रंगभूमी – व्यक्तिमत्व विकासाचं गुरुकुल….

माणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवते रंगभूमी, रंगभूमीच माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा मतप्रवाह आणि अनुभव सर्वश्रुत आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समाज वृद्धिंगत होत असतो. त्याचं प्रभावी मध्यम म्हणजे “रंगभूमी”.

नाट्यकला

Marathi Rangbhumanchसंवाद, संगीत, व नृत्य’ या तीनही कलांचा अंतर्भाव ‘नाटक’ या एकाच कलेमध्ये असल्याने भारतामध्ये ‘नाट्यकला’ ही सर्वात जास्त ‘जोपासली, रुजवली व समृध्द’ गेली आहे. ‘लेखन दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, नृत्यकला’ अश्या सर्वच कलागुणांना यात पुरेपूर वाव मिळत असल्यानेच सामान्यातल्या सामान्य ‘प्रेक्षक व रसिक’ यांच्याशी थेट संवाद साधून सामाजिक विषयांना सक्षमपणे सादर करण्याच्या या कलाकृतीला चहूबाजूंनी प्रतिसाद मिळत गेला आहे. ‘रंगकर्मी व प्रेक्षक’ यांची ही देवाणघेवाण नाट्यकलेच्या बहराला नेहमीच पूरक ठरली आहे. १५० वर्षांची परंपरा असलेल्या या कलेची दखल सरकार दरबारी सुयोग्यपणे घेतल्यानेच ‘बालनाट्य, कामगार कल्याण व राज्यनाट्य’ या माध्यमातून सर्वच वयोगटातील, विविधांगी व आर्थिकस्तरातील कलावंतांना ‘रंगमंच’ उपलब्ध्द करून देण्यात आला आणि या कलेला एक सन्मान प्राप्त झाल्याचं दिसून येतं.

नाट्यानुभव

नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अनुभव मिळत असतो. मग हे अनुभव घेणं, त्याची साठवण करून त्याची पुनर्निर्मिती करणं व प्रेक्षकांना या पुन:प्रत्ययाचा आनंद देणं ही रंगभूमीवरच्या सर्व कलाकारांची जबाबदारी होय. एखादा विचार, थॉटप्रोसेस लेव्हलवर असतांना कलाकारांना तो एक चॅलेन्ज व त्याचं सादरीकरण प्रेक्षकांच्या आकलनशक्तीला गिअरअप करून अच्युतम आनंद देत असतो. प्रेक्षक हा निव्वळ मनोरंजनासाठी प्रेक्षागृहात दाखल झाला असतो आणि त्याला आपल्या विषयाकडे ‘आकृष्ट, बंदिस्त व संमोहित’ करणे ही नाट्यकलावंतांची जबाबदारी असते. त्यासाठी लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, कास्टिंग, शब्दसामर्थ्य, अभिनय यासर्वांसह कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये अप्रत्यक्ष असा एक संवाद व्हायला लागतो आणि त्या कलाकृतीचा एकत्रित परिणाम होवून प्रेक्षक रंगमंचाशी एकरूप होतात. एकदा का रासिकांची ही तादात्म्यता पावली की मग लेखक प्रेक्षकांशी संवाद साधून मूळ विषयाची उकल त्यांच्यासमोर मांडून प्रतिसाद प्राप्त करतो. हा प्रतिसाद म्हणजेच पसंती किंवा शाबासकी होय.

रंगभूमी आणि माणूस….

Marathi Dramaमाणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवते रंगभूमी, रंगभूमीच माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा मतप्रवाह आणि अनुभव सर्वश्रुत आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समाज वृद्धिंगत होत असतो. त्याचं प्रभावी मध्यम म्हणजे “रंगभूमी”. माणसाच्या जडण घडणीत मोलाचा सहभाग असलेला वाहक म्हणजे “नाटक”. जगणार्‍या अगणित प्रकृतींची जिवंत अनुभूती देणारी आणि आत्मपरीक्षण समृद्ध करणारी एक संवेदनशील कला म्हणजे “नाटक”. मंच नाटकाचा असो वा आयुष्य, “प्रवास आणि अनुभव” सारखाच. किंबहुना “अनेक प्रवासांचा एकत्रित अनुभव” म्हणजे रंगमंच. ज्यांचं रंगभूमीशी नातं जुळलं गेलं ते खरे नशीबवानच! कारण त्यांना रंगदेवतेची सेवा करण्याची संधी मिळते व तो एक दैवयोगच म्हणावा लागेल. हौशी कलाकार ते रंगभूमीचा उपासक हा त्यांचा प्रवास त्यांच्यातील कलावंताला घडवतांनाच त्यांच्यातला माणसाला घडवत असतो. त्यांना विचारांनी, कलागुणांनी फुलवत प्रगल्भ करत असतो.

