आपल्या खास व्यक्तींचे ‘मूड स्विंग्स’ सांभाळायचेत..?? मग त्यांच्या वागणुकीचा अंदाज आधीच लावून घ्या.. वाचा मूड ऑफ झाल्यावर कोण कसे वागेल..!!
स्त्री असो वा पुरुष कोणाचा मूड कधी बदलेल आणि नवरसांपैकी कोणता रस आपल्याला पाहायला मिळेल ते सांगता येत नाही.
खुशीत असलेली व्यक्ती लाडात येईल किंवा मजा मस्ती करेल, वैतागलेली व्यक्ती भांडण उकरून काढेल तर चिडलेली व्यक्ती कदाचित मारामारीही करेल.
कोणाच्या बदलत्या स्वभावाचा काय भरोसा..??! म्हणूनच ‘मूडी’ माणसांच्या तालावर नाचणे फारच अवघड असते.
आत्ता एक तर काही वेळाने दुसरे नाटक पाहायला मिळते.
म्हणजे आज ऑफिस मध्ये गेल्या गेल्या बॉस अगदी दिलखुलास कौतुक करतोय तर काही वेळाने तो आपल्याला बोलावून सतत आपल्याला आपण किती चुकतो हे दाखवतोय..
आज बायकोने सुग्रास जेवण बनवलंय पण ती रुसून बसल्याने जेवताही येत नाहीये.
लेकरू कसे मजेत आहे पण शाळेतून आल्यापासून काहीतरी बिनसलंय त्याचा थांगप्पात्ताच लागत नाहीये..
असे अनेक किस्से आपण रोजच अनुभवत असतो..
आनंदी, हसरी व्यक्ती कशी वागेल ह्याचा साधारण अंदाज अपण लावू शकतो.
अशी व्यक्ती आजूबाजूचे वातावरणही खेळी मेळीचे ठेवते.
मात्र कोणी नाराज असेल, उदास असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चालू असेल हे कळणे महाकठीण.
आणि मग अशा स्वभावाचा प्रसाद कोणाला ना कोणाला मिळतो आणि रंगाचा सगळा बेरंग होतो..
पण मंडळी ज्योतिषशास्त्र हे असे मजेशीर शास्त्र आहे ज्यात माणसाच्या जन्मवेळेची आणि ग्रहांची अशी काही गणितं मांडून ठेवलेली आहेत की ती एखाद्या व्यक्तीच्या स्वभावचित्रण जाणून घ्यायला एकदम उपयोगी पडतात.
अगदी तंतोतंत नाही जुळले तरी एखाद्या माणसाच्या स्वभावाचे एक ‘बिग पिक्चर’ आपल्याला नक्कीच दिसते.
इंग्रजी महिन्यांच्या जन्मतारखेवरून सन साईन्स वापरून सुद्धा आपल्याला माणसांचे चित्रविचित्र स्वभाव जाणून घेता येतात..
आता १२ राशींच्या १२ तऱ्हा आणि मग समोरच्याचेही कसे वाजतात १२..!!
तर मग आपण एक आयडियाची कल्पना करू.. प्र
त्येक राशीची व्यक्ती उदास झाल्यावर काशी वागेल ह्याचे ठोकताळे जाणून घेऊ आणि मग त्या व्यक्तीला ‘कूल’ अंदाजात हँडल करून, रिलेशनशीप एक्सपर्ट होऊन जाऊ..
तुमच्या लाडक्या व्यक्तीची रास कोणती म्हणता..?? बघा तर ती कशी वागेल..
१. मेष (मार्च २१- एप्रिल१९) : सांभाळा बरं.. मेषेची व्यक्ती चिडली असेल तर चिलखत चढवा अंगावर..
कारण आता मेष म्हटल्यावर ढुशीच देणार नाही का.. मंगळाचे वर्चस्व असणारी अग्नी तत्वाची ही रास म्हणजे अगदी तापट..
पटकन चिडणे आणि लालबुंद होणे ही मेषेची खासियत.. म्हणजे हा प्राणी शिंग मारायला मोकळा..
