मित्रांनो,
या संपूर्ण सृष्टीत जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत माणूस सतत संपन्नतेच्या, समृद्धीच्या आणि परमवैभवाच्या सिद्धतेकडं धाव घेत आहे.
प्रचंड कष्टानं त्यानं निरनिराळं संशोधन करून आपला विकास साधला. अनादी काळापासून त्याला संशोधनाची आवड आणि गरज वाटत आली आहे.
यातूनच सर्व सोयींनी संपन्न असं सुकर जगणं आपल्या वाट्याला आलं आहे. ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली संकल्पना आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत.
लाखो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी आपण अगदी सहज संवाद साधू शकतो. इतकंच नाही तर त्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर प्रत्यक्ष पाहू सुद्धा शकतो.
काही शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी मांडलेल्या सिद्धांताची अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोड आणि त्याची प्रचिती म्हणजे मानवाने गाठलेल्या प्रगतीचा मोठा आविष्कारच म्हणावा लागेल.
संगणक नावाच्या एका छोट्या यंत्राद्वारे आज आपण आपलं दैनंदिन जीवन अधिक सुकर करीत आहोत. संगणकाचा वापर आता केवळ माहिती साठविण्याकरिता अन् मोठमोठाली गणिते सोडविण्याकरिता मर्यादित राहिलेला नसून त्याच्या वापराच्या मर्यादा सतत वाढतच जात आहेत.
एखादं पत्र सुवाच्च अक्षरात लिहिण्यापासून ते अगदी एखादं यान अवकाशात धाडण्यासाठी संगणकाचे सहकार्य लाभत आहे.
मग अशा आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा युगात संगणक प्रशिक्षण ही काळाची गरजच ठरणार ना! ५-६ वर्षांचा मुलगा आणि ७० वर्षांचे आजोबा यांपैकी कोणीही आता संगणकाच्या संकल्पनेबाबत अनभिज्ञ नाहीत.
पुरेशी आणि शास्त्रीय जरी नसली तरीसुद्धा संगणकाची प्राथमिक ओळख सर्वांना झालेली असतेच. कारण दैनंदिन वापरात संगणकाचा वापर आणि त्यातून आपल्या कामाचा वेग वाढला आहे. मात्र, त्याची शास्त्रशुद्ध ओळख होण्याकरिता अधिकृत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
अर्थात् प्रशिक्षण म्हणजे केवळ संगणक हाताळता येणे आणि इंटरनेट वापरता येणे एवढेच मर्यादित नाही तर हे सगळे करीत असताना त्यामागील तांत्रिक प्रक्रिया समजावून घेणे होय.
चला तर मग अशा काही विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांची ओळख करून घेऊयात.
एम.एस-सी.आय.टी. ने उपलब्ध करून दिलेले अभ्यासक्रम..
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा एम.एस-सी.आय.टी. अर्थात महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आणि प्रमाणित आहे. या अभ्यासक्रमामध्ये संगणकाच्या प्राथमिक माहितीपासून ते सॉफ्टवेअर, हार्डवेअर तसेच संगणकाशी संबंधित विविध उपकरणांची हाताळणी जसे की स्कॅनर, प्रिंटर इत्यादींविषयीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.
विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता तुमच्याकडे केवळ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती आणि एस.एस.सी. अर्थात दहावी पास असणे आवश्यक आहे.
मात्र दहावी पास असणे ही अट अनिवार्य नाही. याचाच अर्थ संगणक शिकण्याची इच्छाशक्ती असली तरी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
या अभ्यासक्रमाकरिता परीक्षा शुल्कासह केवळ जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत एवढी प्रवेश फी आकारण्यात येते. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेच्या माध्यमांसह हिंदी, गुजराती, तेलगु, कन्नाडा, माध्यमातूनही उपलब्ध आहे.
हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असून या अभ्यासक्रमाच्या शेवटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते.
हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा प्रकारची नोकरी मिळू शकते.
मित्रांनो, या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रूजू झालेल्या सर्वांना अनिवार्य करण्यात आला आहे. एम.एस.-सी.आय.टी. शिवाय महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अन्य विविध अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एम.सी.ई.डी. येथे उपलब्ध असलेले अभ्यासक्रम
महाराष्ट्र शासनाची प्रातिनिधीक प्रशिक्षण संस्था म्हणून काम करणार्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
अर्थात एम.सी.ई.डी. येथेही संगणकाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
संगणकाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता एम.सी.ई.डी. ने क्षेत्रनिहाय तीन वर्ग केलेले असून यामध्ये महानगरपालिका क्षेत्र असलेला एक वर्ग, नगरपालिका क्षेत्र असलेला दुसरा वर्ग आणि ग्रामीण भाग म्हणजे तिसरा वर्ग असे वर्गीकरण केलेले आहे.
या वर्गवारीप्रमाणे एम.सी.ई.डी. ने शुल्काची रचना केलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी शुल्कात प्रशिक्षण घेणे शक्य होते. एम.सी.ई.डी. चे महाराष्ट्रात तीनशे हून अधिक अधिकृत प्रशिक्षण केंद्रे असून त्यापैकी बहुतेक केंद्रे ही ग्रामीण भागात आहेत. एम.सी.ई.डी. च्या सर्व संगणक अभ्यासक्रमांचे जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख दृष्टिने नियोजन करण्यात आले आहे.
एम.सी.ई.डी. च्या सर्व अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत व्यवसाय उभा करण्याकरिता कर्ज दिले जाते.
तसेच याकरिता आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रियेची संपूर्ण माहिती प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमादरम्यानच दिली जाते. त्यामुळे मित्रांनो, स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी एम.सी.ई.डी. चे अभ्यासक्रम हा एक उत्तम आणि प्रमाणित मार्ग आहे.
एम.सी.ई.डी. चा सी.डी.टी.पी. अर्थात डिप्लोमा कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग हा अभ्यासक्रम ग्रामीण युवकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अलिकडच्या काळात संगणकाचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे डी.टी.पी. सेंटर्स, डी.टी.पी. ऑपरेटर्स यांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या उद्योगाची तसेच नोकरीच्या अधिकाधिक संधी प्राप्त होत आहेत.
या अभ्यासक्रमात वर्तमानपत्राची, मासिकाची, नियतकालिकांची पाने संगणकावर तयार करणे, एखाद्या उत्पादनाची जाहिरात तयार करणे, संगणकावर निमंत्रणपत्रिका, व्हीजिटिंग कार्डस् इ. चे संगणकीय प्रशिक्षण दिले जाते.
त्यासाठी आवश्यक त्या सॉफ्टवेअर्सचे प्रशिक्षण याशिवाय कॉम्प्युटर फंडामेंटल्स, ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज, डीटीपीच्या संकल्पनांचा यात समावेश होतो.
या अभ्यासक्रमासाठी किमान पात्रता बारावी पास आहे. या अभ्यासक्रमाचे ग्रामीण भागासाठीचे शुल्क साधारण तीनहजार रुपयांपर्यंत आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. या अभ्यासक्रमाच्या शेवटी बहुपर्यायी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येते.
हा अभ्यासक्रम यशस्वीरित्यापूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना स्वत:चे डीटीपी सेंटर उभे करता येऊ शकते. अर्थात् त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र कर्जही उपलब्ध करून देते. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना कोणत्याही नियतकालिकात डीटीपी ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डिझायनर म्हणून नोकरीसुद्धा मिळू शकते.
एम.सी.ई.डी. चा ऍडव्हान्स्ड डिप्लोमा इन हार्डवेअर ऍण्ड नेटवर्किंग हा एक वर्षाचा अभ्यासक्रमही उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमासाठी ग्रामीण भागाकरिताचे शुल्क साधारण दहाहजार रुपये एवढे आहे.
या अभ्यासक्रमामध्ये हार्डवेअर, तसेच लोकल एरिया नेटवर्क, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्किंग प्रोटोकॉल्स, वर्क स्टेशन ऍडमिनिस्ट्रेशन इत्यादी नेटवर्किंग संदर्भातील विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमामध्ये एका प्रकल्पाचाही समावेश असून त्या प्रकल्पासह परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना असिस्टंट सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर, असिस्टंट नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नोकरी मिळू शकते. याशिवाय कॉम्प्युटर मेंटेनन्सचा उद्योगही उभारता येऊ शकतो. अर्थात यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज उपलब्ध करून देतेच.
अलिकडच्या काळात अत्यंत आवश्यक आणि आपल्या उत्पादनाची योग्य पद्धतीने माहिती देण्यासाठी वेबसाईट हा अत्यंत साधा, सोपा आणि अत्यंत वेगवान आणि प्रभावी माध्यम बनले आहे. मग ती वेबसाईट तयार करण्याचा उद्योग आणि त्या क्षेत्रातील नोकरीच्या संधीही वाढलेल्या आहेत.
या क्षेत्रात काम करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी एम.सी.ई.डी. चा सर्टिफिकेट कोर्स इन वेब डिझायनिंग हा अत्यंत उपयुक्त अभ्यासक्रम आहे. यामध्ये संगणकाच्या प्राथमिक माहितीपासून ऑपरेटिंग सिस्टीम, इंटरनेट, एच.टी.एम.एल, डी.एच.टी.एम.एल., जावा स्क्रिप्ट, फ्रंट पेज, इमेज एडिटिंग पॅकेजेस, वेब बेस्ड प्रोजेक्ट आदी विषयांचा समावेश आहे.
हा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा असून ग्रामीण भागाकरिता या अभ्यासक्रमाकरिता चार हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वेब साईट डिझायनिंगचा स्वत:चा व्यवसाय उभा करता येऊ शकता. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सहकार्य करतेच. याशिवाय तुम्ही वेब डिझायनर, वेब डेव्हलपर म्हणून नोकरीसुद्धा मिळवू शकता.
याशिवाय एम.सी.ई.डी. चे ऍडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, कॉम्प्युटर टिचर्स ट्रेनिंग कोर्स, ऍडव्हान्स सर्टिफिकेट इन फायनान्शिअल अकाऊंटिंग यांसारखे अन्य अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जवळच्या एम.सी.ई.डी. केंद्राला भेट द्या.
दहावी – बारावी नंतर रीतसर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे विविध मार्ग
संगणक विषयात आपले करिअर घडवू इच्छिणार्या इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि अकरावीमध्ये कोणत्याही शाखेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांकरिता अकरावी आणि बारावीकरिता माहिती तंत्रज्ञान हा एक पर्यायी विषय उपलब्ध आहे.
या विषयामध्ये संगणकाची प्राथमिक आणि मूलभूत माहिती समाविष्ट आहे. इयत्ता बारावीमध्ये माहिती तंत्रज्ञान या विषयाची 100 गुणांची परीक्षा असून त्यातील 60 गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते आणि अन्य 40 गुण हे प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून असतात.
कोणत्याही शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध विद्यापीठांनी विविध प्रकारचे आणि विविध कालावधीचे पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध केलेले आहेत.
पुणे विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ ऍप्लिकेशन्स अर्थात बीसीए हा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. पुणे विद्यापीठाचे अभ्यासक्रम राबविणार्या 300 हून अधिक महाविद्यालयात हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता साधारण एप्रिल ते जूनच्या दरम्यान विद्यापीठामार्फत सामायिक प्रवेशपरीक्षा घेतली जाते. त्यात गुणवत्तानिहाय निवड करून या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश दिला जातो. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला विद्यापीठाची पदवी प्राप्त होतेच शिवाय तुम्ही प्रोग्रॅमर, डेटा ऍनालिस्ट वगैरे पदावर काम करू शकता.
इयत्ता अकरावीपासूनच जर तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला संगणक विषयातील पदवी प्राप्त करण्याकरिता बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स अर्थात बी.सी.एस. हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे असून पुणे विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयात हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला थेट नोकरी प्रोग्रॅमर, डेटा ऍनालिस्ट वगैरे नोकरी तर मिळू शकतेच शिवाय पुढे तुम्ही एम.सी.ए., एम.एस.सी. इ. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरिता पात्र ठरता.
त्यासाठी अभ्यासक्रमानुसार प्रवेशपरीक्षेनंतर गुणवत्तानिहाय प्रवेश घेता येतो. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढे तुम्ही संगणक विषयात संशोधक, प्रशिक्षक म्हणून करिअर घडवू शकता.
कोणत्याही विषयातील पदवीधारकांसाठी पुणे विद्यापीठात संगणक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदविका अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
हा एक वर्षाचा अर्धवेळ अभ्यासक्रम असून नोकरी करून देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. पुण्यामध्ये नामवंत महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमात प्रोग्रॅमिंग, ऑपरेटिंग सिस्टीम, तसेच ई-गर्व्हनन्स यांसारख्या विषयांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही प्रोग्रॅमर, डेटा-बेस डेव्हलपर, वेबडेव्हलपर म्हणून नोकरी करू शकता.
या अभ्यासक्रमांशिवाय प्रगत संगणक विकास केंद्र अर्थात् सीडॅक या केंद्र शासनाच्या संगणक संस्थेने संगणक प्रशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध केलेले आहेत.
सीडॅकमध्ये निरनिराळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. त्यांच्या अभ्यासक्रमांचा कालावधीत साधारण 6 महिन्यांपासून पुढे असतो. विविध संशोधन आणि प्रकल्प राबविण्याचे काम सीडॅक करीत असल्याने तज्ज्ञ मार्गदर्शक आणि अद्ययावत संगणकसामुग्री यांनी हे प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण देण्याकरिता सुसज्ज असते.
तेथील अभ्यासक्रमांना प्रवेशपरीक्षा असून त्यांच्या वेबसाईटवर वेळोवेळी याविषयी माहिती अपलोड करण्यात येते.
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण मंडळानेही संगणक प्रशिक्षणाकरिता अल्पमुदतीचे विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये डीटीपीसारख्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक सूचना प्रौद्योगिक संस्थानच्या वतीने विविध अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या संस्थेमार्फत अभ्यासक्रमावर आधारित विविध स्तरांवर डी. ओ. इ. ए. अशा नावाने परीक्षा घेण्यात येतात. या संस्थेला डी.ओ.इ.ए.सी.सी. अर्थात् डोएक म्हणूनही ओळखतात.
व्हीडिओ एडिटिंग, गेम मेकिंग, ऑडिओ एडिटिंग, हार्डवेअर, नेटवर्किंग, ऍनिमेशन, ग्राफिक्स डिझायनिंग अशा प्रकारचे विविध अभ्यासक्रम राबविणार्या खाजगी प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम त्या संस्थेची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.
विशेषत: नोकरीसंदर्भात अशा संस्थांनी दिलेल्या आश्वासनांची पुरेशी खात्री करूनच प्रवेश घ्यावा. अर्थात् अशा अनेक नामवंत संस्था अनेक वर्षांपासून अशाप्रकारचे यशस्वी प्रशिक्षण तसेच नोकरीकरिताचे मार्गदर्शन सुयोग्य पद्धतीने देत आहेत.
चला तर मग मित्रांनो, संगणक शिकूयात, काळासोबत राहूयात आणि ‘प्रशिक्षणातून प्राविण्य’ मिळवून संपन्नतेच्या, समृद्धीच्या आणि परमवैभवाच्या सिद्धतेकडं धाव घेण्याचा आपला मूळ गुणधर्म अखंड राखूयात.
धन्यवाद, संगणक प्रशिक्षणाकरिता शुभेच्छा!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.