माणूसपणाच्या गोष्टी…..

सामान्य कुटुंबव्यवस्थेतून ‘जन्म, शिक्षण व संस्कार’ मिळवत अनेकजण रंगभूमीवर प्रवेश मिळाल्यानंतर आयुष्यात कधीही शिकायला न मिळणाऱ्या गोष्टी ‘सहज, नकळत व सवयीने’ शिकत जातात, घडत जातात आणि इतरांनाही घडवत जातात आपोआपच! रंगभूमीच्या माध्यमातून त्यांच्याकडे चालून आलेल्या संधी त्यांना परीक्षेसारख्याच असतात. विविधांगी व वेगवेगळ्या नाट्याकृतींतून उभ्या केलेल्या विविध भूमिकांमुळे त्यांना त्या त्या व्यक्तिरेखांची सखोल ओळख होते. ज्यामुळे “माणूस”; त्याचं “माणूसपण” ओळखणं त्यांना शक्य होतं.

rangbhumi-vyaktimtvaलेखकाचा उपन्यास, दिग्दर्शकाचा अभ्यास आणि ध्यास यातून प्रत्येकाची मानसिकता, विचारांची प्रगल्भता, शब्दांची आणि वाक्य रचनांची श्रीमंती मिळते. आयुष्यात कितीही मोठी भरारी मारली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती मिळते. लेखक व दिग्दर्शकाने समजावून सांगितलेली व रंगमंचावर चेहऱ्याला रंग लावून साकारलेली भूमिका आणि मूळ अस्तित्व यातला फरक समजतो. यामुळेच कदाचित कुठलीही भूमिका वठवतांना उच्चनीच भेद न मानता जीव ओतण्याची संधीही मिळते. रंगभूमीची सेवा ही एक सामुहिक वाटचाल असल्याने त्यातून वैयक्तिक विचार अलिप्त ठेवण्याची दीक्षा व प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांना संमोहित करण्याची विद्या मिळते. रंगमंचावर काल्पनिक पात्र साकारतांना परकाया प्रवेश करावा लागतो त्यामुळे दुसऱ्याचं मन, विचार, भावभावना समजून घेण्याची व आपल्यात सामावून घेण्याची सवय होते, क्षमता वाढते आणि तेच आपलं सामर्थ्यही असतं. एका ठराविक वेळात, ठराविक साच्यात व बंदीस्त कथासंहितेत उपलब्ध असलेली प्रत्येक बाब, वस्तू कशी केंव्हा कधी आणि किती वापरायची याची एक शिस्त लागते, कलाक्षेत्रातल्या इतरही अंगांचं सौंदर्य पारखण्याची दृष्टी, समूहाबरोबर चालतांना त्यातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा मंत्र मिळतो. स्वतःला विसरून जगण्याचा स्वतंत्र मार्ग मिळतो. व्यक्ति तितक्या प्रकृती असतात पण प्रत्येकाचा प्रत्येक प्रकृतीशी संबंध येतोच असं नाही. शिवाय कांही व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे सामान्य जीवनापेक्षा वेगळे असतात. अशांची आणि जे तुमच्या आमच्या आयुष्यात अनेकदा सहजपणे घडून जात असतं त्याची, प्रबोधनासाठी वा मनोरंजनासाठी, किंबहुना या दोन्हींसाठी केलेली एकत्रित-सुयोग्य-ठळक मांडणी म्हणजेही “नाटक”.