आता मेषेची बायको रागावली असेल तर नवऱ्याने जरा संयमानेच घ्यावे नाहीतर किचन मधून कधी भिरभिरत लाटणे डोक्यात बसेल भरोसा नाही हो..!!
म्हणून सांगतो मेषेची व्यक्ती चिडली असेल तर जास्ती नादी लागू नका.. दूर राहा.. त्या व्यक्तीच्या लाडात जायचा मोह ही टाळा..
२. वृषभ (एप्रिल २० – मे २०) : वृषभेची माणसे स्वतःवर त्रागा न करून घेणारी असतात..
त्यांचा मूड खराब असेल तर भवतालच्यांना फार काही त्रास नसतो. तर स्वतःच स्वतःला हील करतात..
म्हणजे एकदम ऑटोमॅटिक..!!! म्हणजे त्यांचा मूड ऑफ झाला तर ते निवांत बसतील.. मस्त पैकी स्वीग्गी, झोमॅटो सर्फ करतील.. स्वतःला मजेदार ट्रीट देतील..
वरती स्वतःलाच डेझर्ट, आईस्क्रीम असे दिलखूष आयटम पेश करतील.. स्वतःची बडदास्त ठेवतील..
जास्तीच मूड खराब असतील तर मस्त शॉपिंगलाही जातील हो ही मंडळी.. नवीन कपडे, बूट घेऊन स्वतःसाठी स्वतःच बिन मौसमी सांता क्लॉज बनतील..
बाकीच्यांना अंमळ शंकाच येईल की मूड खराब म्हणायचा की चांगला..!! आजच बघा शेजारीपाजारी कोणा वृषभाकडे जास्तीत जास्ती पार्सल आणि झोमॅटो वाले येतात का..??
३. मिथुन (मे २१ – जून २०) : वायू तत्वाची ही रास आणि ह्याची माणसे देखील तशीच अगदी ‘तुफानी’…
म्हणजे चक्रीवादळ आल्यावर कसे आपण त्यापासून दूर पळतो तसेच मिथुनेचे चक्रीवादळ आले की जरा लांबच राहिलेले चांगले..
त्यांच्या मनाचा कल थोडा जरी उदासीनतेकडे असला तर त्यांच्या वावटळीचं रूपांतर कधी वादळात होईल सांगता येत नाही हं..
नाही म्हणजे तुम्ही समजवायला जाल आणि स्वतःवरच खापर फोडून आणाल.
सो… जरा सावध असावे मिथुनेच्या मूडी माणसांपासून..!!
४. कर्क (जुन २१ – जुलै २२) : मूड स्विंगचा बरोबर अर्थ कोणाला बघून काढायचा असेल तर ते कर्क राशींचे लोक..
मूड स्विंग म्हणजे क्षणात येती सरसर क्षीरवे, तर क्षणात फिरुनी ऊन पडे असा स्वभाव.
कर्क राशीची माणसे देखील काहीशी अशीच.. मूड खराब झाला तर कोणाला त्रास द्यायचे नाहीत पण खेकड्या सारखे आपल्या आवरणाच्या आत स्वतःला दुमडून बसतील.
खूप वेळ नातलग, मित्रमंडळी ह्यांच्यापासून एकांतात जातील. हवा तेवढा राग काढून झाला, शोक व्यक्त करून झाला की मात्र हे पुन्हा माणसात येतात.
आनंदी आणि हवेहवेसे, पुन्हा पहिल्यासारखे..
म्हणूनच ह्यांचा मूड खराब असताना ह्यांना फक्त ‘मी टाईम’ द्यायचा की झालं काम…
थोडीशी वाट पहायची की आपला माणूस बॅक ऑन ट्रॅक..!!
५. सिंह ( २३ जुलै – २२ ऑगस्ट): सिंहाचा मूड खराब म्हणजे संपूर्ण जंगलाचे धाबे दणाणून सोडणार..
सिंहेची माणसे अशीच असतात मजेत असले तर राजा माणूस आणि बिनसले तर जंगली जनावर..
बघा हं ह्यांच्याशी पंगा नकोच आणि मूड खराब असेल तर संभाळूनच..!!
एकदा का ह्यांचे डोके सरकले कोणावर तर हे त्या व्यक्तीला सळो की पळो करणार.
आजूबाजूच्या, लांब वरच्या अगदी सोशल मिडियावरच्या अदृश्य लोकांनाही त्यांचा मूड खराब असण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरन कळेल ह्याची काळजी ते स्वतःच घेतात..
आणि हे राईचा पर्वत देखील करतात म्हणूनच रागावलेल्या सिंहापासून ‘वन हॅन्ड डिस्टन्स’ वर राहिलेले उत्तम..
६. कन्या (२३ ऑगस्ट – २२ सप्टेंबर): पृथ्वी तत्वाच्या ह्या राशीचा स्वामी आहे बुध..
त्यामुळे बुधाचा अंकुश असणारी माणसे वाक्चातुर्य असलेली…!! ह्यांचा चांगला मूड सुद्धा डेंजर असतो बरंका..
तर मग खराब असेल तर काय होईल..?? विचारच करायला नको.. अतिशय फटकळ आणि दुसऱ्यांवर पटकन विश्वास न दाखवणारे कन्येचे लोक मूड खराब असताना कधी तुमचा मूड खराब करतील सांगता येत नाही..
त्यांचे तिरकस बोलणे जिव्हारी लागते म्हणून ह्यांच्याशी वचकूनच राहिलेले बरे.. पण भारी मूड असेल तर अतिशय चार्मिंग असलेले सुद्धा कन्येचेच बरं का..!!
७. तूळ (२३ सप्टेंबर – २२ ऑक्टोबर) : गोडबोले आडनावाची माणसे सुद्धा कधी तरी गोड बोलणार नाहीत पण तुळेची माणसे सतत गोड बोलणारी..
सगळ्यात चतुर रास म्हणजे तूळ.. ही माणसे त्यांच्या बोलण्यासाठी, सुहास्य वदनासाठी सुप्रसिद्ध असतात.
वैतागलेली असताना किंवा मूड खराब असताना सुद्धा ते अत्यंत ग्रेसफुल वाटतात. मात्र त्यांची पूर्ण सटकली की ते बाजीराव सिंघम असतात..
एरवी पोलाईट असलेली तूळेची माणसे चिडल्यावर तुमच्यावर बरसतात.. वायू तत्वाचा अग्नी रस असल्याने त्यांना रागही पटकन येतो, मूड ही पटकन ऑफ होतो..
पण समोरच्याला आपल्या कह्यात घेणे ही त्यांना चांगलेच जमते.. तूळेला गंडवणेही अवघडच असते बरं.. समोरच्याचा भूगोल इतिहास ते चांगलेच जाणून असतात..
८. वृश्चिक (२३ ऑक्टोबर – २१ नोव्हेम्बर): खतरनाक हा शब्द ज्यांच्या साठी बनला असेल ती म्हणजे वृश्चिकेची माणसे. चिडले की संपले.
म्हणजे जगात कोणा संतापलेल्या माणसाच्या समोर जाणे चांगले नाही ते म्हणजे वृश्चिकेची माणसे.
तुम्ही खोडी काढलीत तर खैर नाही.. ते तुम्हाला पताळातूनही शोधून काढतील. पळता भूइ थोडी करून अशी शिक्षा देतील कि परत तिकडे जायची तुम्हाला सोय राहणार नाही.
म्हणजे वृश्चिकेच्या शिक्षकांपासून तर विद्यार्थ्यांनी संभाळूनच राहावे. वृश्चिकेची माणसे रागावली की आपल्या गुन्हेगाराला सुळावर चढवल्याशिवाय राहत नाहीत. हो त्यांच्या आडव्यात जाणारा हा त्यांच्यासाठी गुन्हेगारच असतो बरंका.
त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीत. तुमचा बदला कसा घेता येईल हे त्यांना चांगले ठाऊक असते त्यामुळे त्यांचा नादच न केलेला बरा..!! नाहीतर विंचू जोरदार डंख मरेल बघा.. पण त्यांच्याशी चांगलं राहाल तर मात्र प्रेम ओसंडून वाहील!
९. धनु (२२ नोव्हेंम्बर – २१ डिसेंम्बर) : शांत, बुद्धिमान आणि आशावादी धनु राशीची माणसे चिडली – रागावली आहेत ह्यावर कोणाचा पटकन विश्वासच बसत नाही.
मात्र चिडल्यावर ते मेषेच्या माणसासारखे तीव्र असतात. अतिशय स्पष्टवक्ते असल्याने रागाच्या भरात जे बोलतील ते अतिशय स्पष्ट असते पण तिरासारखे मनाला लागणारेही..!!
त्यांच्या खरेपणामुळे त्यांना दाबून टाकणे कोणालाच शक्य होत नाही. त्यांचा खराब मूड पट्कन निवळतो मात्र त्यांचे बोलणे कायम लक्षात राहते.
१०. मकर (२२ डिसेंम्बर – १९ जानेवारी) : तसेही फार काही मवाळ, प्रेमळ किंवा मैत्रीपूर्ण नसलेली ही रास अतिशय निरस असते.
हे सगळ्यांनाच माहीत आहे. ते आनंदात सुद्धा फार काही भावनांना वाहवत जाऊ देत नाहीत..
त्यातून चिडले तर ते अजूनच थंड प्रवृत्तीचे बनतात. अतिशय गूढ आणि अजिबात माफी न देणारे असल्याने ह्यांना न डीवचणे उत्तम..
त्यांचा मूड खराब झाल्यास ते निराशवादाला कवटाळतात.. आणि अजूनच हट्टी बनतात.. मकरेला सांभाळणे एकूण अवघडच..
११. कुंभ (२० जानेवारी – १८ फेब्रुवारी): तसे बऱ्यापैकी सोशल असणारी कुंभची माणसे स्वतः चा मूड खराब आहे हे मान्यच करत नाहीत.
पण त्यांना त्यांचा खराब मूड स्वतःहून पटकन ठीक करताही येत नाही. त्यामुळे ते खूप उदास होतात.
कित्येक तास विचारच करत राहतात. अत्यंत अस्वस्थ होतात आणि त्यांना परत नॉर्मल व्हायला बराच वेळ लागतो.
त्यामुळे त्यांनी स्वतःला सांभाळणे खूप महत्वाचे असते. स्वतःचा मूड खराब होईल असे काही न करता सतत माणसे भवताली जमवून आनंदी राहणे उत्तम..
१२. मीन ( १९ फेब्रुवारी – २० मार्च): जर तुमच्या बायकोला तुम्ही रागवून म्हणालात की जा रडत बस तिकडे कोपऱ्यात आणि ती खरंच तुम्हाला तसे करताना दिसली तर समजून जा की ती मीनेची आहे.
पटकन भावनाविवश होऊन मुळूमुळू रडणारी जल तत्वाची अशी ही मीन रास..
मीनेची माणसे पटकन उदास होतात. ते त्यांच्या कोशात जातात आणि स्वतःलाच मानसिक आणि शारीरिक त्रास करून घेतात.
बहुदा उदास गाणी लावून मद्याचे प्याले रिचवणारा देवदासही मीन राशीचाच असावा नाही का..?? तसे ही माणसे सरळ मनाची असल्याने त्यांना भावतालचे आभासी जगही खरेच वाटते.
तुमच्या आजूबाजूच्या मीनेच्या माणसांना खास सांभाळा हं.. नाहीतर गंगा जमुना सतत डोळ्यात राहतील उभ्या..!!
तर मंडळी अशी गमतीशीर माणसे तुमच्या आजूबाजूलाही असणार.. आता त्यांच्या राशी माहीत करून घ्या म्हणजे कोणाला कसे हाताळायचे किंवा कोणापासून लांब पाळायचे त्याचा अंदाज तुम्ही अगदी एखाद्या एक्स्पर्ट सारखा घेऊ शकाल..!!
तुमच्याही भवताली अशी मजेशीर माणसे असतील तर त्यांचे भन्नाट किस्से आम्हालाही कळवायला विसरू नका…!!
Image Credit: https://tophealthjournal.com/
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.