इतर देशांच्या तुलनेत भारतात स्त्रियांना एकल पालकत्व कठीण का जाते..?

पालकत्व म्हणजेच जबाबदारी.. लेकरांची काळजी घेणे हे आई बाबांचे आद्य कर्तव्य..

मुले करती सवरती होई पर्यंत आई वडील आपापल्या परीने, आपापल्या पद्धतीने त्यांची काळजी घेत असतात.. एकदा ती पाखरं घरट्यातून उडून गेली, आणि आपापल्या मार्गाला लागून यशस्वी झाली की पालक असण्याचे सार्थक होते..

लग्न झाल्यावर जोडीदार आणि कालांतराने आपल्या मुलाबाळांचे पालक म्हणून आयुष्य व्यतीत करणे ह्यावरच भारतातील विवाहसंस्था उभी आहे..

पण खरंच का हे पालकत्व इतके सोपे आहे..?? बाळाची चाहूल लागल्यापासून त्याचे संपूर्ण पालनपोषण होई पर्यंत अनंत अडचणी येतात आईला वडिलांना.. पण एकमेकांच्या साथीने ते सगळ्या अडचणींवर मात करतात..

जो पर्यंत एकमेकांची साथ असते तो पर्यंत, अडचणी असल्या तरी, सगळे सुरळीत होऊ शकते… मात्र एखाद्या जोडीदाराच्या नसण्याने सगळे गणित चुकते..

तरीही भारतामध्ये घटस्फोटित किंवा विधुर पुरुषांसाठी नेहमीच वेगळे नियम लागू झाले आहेत..

असे पुरुष जरी एकटे पालक (सिंगल फादर पेरेंट) असले तरी सिंगल मदर पेरेंटच्या तुलनेत त्यांचे आयुष्य खूपच सोपे असते..

दुसरे लग्न करून, मागचे सगळे विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणे हे देखील त्यांच्या साठी जगन्मान्य असते आणि अतिशय सहजतेने करू ही शकतात..

मात्र स्त्री साठी मग ती घटस्फोटित असो, विधवा असो किंवा अविवाहित असो.. आजच्या घडीला, एकविसाव्या शतकातही, ‘सिंगल मदर पेरेटिंग’ भारतात अतिशय अवघड आहे..

इतकेच नाही तर तोपर्यंतची स्थिती सुद्धा भारताच्या सामाजिक जडण घडणीनुसार तिच्यावर अनन्यानेच आणलेली असते याचीहि कित्येक उदाहरणे आहेत.

पुढेही इतर देशात सहजतेने आयुष्य व्यतीत करणे शक्य आहे.. भारतातील विवाहसंस्था, पुरुषप्रधान संस्कृती आणि जनसामान्यांची विचार शक्ती हे सगळेच घटक एका स्त्रीला, तिच्या विश्वाला, तिच्या महत्वाकांक्षेला आणि तिच्या आयुष्याला नियंत्रित करतात.. किंवा तसा आटोकाट प्रयत्न तरी करतात.

आणि ह्यात पुरुषांची आणि कित्येक स्त्रियांची कुंठित विचारसरणी देखील समाविष्ट आहे.. परंपरावादी स्त्रिया सुधारलेल्या विचारसरणी कडे पाठ फिरवतात आणि आपल्याच सारख्या स्त्रियांचे पंख कापतात..

मग विचार करा एखाद्या स्त्रीला एकेरी पालकत्व किती अवघड असू शकेल..?? अर्थात सरकारी नियम, संविधानातील तरतुदी तिच्या बाजूने नक्कीच आहेत.. पण तेही फक्त कागदोपत्री!!

आपल्या आजूबाजूला अशी कित्येक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.. एक स्त्री जीचा नवरा मिलिटरी मधला जवान, बॉर्डर वर शाहिद होतो आणि लहान वयात २ मुलांचे पालनपोषण करायची जबाबदारी तिच्यावर येते..