व्यक्तिमत्व विकासासाठी अजून काय हवं असतं? इतकं कुठे मिळू शकतं? फक्त इथेच!! म्हणून, हे ‘आयुष्य जगून पावलेल्या कलाकारांचं’, ज्या स्थानवर ते जगले आणि इतरांना जगवलं ‘त्या स्थानाचं रंगमंचाचं’, ज्यांच्यासाठी ज्यांच्यामधे जगले त्या ‘रसिकजनांचं’, ज्याच्या प्रेरणेनं हे साध्य शक्य झालं त्या ‘रंगदेवतेचं- नटराजाचं’.

कौटुंबिक, सामाजिक आणि वास्तव रंगभूमी….

नाटक हे प्रसाराचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा आपल्या संसारिक आणि व्यावहारिक कुटुंब व्यवस्थेशी अतिशय जवळचा संबंध असतो. जे नाटकात प्रत्यक्ष काम करतात ते तर त्या भूमिका जगतच असतात, आणि ते त्या जितक्या उत्कटपणे जागवतात तितक्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांना जगायला भाग पाडतात. नाटकात मनोरंजनाबरोबर शिक्षण आणि संस्कार हेही घटक तितकेच महत्वाचे असतात. विचारवंत दिग्गज लेखकांनी मांडलेले मौलिक-लाक्षणिक विचार; त्यांची भाषा, दिग्दर्शक आपली कुशाग्र निरिक्षण बुद्धी आणि कसब पणाला लावून अभिनेत्यांत उतरवतो. “पात्रांची देहबोली, त्याचा पोषाख, चेहर्‍यावरचे हाव भाव, शब्दांचे स्पष्ट-शुद्ध उच्चार, वाक्यांची फेक, व्यक्तिरेखेनुसार आवश्यक ते शिष्टाचार, भावनांचा योग्य अविष्कार होण्यासाठी आवाजाचे चढ-उतार, संभाषण चालू असतांना इतरांच्या चेहर्‍यावर उमटणारे तरंग-त्यांच्या सापेक्ष प्रतिक्रिया” ह्या सर्व गोष्टी “प्रसाराची विविध माध्यमं” असतात. ती अधिक प्रभावी होण्यासाठी अणि वातवरण निर्मितीसाठी “नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषा” ही तंत्र वापरली जातात. नाटकाची परिणामकारकता वृद्धिंगत करण्यासाठी, आधी सांगितलेल्या बाबींप्रमाणेच, “पात्रांची योग्य निवड, त्यांच्या रंगमंचावरील हालचाली, मंचावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा केलेला वापर, योग्य वेळी घेतलेल्या एन्ट्री-एक्झीट्स, वावरण्यातली सहजता” ह्या तितक्याच महत्वाच्या असतात.

