत नसेल, तर लोगो बदला, अधिक सुलभ, अधिक आकर्षक करा.

लोगोमुळे तुमचा व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा असा, उठुन दिसतो. तुम्हाला डिझाईन येत नसेल तर प्रोफेशनल लोकांची मदत घ्या, देखणा लोगो बनवुन व्हिजीटींग कार्ड, ऑफीस, दुकानाचा डिस्प्ले, जाहीराती यात मनसोक्त त्याचा वापर करा. ती तुमची युनिक ओळख बनते.

घराला घरपणं देणारी माणसं, म्हणलं की डिएसके आठवतो, तसंच ‘I m lovin it’ म्हण्टलं की मॅकडोनाल्ड आठवतं, रहा एक पाऊल पुढे म्हणलं की एबीपी माझा आठवतं, ह्यालाच ब्रॅन्ड म्हणतात. आपल्या व्यवसायाचं सार एका वाक्यात लुभावण्या पद्धतीने मांडलं की टॅगलाईन तयार होते.

८. स्वतःमधल्या कमतरता शोधा आणि प्रत्येक घटनेमधुन काहीनाकाही शिका

मार्केटवर बारकाईने लक्ष ठेवुन, तुमचे स्पर्धक कोणत्या बाबतीत वरचढ आहेत, त्याचा अंदाज घ्या. मग स्वतःमध्ये सुधारणा कशी करता येईल, ते शोधा. उदा. नवीन सॉफ्टवेअर शिकणं, ऑफीसला, दुकानाला, चांगलं इंटीरीअर बनवणं, मनुष्यबळ वाढवणं, व्यवसायाला उपयोगी पडणार्‍या नवनव्या स्किल्स शिकणं.

आपला स्पर्धक आपल्यापेक्षा लोकप्रिय असेल तर आपण आणखी कायकाय केल्याने त्यापेक्षा जास्त चांगले बनु याचा सतत विचार करा.

९. प्रेम

आपल्या अवतीभवती वावरणारे लोक, आपले ग्राहक, आपले कर्मचारी, भागीदार, सहकारी, यांच्यामुळेच आपण अधिकाधिक श्रीमंत होत असतो, तेव्हा त्यांच्यावर, आपला परीवार मानुन, कुटुंबियांसारखं प्रेम करायला शिकलं पाहीजे. त्यांच्या सुखादुःखात समरस झाल्यास, इतर ठिकाणी अधिक पैशाचं अमिष मिळुन सुद्धा ते आपल्याशी निष्ठावंत राहतील.

अशा अनेक लोकांच्या योगदानानेच कंपनी अधिकाधिक समृद्ध होत जाते. जीव तोडुन काम करणार्‍या टीमच्या बळावरच आपण यशाच्या शिखरावर पोहचु शकतो.

उदा. कर्मचारी, डिलर, सहकारी, कामगार.

यशाच्या शिखरावर पोहचवणार्‍या आणि पैशाचा धोधो पाऊस पाडणार्‍या ह्या नऊ पायर्‍या आहेत.

मित्रांनो, तुम्ही हा गीता संदेश वाचला असेल,

“फुकट मिळत नाही, केलेले वाया जात नाही”,

“काम करीत रहा, हाक मारत जा, मदत तयार आहे”.

देवावर अखंड विश्वास असला की वाटचाल सोपी आणि सुकर होते.

आजपासुन तुमचा व्यवसाय तुम्हाला भरघोस उत्पन्न देवो, अशा खुप खुप शुभेच्छांसह,

मनःपुर्वक धन्यवाद!..

वाचण्यासारखे आणखी काही…..

माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)
सुंदर ते ध्यान!
निर्भय बना!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!