क्षितीजापलिकडलेे प्रेम

ध्यानीमनी ही नसलेल्या ह्या अवचीत मागणीने अचंबित झालेल्‍या मधुरेला पटकन् काय बोलावे हे सुचेना च. तिने कबुलीप्रित्यर्थ आनंदाने आईस मिठीच मारली. समोर उभ्या प्रतीकच्या चेह-यावर ओसंडून वहाणा-या आनंदाच्या उधाणात दोघे ही न्हाऊन निघाले. साखरपुडा वगैरे न करता थेट नोंदणी पद्धतीने लग्न करायचे ठरले. मधुरेच्या मनातील खुलणारी कळी प्रतीक च्या साथीने त्यांच्या गोड संसाराच्या साखरस्वप्नांत फुलू पहात होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

रातराणी आता पुरती शिणून गेली होती. शेवटी तिने लगोलग राजदरबार बरखास्त केला, चाकरमान्यांना रजा दिली, शिरावरील चंद्रमुकूट व चांदण्यांनी मढलेला पोशाख उतरवला अन् क्षितीजावरील बकुलवृक्षाकडे निघाली. कधी एकदा रक्तवर्णी शलाकाराणी पहाटवा-याच्या रथावर स्वार होऊन येतेय असं तिला झालं होतं. शेवटी एकदाची घटका भरली अन् आकाशी केसरपंखुड्यांची उधळण करत अश्या अगणीत शलाकांनी त्यांच्या रवीराजाच्या निकटच्या आगमनाची वर्दी दिली.

हळुहळु तांबडं फुटूू लागलं होतं. सृष्टि अंधाराच्या जीर्ण देहाची कात टाकून हिरवाईचा तुकतुकीत शालू परिधान करण्याच्या तयारीत होती. पण ह्या सगळ्या नयनरम्य सृष्टीसौंदर्याशी प्रतारणा केल्यासारखा प्रतीक आपल्याच तंद्रीत, उध्वस्त जिवनाच्या भरकटलेल्या वाटेवरून भुतकालाच्या विचारांचा धुरळा उडवत चालत होता. वाढलेले केस, दाढीची खूंटे, शरीर झाकून स्वत:वर व समाजावर मेहेरबानी केल्यासारखे घातलेले कपडे अन् पावलांवर शरिराचा भार टाकत त्यांना रेटत तो चालत होता. चालता चालता अचानक त्याला जाणवलं की उगवतीकडून हलकेच डोकावणा-या तिच्या राजाची एक तिरीप कधीपासून त्याच्या अंगावर पडून त्याच्यासोबत चालते आहे. त्या दिशेने त्याने पाहिले, तेव्हा त्याला ती दिसली. तिच्याच संगमरवरी पारदर्शक चेह-यावरून परावर्तीत होऊन ती तिरीप त्याच्यावर पडत होती. अजाणतेपणी त्याची पावले तिकडे वळली. क्षितीजाच्या त्या संगमावर, ज्या बकुलवृक्षाच्या कट्ट्यावर दोन जिवलग सख्या, उषा व निशा ओझरत्या भेटतात त्याच कट्टयावर, स्वत: मधेच हरवून ती बसली होती. एखाद्या अनामिक शक्तीने वश केल्यासारखा तो तिच्याकडे खेचला जात होता. तिच्या बाजूला थोड्या दूरवर तो येऊन उभा राहिला तरी तिचे लक्ष नव्हते. राहून राहून त्याची नजर तिच्याकडे वळत तिला न्याहाळत होती. पूर्ण कपड्यांवर मातीचे सुकलेले डाग, फाटक्या बाह्यांची लटकणारी लक्तरे, प्रसंगाच्या तिव्रतेचा बाजार लावणा-या जखमा अन् ओठांवर व गळ्यावर हातांचे लालसर ठसे. शरीर जणू काही ब-याच मोठ्या संघर्षातून मुक्ती मिळाल्यासारखे. सगळेच म्हंटले तर खूप पुर्वी, म्हंटले तर हल्ली हल्ली घडल्यासारखे. पण तरी आजही तिची नजर कुणाला तरी, काही तरी शोधत होती, कुणाची तरी वाट पहात होती. पण प्रतीकचे तिथले अस्तित्व जणू काही तिच्या खिसगणतीत ही नव्हते. प्रतीक ला ह्या सगळ्याचा काहीच अर्थ लागेना. विचारांच्या छापखान्याची गंजकी कळ डोक्यात दाबली गेली तसा तो उठून परतीच्या रस्त्याला लागला.