किंवा एखादी घटस्फोटिता नोकरी सांभाळत आपल्या लेकरांना मोठे करू बघतेय.. अशा स्त्रियांना अनंत अडचणी असतात.. अर्थात त्या जगासमोर कोणीच मांडत बसत नाही..

तरीही आज अशा स्त्रियांची आयुष्यातली स्ट्रगल काय असते इतकेच नाही तर त्यातला ८० टक्के भाग हा समाजातल्या इतर प्रथापित म्हंटल्या जाणाऱ्या वर्गाने किंवा काही प्रमाणात प्रशासनाने अगदी विनाकारण निर्माण केलेला असतो.

काही एकल माता किंवा मुलं नसलेल्या, पण एकट्या राहणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवातून त्यांना कोणकोणत्या प्रकारची अडचण येते ह्या बाबतीत आम्ही थोडे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत..

१. दोन्ही पालकांचे एकत्रित काम करावे लागणे:

काही कारणाने स्त्री एकटी पडली असल्यास तिने दुसरा विवाह करणे अपेक्षित असते.. मात्र हे म्हणावे तितके सोपे नाही..

आधीचा बरा वाईट अनुभव किंवा आधीचे उत्तम नाते ह्या दोन्ही गोष्टी स्त्रीला नवीन नात्यापासून दूर ठेवतात.. मुले लहान असल्यापासून इतरांचे वडील आहेत पण त्यांचे का नाहीत?

ह्या प्रश्नांची उत्तरे देत तिला मुलांचे सगळे लहानपण निभवावे लागते.. मुलांच्या मानसिक, भावनिक, आर्थिक सर्व गरजा एकाकी पूर्ण कराव्या लागतात.

या संदर्भात औरंगाबादच्या मानसीची (नाव बदललेले आहे) प्रतिक्रिया बोलकी आहे. ती सांगते,

माझी मुलगी लहान असताना शेजऱ्या-पाजाऱ्यांकडून तिला विचारला जाणारा प्रश्न असायचा कि, तुझे बाबा कुठे असतात??

खरंतर हा प्रश्नच एका लहान मुलाचे भावनिक विश्व् ढवळून काढणारा आहे, इतका साधा विचार जरी लोक करू शकले तरी कित्येक गोष्टी सहज सोप्या होऊ शकतील.

सिंगल मदर पेरेंट असली तर तिला वडिलांच्या जबाबदऱ्याही पार पाडाव्या लागतात.. अशात घरच्यांची आणि समाजाचीही सोबत आवश्यक आहे.. ते नसेल तर खूपदा आईची पालक म्हणून जबाबदारी खूपच वाढते..

२. सुरक्षितता मिळवणे अत्यंत कठीण जाते:

नवरा असताना मिळणारी भावनिक, शारीरिक आणि सामाजिक सुरक्षितता नवरा आयुष्यातून गेल्यावर नाहीशी होते.. स्त्रीला मुलांसाठी एकटीनेच किल्ला लढवावा लागतो..

त्यात कामावरच्या माणसांच्या शिकारी नजरा, शेजाऱ्यापाजाऱ्यांचे विखारी शब्द आणि घरच्यांचीच फिरलेली पाठ ह्या सगळ्यातून जात असताना स्त्रीला अत्यंत असुरक्षित वाटते.

सुरक्षा फक्त तिचीच अवघड नसते.. तर तिच्या मुलांसाठीही समाज असुरक्षित बनतो.. यातून यशस्वी किंवा आर्थिक परिस्थिती उत्तम असलेली स्त्रीही सुटू शकत नाही तर गरीब आणि अशिक्षित बायकांची अवस्था तर अक्षरशः दयनीय होऊन जाते.

त्यातून घटस्फोटिता असल्यास आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीच तिचे लग्न टिकवायला अपयशी ठरते अशीच समजूत समाजात मान्य असते..