रंगकर्मींच्या दैनंदिन दिनचर्येवर होणारा परिणाम……

* रंगभूमीशी निगडीत सर्व तंत्र व कलांची ओळख व उपयुक्तता कळते.
* रंग, प्रकाश, नाद, शिल्पनृत्य, शिल्प, चित्र, रंग, प्रकाश, संगीत यांच्या सोबतच्या सततच्या वावरामुळे आस्वादक सौंदर्यदृष्टी तयार होते.
* ज्येष्ठांचं लिखाण, श्रेष्ठांचं मार्गदर्शन यातून ‘भाषा-विचार-वृत्ती-वर्तन’ संस्कार घडतात.
* भूमिका करतांना नट ती प्रत्यक्ष जगत असतो. म्हणजेच लेखकाच्या विचारांची दिग्दर्शकाच्या दृष्टीतून संबंधित पात्रांशी देवाण घेवण करत असतो. असं करतांना ती सर्व पात्र आतून स्वानुभवत असतो, ज्याला “पर काया प्रवेश” असं म्हणता येईल, जो त्या व्यक्तिमत्वाविषयी आपोआप आस्था निर्माण करतो.
* परकाया प्रवेशाचं तंत्र गवसल्याने नाटक जेंव्हा नाटक वाटत नाही तेंव्हा आपण त्याला खरा अभिनय मानत असल्याने आपल्या वागण्या बोलण्यातला नाटकीपणा जाऊन सहजता आचरणात येते.
* रंगमंचाप्रमाणेच घरातीलही प्रत्येक वस्तू वापरलीच गेली पाहिजे अन्यथा तिचं नसणंच योग्य या संस्कारामुळे सुटसुटीतपणाची वृत्ती अंगी बाणते.
* रंगकर्मी आणि सामन्य माणूस यांच्यातील ‘घर लावणे’ या प्रकारात आपसूकच फरक लक्षात येतो.
* रंगमंचावरील जिथली वस्तू तिथेच व प्रसंगी उपलबध्द असण्याची सवय आपल्या घरातही रुजायला लागते.
* नाटकाच्या कुटुंबात प्रत्येकजण दुसर्‍यावर अवलंबून असतो, ही जाण रंगमंचाशी संबंधित प्रत्येक माणसाला असते. “सर्वांचा एकत्रित उत्तम मेळ म्हणजे उत्तम नाटक”. हीच भावना अंगवळणी पडून घरातही/दारातही काम करते आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची समज वाढीस लागते.
* तत्काळ मूड बदलणे हे फार मोठं कसब असतं. मनातली वादळं दडवून निवळलेलं वातावरण निर्माण करणं सुलक्षण असतं. मागच्या क्षणाला काय घडलं हे पुढच्या क्षणाला समजू न देणं हे नाटकात पडल्यावरच येतं. एक रडका प्रसंग करून विंगेत गेल्यावर दुसर्‍याच एन्ट्रीला; फ्लॅशबॅकचा वेगळाच आनंदाचा सोहळा उभा करावा लागतो त्याच कलाकारांना, लोकांच्या मनावर क्षणापूर्वी ठसवलेलं गांभीर्य पुसून !! असं नाही झालं तर हे दोन वेगळ्या दिवसांचे वेगळे प्रसंग आहेत / होते हे प्रेक्षकांना पचणारच नाहीत. “अशा वेळी आपल्या व्यक्तिगत भावना अलिप्त ठेवणं” हीच “प्रॅक्टीस” असते.
* प्रत्येक नाटक हे एक टार्गेट ओरिएंटेड प्रॉडक्ट असतं; आणि सर्व संच; ते यशस्वी करण्यासाठी एकाच देशेने एकाच ताकदीने आपली सर्व क्षमता पणाला लावून तत्परतेने काम करत असतो. एखादा जरी कुठे कमी पडला तरी नाटक अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. “असं रोमा रोमात भिनलेलं टीमवर्क, प्रत्यक्ष व्यवहारात खूपच सामंजस्य आणतं, आत्मविश्वास वाढवतं. “कामाची झिंग” नाटकच शिकवतं.
* प्रत्येकाच्या निसर्गदत्त व्यक्तिमत्वाला अनुसरून, दिग्दर्शक, त्याच्याकडून त्यात्यानुरूप विविध प्रकारची प्रेझेंटेशन्स करवून प्रयोग करत असतो. त्यातूनच कलाकाराला, “त्याला साजरं कुठलं” हे नकळत कळायला लागतं. प्रेक्षकांचा सत्वर मिळालेला प्रतिसाद हेच त्याचं खरं प्रशस्तिपत्र असतं, कारण ते उत्स्फूर्त आणि निरलस असतं.

सारांश

व्यक्तिमत्व विकासासाठी अजून काय हवं असतं? इतकं कुठे मिळू शकतं? फक्त इथेच!! म्हणून, हे ‘आयुष्य जगून पावलेल्या कलाकारांचं’, ज्या स्थानवर ते जगले आणि इतरांना जगवलं ‘त्या स्थानाचं रंगमंचाचं’, ज्यांच्यासाठी ज्यांच्यामधे जगले त्या ‘रसिकजनांचं’, ज्याच्या प्रेरणेनं हे साध्य शक्य झालं त्या ‘रंगदेवतेचं- नटराजाचं’. प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी नाटकाच्या जन्म प्रक्रियेचा पूर्णवेळ अनुभव घेतला पाहिजे कारण समृद्ध व सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी तो एक अत्यावश्यक संस्कार आहे. नाटक हे एक मनन, एक चिंतन, आणि प्रसंगी मेडिटेशनही असतं यात कुठेही अतिशयोक्ती नाही. “ज्ञान घेणं आणि ते सोपं करून सर्वसामान्यांना सहज कळेल असं देणं” हा तर नाटकाचा पायाच आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आदि संतांनी हेच केलंय, कदाचित वेगळ्या माध्यमातून!!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय