जगण्याचं शिक्षण देणाऱ्या शिवानी दीदींबद्दल जाणून घेऊ

शिवानी दीदींचे विचार आणि त्यांचे शांत, सौम्य बोलणं ऐकलं की, आपल्या मनात काही राग, अशांतता असेल तर नक्कीच निघून जाईल.

शिवानी दीदींच्या आयुष्याबद्दल वाचा या लेखात.

एकदा आपल्या मनाने ठरवले की मला हेच करायचे आहे… तर कुणीही ती गोष्ट करण्यापासून रोखू शकत नाही. अगदी तशीच गोष्ट आहे. ‘शिवानी वर्मा’ यांची!

शिवानी वर्मा… आता त्या शिवानी दीदी या नावाने लोकप्रिय आहेत. ‘प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालय’ या संस्थेत त्या आध्यात्मिक गुरु म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचं व्यक्तिमत्त्व बघून बरेच जणांना त्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. असं काय विशेष आहे त्यांच्यात? जग त्यांना इतकं का मानतं? चला तर मग मनाचेTalks च्या माध्यमातून जाणून घेऊया शिवानी दिदींची कहाणी…

शिवानी वर्मा म्हणजेच आत्ताच्या शिवानी दीदी यांचा जन्म १९७२ साली पुण्यामध्ये झाला. लहानपणी शिवानी दीदींची आई त्यांना प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रामध्ये येण्यासाठी आग्रह करत असे.

पण दीदी मात्र तिकडे जाण्यास अजिबात इच्छूक नव्हत्या. त्या म्हणतात,

‘‘जितकी आई मला तिकडे नेण्यासाठी प्रयत्न करत होती तेवढीच मी त्या गोष्टीपासून दूर जात होते.”

त्यांना वाटायचं, मी का जाऊ? मला काय गरज आहे? मला काय प्रॉब्लेम आहे? माझं आयुष्यं तर सुरळीत चाललंय. पण नंतर नंतर त्यांना आईमध्ये तिकडे जाण्यामुळे बदल दिसू लागले.

म्हणजे आईच्या व्यक्तिमत्त्वात त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी दिसू लागली. तसं थोडं थोडं आई सांगतेय त्याप्रमाणं करून तर बघू असा विचार येत गेला.

मग चला आज परीक्षा आहे तर मेडीटेशन करा, किंवा वेळ आहे ना पाच मिनिटं मग करून तरी बघ… अशा आईच्या आग्रहामुळे हळूहळू मेडीटेशन वगैरे गोष्टी त्या करू लागल्या, पण तरीही त्या प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्रावर जात नव्हत्या.

त्यांचं शिक्षण सुरळीत सुरू होतं. १९९४ साली शिवानी दीदींनी पुणे युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर दोन वर्षं पुण्याचा भरती विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केलं.

इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर परत आईने आग्रह केला की, आता जरा ब्रह्मकुमारी केंद्रावर जाऊन मेडिटेशन वगैरे शिकून घे. थोड्याश्या नावडीनेच पण कधी आठवड्यातून एकदा कधी दोनदा असं जाणं-येणं आई-वडिलांबरोबर सुरू झालं.

एकदमच रोज जाऊ लागल्या असं काही नाही. १९९६ सालापासून मात्र त्या नियमित जाऊ लागल्या. त्याच दरम्यान त्यांचं लग्नही झालं होतं.

१९९६ पासून २००४ पर्यंत त्यांनी आपल्या नवर्‍याच्या बरोबर बिझनेसही केला होता. त्या म्हणतात की लग्नाआधी मला प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेत इतका इंटरेस्ट नव्हता, पण लग्नाच्या आधी अगदी दोन-तीन महिने मात्र तो वाढत गेला आणि त्यांचं भाग्य की त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्यासाठी त्यांना त्यांच्या नवर्‍याची पण साथ मिळाली.

