जॅक तिला का सोडत नाही आणि ती गिव्ह अप का करत नाही याचं उत्तर या गाण्यात सापडतं, जे जगण्याच्या आणि प्रेमाच्या नव्या व्याख्या शिकवतं. ही टायटॅनिकच्या शोकांतिकेची अपूर्व ताकद आहे.
देखणी केट विन्स्लेट,राजबिंडा लिओनार्डो डीकॅप्रीओ आणि जेम्स कॅमेरूनच्या दिग्दर्शनासाठी टायटॅनिक किमान पंचवीसेक वेळा तरी पाहिलाय.
दर वेळेस शेवट पाहताना भारावून जायला होतं. उत्तर अटलांटीक समुद्राच्या रक्त गोठवणाऱ्या पाण्यात ती अजस्त्र बोट जलसमाधी घेते आणि हजारो जीव तिच्या सोबत आपली स्वप्ने त्या काळ्या निळ्या पाण्यात विरघळवत तळाशी जातात.
काही जीव कसेबसे तरतात. एकाच माणसाचं वजन झेपू शकेल अशा एका अलमारीच्या फळकुटावर रोझ पडून आहे. तिचे श्वास धीमे होत चाललेत. ती अर्धवट बेशुद्ध व्हायच्या बेतात आलेली आहे हे जॅकने ओळखलेलं.
त्या लाकडावर हात टेकवून त्या थंडगार पाण्यात तो उभा तरंगतोय. तिने भान हरपू नये म्हणून बोलण्यात गुंतवून ठेवतोय. खरं तर त्याला तिथून सरकणं शक्य होतं पण तो तिला सोडून जात नाही. तिनं जगावं म्हणून तो पाण्यात उभा आहे, तिनं गिव्ह अप करू नये याचं प्रॉमिस त्याने घेतलंय.
तिचा हात त्याच्या हातात आहे. त्या हाताची ऊब आणि त्यातून जाणवणारे तिच्या काळजाचे ठोके हीच काय ती त्याची उर्जा, त्यावर तो तरून आहे.
बघता बघता प्रहर उलटून जातो. आपल्या सहप्रवाशांची दया आल्याने एक लाईफ सेव्हिंग बोट तिथं परतते. त्यातून ‘एनीबडी देअर‘चा पुकारा होऊ लागतो.
त्या आवाजाने आणि बोटीच्या चाहुलीने गाढ झोपी गेलेली, थकलेली रोझ जागी होते. जीवाच्या आकांताने जॅकला जागं करण्याचा प्रयत्न करत्ये. काही केल्या त्याच्या चेतना जाग्या होत नाहीत. ती त्याच्या चेहऱ्यात डोकावते आणि तिच्या काळजात धस्स होते.
तिचा जॅक तिला वाचवण्याच्या नादात कधीच अचेतन झालेला असतो. तिला रडूही फुटत नाही. ती पुरती भांबावून जाते. तरीही जॅकच्या हातातली हथकडी वाजवत खोल गेलेल्या आर्त आवाजाने त्याला सांगू लागते की, “वेक अप! प्लीज वेक अप … देअर इज ए बोट जॅक !“.
बोटीवरून पळून जाण्याच्या ध्येयापासून ते जीव वाचवण्याच्या कसरतीपर्यंत त्यांनी या लाईफ सेव्हींग बोटीची प्रतीक्षा केलेली असते.
आता ती बोट काही अंतरावर असते. सगळं तारांगण जणू गतप्रभ झाल्यागत असतं, दाट अंधार दाटून आलेला आणि डोक्याच्या ओल्या केसातल्या पाण्याचं बर्फ झालेलं इतकी बधीर थंडी अन पहाटेची कातरवेळ !
पडद्यावरील अक्राळ विक्राळ कॅनव्हासवर जीव कासावीस झालेली रोझ आणि तिचा हात हाती धरलेल्या अवस्थेत देहाच्या संवेदना हरवलेला अचेतन जॅक दिसतात.