एकटे राहणाऱ्या स्त्रीचे चारित्र्य हा कायम संशयाचा विषय ठरवला जातो.. हे पुरुषांच्या बाबतीत भारतात तरी घडताना दिसत नाही.. आणि त्यांच्या चारित्र्यावर संशयही घेतला जात नाही.. मुळात ‘चारित्र्य’ भारतात फक्त स्त्रियांसाठीच वापरला जाणारा आहे.

तिने एकटीने राहणे जणू लबाड पुरुषांसाठी उघडी तिजोरीच.. स्त्री विवाहित असो की विधवा, कित्येक पुरुष तिचा उपभोग घ्यायला आसुसलेले दिसतात.. अशा बीभत्स नजरांना आणि इशाऱ्यांना टाळत आयुष्य काढणे किती अवघड असेल..??

 ३. लोकांचा अविश्वास हा सिंगल मदर असल्याची मोठी शिक्षा:

कित्येक ठिकाणी एकल माता असलेल्या स्त्रियांना भाडेतत्वावर घर मिळणे दुरापास्त होऊन जाते. कारण काय? तर एकटी स्त्री आहे मग रिस्क कोण घेणार..?? म्हणजे नवऱ्याच्या आधाराशिवाय तिचे जगणे जणू पापच..

याविषयी पुण्यात खाजगी कम्पनित नोकरी करणारी संगीता सांगते,

मी नोकरीसाठी जालन्याहून पुण्याला शिफ्ट झाले असता मी आणि माझी लहान मुलगी अशा आम्ही दोघीच असल्याने ‘आम्ही पूर्ण कुटुंबालाच घर देऊ शकतो’ या सबबीवर मला राहण्यासाठी घर सुद्धा मिळू शकत नव्हते.

अशी जर परिस्थिती असेल तर सरकारने भाडे करार कायद्यात सुधारणा करून या प्रकारांना आळा घालणे घालणे शक्य नाही का?

काही शाळांमध्येही वडील नसलेल्या मुलांना पट्कन ऍडमिशन मिळणे अवघड झाले आहे.. नवी मुंबईतल्या एका नावाजलेल्या शाळेच्या प्रिन्सिपलने सिंगल मदरच्या मुलास चारित्र्याचे कारण देऊन ऍडमिशन देण्यास मनाई केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर गेल्या वर्षभरातच तुम्ही पहिला असेल.

ही समाजाची विचारपद्धती सिंगल मदर्स साठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी खूपच जीवघेणी ठरते..

४. सरकारी कामे, कागदपत्रे करवून घेणे म्हणजे परीक्षाच:

एकट्या महिला पालकाला बऱ्याच कारणांसाठी सरकारी ऑफिसेसच्या चकरा माराव्या लागतात.. नवरा नसल्यामुळे काही कागदपत्र बनवून घायचे झाल्यास सिंगल मदर्स साठी एक मोठी परीक्षाच असते..

शाळा, कॉलेजच्या ऍडमिशन, स्वतःचे किंवा मुलांचे नाव बदलून घेणे, जात प्रमाणपत्र आणि अजून असंख्य डॉक्युमेंट्स बनवताना अजूनही अडचणी येतात..

भले त्यांच्यासाठी कित्येक नियम भारतात अस्तित्वात आहेत पण त्याची माहिती साखळीतल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचलेलीच नसते.. अशी जनता संपर्क खुर्चीवर बसलेली, माणुसकीचा लवलेशही नसलेली माणसे मुद्दाम स्त्रियांना ऑफिसचे खेटे मारायला भाग पाडतात.. हे कितपत योग्य आहे..??

या विषयी नाशिकहून स्वाती तिचा पासपोर्ट ऑफिसमधला अनुभव सांगते,

मी माझ्या आणि माझ्या मुलाच्या पासपोर्ट साठी जेव्हा नाशिकच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये, आधीची ऑनलाईन असलेली प्रक्रिया पूर्ण करून गेले तेव्हा माझ्या मुलाचे पासपोर्ट इश्यू करण्यासाठी पासपोर्ट ऑफिसरने विनाकारण आढेवेढे घेतले.