आता तिची ती छबी त्याला एक वर्षापुर्वीच्या त्या आठवणींच्या गावात घेऊन आली होती. त्याच्या व मधुराच्या अल्पकालीन सहवासाच्या सुमधूर आठवणी. प्रतीक व त्याची विधवा आई एवढच त्याचं छोटसं कुटूंब. चार्टर्ड अकाउंटंट असलेला प्रतीक जात्याच खूप बुद्धीमान होता. लहानपणापासून आत्तापर्यंतचे त्याचे सारे शिक्षण शिष्यवृत्तीतूनच झाले होते. वडील लहानपणीच गेले व आईने खानावळ चालवून प्रतीक ला लहानाचे मोठे केले. कुणाची चाकरी न करता त्याने स्वतः ची प्रॅक्टिस सुरू केली. मधुरा नुकतीच त्यांच्याच इमारतीतील एका ब्लाॅकमधे रहायला आली होती. चुणचुणीत अन् लाघवी स्वभावाची मधुरा सुंदरच नाही तर हरहुन्नरी देखील होती. एक दिवस दोघांची सोसायटीच्या एका कार्यक्रमात गाठभेट झाली. मग मैत्री झाली. कालांतराने फोन, मेसेज सुरू झाले. या ना त्या निमीत्ताने ती प्रतीकच्या घरी येवू लागली, आईला काय हवं, नको ते पाहू लागली. दोघांमध्ये अनुभवांची, मतांची, आवडीनिवडींची खिरापत वाटली जाऊ लागली.

दिस जसे सरत होते, मैत्रीची सिमारेषा पार करून त्यांचे नाते आता प्रेमाच्या नयनरम्य गावात स्थिरावू पहात होते, जे एकमेकांकडे उघडपणे व्यक्त करायची त्यांना कधी गरजच लागली नाही. त्यांच्या मनांनी आपणहून एकमेकांना स्विकारलं होतं अन् म्हणून की काय, वाढत्या भेटींतल्या मधुर सहवासात हे प्रेम अजूनच बहरत होते. प्रतीक च्या आईला ही मधुरा आवडू लागली होती. दोघांची एकमेकांसाठी असलेली नि:संशय पसंती तिला उमगली होती. तीनेच एक दिवस प्रतीक असताना मधुराला घरी बोलावले व “पोरी, मला तू खूप आवडतेस. ह्या घराची सून आणि प्रतीक ची सहचारिणी व्हायला तू सर्वार्थाने योग्य आहेस. माझ्या राजाची राणी होशील?” अशी सरळ मागणीच घातली. ध्यानीमनी ही नसलेल्या ह्या अवचीत मागणीने अचंबित झालेल्‍या मधुरेला पटकन् काय बोलावे हे सुचेना च. तिने कबुलीप्रित्यर्थ आनंदाने आईस मिठीच मारली. समोर उभ्या प्रतीकच्या चेह-यावर ओसंडून वहाणा-या आनंदाच्या उधाणात दोघे ही न्हाऊन निघाले. साखरपुडा वगैरे न करता थेट नोंदणी पद्धतीने लग्न करायचे ठरले. मधुरेच्या मनातील खुलणारी कळी प्रतीक च्या साथीने त्यांच्या गोड संसाराच्या साखरस्वप्नांत फुलू पहात होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

विवाह नोंदणीच्या कार्यालयात प्रतीक व मधूरा विवाहनोंदणीसाठी आई अन् निवडक साक्षीदारांसह आले होते. शिष्टाचाराच्या सह्या झाल्या अन् त्याच घटकेला शुभ घटका मानून प्रतीकने मधुराच्या गळ्यात हार घातला. आता मधुरा ही प्रतीक च्या गळ्यात हार घालणार, तोच काळाने घाला घातला अन् अचानक चक्कर येऊन ती खालीच कोसळली. सुखी संसाराची स्वप्ने बघण्यात रममाण असलेल्या प्रतीकला एक क्षण काय झालॆ ते कळलेच नाही. पण नंतर जे घडले पाहिले त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बराच वेळ शुद्धीवर येईना म्हणून मधुराला दवाखान्यात भरती केले गेले. डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण खूप उशीर झाला होता. मेंदूत रक्तस्त्राव होण्याचे कारण झाले अन् काही कालावधीतच मधुरा त्यांचा गोड स्वप्नांचा मांडलेला सुखी संसाराचा बंगला मोडून हे जग कायमचं सोडून गेली. एका फुलण्यास आतूर कळीला नियतीने खुलण्याआधीच पायदळी तुडवले.

प्रतीक मात्र तिच्या बंद डोळ्यांच्या पलिकडे जळून खाक झालेल्या स्वप्नांच्या चितेची राखरांगोळी त्याच्या नजरांच्या रिकाम्या मडक्यात विमनस्क मनस्थितीत भरत होता. नंतरच्या काही काळात तो पुरता तुटत गेला. जिच्या सोबत त्याने आमरण सहवासाची, सुखदुःखातील सोबतीची, अमर्याद प्रेमवर्षावाची स्वप्ने पाहिली होती ती असा अर्ध्यावर डाव उधळून लावून निघून गेली आहे हे दारूण सत्य स्विकारायला इतके दिवसांनंतर ही त्याचे मन तयार नव्हते. त्यांच्या सुंदर भेटींदरम्यान मधुरा बरेच वेळा त्याच्याकडे एकटक पहात रहायची तेव्हा प्रतीक लाडाने विचारायचा, “वेडाबाई, काय बघत असतेस असं सारखं एकटक माझ्याकडे ?, काय शोधत असतेस एवढं त्यांच्यात?”, मधुरा ही लटक्या रागाचा आव आणून म्हणायची, “थांब रे राजा, साठवून ठेवूदे मला तुझे हे श्यामरुप माझ्या डोळयांत. डुंबत राहूदे मला ह्या प्रेमसागरात”. प्रतीक तिला लगेच कुशीत ओढायचा व म्हणायचा, “मी कुठे जाणार आहे तुला सोडून? कायमच राहीन या तुझ्या मृगनयनी डोऴ्यांत भरून.” हा त्यांचा प्रेमळ वार्तालाप सतत आठवून प्रतीक भावूक होऊन लहान मुलांसारखं बराच काळ रडत असे. स्वतः पासून, जगापासून अन् जगण्यापासुन ही जणू त्याने स्वतः ला तोडले होते. केवळ आईने शपथ घातली होती म्हणून तो जगण्याचा गाडा रेटत होता एवढंच.

पण आज हे काही विपरीत च घडलं होतं. प्रतीक च्या नजरेसमोर सकाळी पाहिलेली ती सारखी घुटमळत होती. कोण असेल ती? अशी एवढ्या पहाटे तिथे एकटीच का बसली असेल? आधी कधी ती इथे दिसल्याचं आठवत नाही? असे अनेक प्रश्र्न त्याच्या डोक्यात रुंजी घालत होते. पण त्या ही पेक्षा जास्त विचार करायला लावणारा प्रश्र्न हा होता, की “मी तिचा एवढा विचार का करतोय?”. त्याक्षणी त्याने वैतागून कठोरतेने मेंदूचा दरवाजा धाडकन् आपटून बंद केला व कामांत स्वत:ला रुतवून घेतले. मधुरेला गमावल्यानंतर परत त्या मोहाच्या वाटेला त्याला जायचे नव्हते. दुस-या कुणातही गुंतायचे नव्हते. कुणाही दुस-या स्त्रीला त्याच्या हृदयातल्या मधुरेची जागा गिळंकृत करून द्यायची नव्हती. त्यांच्या अल्पसहवासाच्या आठवांच्या सोबतीने त्याला त्याचे उर्वरीत आयूष्य काढायचे होते. पण तरीही.

विधीलिखीताचे फासे त्याच्या मर्जीनेच पडणार होते अन् ते पडलेच. रोज पहाटे त्या वाटेने जायचे, कधी नास्तीकासारखे मंदीराच्या बाहेरून देवाकडे कुत्सीत कटाक्ष टाकून तसेच पुढे जातात तसे तिच्याकडे बघून पुढे जायचे नाहीतर कधी आत जाऊ का नको या संभ्रमात पायरीवरच उभे रहातात तसे तिला लांबूनच न्याहाळत उभे रहायचे. थोडक्यात सांगायचं झालं तर ती म्हणजे एक चुंबकीय शक्ती होती, जी त्याला हळुहळु स्वतः कडे खेचत होती. पण त्या सुईला जणू वियोगाचा, वैराग्य भावनेचा गंज चढला होता त्यामुळे ती दोलायमान होत होती. पण कसा कोण जाणे, आज पहाटे त्या शक्तीचा प्रभाव हा गंज आपसूकच उतरवत होता.

प्रतीक निघाला होता त्याच वाटेने, मनाशी काहीतरी ठरवून. रोजच्या सारखं त्या कोवळ्या तिरीपेला अंगावर लपेटून घेत. ती तिथेच होती, ध्रुव ता-यासारखे स्वतः च्या स्थानावर विराजमान. प्रतीक तडक तिच्याकडे गेला व म्हणाला, “अग तू कोण आहेस? एवढ्या भल्या पहाटे अशा निर्मनुष्य जागेवर तू रोज एकटीच का बसलेली दिसतेस?” ती तशीच स्तब्ध, क्षितीजाच्या खोलीत नजरा खुपसून बसलेली. तो पुढे बोलायला लागला, “मी रोज तुला इथे बघतो. असं वाटतं तू कुणाची तरी रोज वाट बघतेस. काही त्रास आहे का तुला ? मी काही मदत करू का? तुला कुणी मारलय का म्हणून तुझी ही अशी दुर्दशा? असं भल्या पहाटे अंधारल्या परिसरात एकटीने बसणं योग्य नाही.” तरीही ती निरूत्तर. प्रतीक ला वाटले ती विचारांच्या तंद्रीत आहे म्हणून त्याने हलकेच तिच्या हाताला स्पर्श केला.

त्याच्या बोलण्यातून पाझरणा-या कणवेतील ओलावा तिच्या मनापर्यंत पोहोचला असावा बहुदा, कारण आज तिने त्याच्याकडे वळून पाहीले. बापरे, त्या नजरेत एवढा विखार होता की त्या अंगार फुललेल्या नयनपटलावर एक विज सळसळली अन् ती आता त्याच्या अंगावर कडाडतेय की काय? असं त्याला वाटलं. पण दुस-याच क्षणी ती विज लुप्त झाली अन् तिची जागा दु:खाने भरलेल्या डोहांनी घेतली अन् ते तिच्या डोळ्यांतून उतू जाऊ लागले. आता मात्र त्याचे काळीज ममतेने गलबलले. “हे बघ, कधी पासून तुला मी काहीतरी विचारतोय. नुसती रडत आहेस. बोलल्याशिवाय काही कळणार आहे का मला ?” तशा तिच्या कोमेजल्या गुलाबासारख्या ओठांच्या पाकळ्या व्यक्त होण्यासाठी म्हणून उघडल्या ख-या, पण तोंडातून एकही शब्द फुटेना. कितीही घसा ताणून तिने बोलायचा प्रयत्‍न केला पण त्या आवाजाला काही पाझर फुटला नाही. हरलेल्या शब्दांचा त्या कंठाच्या रिकाम्या विवरात कोसळून नाहक बळी गेला. असहायतेशी लढता लढता आता ती थकून कोसळणार, तोच प्रतीक ने तिच्या मुकपणे उतू जाणा-या भावनांच्या कढाखालचा त्राग्याचा विस्तव बाजूला करून तिला शांत केले. काही वेळाने ती तिथून उठली, पडलेली एक काडी घेतली अन् तिथे बसून मातीवर लिहायला सुरूवात केली. जसजसे ओघळणा-या अश्रूंना मातीवर शिंपत त्यावर एकेका शब्दाचे ठिपके जोडून त्या घडलेल्या प्रसंगाचे हृदयद्रावक चित्र ती त्याच्यासमोर मांडत गेली तसतसे ते वाचून त्याच्या चेह-यावरचे कारूण्यभाव विरळ होत जाऊन त्यांची जागा तीव्र संतापाने घेतली.

राधा नावाप्रमाणेच गोंडस, सुस्वरूप, संगमरवरी नितळ कांती असलेली आईवडिलांची एकुलती एक लाडाची लेक. वाणिज्य शाखेच्या काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला होती ती. नीट अभ्यास करून चांगले गुण मिळवावेत अन् छानशी नोकरी करून आईवडिलांना आर्थिक सहाय्य करावे एवढीच मोजकी स्वप्ने तिची. दूरदेशी चा घोड्यावरून येणारा अन् तिला लग्नाची मागणी घालणारा सुस्वरूप राजकुमार सध्या तरी तिच्या नजरांच्या कक्षेपलिकडे होता. काॅलेज सकाळी व संध्याकाळी क्लासेस असायचे. थोडी आडवळणाचीच वाट होती ती क्लास ला जायची, पण पर्याय नव्हता. एक दिवस क्लासमधे जास्तीचे तास विषय शिकवले गेले त्यामुळे तिला साहजिकच परतायला उशीर झाला, त्यात रोजच्या सोबतीची मैत्रीण पण आज आली नव्हती. निघताना तिने आधी घरी आईला उशीरा निघाल्याबाबत कळवले व मग निघाली. काळोखवाटेने जीव मुठीत धरून, सगळा धीर एकवटून चालत होती ती.

रोजची पायाखालची वाट तिला आज उगाचच खूप दूरवरची, धुसर, भासत होती. तोच तिला बाजूच्या झाडीत काही सळसळल्याचा आवाज अाला. एखादं जनावर आहे की काय म्हणून ती पटकन वळून पाहणार, तोच मागून येऊन कुणीतरी तिच्या नाकावर उग्र दर्प येणारा रुमाल दाबला अन् तिची शुध्द हरपली. जेव्हा ती शुद्धीत आली, तेव्हा तिला असं जाणवलं की आपण अंधा-या झाडाझुडपांमधे जमिनीवर मरणासन्न अवस्थेत पडलेले आहोत. देह म्हातारीच्या उडत्या केसाप्रमाणे हलका झालाय अगदी. आपलं शरीर तर आहे पण एक विलक्षण गूढ पोकळी त्या शरिराला व्यापून आहे. अगं आई गं !! पूर्ण अंग असं का ठणकत आहे माझे बेदम मारहाण झाल्यासारखे? अंगावरचे कपडे ठिकठिकाणी फाटून त्यांची लक्तरे लोंबत आहेत.

कमरेखाली तर घणाचे घाव घातल्या सारख्या मरणप्राय वेदना होत आहेत. पाय पण अवजड शिळा रूतवल्यासारखे ठणकत आहेत. पूर्ण शरीर ओरबाडलं गेलंय धारदार सुळ्यांनी. अन् हे रे काय? हे गळ्याभोवती काय रूतत आहे? जीव घुसमटतोय त्याने. अरे हा तर एक जाडसर दोर आहे जो, जोरात आवळल्यामुळे तिथेच खोलवर रूतून बसलाय. सरतेशेवटी इतका वेळ श्वासांशी झगडल्याचा काहीच उपयोग झाला नाही. डोळे फाडून कुडीतले प्राण त्याच वाटेने मला सोडून निघून गेलेत. पण ही सभोवती काही रक्ताळलेल्या हातांची अन् तोंडांची माणसांच्या वेषातील गिधाडे अशी का बसलेली दिसत आहेत? बहुतेक ह्या राक्षसांनीच वासनांध होऊन माझ्या देहाचे जागोजागी लचके तोडले असावेत आणि या रक्तपिपासूंचे मन भरल्यावर त्यांनीच असा निर्दयतेने गळा घोटून नुसता माझा आवाजच माझ्या कंठापासून उपटून काढला नाही तर अतिशय थंड डोक्याने वासनेच्या राक्षसाला माझा नरबळी दिला. माझ्या आईबाबांना पोरकॆ केले? माझ्या देहाच्या कुडीत आता प्राण नाहीत तर हया पोकळ देहाचे कातडे पांघरून, गोठलेल्या इच्छांचे, आकांक्षांचे, स्वप्नांचे आझे बाळगत हा तडफडता आत्मा अनादीकालापर्यंत भरकटत राहणार आहे. आपलंच मरण असं स्वत:च बघण्याइतकी हतबलता दुसरी नाही.