तिचे उस्मरणे तिच्या उसाशांतून जाणवतं. मधूनच लाईफबोटीच्या वल्ह्यातून येणारा पाण्याचा आवाज, टॉर्चच्या प्रकाशाची तिरीप आणि रोझचं जॅकसाठी धडपडणं, पार्श्वसंगीतात ‘माय हर्ट विल गो ऑन‘ची धून हलकेच तरळत राहते.
अखेर ती सत्य स्वीकारते. सेलीन डीऑनच्या आवाजातले कातर आलाप काळीज चिरत जातात. ती ‘कम बॅक‘ची आर्जवं करत राहते.
लाईफबोटीतुन हॅलोचा पुकारा होत राहतो. ‘कॅन एनीवन हिअर मी ?‘ चा आवाज कानी पडत राहतो. इथं कुणीच नसल्याचा निष्कर्ष काढून पाण्यात तरंगणाऱ्या अगणित मृतदेहांना बाजूला सारत आस्तेच बोट पुढे जाऊ लागते.
आणि तिला एक भयानक जाणीव होते. आता ‘तो’ क्षण जवळ आल्याची तगमग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत्ये.
निमिषार्धासाठी त्याचा हात घट्ट धरते, विमनस्कतेला हरवत निश्चयाने त्याच्याकडे पाहत उद्गारते, “आय विल नेव्हर लेट गो आय प्रॉमिस !….”
पुढच्याच क्षणाला त्याचा हात हलकेच सोडून देते, तिचा हात आपल्या हातात धरण्याच्या भावमुद्रेतला त्याचा ताठलेला देह हळूहळू पाण्यात दिसेनासा होतो. तिच्या काळजात कालवाकालव होते आणि पुढच्याच क्षणाला ती घसा ताणून हाका मारण्याचा प्रयत्न करू लागते.
तिची ताकद कमी पडते. आपला आधार सोडून जीवाच्या आकांताने त्या थंडगार पाण्यातून काही अंतर कापून ती शेजारीच तरंगत असणाऱ्या एका गार्डच्या शवाजवळ जाते.
त्याच्या तोंडातली शिटी काढून प्राण कंठाशी आणून फुंकू लागते. त्या आवाजाने लाईफसेव्हींग बोटीचे तिच्याकडे लक्ष जाते. तिच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाशझोत पडतो. एका वेगळ्याच आवेगाने शिटी वाजवणारी डोळे तारवठून गेलेली रोझ पडद्यावर दिसते आणि फ्लॅशबॅक संपतो.
चित्रपट संपल्यावरही जॅक आणि रोझ डोळ्यापुढे तरळत राहतात. तर सेलीन डीऑनचं ‘माय हर्ट विल गो ऑन’ काही केल्या डोक्यातून जात नाही. ‘एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स आय सी यू, आय फील यू, दॅट इज हाऊ आय नो यू‘ पासून सुरु झालेला हा प्रवास ‘निअर फार व्हेअरेवर यू आर, आय बिलीव्ह दॅट द हर्ट डज गो ऑन वन्स मोअर’पर्यंत येऊन थबकतो.
जॅक तिला का सोडत नाही आणि ती गिव्ह अप का करत नाही याचं उत्तर या गाण्यात सापडतं, जे जगण्याच्या आणि प्रेमाच्या नव्या व्याख्या शिकवतं. ही टायटॅनिकच्या शोकांतिकेची अपूर्व ताकद आहे.
लोकांनी काळजात गोंदवून घेतलेली हि कलाकृती सिद्ध करते की, आयुष्यातून कारुण्य आणि दुःख वजा केलं तर सुखाला किंमत शून्य उरते. शोकांतिकेच्या गाथेचा हा अर्थ, जगणं आणखी समृद्ध करतो.
शोले….शोकांतिकेची गाथा..(भाग २)
गेले द्यायचे राहून….शोकांतिकेची गाथा..(भाग ३)
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.