मी जेव्हा इ-मेल द्वारे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला (जेथे पासपोर्ट देण्याचे अधिकार आहेत) तक्रार केली तेव्हा आधी दाखवलेल्याच कागदपत्रांच्याच आधारे माझे काम होऊ शकले.

मी टॅक्स भरते तेव्हा प्रशासनात कुठल्यातरी खुर्चीवर बसून कोणी विनाकारण मी सिंगल आहे म्हणून माझी अडवणूक करू शकतं हे या देशासाठीच लाजिरवाणं नाही ये का?

भारतात १३-१४ लाखांच्यावर एकट्या महिला पालक आपल्या मुलांबरोबर राहतात.. त्यातील कमावत्या स्त्रिया टॅक्स देखील भरतात.. म्हणजेच देशाच्या, समाजाच्या प्रगतीत त्यांचेही योगदान असते.. मात्र ह्या सगळ्यांच्या बदल्यात आपण त्यांना काय देतो..??

समाजाची संवेदनशीलता नेमकी ह्यांच्या बाबतीतच का कुंठते..?? समाजातील कित्येक ओघांना आपण मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न करतो.. मग सिंगल मदर्स ह्या विषयाला इतका दुजाभाव का..??

भारतातील एकांगी महिला पालकांचे सर्व्हे घेतले असता बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत..

जसे कोणाच्या मुलांचे पासपोर्ट बनवतांना अडवणूक झाली.. तर कोणा महिलेला नोकरीवर सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाली नाही.. ज्याचे कारण हे दिले गेले की HR पॉलिसीज प्रमाणे सिंगल मदर्स ना जॉब देणे कंपनीला अमान्य आहे..

काही सिंगल पेरेंट महिलांची आणि त्यांच्या मुलांची पैशांसाठी फसवणूक केली गेली.. तर काही महिलांना दुसऱ्या लग्नासाठी वचन देऊन लुबाडण्यात आले..

ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तींना आळा बसला तरच सिंगल मदर्स साठी जगणे सुसह्य होईल. ह्या सगळ्या अपराधांच्या विरोधात स्त्रिया आवाज उठवत नाहीत असे नाही..

मात्र सगळीकडेच चांगला अनुभव येतो असेही नाही.. न्याय मिळवतानाही तिला स्ट्रगल करावेच लागते.. अशा वेळी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेकडून सहकार्य असणे गरजेचे आहे.

मग कसे आणि किती लढावे एकट्या स्त्रीने..?? तरीही काही लढवय्या असतात.. शेवटपर्यंत झुंजत राहतात.. तरीही असे जिणे त्यांच्या वाट्याला का यावे..??

हे आहेत ह्या दुर्गा भवानीच्या रुपातल्या स्त्रियांचे हाल तर, तर कित्येक परिस्थेतीने खचून गेलेल्या स्त्रियांच्या आणि त्यांच्या मुलांच्या मुलांच्या भविष्याचे काय?

भारतात स्त्रियांच्या बाबतीत बरेच जघन्य अपराध घडताना आपण ऐकतो. पण हे एक दिवस थांबायला हवे.. स्त्रिया स्वतःच स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत..

त्यातही एकल मातांच्या आणि स्त्रियांच्या बाबतीत वाईट म्हणजे काही स्त्रियाच अशा स्त्रियांचे पाय ओढण्यात धन्यता मानतात.. असा समाज सगळ्यांसाठीच घातक आहे..

स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक घटकाला बळ देणे हे भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.. त्यातही भारत सरकारने काही कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.. नियम कायदे कडक करणे आणि त्यांचे पालन होण्याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे..

नाहीतर नुसतंच “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः|” असं म्हणून दामिनी, निर्भया असे वेगवेगळे पथक काढून जोमात महिला दिन साजरे करायचे पण समाजात एका मोठ्या प्रमाणात असलेल्या वर्गाला दुर्लक्षित करायचे हे भारताच्या महान म्हणवल्या जाणाऱ्या संस्कृतीसाठी हास्यास्पद नाही का?

ImageCredit: Times Of India

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।