१२ वर्षं संस्थेत काम केल्यानंतर शिवानी दीदींनी ‘अवेकनिंग विथ ब्रह्मकुमारीज्’ नावाचा कार्यक्रम सुरू केला जो खूपच लोकप्रिय झाला आणि अजूनही चालू आहे. देश-विदेशात त्या प्रखर वक्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

जीवन दर्शन आणि आध्यत्मिक विषयावर दिलेली त्यांची व्याख्यानं उच्च प्रतीची मानली जातात.

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच शिक्षण घेऊन सुद्धा अध्यात्माकडे वळणार्‍या या शिवानी दीदींची वाणी, त्यांची सात्त्विकता त्यांच्या बोलण्यातूनच जाणवते.

त्या म्हणतात की, आपण समजतो अध्यात्म वेगळं आहे आणि आपलं करिअर वेगळं आहे पण तसं नाही. जीवन हेच अध्यात्म आहे. त्यांना बरीच लोकं विचारतात, ‘तुम्ही या क्षेत्रात का आलात?’ तर त्या म्हणतात, ‘आधी मुळात काहीतरी गंभीर समस्या माझ्या जीवनात आली असेल म्हणून मी इकडे आले असेन असा लोकांचा समज असतो, पण तसं मुळीच नाही.

कारण अध्यात्म हा वेगळा रस्ता नाहीचे. अध्यात्म म्हणजे जीवनात तुम्ही जे काही करताय, परिवार सांभाळताय, मुलांना शिकवताय जे काही करताय ते योग्य विचार, योग्य आचार, योग्य संस्कार हेच अध्यात्म आहे.

आत्म्याचे जे गुण आहेत शांती, खुशी, प्रेम हे आपल्या व्यक्तिमत्त्वात आले पाहिजेत. आणि आपल्या वागण्यात ते आले पाहिजेत. तेच खरं अध्यात्म.

त्या नेहमी पांढर्‍याच रंगाची साडी नेसतात, पण त्या म्हणतात,

मी रंगाशी नातं वगैरे तोडले नाहीये, पण ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जे केंद्र सांभाळतात, त्या पांढर्‍या रंगाच्या साड्या नेसतात, तो युनिफॉर्म आहे. जे शिकायला जातात, ते सगळ्या रंगाचे कपडे घालतात, मी पण घालत होते, पण जेव्हापासून मी हे टीव्ही प्रोग्राम चालू केले, किंवा आध्यात्मिक शिकवण देऊ लागले तेव्हापासून पांढरे कपडे घालू लागले.

एकीचं ते एक लक्षण आहे. आणि ते त्यांना आवडू लागलं म्हणून त्या आता तशाच प्रकारची वस्त्रं परिधान करतात, यात कोणतीही जबरदस्ती नाही, त्यांना वाटलं तर त्या अजूनही रंगीत कपडे घालू शकतात.

जेव्हा त्या ब्रह्मकुमारी मध्ये २५ वर्षांपूर्वी जायला लागल्या तेव्हा त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना विचारलं, ‘काय झालं तुला?’ कारण आत्तासारखं वातावरण २५ वर्षांपूर्वी नव्हतं.

मैत्रिणींना वाटलं की, त्यांना काहीतरी दु:ख आहे म्हणून त्या तिकडे वळल्या. त्या म्हणतात की, मी या क्षेत्रात आल्याने माझं आयुष्य आहे तसंच आहे, पण विचारांची दिशा बदलली आहे.

मी आता जॉब करत नाही, सेवा करते. व्यवहार, संस्कार यामध्ये खूप बदल झाले. त्या म्हणतात, जे आपण रोज वाचतो, ऐकतो तसाच बदल आपल्यात होत जातो.

जसं, सगळेच शिक्षण घेतात, पण प्रत्येकाचं यश वेगळं असतं. तसंच प्रत्येकात परिवर्तन होत असतं पण ते वेगळ्या प्रमाणात होतं आणि ते ज्याचं त्याला समजतं.

पहिल्यांदा कुणी माझ्या अपेक्षेच्या विरुद्ध काही बोललं तर मला वाईट वाटायचं, आता मात्र वाटत नाही. पहिल्यांदा कुणी काही बोललं तर एक तास वाईट वाटायचं.

नंतर तोच वेळ वीस मिनिटांवर आला आणि आता तर वाईटच वाटत नाही. हा बदल आपल्या स्वभावात अध्यात्मामुळे होतो.

आता नात्यात तणाव असतात त्याबद्दल बोलताना त्या म्हणतात, तणाव ही एक परिस्थिती आहे मग नातं कोणतंही असो. पहिल्यांदा वातावरण वेगळं होतं.

एकत्र कुटुंब होती, मुलं भरपूर होती. मुलं काय करतायत हेही पालकांना माहीत नसायचं. पण आता तसं करून चालत नाही. मुलांचा सारा ताण पालकांवर असतो. त्याचं शिक्षण, आपलं करिअर सांभाळताना नाकी नऊ येतात आणि मग परिस्थिती तणावपूर्ण होते. आता आपलं सारं लक्ष पैसा, पोझिशन यात असतं.

मनाची ताकद त्यासाठी कमी पडतेय. त्यामुळे आता लोक जास्त प्रेशरखाली असतात. दीदी म्हणतात, की लोकांना वाटतं देवाचं नाव घेतल्याने देव माझं काम करेल, पण तसं नाही.

नाव घेतल्याने देव तुमच्यातील ते काम करायची ताकद वाढवेल. ‘मी’ जेव्हा ‘आपण’मध्ये बदलेल तेव्हा खूप चांगले बदल होतील. तुम्ही जितके प्रेम द्याल, तितका आनंद तुमच्या वाट्याला येईल.

रागाने जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या गोष्टी समोरच्यासाठी अपमानकारक आणि अव्यावहारिक होतात. ज्यामुळे नाती तुटू शकतात. त्यामुळे बोलण्याच्या आधी विचार करावा. आणि आपल्यात सकारात्मकता वाढवा.

हल्ली आपल्या जीवनात मोबाईल, टीव्ही यांना अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. त्या म्हणतात, उठल्यानंतर एक तास तुम्ही मेडिटेशन किंवा सकारात्मक असं वाचन किंवा व्यायाम या गोष्टी केल्यात तर त्याचा तुमच्या दिवसावर चांगला परिणाम होईल.

तसेच झोपण्याच्या आधी एक तास ही सर्व साधनं बाजूला ठेवून, अगदी कामकाज सुद्धा बंद ठेवून थोडा वेळ स्वत:साठी काढला तर तो आपल्याला फायद्याचा ठरू शकेल. खाण्याचं डाएट आपण पाळतो, पण मनाचं डाएट पाळतो का??

तर अशा या शिवानी दीदींनी २००७ पासून आध्यात्मिक शिक्षण देणं सुरू केलं. अनेक समाजसेवा कार्यात सुद्धा त्या कार्यरत आहेत. २०१४ मध्ये ‘वुमन ऑफ द डिकेड अचीवर’ हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

२०१८ मध्ये त्यांना राष्ट्रपतींकडून ‘नारीशक्ती सम्मान’ पुरस्कार देण्यात आला. त्यांची पुस्तके ‘मेरा सुख किस के हाथ’ आणि ‘हॅपिनेस अनलिमिटेड’ खूप लोकप्रिय झाली आहेत.

शिवानी दीदींचे विचार आणि त्यांचे शांत, सौम्य बोलणं ऐकलं की, आपल्या मनात काही राग, अशांतता असेल तर नक्कीच निघून जाईल. एकदा तरी त्यांचे विचार नक्कीच ऐका. तुमचं जीवनही सकारात्मक होऊन जाईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

2 Responses

  1. Nitin Motghare says:

    excellent

  2. Saiprasad Prabhakar Panhalkar says:

    🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!