जसं जसं राधा लिहीत गेली तसं तसं प्रतीक ते वाचत गेला अन् शब्दांच्या चिखलात रुतत गेला. भय, वेदना, करुणा, सहानुभूती अश्या संमिश्र भावनांचे चक्रीवादळ त्याच्या मनावर घोंघावू लागलं. मेंदू कोणताही विचार करण्यास बधीर झाला. त्याला जाणिव झाली की राधा एक सजीव मुलगी नाही तर हा एक सजीवतेचा आभास आहे. एका अभागी, वासनेला बळी दिलेल्या मुलीचा मुका आत्मा आहे, जो आज मरणानंतरचं भयाण विश्व अन् मुक्तीनंतरची सद्गती ह्या दोहोंमधील वाटेवरच घुटमळतोय. मी नश्वर सजीवसृष्टित जगतोय अन् ही अनंतातही रोज मरतेय. ब-याच वेळाने त्याने स्वत:ला सावरले, मेंदूचा विचारांशी संपर्क तोडून टाकला. खरंतर तो मनातून जरासा घाबरलाच होता, अन् निशब्द झाला होता तरी बळेच स्वतःचा धीर एकवटून, “शांत हो राधा, सावर स्वत:ला. काय बोलू अन् कोणत्या शब्दांनी सांत्वन करू तुझे? ह्या हिडीस रानटी मानवजातीचा धिक्कार असो. पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्यावर विचार करून काय फायदा? येतो मी, नक्की परत येईन, विश्वास ठेव माझ्यावर”, असं म्हणून तो परतला. राधा त्याच्या पाठमो-या आकृतीकडे भरल्या नयनांनी पहातच राहिली. का कोण जाणे, त्या धुसर पडद्यामागे तिला अश्वारूढ राजकुमार दिसत होता.

प्रतीक ला सकाळपासूनचे प्रसंग आठवून वेड लागायची पाळी आली होती. कामातही लक्ष लागत नव्हतं. सतत राधाची आठवण, तिच्याबद्धलचं वास्तव, तिने सोसलेल्या हालअपेष्टा डोळ्यासमोर येत होत्या. आजवर माझा भुतकाल मधुरेच्या विरहात भरकटला, नंतर ना मी दुस-या कुणाचाही विचार केला ना कुणाला जवळपास ही फिरकू दिलं पण आज ही राधा व तिचा भुतकाळ अश्या विचीत्र परिस्थितीत माझ्या सामोरे आले आहेत आणि तरी ही माझी तिच्यातील भावनीक गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे. मी जेवढं तिला टाळण्याचा प्रयत्न केला, दूर लोटण्याचं ठरवलं त्याच्या दुप्पट वेगाने मी तिच्याकडे खेचला जातोय. त्यातून आज जे कटू सत्य माझ्या समोर आलंय, ते बघता मी तिचा विचार सोडून द्यायला हवा.

पण प्रत्येक क्षणाला तिची आठवण सतावतेय. ती अगदी एकाकी पडली आहे. का तिची खूप काळजी वाटतेय? का तिचं दु:ख बघुन काळीज एवढं गलबलतय? का तिचा दिपस्तंभ व्हावसं वाटतय? ही निव्वळ सहानुभूती आहे का दुसरं काही? अशा कुठल्याच प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाहीये की मीच मनाच्या खिडक्या दरवाजे आपणहून बंद केले आहेत. साधी भोळी राधा त्याला आवडू लागली होती. तिचा भाबडा भित्रा स्वभावच त्याला तिच्याकडे आकर्षित करत होता. तिचे बोलके निरागस पाणीदार डोळे, लोभसवाणा निश्पाप चेहरा, सागराला ही ओंजळीत घेण्यास आतूर हात, हवेत चालतेय की काय असं वाटावं एवढी नाजूक लयबद्ध चाल व ह्या सगळ्याला साजेसं असं तिचं निरभ्र आकाशासारखं विस्तारलेलं मन, ज्या मनात घर करण्यावाचून, कितीही ठरवलं तरी तो स्वतः ला अलिप्त ठेवू शकत नव्हता.

ती कोण आहे? कशी आहे, ह्या प्रश्नांची उत्तरे शोधायची त्याला कधीही गरज पडली नाही. “जाऊदे, डोक्याचा भुगा होईल. त्यापेक्षा या अनोळखी प्रवाहात स्वतःला झोकून द्यावे अन् विचारांची नाव तिराला कधी लागेल याची वाट पहावी” असं स्वत:शीच म्हणून प्रतीक उठला, त्याने आॅफीस बंद केलं, बाजारात गेला व राधासाठी २-४ ड्रेसेस्, खाऊ घेतला व घरी आला. चार घास कसेबसे पोटात ढकलले. पलंगावर डोळ्याला डोळा लागेना कारण नजरेत उद्याची पहाट आणि राधा दिसत होती. दुस-या दिवशी वेळेआधीच तो उठला. प्रातर्विधी आटोपल्यावर पिशवी उचलून सरळ त्याने राधाकडे जाणारी वाट पकडली.

पण आज तीचं अस्तित्व दर्शवणारी तिरीप सोबत नव्हती अन् ती ही नव्हती तिच्या जागेवर. तसा तो चपापला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. ती कुठेही दिसेना. कुठे गेली असेल ती मला सोडून? मुक्ती मिळाली असेल का तिला? एक वार भेटून सांगून तरी जायला हवं होतं तिने? ती आता भेटणार नाही ह्या नुसत्या विचारांनीच काळजात धस्स झाले त्याच्या. माझा जरा तरी विचार करायला हवा होता? अन् याच तऴमळत्या भावनांनी, कासावीस करणाऱ्या विचारांनी, तिच्यासाठी च्या इतक्या दिवसांच्या तडफडीने, ज्या प्रश्नांची उत्तरे तो आजवर शोधत होता त्यांचे एकच सामायिक उत्तर त्याला दिलं होतं. होय, “तू राधाच्या प्रेमात पडला आहेस.”

त्याचं आतूर नजरेने क्षितीजाकडे बघत असतानाच खांद्यावर हाताचा थंड स्पर्श त्याला जाणवला. पट्दिशी त्याने मागे वळून पाहिलं. ती राधाच होती. त्याने लगेच तिचा हात हातात घेतला व तिला बाजूला बसवून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली तिच्यावर, “राधे, अग कुठे गेली होतीस तू? मला तुझी खुप काळजी वाटत होती. कसं सांगू तुला? असं कसं वागू शकतेस गं तू? काहीच कसं वाटलं नाही तुला? वचन दे मला आधी, परत अशी मला एकट्याला सोडून कुठे ही जाणार नाहीस तू” राधाने मिश्कील हासून त्याच्या हातावर थोपटलं व खूणेनेच शांत हो असॆ सांगितले. “हे घे. किती प्रेमाने तुझ्यासाठी कपडे व खाऊ आणलाय. कपडे बदल आधी व खाऊन घे थोडसं”. राधाने साश्रूनयनांनी त्याच्याकडे पाहिलं व नजरेनेच कृतज्ञता व्यक्त केली. “का करतोस एवढे माझ्यासाठी? आणि आता ह्या कपड्यांचे, खाऊचे मी काय करू? तू तुझा वेळ दिलास. माझ्याशी बोललास, भेटलास हेच माझ्यासाठी खूप आहे.” मातीतल्या पाटीवर तिने लिहीलं.

त्याने ही मिश्कील हसत त्याच पाटीवर लिहीलं, “असूदे. तू नको त्याचा विचार करूस. मी तुझ्यासोबत कायम राहीन. तुला कधीही एकटं सोडणर नाही. विश्वास ठेव माझ्यावर.” तिच्या गालावरील पुसटश्या खळीत हास्याची गोडी पसरत गेली व लाजेच्या नाजुक गुलाबकळ्या संपूर्ण चेह-यावर फुलत गेल्या. दोघांच्या हातांच्या साखळीत एकमेकांची मने गुंतवून दोघे मग बराच वेळ हितगूज करत राहिले. त्याचे मन तिच्या मौनाची भाषा शिकत राहिले व ती डोळ्यांच्या नभपटलावर मनातल्या त्याच्याविषयीच्या ज्या अव्यक्त भावनां विचारांच्या कुंचल्यांनी चितारत राहिली, त्या सगळ्या हृदयाच्या कप्प्यात साठवत राहिली. ती ही पिशाच्चयोनीतून त्याच्या सजीव मनाच्या विश्वात हऴुहऴु प्रवेश करू लागली होती. तिला ही प्रतीक आवडू लागला होता. अलिप्त स्वभाव, धिरगंभीर रहाणी, पण भेटल्या दिवसापासून ती कोण, कुठली याचा विचारही न करता तिच्यात गुंतणे, तिला जाणून घेण्याची त्याची उत्सुकता, तिच्या बाबतची कळकळ, तिची काळजी घेणे आणि ह्या सगळ्या भावनांना जिथून भरती येत होती ते त्याचे सागराएवढे विशाल मन, सगळंच तिला मोहीत करणारं होतं. तिला असं वाटायला लागलं की बहुतेक तिच्या मुक्तीची वाट त्याच्या हृदयातून त्याच्या कुशीतच होती.

भुतकाळाच्या पाटीवर तो अगदी कालपर्यंत त्याच त्याच दुख-या आठवणी पुन्हा पुन्हा गिरगटत होता, ती पाटी त्याने आज पुरती पुसून टाकून परत कोरी केली व तिच्यावर ठळक अक्षरात ‘राधा’ असे लिहून नवीन अायुष्याचा श्रीगणेशा केला. तेवढ्यात अचानकच त्याचा मेंदू विद्रोह करून उठला. “तू हे काय चालवलं आहेस? शुद्धीत आहेस का तू? आजवर मधुराच्या वियोगात वेडा झाला होतास. आत्ता आत्ता कुठे थोडा सावरत आहेस. तर हे कुठलं नवीन खूळ डोक्यात घेतलं आहेस? हे मृगजळ आहे. भूत आहे हे मानवी वेशातलं. कोणतेही विचार, भावना नसलेली जीवरहीत बाहुली, एक अंगार आहे ही. हिला हिरा म्हणून धरायला जाशील तर नुसते हातच नाही तर सारं आयुष्य करपून जाईल. खर सांगू का? तर तू प्रेमात पडला आहेस तिच्या, तुझ्या ही नकळत. पण हे प्रेम नाही, फसवे आकर्षण आहे, मायाजाल आहे हे. तुला आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल व नंतर सर्वनाशाच्या वाटेला, तिच्या सोबत तिच्या जगात घेऊन जाईल. जिथून तू कधीच परत येऊ शकणार नाहीस. त्या म्हाता-या आईचा तरी विचार कर रे. तुझ्यासाठीच जगत आहे ती. वेळीच सावर. छान मुलगी बघून लग्न कर अन् सुखी हो. सोड हा खुळा नाद”. कल्लोळ झाला विचारांचा डोक्यात. त्याच्या विद्रोही विचारांचा त्यालाच राग आला. मेंदूचा दरवाजा धाडकन् बंद करून राधाबाबत च्या आपल्या प्रामाणिक भावना कवटाळत तो झोपी गेला.

आज उठल्यापासुनच त्याला खूप ताजेतवाने वाटत होते. बरेच दिवसांनी तो माणसांत येत होता. त्याने स्वत:ला आरशात बघितले, दाढीची खुंटे उतरवली, परिटघडीचे कपडे घातले, कुंडीतलीच एक गुलाबाची कळी खुडून हातात घेतली अन् छान तयार होऊन तो बाहेर पडला. आज त्याला सुर्योदयापुर्वीच क्षितीजावर पोचायचे होते. उषा व निशा यांच्या मिलापाआधी त्याला त्यांचा मुहूर्त स्वतःसाठी गाठायचा होता. तीच घटका त्याला शुभमुहूर्त म्हणून हवी होती कारण त्याच घटकेला त्याला राधा भेटली होती. जसा तो क्षितीजाच्या टप्प्यात आला तसा तीच ती उगवतीची तिरीप त्याला जवळजवळ खेचतंच राधाकडे घेऊन आली होती. कारण तसंच होतं. आज राधाने प्रतीकने तिच्यासाठी आणलेला त्याचा आवडता शुभ्रवर्णी चांदणखडी असलेला ड्रेस घातला होता. अप्रतिमच दिसत होती ती. प्रतीक बराच वेळ तिच्याकडे पुतळा बनून पहातच राहिला. राधाने त्याचा हात हातात घेतला तेव्हा तो पटकन् शुद्धीवर आला कारण आज त्याला त्या स्पर्शात उब जाणवली, जी प्रतीकच्या आजवरच्या सहवासाच्या ओढीने अन् गोडीने तिच्या शरिरात निर्माण झाली होती. प्रतीक ने तोच हात पकडला व दुस-या हाताने आणलेले ते गुलाबाचे फूल तिच्या समोर धरले व तीला एवढंच म्हंटले, “राधा, माझ्याशी लग्न करशील?” राधा प्रतीककडे बघतंच राहीली.

तिच्या अाधीच लाजून चूर झालेल्या चेह-यावर भली मोठी प्रश्नरेखा उमटली. तिच्या सोबतच अजून लगोलग ब-याच रेषा एका मागोमाग एक उगवत राहील्या. “हे कसं शक्य आहे प्रतीक? माझ्या सारखीशी लग्न, जी मृत्यू व मुक्ती यांच्या फे-यात अडकून पडली आहे? जी पूर्ण जगात फक्त तुलाच दिसते, तुलाच जाणवते. नवरा बायको म्हणून जी भौतीक सुखे तुला जोडीने अनुभवावीशी वाटतील ती तुला कधीच अनुभवायला मिळणार नाहीत. आईला काय सांगशील? जगाला काय उत्तर देशील? परत एकदा विचार कर”.

राधाच्या ह्या अव्यक्त प्रश्नांच्या मालिका तिच्या भरल्या डोळ्यांच्या वाटेवरून प्रतीकच्या डोळ्यांना नुसत्या भिडल्याच नाहीत तर त्यांनी गनिमीकावा करून त्याच्या मनात शिरून, त्याला फितूर करायचा देखील प्रयत्न केला. पण प्रतीकचा निर्धार त्यांच्यापुढे ढाल बनून उभा राहीला. प्रतीकने पुढे होऊन राधा चे डोळे पुसले, तिला हलकेच आपल्या कुशीत घेतले व म्हणाला, “राधे, तू मला जशी आहेस तशी हवी आहेस. मला खूप खूप आवडतेस तू. माझ्यापेक्षा ही तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे गं. अगदी प्रामाणिकपणे सांगतोय. तुझ्या ह्या पाणीदार डोळ्यांत मला माझे अवघे विश्व साकार करायचंय. तुझ्या ह्या मधाळ हसण्याने मला माझा दुखद बोचरा भूतकाळ ही विसरायला लावलाय. तुझ्या ह्या हातांच्या गुंफणीत मला माझेच काय, सा-या जगाचेच भान रहात नाही. तुझा हा लोभसवाणा चेहरा म्हणजे निरागसतेची परिसिमाच म्हणावे लागेल. तुुुुझे हे धिरगंभीर चालणे म्हणजे देवळाला घातलेली स्वमग्न प्रदक्षिणा च जणू. तुझ्या बद्दल काय अन् किती बोलू? भावनांचे दोरे ही तोकडे पडतात शब्दांना ओवायला.

अगं, मी जग काय म्हणेल याचा अजिबात विचार करत नाही आणि माझ्या आईचं म्हणशील तर मला खात्री आहे की माझ्या सुखातच तिचं सुख आहे. मी आजचा विचार करतो. उद्याच्या विचारात मला आजच्या सुखाची माती होऊ द्यायची नाही. मला सांग, काय फरक आहे मर्त्यलोकातील माणसांमध्ये अन् तुझ्यात. तुला मी आवडतो ना? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तुझे ही माझ्यावर तितकेच प्रेम आहे ना, जेवढे माझे तुझ्यावर आहे? तु माझ्या सहवासात खुलतेस ना? तुला आवडेल नं माझी सहचारिणी बनायला, ह्या कृष्णसावऴ्याची प्रेमवेडी राधा होशील?

राधाने क्षणाचाही विचार नं करता लाजून होकारार्थी मान हलवली. “मग मला सांग, नश्वर माणसांच्या भावना अन् तुझ्या भावना वेगवेगळया आहेत का? मला तुझ्याबद्धल वाटणारी हुरहुर, काळजी, भेटण्याची आस तुला ही माझ्याबद्दल वाटते ना? तुला भेटण्याची तळमळ उरी भरून जसे माझे मन उसळ्या मारते तसे तुझे होत नाही का? तू ज्या दिवसापासून दिसलीस, त्या दिवसापासून आजतागायत तुला भेटल्याशिवाय माझा एकही दिवस पूर्ण होत नाही, तसे तू ही अनुभवतेस का? आणि ह्या सगळ्या प्रामाणिक भावनासागरात जसॆ मला डुंबायला आवडते तसे तुला ही आवडत असेल तर मग केवळ तू अनश्वर युगातून आली अाहेस किंवा तुझी वाचा गेली आहे म्हणून तुझ्यावर माझेे प्रेेम नाकारण्याचा वेडेपणा मी नक्कीच करणार नाही. आपले प्रेम हे वाहत्या पाण्यासारखे स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक आहे. तुझ्या माझ्या मनांच्या संगमावर ते अजून फुलेल, परिपक्व होईल असा मला विश्वास आहे. देशील माझी साथ शेवटपर्यंत?” असे बोलून त्याने हात पुढे केला. राधानेही आपला हात त्याच्या हातात दिला. प्रतीक ने त्या हाताचे हलकेच चुंबन घेतले व आपल्या निस्सीम प्रेमाची पहिली मोहर त्यांच्या प्रेमावर उमटवली.

तसा तिच्या सर्वांगावर शहा-यांचा कल्लोळ उठला. तिचा लाज उधळलेला गुलाबी चेहरा त्याने आपल्या आश्वस्थ ओंजळीत घेतला व तिच्या कपाळावर जसे त्याने आपले ओठ टेकवले तसं तिला असा भास झाला की त्या पवित्र स्पर्शाने अंगावरील त्या भळाळत्या जखमा त्यांच्या खुणांसकट गळून पडल्या आहेत व देहात जैवचैतन्य आले आहे. तिच्या कमळपंखुड्यांसारख्या लाल ओठांचे दिर्घ चुंबन घेऊन त्याने आजवर साठवलेल्या सगळ्या भावनांची घुसमट त्या एका क्षणावर रिती केली तशी ती लाजेने चूर चूर झाली. आतापर्यंत ह्या सा-या मंगलघटीकांचे साक्षीदार असलेल्या पाखरांनी मग जराही वेळ न दवडता निरागस चिवचीवाटाच्या एकसुरात मंगलाष्टका गायल्या, तशी प्रतीकने आवेगाने राधाला मिठी मारून दोघांनी जणू आपल्या हातांचे हार एकमेकांच्या गळ्यात घातले. रवीराजाने ही मग प्रकट होऊन आपली किरणपुष्पे त्यांच्यावर शिंपडून दोघांना शुभाशिर्वाद दिले. एका निस्सीम प्रेम करणा-या जिवाने आपल्या प्रामाणिक व अलौकिक प्रेमाच्या जोरावर एका अमर्त्य आत्म्यात प्राण ओतून त्याला आपले सर्वस्व बहाल केले होते अन् हा जगावेगळा प्रेमविवाह सोहळा पाहण्यासाठी पूर्ण सजीवसृष्टि त्या क्षितीजावर लोटली होती.

वाचण्यासारखे आणखी काही…

कथा

प्रेरणादायी/MOTIVATIONAL


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय